Features

जेजे अनन्य अभिमत विद्यापीठ होणारच !

परवा रात्री आशुतोषचा फोन आला. म्हणाला, ‘उद्या येतोयस ना ?’ म्हटलं, ‘पाहूया… आत्ता काही सांगता येत नाही. ‘चिन्ह’साठी मी खूप काही लिहितोय.’ तर तो म्हणाला, ‘आपण जेजेचं आंदोलन सुरु करतोय आणि तूच नाही तर कसं होणार ? ते काही नाही तू यायचंच.’ मी पाहू पाहू असं म्हणून फोन ठेऊ लागलो तर त्यानं मला थांबवलंच म्हणाला, ‘तू उद्या कसंही करून पाहिजेच ! मी त्याला मध्येच थांबवून म्हटलं, ‘अरे मी आता ठाण्याच्या बाहेर तीन किलोमीटर राहतो, जेजेमध्ये यायचं म्हणजे मला तब्बल ४० किलोमीटर पेक्षाही जास्त प्रवास करावा लागतो. या कडक उन्हाळ्याच्या दिवसात आणि या वयात खूप त्रासदायक वाटतं सारं. त्यातच लॉकडाऊनमुळे प्रवासाची संवयच गेलीय.’

ऐकेल तर तो आशुतोष कसला ! त्यानं त्याचा निर्णय जाहीरच करून टाकला. तू उद्या यायचं, यायचं म्हणजे यायचंच आणि भाषण देखील करायचंस. सोबत गीताला देखील घेऊन ये म्हणजे आपण आपली सभा यु ट्यूब लाईव्ह करू. जे येऊ शकणार नाहीत ते जिथं असतील तिथून पाहतील. मी सकाळी पावणे नऊ – नऊ वाजता गाडी घेऊन तुला न्यायला येतो. मला गुगल मॅप पाठव पटकन. मी त्याला म्हटलं अरे काय वेडा आहेस का तू ? तुझं घर सफाळ्याला म्हणजे सव्वाशे किलोमीटर दूर आहे. तिथून तू ठाण्याला येणार, काय वेड लागलंय का ? तो म्हणाला, ‘तू माझी काळजी करू नकोस, मी सकाळी ९ वाजता येतोच.’

९ वाजता येतो म्हणणारा आशुतोष सव्वा दहा वाजता घरी आला. तोपर्यंत माझ्यावर प्रचंड ताण. आता हा येणार कधी ? इथून ठाण्यावरून निघणार कधी ? आणि जेजेला पोहोचणार कधी ? नक्कीच उशीर होणार. जे टाळत होतो तेच अखेर घडल होतं. आशू ठाण्यात येतोय हे कळल्याबरोबर जेजेतल्या एका जुन्या मित्रानं त्याला गाठलं. मी ही येतो तुमच्या बरोबर म्हणाला. आधी सीएनजीच्या रांगेत आशू कंटाळलेला. त्यातचं हे मित्राचं घर शोधणं. तब्बल अर्धा तास तो ते घर शोधत होता. अखेरीस त्यानं कंटाळून तू आता ट्रेननं जेजेला ये असं सांगुन तो माझ्याकडे आला होता. तोपर्यंत सकाळी ८.३० पासून वाट पाहून माझा दगड झालेला.

ठाण्यामधून मुलुंड चेकनाक्याला पोहोचायला अर्धा पाऊण तास सहज लागतो. आजही तो तसाच लागला. तोपर्यंत जेजेमधून फोन यायला सुरुवात झाली होती. आशू अस्सल नाटकवाला. फ्री वेला लागलोय, फ्री वेला लागलोय, असं सांगुन तो वेळ मारून नेऊ लागला, पण खरोखर फ्री वेला लागेपर्यंत गाडीतल्या आमचा आणि फोनवरच्या पलीकडच्या मित्रांचा धीर सुटू लागला होता. कसे बसे ११.४०ला जेजेत पोहोचलो. आशुनं सुनीलला सांगितलं होतं तुम्ही सुरुवात करा आम्ही पोहोचतोच. त्या प्रमाण सुनीलने सुरुवात केली होतीच. निम्म्यापेक्षा अधिक असेम्ब्ली हॉल भरला होता. माजी विद्यार्थी देखील मोठ्या संख्येनं आले होते. उपस्थिती इतकी वाढली की असेम्ब्ली हॉलची सर्वच पार्टीशन उघडावी लागली. कुणीतरी सभेकडे काटेकोरपणे लक्ष ठेऊन आहे असा त्याचा अर्थ होता.

सुनील नाईकनं छानपैकी वेळ मारून नेली होती. विशेषतः सिनिअर्सबद्दल माजी विद्यार्थ्यांच्या मनातलं दडपण काढून टाकण्यास तो यशस्वी ठरला होता. सुनीलनं आशुच्याकडं सूत्र दिली आणि आशुनं साऱ्या सभेचा ताबा घेतला. अनन्य अभिमत विद्यापीठ म्हणजे काय इथंपासूनच त्यानं सुरवात केली. आणि जुने जुने धमाल किस्से सांगून विद्यार्थ्यांच्या मनातली भीती त्यानं काढून टाकली. सुमारे अर्धा तास आशु नॉनस्टॉप बोलत होता. आजी आणि माजी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा त्यानं प्रयत्न केला होता. काही सांगायचं त्यानं शिल्लक ठेवलं नव्हतं. उपस्थित आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी त्याच्या भाषणानंतर कडाडून टाळ्या दिल्या होत्या.

आता बोलायची माझी पाळी होती. खरं तर असं काही बोलायची वेळ येईल असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं होतं १०-१५ लोक जमलेले असतील. त्यांच्या बरोबर पुढील कार्यक्रमांविषयी चर्चा करायची आणि तासाभरात घरी निघायचं असा माझा समज झाला होता.

मी बोलायला उभा राहिलो आणि शब्दच फुटेना ! १९७४ साली प्रवेश घेण्यासाठी याच इमारतीत पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. तो दिवस मला आठवला. त्या दिवशी दिसलेली मीना सुखटणकर (आताची मीना नाईक) मला आठवली. नाटकाचं मला प्रचंड वेड लागलं होतं त्या दिवसात. दामू केंकरे, पु.लं चे भाऊ रमाकांत देशपांडे,रंगायनवाले इर्शाद हाश्मी, शांताराम पवार, डॉ. रेगे या सर्वांना तळ मजल्यावरच्या केंकरेच्या केबिनसमोर पाहून इथं आपल्याला शिकायला मिळणार या भावनेनं मी अक्षरशः हरखून गेलो होतो. तो दिवस मला जसाच्या तसा आठवला आणि मला बोलणंच सुचेना ! क्षणार्धात त्या कॅम्पसमधले सारेच्या सारे दिवस माझ्या नजरे समोरून तरळून गेले. मोठ्या निर्धारानं मी मला सावरलं आणि जेजे संदर्भात बोलायला सुरुवात केली.

जवळजवळ अर्धा तास मी बोलतच होतो. आशुतोषनं अभिमत विद्यापीठासंदर्भात सारं काही आधीच सांगून टाकलं असल्यामुळं मला त्याची पुनरावृत्ती करायची नव्हती. जेजेतलं सारं शिक्षण पूर्ण झाल्यावर ८१ साली मी जी पहिली बातमी दिली होती तिचं सार असं होत की जेजेतल्या दोन प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत आणि आज २०२२ साली फक्त दोन जागा भरल्या गेल्या आहेत बाकी साऱ्या रिक्त आहेत. या माझ्या वाक्याला प्रचंड दाद मिळाली. १९८१ पासून आजतागायत मी ‘चिन्ह’द्वारा किंवा मुंबईतल्या वृत्तपत्रांना बातम्या देऊन कसा एक हाती लढा दिला त्याची माहिती देऊन आता पुढल्या पिढीनं जेजेचा हा कॅम्पस राखायला हवा कारण जगात कुठेही इतका सुंदर कॅम्पस कुठल्याच आर्ट स्कूलला लाभलेला नाही, असं जगभर प्रवास करणारे सांगतात. असं सांगून टाळ्यांच्या कडकडाटात मी खाली बसलो. कोणाची तरी सूचना आली की आता आवरतं घे, कारण सभा सुरु व्हायला उशीर खूप झाला होता आणि इतरांनाही बोलायचं होत. ती जर सूचना आली नसती तर न जाणो मी किती काळ बोलत राहिलो असतो. कारण जेजेचा सारा उतरता काळ आणि भ्रष्टाचार मी उघड्या डोळ्यानं पाहिला असल्यानं मला कुणी झोपेतून उठवलं तरी या विषयावर माझी तासनतास बोलायची तयारी असते. असो.

माझ्यानंतर जेजेचा कॅम्पस गाजवलेले मंतोश लाल, रफिक आणि ऍडमॅन राज कांबळे यांनी देखील अतिशय प्रभावी पद्धतीनं आपले विचार मांडले. भाषण संपल्यानंतर आजी माजी विद्यार्थ्यांकडून जो काही अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तोच ही सभा किती यशस्वी ठरली हेच सांगणारा होता. मग एकमेकांच्या गळाभेटी, हस्तांदोलनं आणि नव्या पद्धतीनुसार सेल्फी वगैरे घेणं या खेळीमेळीच्या वातावरणानं जेजे अनन्य विद्यापीठ प्रकल्प यशस्वी होणार याचा आत्मविश्वास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खेळताना दिसत होता.

या तिन्ही कला महाविद्यालयामधून ७०सालापासून जे जे विद्यार्थी शिकले त्या सर्वांशी संपर्क साधला जाणार आहे. तिन्ही महाविद्यालयांची मिळून एकच संघटना तयार केली जाणार आहे. या संघटनेतल्या दिग्गजांनी सरकारच्या गळी अभिमत विद्यापीठांचा प्रस्ताव उतरवून जेजेच्या कॅम्पसला पुन्हा नव्यानं सोनेरी दिवस प्राप्त करून द्यायचे आहेत. सरकारमधल्या झारीतल्या शुक्राचार्यांमुळे हे होणार किंवा होणार नाही या विषयी काही सांगता येणार नाही, पण त्या दिशेनं पडलेल पाहिलं पाऊल मात्र अतिशय दमदार होतं असं निश्चितपणे म्हणता येईल !

सतीश नाईक

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.