Editorial

कळवण्यास कारण की…

कळवण्यास कारण की…

आम्ही गृहीत धरला होता त्याहीपेक्षा अधिक वेळ ‘Chinha Art News’ सुविहितपणे सादर करण्यास आम्हाला लागला. आता सारे काम जवळजवळ मार्गी लागले आहे. डिजिटल माध्यमाचं एक असतं की, ते कधीच संपत नाही, कधीच परिपूर्ण वाटत नाही आणि मुख्य म्हणजे सततच तुम्हाला काहीतरी करावयास प्रवृत्त करत राहते. इथंही तसंच झालं. पण आता जे योजिलं होतं त्यातलं ७५% तरी काम पूर्णत्वास आलं आहे. उरलेलं काम पूर्ण होण्यास आणखीन आठ-नऊ दिवस नक्कीच लागतील. म्हणजेच बहुदा १ मेपासून त्याला पूर्णपणे नियमितता येईल.

रोज सकाळी उठल्याबरोबर किमान एक तरी महत्वाचा लेख आणि कमीतकमी दोन-तीन तरी बातम्या तुम्हाला वाचायला मिळाल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर विशेष लेख, सदरं, प्रदर्शनांचा साप्ताहिक आढावा हे सारे तर प्रसिद्ध होणारच आहे. या खेरीज जे जे म्हणून कलाजगतात नवेनवे घडेल त्याचे प्रतिबिंब या ‘Chinha Art News’मध्ये लागलीच पडेल याची आम्ही खात्री देतो.

मराठी वाहिन्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर जेजेचा प्रश्न आता अगदी ऐरणीवर आला आहे. वृत्तपत्रातून देखील त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. व्हॉट्सअप ग्रुपवर तर तावातावानं चर्चा झडू लागल्या आहेत. यासंदर्भात आम्ही एवढंच सांगतो की, ‘आम्ही जेजे अभिमत विद्यापीठाच्याच बाजूने आहोत !’ याचा अर्थ कुणाच्यातरी सुपीक डोक्यातून उगवलेल्या महाराष्ट्र कला विद्यापीठाच्या विरोधात आम्ही आहोत असा मुळीच नाही. ज्यांनी जेजेमध्ये कधीच कलाशिक्षण घेतले नाही किंवा ज्यांचा जेजेशी कधीच दुरान्वयानं देखील संबंध आला नाही अशांनी जरूर कला विद्यापीठासाठी लढा उभारावा. आम्ही त्यांची पाठराखण करूच, पण अभिमत विद्यापीठाला ते जर विरोध करणार असतील तर त्याविरोधात आम्ही निश्चितपणे लढा उभारू !

याची सुरुवात आम्ही नुकतीच केली आहे. यासंदर्भात जे लेख आम्ही प्रसिद्ध केले आहेत त्यावरून ते आपल्या लक्षात आलं असेलच. गेले जवळजवळ तीन-चार महिने आम्ही यासंदर्भात माहिती गोळा करत होतो. त्या साऱ्याचा उपयोग पुढील लेखांकांमध्ये करणार आहोत जेणेकरून जेजेमध्ये आज काय चाललं आहे याची कल्पना लोकांना यावी. यासंदर्भात वाचकांकडे काही विशेष माहिती असल्यास त्यांनी आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

‘चिन्ह’चा हा नवा अवतार तुम्हाला कसा वाटतोय ? ते मात्र अवश्य कळवा ! आणि हो.. आवडला तर आप्तमित्रांशी देखील शेयर करायला विसरू नका. यात कुठलंही व्यावसायिक अर्थकारण नाहीये. याचीही कृपया नोंद असू द्यावी. धन्यवाद !
सतीश नाईक
संपादक

Related Posts

1 of 4

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.