Editorial

 ‘चार्ज’शीट ?

जे जे स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्राध्यापक विश्वनाथ साबळे यांनी कलाशिक्षण क्षेत्रात किंवा चित्रकलेच्या क्षेत्रात असं कोणतंही कर्तृत्व गाजवलेलं नाही की त्यांच्यावर ‘चिन्ह’नं आपला अग्रलेख लिहावा.ते जे जे स्कूल ऑफ आर्ट या  १६५ वर्षाच्या जगविख्यात संस्थेचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग या संस्थेने निवडलेले अधिष्ठाता असल्यानं त्यांच्यावर लिहिणं ‘ चिन्ह’ला भाग पडलं आहे. त्यांची नेमणूक या पदावर कशी झाली ? अत्यंत गुणी आणि ज्येष्ठ कलावंतांची त्यासाठी कशी गळचेपी केली गेली याविषयी  कलाशिक्षण क्षेत्रात साऱ्यांनाच संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे त्यावर आता इतक्या दिवसांनी काहीबाही लिहून आम्ही आपली शक्ती वाया घालवू इच्छित नाही.


खरं तर जे जे स्कूल ऑफ आर्टची एकूण झालेली अवस्था – आधीच्या कलासंचालक, उप कलासंचालक, मंत्रालयातले भ्रष्ट अधिकारी आणि त्यांची प्यादी चालवणारे मंत्री – संत्री या साऱ्यांनी एकत्र येऊन जो काही गोंधळ घातला आणि पर्यायानं जे जे स्कूल ऑफ आर्ट, कला संचालनालय आणि कोणे एके काळी भारतात सर्वोच्च स्थानी असलेलं कलाशिक्षण यांची जी काही पुरती वाताहत झाली,  ती पाहिल्यावर त्यावर काही करावं असं देखील वाटेना ! भविष्यात तिथं काही घडू शकेल असं दूरान्वयानं देखील वाटेना ! सारखं त्या मंत्रीमहोदयांचं वाक्य समोर फेर धरून नाचत राहायचं, ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट बंद पडलं तर कुणाचं काय बिघडणार आहे ?’ त्यामुळेच ‘कालाबाजार’चा अंक प्रसिद्ध झाल्यानंतर म्हणजेच २०१० सालानंतर या विषयाकडे आम्ही जवळ जवळ दुर्लक्षच केलं होतं. 
पण जे जे स्कूल ऑफ आर्ट हा असा विषय आहे की, एकदा तिथं वावरल्यानंतर, शिकल्यानंतर कुणाही संवेदनशील माणसाच्या मनातून तो असा सहजासहजी उतरत नाही. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तो मनात सतत झिरपत राहतो. ठरवूनही तो विषय आम्हाला टाळता आला नाही, पण या भानगडीत पडायचं नाही असं बंधन मनाला घातलं असल्यामुळं त्यावर फार काही आम्ही केलं नाही. 
कोरोना लॉकडाऊनच्या काळात ‘चिन्ह’तर्फे ‘गच्चीवरील गप्पां’चे जे कार्यक्रम झाले आणि त्या कार्यक्रमांना जो अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला, तो पाहिल्यावर मात्र ‘कालाबाजार’चे दिवस पुन्हा एकदा मनात उसळी मारून उठले. यु ट्यूब चॅनल हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे आणि त्याचा वापर जर आपण जे जे स्कूल ऑफ आर्ट किंवा महाराष्ट्राच्या कलाशिक्षणात बदल सुचवण्यासाठी करू शकलो तर त्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही असं आमच्या लक्षात आलं .  
त्यातूनच मग ‘कलाशिक्षण महाचर्चे’चे कार्यक्रम सुरु झाले. आता परिस्थिती खूपच बदलली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी जेजेचाच एक माजी विद्यार्थी विराजमान झाला होता. ‘महाचर्चे’च्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व होता. कधी नव्हे तो संबंधितांकडून देखील  उत्स्फूर्त प्रतिसाद येऊ लागला, ‘आमचं लक्ष आहे, आम्ही प्रयत्न  करतो आहोत’ अशा स्वरूपाचे निरोप येऊ लागले. त्यातूनच मग जेजेचा प्रश्न इथं जोडला तर काय हरकत आहे ? असे विचार मनात येऊ लागले. संबंधितांशी बोलल्यावर त्याला मूर्तरूप देखील येऊ लागलं. केंद्र सरकारतर्फे जी नवीन शिक्षणप्रणाली आणू घातली आहे, तिच्यामुळे देखील खूप काही घडलं. आणि मग आम्ही ठरवलं की आता शेवटचा प्रयत्न करायचा. 
तिथं जेजेत देखील अभिमत विद्यापीठाची चर्चा सुरु झाली होती. किंबहुना त्याचं काम पुढं पुढं जाऊ लागलं होतं, पण या कामात कुणीतरी कोलदांडा घालू पाहत आहेत असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हाच ठरवलं की आता थांबायचं नाही ! प्रतिकारासाठी जे जे शस्त्र हाती घ्यावं लागेल ते ते घ्यायचं. मागं पुढं पाहायचं नाही. सगळ्याच दृष्टीनं पाहिलं तर ही शेवटचीच संधी होती. त्या दृष्टीनं अभ्यास सुरु झाला, निरीक्षणं सुरु झाली. हल्लीच्या भाषेत ज्याला रेकी म्हणतात, ती देखील करून पाहिली. हाती आलेले निष्कर्ष हादरवून टाकणारे होते, सुन्न करून टाकणारे होते. जे जे स्कूल ऑफ आर्टच्या १६५ वर्ष ऐतिहासिक परिसरात असं काही होऊ शकतं यावर विश्वास बसत नव्हता, पण पुरावे काही वेगळंच सांगत होते. आम्ही शस्त्र पारजली आणि लढाई सुरु झाली . 

आता ही लढाई थांबणारी नाही. माघार तर नाहीच नाही. कारण आम्हाला देखील आता कळून चुकलंय की, आता नाही तर कधीच नाही ! भले आम्ही आज आहोत, उद्या नसू, पण जिनं आम्हाला घडवलं, आम्हालाच नव्हे तर साऱ्याच्या साऱ्या भारतीय चित्रकारांना किंबहुना भारतीय चित्रकलेलाच घडवलं ती वास्तू तिथंच राहायला हवी. पुढच्या असंख्य पिढ्या त्या तिनं अशाच घडवायला हव्या. 
आमच्या पाहणीतले, अभ्यासातले, निरीक्षणातले, रेकीतले निष्कर्ष तुमच्यासमोर बेधडकपणे आम्ही मांडणार आहोत. त्याची झलक नुकतीच आम्ही दाखवली आहे. आमची मांडणी इतकी अचूक होती, की दुसऱ्याच दिवशी साबळे साहेबांनी रजेवर जाताना संस्थेची सूत्र रीतसर कायमस्वरूपी प्राध्यापकांच्या हातात सोपवली. ( मग इतकी वर्ष हे का नाही केलं ? का नाही त्यांना कुणी ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात विचारलं ? का नाही शिक्षण सचिवांनी त्यांना जाब विचारला ? ) 
खरं तर ‘चिन्ह’नं ज्या पद्धतीनं हे प्रकरण बाहेर आणलं ते पाहिल्यावर दुसरा तिसरा कुणी असता तर त्यानं लगेचच रजेवर जाण्याचं धाडस केलंच नसतं, पण साबळे साहेबांचे पाठीराखे मंत्रालयात असल्यामुळं कदाचित त्यांनी ते धाडस केलं असावं. किंवा कदाचित असंही असेल की, सत्तेच्या साठमारीत ज्यांची मदत होते, त्यांच्या घरी काही महत्वाचं कार्य निघालं असल्यामुळं जुने  ऋणानुबंध असलेल्या  साबळे साहेबांना तिथं जावं लागलं असेल… असेल ते असेल ! त्याच्याशी आम्हाला काहीएक देणं घेणं नाही.
जे जे स्कूल ऑफ आर्टसारख्या जागतिक इतिहास असलेल्या १६५ वर्ष वयाच्या संस्थेला आता असं वाऱ्यावर सोडून कुणालाच कधी जाता येणार नाही. त्या संदर्भातले नियम, कायदेकानू पाळूनच यापुढं तिथं राहावं लागेल. ‘चिन्ह’नं उभे केलेले मुद्दे इतके अचूक होते की  बातमी येताच दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊणे नऊ वाजताच सारा शिक्षकवर्ग आवारात हजर होता. प्रभारी कला संचालकांना देखील याची दखल घ्यावीच लागली असणार. आमचे मुद्दे इतके बिनतोड होते की गेली अनेक वर्षं अजगरासारखं सुस्त पडून राहिलेलं उच्चशिक्षण खातं देखील आता जागं झालं असेल . नसेल तर थोड्या दिवसात त्याला व्हावंच लागेल हे निश्चित ! तूर्त इतकेच !
संपादक

What's your reaction?

Related Posts