Editorial

कलावंतांसाठी अभिनव संकल्पना !

आजपासून ‘चिन्ह’ची ऑनलाईन आर्ट गॅलरी सुरु होत आहे. खरं तर या आधीही आम्ही प्रयत्न केले होते. पण काहींना काही तांत्रिक कारणांमुळे ती कल्पना सततच पुढं ढकलावी लागत होती. पण आता मात्र आम्ही ती संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

रुपाली ठोंबरे यांचं प्रदर्शन मुंबईच्या नरिमन पॉईंट परिसरातील ओबेराय या पंचतारांकित हॉटेलच्या ‘ट्रायडंट आर्ट वॉक’ या आर्ट गॅलरीत आजपासून सुरु झालं आहे. तेच प्रदर्शन ‘चिन्ह’ ऑनलाईन आर्ट गॅलरीवर देखील आम्ही 17 मे पर्यंत प्रसारित करीत आहोत.

अभिजात चित्रकलेचा प्रसार व्हावा चित्रकलाच नव्हे तर चित्रकार देखील कला रसिकांपर्यंत पोहोचावेत हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊनच आम्ही एक अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. ‘चिन्ह आर्ट न्यूज’ मधील बातम्या आणि फीचर्स वाचण्यासाठी दररोज हजारो मराठी भाषिक कला रसिक ‘चिन्ह आर्ट न्यूज’ला भेट देत आहेत. येत्या काही दिवसातच ‘चिन्ह आर्ट न्यूज’ची इंग्रजी आवृत्ती प्रसारित होऊ घातली आहे. त्यानंतर मात्र आज हजारोच्या संख्येनं वाचणाऱ्या मराठी वाचकांची संख्या – जगभरातले कलारसिक इंग्रजी वाचक त्यात सहभागी झाल्यामुळं दररोज लाखोंच्याच घरात पोहोचली तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना तीच आमची अपेक्षा आहे. त्या दृष्टीनंच आम्ही गेले अनेक महिने या योजनेस आकार देण्याच्या प्रयत्नात होतो.

कलावंतांची प्रदर्शनं मुंबई, दिल्ली,कोलकत्ता, बंगळुरु इत्यादी मेट्रो सिटीजमध्ये सातत्यानं भरत असतात. पुणे, पणजी, भोपाळ, बडोदा, इंदोर या शहरांमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर प्रदर्शनं भरु लागली आहेत. ही सर्व प्रदर्शनं एकाच वेळी पाहणं कुणालाही शक्य नाही. यावर उपाय काय ? तर तो आम्ही अशा पद्धतीनं शोधला आहे.

समजा एखादं प्रदर्शन पुणे, पणजी, बडोदा, भोपाळ किंवा मुंबईलगतच्या ठाण्यासारख्या अगदी एका छोट्या शहरात देखील भरत असेल आणि ते प्रदर्शन भरवणाऱ्या कलावंताला ते जगभरच्या कला रसिकांना दाखवायचं असेल तर ‘चिन्ह आर्ट न्यूज’च्या साहाय्यानं आता ते सहज शक्य होणार आहे. सर्व साधारणपणे एक आठवडाभर अशी प्रदर्शनं चालतात. पण ‘चिन्ह’च्या ऑनलाइन आर्ट गॅलरीमध्ये आम्ही प्रत्यक्ष गॅलरीत भरणाऱ्या प्रदर्शनाच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर ही प्रदर्शनं दाखवणार आहोत. जेणे करुन त्या कलावंताला आपली कला जास्तीत जास्त कला रसिकांपर्यंत नेता येईल, इतकंच नाही तर त्याची विक्री देखील करता येईल.

या ऑनलाईन प्रदर्शनात कलावंताला आपल्या कलाकृतींचा स्लाईड शो, प्रदर्शना निमित्तानं काढलेला कॅटलॉग, चित्रांबद्दलचं स्वतःचं म्हणणं किंवा एखाद्या कला समीक्षकाने केलेली समीक्षा किंवा मान्यवर कलावंतांची मतं, पूर्वीच्या प्रदर्शनाची कात्रणं, प्रदर्शनास भेट देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांच्या किंवा सेलिब्रिटींच्या भेटींची छायाचित्रं, व्हिडीओज किंवा शॉर्ट फिल्म्स देखील दाखवण्याची व्यवस्था आम्ही या ऑनलाईन आर्ट गॅलरीमध्ये केली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ही सर्व माहिती ‘चिन्ह आर्ट न्यूज’ वर केवळ तात्पुरत्या स्वरुपात नव्हे तर कायम स्वरूपीच तिथं राहणार आहे. केव्हाही काढून कला रसिकांना, अभ्यासकांना ती वाचता येणार आहे.

माध्यमांकडून आज जी कलावंतांची परवड होते आहे किंवा शोषण होते आहे त्या साऱ्याला सर्व कलावंतांच्या वतीनं ‘चिन्ह’नं दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे. तेव्हा सर्वच कलावंतांना ही विनंती आहे की या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि ‘चिन्ह’चे हात बळकट कराच पण आपली कला देखील जगभरातल्या कला रसिकांपर्यंत न्या.

लक्षात ठेवा, कलावंतानं कलावंतांसाठी कलेच्या प्रसारासाठी तयार केलेली अशा प्रकारची ही जगातली एकमेव संकल्पना आहे.

या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास कृपया कनक वाईकर 7738950216 यांच्याशी संपर्क साधा.

*****

– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

रुपाली ठोंबरे यांचं ‘डॉट टू डॉट’ हे ऑनलाईन प्रदर्शन तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

DOT TO DOT

Related Posts

1 of 4

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.