Editorial

षंढ !

गेल्या आठवड्यात बडोद्याच्या फाईन आर्ट कॉलेजात जे काही घडलं ते सुसंस्कृतपणाच्या कोणत्याही व्याख्येत बसणारं नाही. कोरोना लॉकडाऊन नंतर जरा कुठे सारं स्थिरस्थावर होत असताना किंबहुना व्यवस्थापनानं घेतलेला तातडीनं परीक्षा घेण्याचा निर्णय बहुसंख्य विद्यार्थ्यांना अमान्य असताना देखील आज्ञापालन करून ते कामाला लागले असताना, सर्व विभागाच्या ज्युरी – वायवा परीक्षा चालू असताना दोन – अडीचशे लोक अचानक कॉलेजमध्ये शिरतात आणि हातातले मोबाईल नाचवत ‘त्यातली चित्रं कुठे ?’ असे प्रश्न विचारून बळजबरीनं शोधाशोध करायला लागतात, आदळआपट करतात, आरडाओरडा करतात, आपटाधोपट करतात, हातवारे करतात, संतापजनक प्रश्न विचारतात, हे भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलमात बसतं ? यांना कुणी अधिकार दिला ? अमुक चित्र लावली आहेत किंवा नाहीत हे शोधणारे हे कोण ? दोन – अडीचशे लोकांचा जमाव असा एखाद्या कला महाविद्यालयात पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे शिरतो तरी कसा ? प्रदर्शनात लावलेल्या चित्रांमध्ये तो शोधाशोध करतो, विविध वर्गांमध्ये शिरतो, विद्यार्थिनींशी सुद्धा असभ्यपणे बोलतो, इतकंच नाही तर थेट अधिष्ठात्याच्या कार्यालयावर धडक मारतो, हे कृत्य केवळ निंद्य आणि संतापजनक आहे. जमाव तुमच्या सोबत आहे म्हणून कुणी कायद्याला असं फाट्यावर मारू शकत नाही, पण आपण राजकारणापायी झालेल्या ध्रुवीकरणातून आपल्यातली संवेदनशीलताच गमावून बसलो आहोत. हेच सत्य या घटनेत अधोरेखित झालं.

या साऱ्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत अक्षरशः धुळीला मिळाली आहे. एकतर लॉकडाऊनमुळे आयुष्यातली दोन वर्षे फुकट गेलेली, त्यात कॉलेज सुरु झाल्यानंतर लवकरात लवकर अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेण्याची केलेली घाई यामुळे आधीच संत्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांना या सर्व संतापजनक प्रकारानं निराशेच्या कडेलोटापर्यंत नेऊन ठेवलं आहे यात शंकाच नाही.

या सर्वच प्रकारचा आम्ही कडाडून निषेध करतो. ज्यांनी हे केलं त्यांना कायद्यानं कोणताही अधिकार दिलेला नाही आणि विरोधाभास म्हणजे ज्यांच्या हातात कायद्याची सूत्रं आहेत ते मात्र या सर्व प्रकारावर मूग गिळून गप्प बसले आहेत. हे भयंकर आहे ! काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं जमावानं याच संस्थेच्या वार्षिक प्रदर्शनावर हल्ला चढवला होता. त्या विद्यार्थ्याला पोलीस चौकशीस सामोरे जावे लागले होते. माध्यमांनी देखील ते प्रकरण खूपच उचलून धरलं होतं, पण राज्यकर्तेच जर अशा प्रकारांच्या पाठीशी असतील, तर कारवाई करायची कुणी कुणावर ? तेव्हा घडलेला साराच प्रकार राक्षसी मनोवृत्तीचं दर्शन घडवणारा होता. या क्षेत्रातले सारेच सुसंस्कृत कलावंत त्या प्रकारानं अस्वस्थ झाले होते. आज पुन्हा तीच वेळ त्यांच्यावर आली आहे. तेव्हा निदान ‘तथाकथित आक्षेपार्ह’ म्हणता येईल असं चित्र तरी तिथं होतं, पण यावेळी तर काहीच नव्हतं. भरपूर शोधाशोध करून तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या हाती काही एक लागलं देखील नाही, पण त्याबद्दल त्यांनी साधी दिलगिरी व्यक्त केल्याचं देखील ऐकिवात नाही. महाराष्ट्रातून तिथं शिक्षणासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याकडे चौकशी केली असता तो म्हणाला, ‘त्या मानानं महाराष्ट्रात आपण खूपच सुरक्षित आहोत. इथं जे काही घडलं, घडवलं गेलं ते सुसंस्कृतपणाच्या साऱ्याच सीमारेषा ओलांडणारं होतं ! हे असंच जर भविष्यात इथं घडत राहीलं तर इथं शिकावयास येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण मात्र निश्चित कमी होईल.’ आहे कुणाकडे यावर काही उत्तर ? संपूर्ण भारतातल्या कलाशिक्षणानं आता अधःपतनाचा अक्षरशः तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत बडोदा स्कूलकडूनच काही तरी अपेक्षा केल्या जात होत्या. ही जर परिस्थिती अशीच कायम राहिली तर मात्र उरलं सुरलं कला महाविद्यालय आणि त्यातलं शिक्षण देखील कालौघात वाहून जाईल यात शंकाच नाही.

या संदर्भात युट्युबवर उपलब्ध असेलेल्या काही क्लिप्स :

[wdo_ult_video wdo_video_url=”https://www.youtube.com/watch?v=d6vCeaBk8c8″][wdo_ult_video wdo_video_url=”https://www.youtube.com/watch?v=4Q11XGQXsS8&t=29s”][wdo_ult_video wdo_video_url=”https://www.youtube.com/watch?v=kdtzQ0eAYXM”]

Related Posts

1 of 4

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.