No products in the cart.
आपल्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे !
जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये होणाऱ्या तथाकथित कोरिया बिएनाले संदर्भात जो लेख आम्ही प्रसिद्ध केला आहे त्यावरून जेजेचे सद्याचे सर्वेसर्वा, तिथले काही शिक्षक आणि मंत्रालयातल्या तंत्रशिक्षण खात्यातले जेजेचा अधिभार असलेले अधिकारी कुणालाच जुमानत नाहीत हे उघड होतं . तसं नसतं तर हा तथाकथित बिएनाले आयोजित करण्याचं त्यांचं धाडस झालंच नसतं , इतक्या गोंधळाची परिस्थिती सध्या जेजेत आहे .
आधीच एक तर कोरोनानं विद्यार्थ्यांची तब्बल दोन वर्ष फुकट गेलेली .त्यातच शैक्षणिक वर्ष काहीसं साशंक वातावरणात सुरु झालेलं . ते कमी झालं म्हणून की काय विनाकारण डिनोव्होचा वाद निर्माण केला गेला .जागतिक कीर्तीचं १६६ वर्षाचं कॉलेज चालवायची पात्रता नाही आणि निघाले राज्य कलाविद्यापीठ स्थापन करायला असा एकूण तमाशा देखील उभा केला गेला . तशातच सीईटी परीक्षेचा घोळआणि निकालातले फेरफार . वर्गात शिकवायला शिक्षकच नाहीत . जे कंत्राटी होते ते गोत्यात आलेले , सरकारनं तासिका तत्वावर शिक्षक नेमायला सांगितलं तर त्या आदेशाकडे अधिष्ठातांनी चक्क कानाडोळा केलेला . शिक्षक वर्गात आले तर आले , नाही तर नाही . त्यांची मोठमोठाली कामं चाललेली त्यांना काय पडलीय विद्यार्थी शिकले काय आणि न शिकले काय त्याची . अशी एकूण परिस्थिती .
त्यातच विद्यार्थ्यांचा संप झालेला .त्यातनंच जेजेतल्या २५० ते ३०० मुलींसाठी जेजेत साधे टॉयलेट देखील नाही ही आत्यंतिक शरमेची गोष्ट बाहेर आलेली . हा संप डिनोव्होला विरोध करणाऱ्या शिक्षकांनीच घडवून आणलेला हे देखील लपून राहिलं नाही . या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘चिन्ह’च्या रिपोर्ट्सनी तर व्यवस्थापनाचे पुरते वस्त्रहरण केलेलं. अशा परिस्थितीत कुण्या शहाण्या माणसानं आपल्याला नेमून दिलेल्या कामावर लक्ष केंद्रित केलं असतं पण इथं शहाणपणाचीच वानवा असल्यानं आणि ठरवलेली उद्दीष्ट्यच उफराटी असल्यानं हा कोरियन बिएनालेचा घाट घातला गेलाय . आमच्या प्रतिनिधीने त्यामागची मोडस ऑपरेंडी अगदी स्पष्ट करुन सांगितली आहे .
पण आमचा आवाज बहुदा संबधितांपर्यन्त पोहोचत नसावा म्हणूनच आम्ही ‘ जे जे स्कूल ऑफ आर्ट ‘ या नावाविषयी ज्यांना ज्यांना आपलेपणा आहे , ज्यांना ज्यांना सहानुभूती आहे , जेजे हे नाव असंच वर्षानुवर्षे , शतकानु शतके अस्तित्वात राहावं असं वाटतं त्या साऱ्यांनाच आम्ही आवाहन करू इच्छितो की जो रिपोर्ट आम्ही प्रसिद्ध केला आहे तो आपल्या मित्र परिवारात जास्तीत जास्त शेअर करा . ज्यांना शेअर कराल ते आर्टिस्ट पाहिजेत असे काही नाही , ‘ जे जे स्कूल ऑफ आर्ट ‘ हे जादुई नाव ज्यांना ज्यांना ठाऊक आहे ( ‘जेजे ‘ हे नाव ठाऊक नसेल अशी व्यक्ती निदान भारतात तरी विरळाच ) अशा साऱ्यांनाच हा लेख आवर्जून पाठवा . त्यांना तो पुढे पाठवायला सांगा . तरच आता आपल्याला जेजे स्कूल ऑफ आर्ट वाचवता येईल . ज्यांनी ज्यांनी म्हणून जेजेची वैभवशाली शिक्षण परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्या साऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे . आणि ती करावयाची असेल तर ‘चिन्ह’चे जेजे संदर्भातले सारे लेख आपल्या आप्त मित्रांशी शेअर करा आणि उच्च व तंत्रशिक्षण खात्यावर दबाव निर्माण करा .तरच पडद्यामागचे हे सारे जेजेचे मारेकरी पडद्यापुढे येतील . त्यांना शिक्षा ही व्हायलाच हवी .आता जेजे संदर्भात जे काही करावयास लागेल ते ते सारे करावयाचेच एव्हडं एकच उद्दिष्ट्य आम्ही समोर ठेवलं आहे, आणि ते साध्य करण्यासाठी आम्हाला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे . देणार ना ?
– सतीश नाईक
chinha.in
Related
Please login to join discussion