Features

कोकण, कहाण्या, कातळ शिल्पं, कलेचा इतिहास इत्यादी !!

मंजिरी ठाकूर या नुकत्याच रत्नागिरीत झालेल्या कातळशिल्प पर्यटन महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवामुळे कातळशिल्प असलेल्या असंख्य ठिकाणांना त्यांना भेटी देता आल्या. या भेटीत त्यांना काय दिसलं ? कोणते विचार मनात आले ? ते सारंच त्यांनी या लेखात मांडलं आहे. अवश्य वाचा !

कोकणाचे साहित्य आणि कलेशी असलेले नाते जगजाहीर आहे. पावलापावलावर इतक्या कथा कहाण्या आहेत की त्यांची कोकणात जणू चित्ररूप जत्राच भरते. इथला निसर्ग समुद्राला पाचूच्या कोंदणात थाटाने मढवून सजला आहे. सह्याद्रीच्या रांगा अविचल असल्या तरी शांत नाहीत. इथला काळाकभिन्न कातळ भला मोठा, गूढ आणि साहसी इतिहास साठवून ताठ उभा आहे. गंमत म्हणजे इथला कातळ बोलतो.. हो ! हा कातळ माणसांची भाषा बोलतो. प्रत्येक कोकणी माणूस या कातळाला बोलकं करतो अनेक मनोरंजक गोष्टींतून. अशातच काही निसर्गयात्रीनी शोधून काढली कातळाची प्राचीन कहाणी ती सुद्धा आगळ्यावेगळ्या सांकेतिक चित्र लिपित चितारलेली !

ही आहेत अश्मयुगीन कातळ शिल्पं. अश्मयुग, दगडांचे युग. मानवाने दगडांचा वापर करत हत्यारे, गुहा ई. अनेक गोष्टी बनवायला सुरू केली तो काळ, म्हणजे साधारण इ. स. पूर्व ४५००० ते इ. स. पूर्व १०००० वर्षापूर्वीचा काळ.  इतिहासात याला pre history असेही म्हणतात. मानववंश शास्त्राची अभ्यासकांना उपयोगी अशी पहिली पायरी. या काळातील अनेक अवशेष फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रेलिया अशा बऱ्याच देशांत सापडले आहेत आणि त्यावर अभ्यास करून मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासाला फार मोठी मदत झाली आहे. काय आहे या अवशेषांत आणि कोकणाचा याच्याशी काय संबंध आहे ?

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे हे प्राचीन अवशेष सापडले आहेत. कातळावर दगडी हत्यारे वापरून कोरलेल्या आकृत्या म्हणजेच कातळ शिल्प ! थोडी थोडकी नाहीत दीड हजारावर आणि त्यांचे आकार सुद्धा नजरेच्या आवाक्यात न मावणारे. प्राणी, पक्षी, भौमितिक आकार, मानवी आकृत्या आणि काही सांकेतिक खुणा अशी कितीतरी चित्रणे पहायला मिळतात. कलेचा अभ्यास जिथे सुरू होतो, ‘abstract’ ची व्याख्या जिथे नियमांना न जुमानता तयार होते आणि म्हणता म्हणता हजारो वर्षांचे कलेचे समीकरण फिरून परत त्याच रेषेवर जुळून येते ते हे अश्मयुग…

रत्नागिरीच्या आसपास कशेळी, बारसू, देवी हसोळ, देवाचे गोठणे अशा अनेक गावांच्या मोकळ्या माळावर ही कातळ शिल्पं पसरली आहेत. स्थानिक लोकांनी आणि अभ्यासकांनी प्रचंड मेहनत घेऊन या कातळ शिल्पांची गुंतागुंतीची चित्रणे जपायला आणि उकलायला सुरुवात केली आहे. प्रचंड मोठा हत्ती, मासे, हरणे, मोर, साप, मानवी आकृत्या यांची आकर्षक रचना नागमोडी आणि सरळ रेघोट्यामध्ये बेमालूपणे बसवलेली पाहिली की आपण अचंबित होतो. हे का केलं असेल ? कसं केलं असेल ? त्याचा नेमका अर्थ काय ? कशासाठी असेल हा अट्टाहास ? नेमके काय संकेत आहेत या मागे ? अबोल संवादाचं “चित्र” हे तेव्हाही माध्यम असेल का ?

मुळात खूप सारे प्रश्न पडतात. म्हणजे या विशाल कातळावर भारतात मध्य प्रदेशातील भीम बेटका येथे दिसतात तशा गुहा किंवा घळी दिसत नाहीत. मग येथे नेमके काय झालं असेल, किंवा काय होत असेल की आदिमानवाने इतके सारे रेखाटून ठेवले आहे? कोकणचा किनारा भगवान बुद्धांच्या काळापूर्वीपासून समुद्र मार्गाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे खरा, आणि त्याचे अनेक रेकॉर्डस् पहायला, वाचायला मिळतात. समुद्रमार्गे अनेक परदेशी लोकं इथल्या किनारपट्टीला येऊन थडकली. पण ही कातळ शिल्प या काळाच्या सीमांच्या पार पूर्वीची आहेत यात शंका नाही. मग हे कोण ? नेमके तिथले रहिवासी की आणखीन काही? वीस, पंचवीस, अगदी चाळीस फुटांचे रेखाटन कशासाठी करत असतील? यातील काही चित्रं/ शिल्प यांची रचनाचित्र आधुनिक असावीत इतकी काळापुढची आहेत. प्राण्यांचे आकार पाहताना surrealism चा भास होतो. उक्षीचा हत्ती छोट्या कानांचा रेखाटला आहे. १५-२० फुटांचा हा हत्ती composit प्राण्यासारखा वाटतो. एक शिंगी गेंडा सुद्धा भला मोठा कोरून ठेवला आहे. बाकी मोर, हरणे आणि मासे तर अप्रतिम आहेत. यांची रचना सुद्धा अचंबित करते. एकाचं डोकं वेगळ्या दिशेला तर त्यापाठी दुसरा पाठ केलेला. म्हणजे ते कोरणारे वेगवेगळे असावेत. प्राणी उलट सुलट कोरले आहेत. ते कोणत्याही दिशेने पहाता येतात. हे ओपन installation सारखे वाटत राहते. यातील बरेचसे प्राणी धावत असलेले दिसतात. गतीचे वेड आदिमानवाला सुद्धा होते !

प्राण्यांची उकल होत नाही तोच आणखीन विचित्र सांकेतिक खाणाखुणा नवीन आवाहन उभे करतात. मुळात गोल, चौकोन, आयत असले भौमितिक आकार वापरून काही गुंतागुंतीच्या संरचना दिसून येतात. यात नागमोडी रेखाटने बेमालूम केलेली आहेत. कातळावर हे कोरणे नक्कीच अवघड काम आहे. बरं, यात बऱ्यापैकी sofistication दिसते. म्हणजे रेषा तुटक नसून सलग आहेत. येथील स्थानिक काही रेखाटने विशिष्ट नावांनी ओळखतात. जसं की भोपळ्याचा वेल! उलट सुलट उभं राहून ही उकल लवकर सुटावी असं वाटत रहातं. अगदी MOMA किंव्हा Guggenheim मधील प्रदर्शनात वाटतं तसं काहीसं. काही ठिकाणी काढलेली वर्तुळे चक्रावून सोडतात. एकतर फार मोठी नाहीत आणि एकाच वेळेला अनेक वर्तुळे एका मोठ्या आयातावर कोरलेली. नेमकं कसं केलंय याबरोबरच काय केलंय असा प्रश्न पडतो. भौमितिक आकारांचे गूढ संपत नाही तोच अनेक अवाढव्य मनुष्याकृती लक्ष वेधून घेतात. रा. चिं. ढेरे यांच्या ‘लज्जगौरी’ या शोध निबंधाची आठवण करून देणाऱ्या आकृत्या. स्त्री, अथवा Mother Goddess असा काही त्याचा अर्थ असावा. प्रजननाच्या काही सांकेतिक खुणा ! मानवाकृत्या फार मोठ्या आहेतच पणं काही ठिकाणी फक्त अवयव, म्हणजे फक्त हात किंवा फाकलेले पाय अशी भेदक चित्रणं आहेत. हे सारे उकलून त्याचा योग्य तो परामर्श करणे सोपे नाही आणि त्याला अवधी लागणार. पण एक नक्की, हा अभ्यास बऱ्याच चित्र आणि शिल्पकारांना वेड लावणार हे नक्की !
डॉ. मंजिरी ठाकूर

छायाचित्र सौजन्य: निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.