No products in the cart.
लता मंगेशकर महाविद्यालय, माजी शिक्षणमंत्र्यांचा ‘उद्योग’ आणि कला संचालनालय
आज सायंकाळी सहा वाजता मुंबईच्या पु ल देशपांडे कला अकादमीत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे . आता ‘ चिन्ह ‘ च्या वाचकांना असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे की चित्रकला आणि लता मंगेशकर यांचा काय संबंध ? लता मंगेशकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वावर लिहून ‘ चिन्ह’ची चित्रकारांसाठीची जागा तुम्ही का वाया घालवताय ? पण तुमच्या आमच्यासारख्या सर्व सामान्य माणसांना पडणारे प्रश्न मागील सरकारातील तालेवार उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कधी पडले नाहीत म्हणून तर इथं या साऱ्या प्रकरणाचा समाचार घेण्याचीच वेळ आमच्यावर आली आहे .
सोबत प्रसिद्ध केलेली सदर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पहा . त्यात सर्वात तळाला ‘ आपले विनीत ‘ म्हणून आपल्या कला संचालनालयाचे ( प्रभारी ) संचालक प्रा विश्वनाथ साबळे यांचं नाव टाकलं आहे . याचा अर्थ उघड आहे की या कार्यक्रमाचे निमंत्रक आपले प्रिय ‘कलावंत कला संचालक’ (अर्थातच प्रभारी ) श्री साबळे हेच आहेत . ( पुरुषस्य भाग्यम , दुसरं काय ? ) आता तुम्ही अर्थातच आम्हाला विचाराल की लता मंगेशकर आणि कला संचालनालय यांचा संबंध काय ? तर हा प्रश्न या क्षेत्रात हयात घालवल्यावर आम्हाला देखील पडला आहे .पण आम्ही कोणाला विचारणार ? आम्ही चित्रकला विषयक ऑनलाईन नियतकालिकाचे संपादक असल्यामुळे आम्ही ठरवलं की सदर प्रश्न आता जाहीरपणं विचारायचा . निदान संध्याकाळी होणाऱ्या उदघाट्न समारंभात तरी या प्रश्नाचं उत्तर मिळावं.
लताबाईंचा आणि कला संचालनालयाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. त्यांनी कधी कला संचालनालय असलेल्या जेजे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरात पाऊल टाकलं असेल असं देखील ऐकिवात नाही. ( पण हा या परिसरात लताबाईंची गाणी जेजेच्या प्रत्येक पिढीनं अक्षरशः जीव टाकून ऐकली यात मात्र काही शंकाच नाही.) पण मग कला संचालनालयाशी लताबाईंचा संबंध जोडला कोणी ? असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे . तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मागच्या सरकारातले उच्च शिक्षण मंत्री आणि आताच्या सरकारातले उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी . त्यांचेच हे सारे उद्योग आहेत .लताबाईंचं स्मारक करण्याची चर्चा जेव्हा सुरु झाली तेव्हा ठाकरे सरकारातले उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अत्यंत चपळाई दाखवून स्मारकाचा प्रस्ताव कला संचालनालयाच्या ताब्यात घेतला आणि जेजे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरात लताबाईंचं स्मारक उभारण्याचा घाट घातला . एक वेळ तर अशी आली की मोठ्या उत्साहात ते चक्क जेजेच्या ऐतिहासिक डीन बंगल्यातच संगीत महाविद्यालय स्थापन करण्यास निघाले होते . तसं करता येणार नाही याची कुणीतरी त्यांना जाणीव करु दिल्यावर कुठे त्यांनी आपल्या उत्साहाला आवर घातला . आता हा उत्साह आणि ही चपळाई त्यांनी वेदांता प्रकरणात का नाही दाखवली असा प्रश्न जर तुम्ही विचारणार असाल तर आपल्या कानी सात खडे !
हेच सामंत साहेब डिनोव्हो संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावलेल्या जेजेच्या माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत ‘ डिनोव्होला मंजुरी दिली तर जे जे स्कूल ऑफ आर्ट कायमचेच केंद्र सरकारच्या पर्यायानं भाजपच्या म्हणजेच मोदी यांच्या हातात जाईल अशी भीती वारंवार उद्धव ठाकरे याना घालत होते . ही सांगोवांगीची गोष्ट नव्हे तर या साऱ्याला आम्ही जेजेचे माजी विद्यार्थी या नात्यानं आमंत्रित म्हणून प्रत्यक्ष उपस्थित साक्षीदारच होतो . अन्यही अनेक जेजेचे माजी विद्यार्थी आणि अधिकारी ( तसेच सी सी टीव्हीचे कॅमेरे ) तेथे उपस्थित होते . त्याच उद्योगी सामंतांवर नंतरच्या तीनच महिन्यात वेदांता प्रकरणात भाजप , मोदी वगैरेंची पाठराखण करावयाची वेळ यावी याला काव्यागत न्याय वगैरे म्हणावं का ? का हो सामंतसाहेब ?
कालचक्र उलटं फिरवून जेजेला सर्वोच्च डिनोव्हो दर्जा मिळवू न देण्याचा इतकंच नाही तर त्या ऐवजी कला विद्यापीठ स्थापन करण्याचा सामंतांचा महत्वाकांक्षी ( ? ) उद्योग सरकार कोसळताच बासनात बांधला गेला आणि तिकडे उद्योग मंत्री पद मिळवल्यावर देखील वेदांत प्रकरणात तोंडघशी पडावयाची नामुष्कीची वेळ सामंतांवर आली . चंद्रकांत दादांनी पदभार स्वीकारताच पहिल्या आठवड्यातच जेजेचा प्रश्न कायमचा निकाली काढला आणि ३०-३५ वर्षाच्या तुंबलेल्या साफसफाईस सुरवात देखील केली . त्यांना मोठं अडसर ठरणार आहे तो सामंतांनी जाता जाता करुन ठेवलेला हा संगीत महाविद्यालयाचा उद्योग . कसं ते पहा !
कला संचालनालयाची स्थापना झाली ती १९६५ साली . दृश्य कला आणि कला शिक्षणाच्या बाबींवर धोरणात्मक निर्णय घेणे , दृश्यकलेचे अभिजात व व्यावसायिक शिक्षण देणे , परीक्षा घेऊन पदविका प्रदान करणे , शालेय स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंत नियोजनबद्ध शिक्षण देणे , अद्यापनासाठी प्रशिक्षित कलाशिक्षक तयार करणे , दृश्य कलेचा प्रचार प्रसार व विकास करणे , दृश्य कलेतील कलावंतांना प्रोत्साहन देणे वगैरे वगैरे कला संचालनालयाची उद्दिष्टे ही कला संचालनालयाच्या सादरीकरणामधूनच घेण्यात आली आहेत . आता सांगा यात चित्रकला वगळता अन्य एका तरी कलेचा नुसता नामोल्लेख तरी दिसतो आहे का ? नाही ना ? मग हा अगोचरपणा केला कोणी तर अर्थातच तेव्हाच्या उच्च शिक्षण मंत्र्यानी म्हणजे उदय सामंत यांनी . तो करण्यापूर्वी त्यांनी कला संचालनालयाची नुसती उद्दिष्टय जरी वाचली असती तरी हा अगोचरपणा करण्याचं धाडस त्यांना झालं नसतं .कुणी जरी कोर्टात गेलं तर त्यांच्या या निर्णयाची अक्षरशः शकलं उडतील .
गेल्या ३५-४० वर्षात संबंधितांनी काय करायचं शिल्लक ठेवलंय कला संचालनालयात की लता मंगेशकर यांच्या सारख्या विश्वविख्यात कलावंतांच्या नावानं उभारलं जाणारं महाविद्यालय कला संचालनालयाच्या अखत्यारीत यावं ? खरं तर हा लताबाईंचा घोर अपमान आहे असं आमचं स्पष्ट मत आहे . ज्या कला संचालनालयाला गेल्या तीन दशकात कायम स्वरुपी कला संचालक भरता आलेला नाही. प्रभारी अक्कलशुन्य बाजार बुणग्यांकरवी कारभार चालवला जातो आहे . चार शासकीय कला महाविद्यालयातली सुमारे दीडशेपेक्षा अधिक प्राध्यापक – कलाशिक्षकांची पदं तीन दशकात भरलीच गेलेली नाहीत . कंत्राटी शिक्षकांकरवी कारभार हाकला जातो आहे . त्यातला एकेक किस्सा तर भयानकच . कायम स्वरुपी सफाई कामगाराला पगार काय तर म्हणे ६५ का ७५ हजार आणि विद्यार्थी घडवणाऱ्या कंत्राटी शिक्षकाला पगार किती तर फक्त २४ हजार . आता बोला ! जी परिस्थिती शिक्षकांबाबत तीच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत . तिथंही नेमणुकांबाबत ठणठणाट . इकडून तिकडून लोकं आणून कामकाज कसंबसं उरकलं जातंय . त्यांचेही एकेक भयानक किस्से. एक अधिकारी तर म्हणे वर्षानुवर्षे सोमवार ते शुक्रवार त्याच कार्यालयात राहतात .शुक्रवारी आपल्या गावाला निघून जातात . परत सोमवारी हजर . ते निदान कायमचे तरी आहेत , पण दुसरे तर कंत्राटी आहेत . सी ई टी चं म्हणे कामकाज संभाळतात पण वर्षानुवर्षे मुक्कामाला मात्र कला संचालनालयाच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये . खाणे ‘ पिणे ‘ झोपणे सारे तिथेच .( रस्तोगी साहेब आता तरी याची दखल घेणार का ? ) अशा गेली तब्बल ३०-३५ वर्षं भ्रष्टाचारानं संपूर्णतः बरबटलेल्या ठिकाणाहून लताबाईंच्या स्मरणार्थ काढल्या जाणाऱ्या महाविद्यालयाचं कामकाज चालणार असेल तर मंगेशकर कुटुंबीय आणि संबंधितांना फक्त शुभेच्छा देण्यापलीकडे आपण दुसरं काय शकतो? नाही का !
****
– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह’
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/KsGTWYH3K1YF2YZe8AADN2
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/ch
Related
Please login to join discussion