Features

जे जे सोडले काय बिघडले ?

काळा घोड्याला आम्ही सारे जेजेतले विद्यार्थी संपाला बसलो होतो. युनिव्हर्सिटीच्या समोर पोलिसांनी आम्हाला अडवलं होतं.आकर्षक फलक वगैरे तर आम्ही केलेच होते, पण गमतीदार घोषणा देखील आम्ही देतच होतो. तास दोन तास बसल्यानंतर सारे चुळबुळ करू लागले. तेव्हा कोणाच्या तरी डोक्यात आलं गाणी वगैरे म्हणावी. तितक्यात कोणी तरी हॉस्टेलवाला मुलगा उठला आणि म्हणाला, ‘आमचा सुन्या कीर्तन फार छान करतो.’ कुणीतरी ओरडलं, ‘उठ रे सुन्या… होऊन जाऊ दे !’ फारसे आढे-वेढे न घेता सुन्या नावाचा एक तरतरीत मुलगा उठला. तो उठल्याबरोबर हॉस्टेलमधल्या मुलांनी टाळ्या वाजवून एकच गजर केला.

सुन्याचं कीर्तन सुरु झालं आणि एक दोन मिनिटातच त्या कीर्तनानं मोर्च्यामधल्या मुलांचा ताबा घेतला. हळूहळू सारेच ‘हारी विठ्ठलाचा’ गजर करू लागले. नंतरची पाच दहा मिनिटं सुन्याच्या त्या कीर्तनानं रस्त्यावर अक्षरशः धमाल उडवून दिली. इतकी की रस्त्यावरून येणारे जाणारे पादचारी देखील तिथेच उभे राहून ते कीर्तन ऐकू लागले. ‘हा सुनील धोपावकर…’ कुणी तरी माझ्या कानात कुजबुजलं. सुनील धोपावकरची पहिली ओळख ही अशी झाली. शेवटच्या वर्षी कॉलेज करूनच मी नोकरी करू लागलो होतो. साहजिकच दुपार नंतर मी जेजेत नसे.त्यामुळे तो समोर दिसला की हाय हॅलो करण्यापलीकडे आमचे संबंध फारसे आलेच नाहीत. पण लक्ष्मणच्या कँटीनमध्ये झालेल्या एका धावत्या भेटीत त्यानं आपल्या मावसभाऊ का चुलत भाऊ असलेल्या आशुतोष आपटेची ओळख करून दिली होती. पण काळा घोडावरच्या त्या कीर्तनानं सुनील धोपावकर हे नाव कायम स्मरणात राहीलं.

मध्यंतरी एकदा वीसएक वर्षांनी बहुदा तो जहांगीरमध्ये भेटला होता. त्यावेळी त्याने त्याचं कार्ड दिलं होतं आणि मग नंतर काहीच दिवसात त्यानं त्याच्या पार्ल्याच्या प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिकाच पाठवली होती. मी आवर्जून त्या प्रदर्शनाला गेलो होतो, खूप गप्पा देखील मारल्या आम्ही. त्याला ते प्रदर्शन मुंबईत आणखी कुठे तरी करायचं होतं. त्यासाठी संबंधित गॅलरीच्या लोकांशी मी बोललो देखील होतो. पण अचानक लॉकडाऊन सुरु झालं आणि सारचं फिस्कटलं.

मध्यंतरी काही कामानिमित्तानं त्याच्याशी संवाद सुरु झाला, पण तो बहुदा आजारी पडला असावा त्यामुळं थांबला. त्याच्याकडून रोज टायपोची फॉर्वर्डस येत. माझाकडून देखील ‘चिन्ह’ची अपडेट्स जात, पण संवाद थांबला तो थांबलाच. ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये सहभागी होणार का ?’ असा मेसेज त्याला पाठवला आणि मग आमच्यातला संवाद पुन्हा सुरु झाला. मध्यंतरी काही काळ व्हर्टिगोचा खूप त्रास झाला, असे तो सांगत होता. काल त्याच्यावरच्या लेखानिमित्तानं एका लॉन्ग कॉलवर आमचं बोलणं झालं. सुरवातीलाच मी त्याला संपातल्या त्याच्या कीर्तनाची आठवण सांगितली. त्यावर तो खुलला. ‘संपानंतर गायब कुठे झालास ?’ असं जेव्हा मी त्याला विचारलं तेव्हा त्यानी माझं बोलणं मध्येच थांबवलं आणि म्हणाला, ‘१९८१ सालच्या तुझ्या जहांगीरच्या प्रदर्शनासाठी मी तुझी पोस्टर्स करायला जहांगीरमध्ये आलो होतो, आठवतं का ? ती तुला खूप आवडली आणि तू मला प्रफुल्ला डहाणूकरांकडे पाठवलंस.

‘प्रफुल्लाबाईंना मेकर चेंबरसाठी एक मोठं म्युरल करायचं होतं आणि त्या म्युरलमध्ये त्यांना कॅलिग्राफीतून अथर्वशीर्ष लिहायचं होतं. प्रफुल्लाबाईंचं ते काम मी केलं हे तुला आठवतं का ?’ खरच मी ते सारं विसरून गेलो होतो, पण सुनीलने आठवण करून देताच मला ते सारं आठवलं. मी त्याला म्हटलं, ‘नंतर मी पत्रकारितेत शिरून नोकरी करू लागलो, पण तू तर जेजेत शिकत होतास, पण अचानक गायब कुठे झालास ?’

‘वो एक लंबी कहानी है !’ त्यानें शांतपणे उत्तर दिलं. ‘काय लफड्याची स्टोरी आहे का ?’ मी त्याला विचारलं. म्हणाला, ‘हो खूपच !’ आता माझी उत्सुकता खूपच चाळवली होती. जवळ जवळ अर्धा तास तो मला ती स्टोरी सांगत होता. जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये त्याच्यावर कसा भयंकर अन्याय झाला ते तो सारं मला विस्तारानं सांगत होता. बांद्रा होस्टेलच्या रेक्टरनं त्याच्यावर कशी साऱ्याची ‘खापरे’ फोडली ते तो अगदी सविस्तर सांगत होता. तेथील शिक्षक, अधिष्ठाता आणि कलासंचालक या सर्वांनी मिळून त्याला कसा कॉर्नर केला, मनस्ताप दिला हे त्यानं मला सविस्तर सांगितलं. मग नव्या आलेल्या अधिष्ठात्यांनी कसा त्याच्यावरचा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला, ते ही त्यानं सांगितलं.

‘त्यावेळी मी जेजेत शिकत होतो, पण त्याचवेळी मी आधी ‘श्री साप्ताहिकात’ आणि नंतर ऍड एजन्सीमधून फ्रिलान्सिंग कामं देखील करत होतो. आम्ही धोपावकर मूळचे गुहागरचे, पण नाशकात येऊन स्थायिक झालो. घरातल्या बहुसंख्यांची पार्श्वभूमी मेडिकलची होती. घरातले सारेच्या सारे डॉक्टरच. पण मला चित्रकलेचा नाद लागलेला. त्यामुळं वडिलांनी “हे सारे भिकेचे डोहाळे !” असं म्हणून मदत करणं वगैरे नाकारलं होतं. साहजिकच जेजेतलं शिक्षण, हॉस्टेलमध्ये राहणं वगैरेसाठी मला पैसे मिळवावेच लागत. अत्यंत सुशिक्षित घराची पार्श्वभूमी असल्यामुळं रॅगिंगसारख्या गोष्टी मला कधी आवडल्याच नाहीत आणि आश्चर्य म्हणजे त्यावेळच्या आमच्या होस्टेलच्या रेक्टरला रॅगिंग आवडत असे. त्यानं ते माझ्यावर करायचा प्रयत्न केला. मी आणि माझ्या सुशिक्षित मित्रांनी तो उलटवून लावला. त्याचा वचपा म्हणून त्या रेक्टरनं खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविरोधात खोटी तक्रार केली. एक महिनाभर रोज हजेरीला जावं लागायचं. या साऱ्याला मी अखेरीस कंटाळलो. जेजेमध्ये शिकायची जी स्वप्न घेऊन मी नाशिकहून आलो होतो ती सारीच्या सारी उद्ध्वस्त झाली होती.

त्याच वर्षी मला राज्य पुरस्कार मिळाला, तो ही व्यावसायिक विभागात, पण वर्गात प्रेझेंटी कमी म्हणून तो ही मला या लोकांनी घेऊन दिला नाही. वास्तविक प्रेझेंटीचा आणि व्यावसायिक विभागाचा काही संबंध नव्हता. खूप मनस्ताप दिला, नको नको ती कारणं सांगितली. बरं वाटत नव्हतं म्हणून नाशिकला गेलो आणि तिथंच आजारी पडलो आणि मग मुंबईला मला यावंसंच वाटेना ! नाशकातच काम करू लागलो. गावकरी, रसरंगनं मला सुरुवातीची कामं दिली आणि हळूहळू इतर वेगवेगळ्या कंपन्यांची कामं माझ्याकडं येऊ लागली. मुंबईचे माझे दरवाजे मीच बंद करून टाकले.’

सुनील जे सांगत होता त्यावर माझा विश्वासच बसेना ! अरे, हे तू मला त्याचवेळी का नाही भेटून सांगितलंस ? असं मी त्याला अक्षरशः किंचाळून म्हणालो. का नाही तू मला त्यावेळी भेटलास किंवा निरोप पाठवलास ? मी तुझा प्रॉब्लेम नक्कीच सोडवला असता. तो सगळा काळ माझ्या डोळ्यासमोर क्षणभर फिरून गेला. अर्थात घडायचं ते घडून गेलं होतं, आता त्यावर बोलून काहीच मतलब नव्हता. ‘पण तू हे सारं गप्पांमध्ये सांगणार आहेस का ?’ मी त्याला थेट प्रश्न टाकला. तो ठामपणे उत्तरला, ‘होय, सांगेन मी… सांगायला आवडेल मला ! फक्त नावं घ्यायला सांगू नकोस मला.’ म्हणाला. मी ते मान्य केलं.

परवा शनिवारी सुनीलच्या कार्यक्रमाचं पोस्टर आम्ही फेसबुकवर टाकलं आणि ते अक्षरशः व्हायरल झालं. आतापर्यंत ९५०० पेक्षा जास्त लोकांपर्यंत ते पोहोचलंय. आज सुनील हा फेसबुक स्टार आहे ! त्यानं टायपोचे नमुने फेसबुकवर टाकले की त्यावर प्रचंड प्रतिसाद येतो, खूपच लाइक्स मिळतात, खूपच लोकं ते शेयर करीत असतात. प्रतिक्रिया तर विचारू नको एवढ्या त्याला मिळत असतात. ‘सुनील धोपावकर’ या अकाउंटला कधीही भेट देऊन तुम्ही याची खात्री करू शकता, इतकं प्रचंड काम त्यानं केलं आहे. मराठी टायपोग्राफीचा एक नवा ट्रेंडच त्यानं आणला आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्तीचं ठरणार नाही.

त्याचं जेजेतलं शिक्षण अपुरंच राहिलं. पोलीस केस वगैरे भानगडीत शिकण्यातलं स्वारस्य निघूनच गेलं. या साऱ्याला कुणाला जबाबदार धरायचं ? सुनीलला का मुलांना रॅगिंग करायला भाग पाडणाऱ्या रेक्टरला ? जेजे सोडावं लागल्यानं त्याचं फारसं बिघडलेलं नाही . तो आज नाशकात एक जाहिरात संस्था चालवतो. ३५ एक लोकं त्याच्याकडं पूर्णवेळ काम करतात. लॉकडाऊनचा फटका त्यालाही खूप बसलाय. त्यामुळं काही लोकं कमी करावी लागली, पण लॉकडाऊनच्या एक वर्षाच्या काळात त्यानं आपल्या सर्व स्टाफला एक वर्षाचा पगार घरी बसून दिला. ही साधीसुधी गोष्ट नव्हे ! ज्यानं हे सारं घडवून आणलं तो रेक्टर आता हयात नाही. खूपच वाईट पध्दतीनं त्याचा अंत झाला असं सांगतात, खरं खोटं जमशेदजीभाई जाणे. सुनीलला ज्यांनी त्रास दिला ती सारीच मंडळी आता हयात नाहीत, पण असं असलं तर सुनील त्यांची नावं घेऊ इच्छित नाही. त्याच्यावरचे घरचे सुसंस्कृत संस्कार त्याला ते करू देत नाहीत.

१९७८ पासून सुनीलनं मराठी अक्षररचनेच्या / टायपोग्राफीच्या क्षेत्रात डोंगराएवढं काम करून ठेवलं आहे. साप्ताहिकं, मासिकं, पुस्तकं याची हजारो कामं त्यानं आजवर केली आहेत. सिनेमा, नाटक, टीव्ही, वेब या माध्यमात देखील त्यानं हजारो जाहिराती आणि अक्षररचनेचे नमुने पेश केले आहेत. १००० च्या वर मराठी शब्दांना ‘एक्सप्रेसिव्ह टायपोग्राफी’मधून त्यानं साकारलं आहे. इतकंच नाही तर ७० देवनागरी फॉन्ट्सची निर्मिती त्यानं केली असून लवकरच संगणकाच्या कळफलकावर ते सर्वांसाठी उपलब्ध होणार आहेत. देवनागरी अक्षरसौंदर्याची गोडी लागावी म्हणून ७००० मराठी, हिंदी नावांचा टायपोग्राफिकल एन्साय्क्लोपीडिया तो तयार करतो आहे. मराठी टायपोग्राफीच्या प्रसारासाठी तो व्याख्यानं देतो, कार्यशाळा भरवतो आणि आतापर्यंत ११ प्रदर्शनं त्यानं भरवली आहेत. हे केवळ अद्भुत असं काम आहे. मध्यंतरी त्यानं नाशकात एक मोठं रेस्टोरंट देखील काढलं. नंतर ते विकून देखील टाकलं. त्याचं हे सारं आत्मकथन ऐकायला ज्यांनी ज्यांनी त्याला जेजे सोडायला भाग पाडलं ते रेक्टर किंवा ते शिक्षक मात्र आता हयात नाहीत. पण नंतरच्या पिढीतले शिक्षक हे सारं ऐकू शकतात आणि या साऱ्यातून बोध घेऊन आपल्या हातून अशी चूक जन्मात होणार नाही, एखाद्या विद्यार्थ्यांचं आयुष्य आपण बरबाद करणार नाही याची काळजी तर घेऊ शकतात ! एखाद्या तरी शिक्षकाला असं वाटलं तरी आमच्या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं समजू.

सतीश नाईक

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.