Features

‘अभिजात’ कलेचं दर्शन घडवणाऱ्या मराठी लेखिका !

सरिता आवाड यांच्या ‘हमरस्ता नाकारताना’ या आत्मकथनामधलं एक प्रकरण बहुदा कुठल्यातरी एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झालं होतं. माफ करा, त्या अंकाचं नाव आता आठवत नाही. बहुदा ‘हंस’चा अंक असावा २०१६ सालचा आणि त्या लेखावरची अतिशय परखड भाषेतली प्रतिक्रिया लोकसत्तेच्या बहुदा रविवारच्या अंकात प्रसिद्ध झाली होती. लेखाखाली नाव होतं अरुंधती देवस्थळे ! अरुंधती देवस्थळे या नावाचा हाच पहिला परिचय.

अतिशय परखडपणे लिहिलेली ती प्रतिक्रिया वाचून का कुणास ठाऊक मी अस्वस्थ झालो. कदाचित असंही असेल की, त्या कथनामधले सारे प्रसंग माझ्या अवती भवती घडले असावेत. म्हणजे उदाहरणार्थ त्या काळात मी चुनाभट्टीला राहत होतो. चुनाभट्टी ते सायन हे अंतर चालत जायचं म्हटलं तरी १५-२० मिनिटांचंच होतं. ज्यांच्याविषयी ते लिहिलं होतं त्या प्रख्यात लेखिका सुमतीबाई देवस्थळे या सायनमध्येच राहत होत्या आणि मुख्य म्हणजे त्या ज्या डीएस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका होत्या, त्याच शाळेत माझी धाकटी बहीण शिकली होती आणि तिथंच नंतर ती शिक्षिका म्हणून लागली आणि मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाली.

त्याकाळात ‘माणूस’चं वाचन प्रचंड व्हायचं. ‘माणूस’चे काही गाजलेले अंक आजही माझ्या संग्रहात आहेत. त्यांचं ‘टॉल्स्टॉय : एक माणूस’, ‘मॅक्झिम गॉर्कीचं चरित्र’ वगैरे वाचून मी अतिशय प्रभावित देखील झालो होतो. ते वय देखील तसंच होतं, पण संवादाच्या अभावामुळं असावं किंवा कदाचित नाटक, साहित्य, पत्रकारिता, चित्रकारिता यांच्या चळवळीमध्ये पूर्णतः गुंतल्यानं माझं दुर्लक्ष झालं असल्यामुळं म्हणा, सुमतीबाई देवस्थळे हा विषय माझ्यापासून जवळ असून देखील लांबचा ठरला.

तर सांगत काय होतो, लोकसत्तेतला अरुंधती देवस्थळे यांचा लेख मला प्रचंडच भावला आणि लेखाखालचा ईमेल आयडी पाहताच मी न राहवून त्यांना एक ईमेल देखील पाठवला. त्यांनी ही अतिशय तत्परतेनं त्या ईमेलला अतिशय सुरेख असं उत्तर दिलं. त्यानंतर अधनं मधनं त्यांचं नाव वाचनात येत होतं. पुन्हा एकदा सुमतीबाईंच्या लेखनाच्या आठवणी ताज्या होत, पण ते तसंच राहत असे.

यंदाच्या जानेवारीमध्ये मात्र त्यांचं नाव लोकसत्तेच्या रविवारच्या अंकाच्या जाहिरातीत झळकलं. लोकसत्तेसाठी दर रविवारी त्या ‘अभिजात’ नावाचं सदर चालवणार होत्या आणि त्या सदरात त्यांनी जगभरातल्या ज्या ज्या म्युझियम्सना भेटी दिल्या त्याविषयी त्या लिहिणार होत्या. ती माझ्यासाठी तरी खूप मोठी बातमी होती. त्यांचा पहिलाच लेख अगदी अधाशासारखा वाचला. अप्रतिम होता तो ! ‘लुव्र’ म्युझियमविषयी त्यांनी लिहिलं होतं. अतिशय बारीक बारीक निरीक्षणं त्यांनी नोंदवली होती जी वाचून मी अक्षरशः झपाटून गेलो होतो आणि त्याक्षणी मी ठरवलं की यांना कधीतरी ‘गच्चीवरील गप्पा’ कार्यक्रमासाठी बोलवायचं आणि त्यांच्याशी तास दोन तास जगातल्या त्यांनी पाहिलेल्या म्युझियम्सविषयी आणि पुस्तकाच्या सानिध्यात आजवर त्या जे काही जगल्या त्याविषयी अगदी मनसोक्त गप्पा मारायच्या. लगेचच त्यांना मेसेज देखील टाकला, त्यांचं उत्तर देखील आलं. त्यांना आवडली होती ती कल्पना, पण म्हणाल्या थोड्या दिवसानं करू, सध्या कामांची खूप धावपळ चालू आहे आणि प्रवास देखील.

हो – ना हो – ना करता करता अखेरीस एप्रिल महिन्यातली ३० तारीख नक्की झाली आणि मग आमचं चॅटिंग सुरु झालं. पोस्टरसाठी फोटो मागवणे, व्यक्तिगत माहिती मागवणे, त्या देखील वेळात वेळ काढून हे सारं करत होत्या. पण मध्येच फोटो पाठवल्यावर त्यांचा मेसेज आला की, ‘मला अतिशय संकोच वाटतोय. शक्य असल्यास कमी किंवा टोन डाऊन करूया !’ मग मी त्यांना म्हटलं, ‘अहो काही नाही, खूप मजा येईल गप्पा मारायला ! खूप नवी माहिती मिळेल लोकांना, निश्चिन्त राहा !’ त्यावर त्यांचा मेसेज आला, ‘मी आधीच टेबलाखाली जाऊन बसते’ आणि त्यासोबत तीन मोठ्या हसऱ्या तोंडाच्या स्मायली वगैरे.

तितक्यातच २४ एप्रिलच्या रविवारी त्यांनी प्रख्यात चित्रकार मार्क रॉथकोवर लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला. त्यातल्या काही वाक्य रचनांनी तर मी अक्षरशः हादरून गेलो ! उदाहरणार्थ ‘रॉथकोंची शैली यथार्थवादी नाही, पण वास्तवातून निर्माण होणाऱ्या भावनांचं ती चित्रण करते. मोकळी जागा आणि रंगापर्यंत जाणारं काहीतरी सांगण्याचा प्रयत्त्न आहे किंवा झालंच तर ‘पेंटिंग म्हणजे अनुभवांचं चित्रण नव्हे, पेंटिंग हाच एक अनुभव असतो असं मानणाऱ्या रॉथकोंची शैली म्हणजे रंगाचा सहजसाध्य खेळ वाटतो. पण तसं नाही, ही बाब फक्त दृश्य रंगानुभूतीची नाही, हे अनुकरण करणाऱ्याला पटकन उमगतं’ किंवा ‘१९४०च्या दशकात व नंतर नित्शेना अभिप्रेत असलेली निःशब्द निराकार संगीताची भावना पेंटिंग्जमध्ये आणण्यासाठी मी चित्रातून मानवाकृती वजा केली आणि अमूर्तता वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला.’ हे त्यांच्या लिखाणातले काही नमुने मला विलक्षण आवडून गेले. किती सहज सोप्या भाषेत त्यांनी आशय व्यक्त केला होता. मार्क रॉथकोवरचा त्यांचा लेख खरोखरच आजवरच्या सर्व लेखांमधला मास्टरपीस आहे असं मी मानतो ! म्हणूनच येत्या शनिवारी म्हणजे ३० एप्रिल रोजी त्यांच्यासोबत जगभरच्या म्युझियमसंदर्भात, महत्वाच्या चित्रकारांसंदर्भात होणाऱ्या गप्पा या ‘गच्चीवरील गप्पां’च्या कार्यक्रमाची शानच ठरतील असा माझा कयास आहे. ऐकायला, पाहायला विसरू नका !

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.