Features

यांना नैतिक अधिकार आहे ?

आधी २० मार्चला रत्नागिरीत जेजे अभिमत विद्यापीठाविषयीची घोषणा करून शिक्षणमंत्र्यांनी कलाशिक्षण वर्तुळात आनंदी वातावरण निर्माण केलं आणि २१ मार्चला राज्यस्तरीय विद्यापीठ अभ्यास समिती स्थापन करून आधीच्या निर्णयावर बोळा फिरवला. काय आहे का प्रकार ? शिक्षणमंत्री असं का वागताहेत ? त्यांनी जी समिती स्थापन केली आहे तिला अभ्यास करण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का ? वाचा ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांचे परखड विचार !

जे जे स्कूल ऑफ आर्टच्या कॅम्पसमधील अप्लाइड आर्ट आणि आर्किटेक्चर ही तीन महाविद्यालये एकत्र करून राज्यस्तरीय विद्यापीठ स्थापन करण्याचा शासनाचा मानस असल्यामुळं उच्च व तंत्रशिक्षण विभागानं मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली एक सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत डॉ. विजय खोले यांच्यासोबत मुंबई विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू नरेश चंद्रा आणि मुंबई विद्यापीठाचेच प्र कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांची देखील नेमणुक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत प्रख्यात आर्किटेक्ट शशी प्रभू, चित्रकार सुहास बहुळकर, विधी व न्याय विभागाचे सेवानिवृत्त उपसचिव शे. व. चिंधडे, प्रभारी कलासंचालक राजीव मिश्रा यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. आणखीन एक नाव या समितीत आहे, ते म्हणजे सावर्डे जिल्हा रत्नागिरी येथील विजय राजेशिर्के यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. ते नाव बहुदा सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्रकाश राजेशिर्के याचे असावे.

किती शरमेची गोष्ट आहे ! ज्याचा सत्कार उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे दि. २० मार्च रोजी रत्नागिरीत मोठ्या धूम धडाक्यात केला जातो, त्याच खात्याचे उपसचिव सतीश तिडके मात्र २१ मार्चला आपल्या सहीनं शासन निर्णय जारी करताना ‘प्रकाश राजेशिर्के’ यांचे नामकरण ‘विजय राजेशिर्के’ असं करतात. काय बोलावं यावर ? हा असा कारभार जर उच्च व तंत्रशिक्षण विभागात चालत असेल तर या विभागाकडून महाराष्ट्राच्या शिक्षणाचं काही भलं होईल अशी अपेक्षा करावी का ? असो.

सदर समितीनं पुढील तीस दिवसात आपला अहवाल शासनास सादर करावयाचा आहे. २१ मार्च रोजी हा शासन निर्णय जाहीर झाला, त्याला आता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. या कालावधीत दोन – तीन मिटिंग झाल्याचे उडत उडत कानी आले आहे.

ही समिती शासनाला जेव्हा केव्हा तो अहवाल द्यायचा तो देईलच, पण त्याआधी काही प्रश्न मात्र सतावू लागले आहेत. उदाहरणार्थ या समितीचे अध्यक्ष डॉ. विजय खोले हे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. त्यांनी आणि माजी प्र कुलगुरू नरेश चंद्रा यांनी आपल्या कुलगुरू पदाच्या कारकिर्दीत जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य दोन संस्थांकडे किती लक्ष दिलं ? असा प्रश्न मनाला पडल्यावाचून राहत नाही. तीच गोष्ट मुंबई विद्यापीठाचेच प्र कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या बाबतीत देखील विचारता येईल.

खरं तर ही तीनही शासकीय महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. या महाविद्यालयातून काय शिकवले जाते ? काय शिकवले जावे ? कसे शिकवले जावे ? तेथील व्यवस्थापन कसे असावे ? त्यात व्यवस्थापकीय त्रुटी असल्यास त्यावर कोणती कारवाई करावी ? यासंदर्भातले आपले अधिकार कुलगुरू बजावू शकतात. कुलगुरूंच्या अनुपस्थितीत या संदर्भातले सारे निर्णय प्र कुलगुरु घेऊ शकतात. असे असताना जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य दोन महाविद्यालयं यांची ही अवस्था का झाली ? या प्रश्नांची उत्तरं या समितीवर निवडल्या गेलेले माजी कुलगुरू, माजी प्र कुलगुरू आणि प्र कुलगुरू हे तिघंही देऊ लागतात किंबहुना त्यांनी ती द्यायलाच हवीत, असं म्हटलं तर त्यात आमचं काय चुकलं ?

का नाही मुंबई विद्यापीठाच्या या महनीय व्यक्तींनी या संदर्भात त्या त्या वेळी योग्य ती कारवाई केली ? या तीन महाविद्यालयांना अधिष्ठाता नाही ( ज्यांची नेमणूक केली त्यांना धड दीडशे वर्षाची संस्था चालवता देखील येत नाही ) प्राध्यापक नाहीत, लेक्चरर्स नाहीत, कर्मचारी नाहीत, इतकंच काय पण तंत्रविषयाचे कर्मचारी तसेच अशैक्षणिक कर्मचारी देखील नाहीत. एवढेच नाही तर सुरक्षारक्षक, माळी, शिपाई यासारखी चतुर्थ श्रेणीची पदं देखील तीस वर्षात भरली गेलेली नाहीत. अशा या महाविद्यालयांची मान्यता मुंबई विद्यापीठानं त्याचवेळी का नाही काढून घेतली ?

बहुसंख्येनं तात्पुरते किंवा कंत्राटी शिक्षक नेमले असताना का नाही मुंबई विद्यापीठानं या महाविद्यालयांवर कारवाई केली ? या लेखासोबत सुमारे २५-३० वर्षांपूर्वीच्या प्रॉस्पेक्टसमधील शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत, त्यावरून कोणे एके काळी किती शिक्षकवर्ग जेजेतल्या विद्यार्थ्यांना शिकवत होता याचे दर्शन घडते आणि नंतरच्या रकान्यात आज किती कायमस्वरूपी शिक्षक शिकवत आहेत ती देखील यादी प्रकाशित केली आहे. हे सारं पाहिल्यावर महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागानं जे जे स्कूल ऑफ आर्टसारख्या दीडशेपेक्षाही जास्त वर्ष वयाच्या जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्थेची काय विदारक अवस्था करून ठेवली आहे त्याचे दर्शन घडते.
ज्यांच्या अखत्यारीत जे जे स्कूल ऑफ आर्टसारखी संस्था आहे, त्या मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंनी किंवा माजी प्र कुलगुरूंनी का नाही यासंदर्भात लक्ष घातलं ? हाच प्रश्न आताच्या प्र कुलगुरूंना देखील विचारतो. जे जे स्कूल ऑफ आर्टची आजची अवस्था पाहून का नाही या संस्थेवर कारवाई केली ? याचा अर्थ उघड आहे की आपण फक्त शिक्षणमंत्र्यांच्या होकारात हो मिळवलात. शिक्षण सचिव बिचिव साऱ्यांनाच दबकून राहिलात. का नाही तातडीनं योग्य ती कारवाई केलीत ? तुम्हाला यातलं काहीच ठाऊक नाही असं तुम्ही म्हणूच शकत नाही, कारण लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांनी वेळोवेळी या संदर्भात पुराव्यासह बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. ‘चिन्ह’नं तर या साऱ्याचं विदारक दर्शन पुराव्यांसकट घडवणारा ‘कलाबाजार / कालाबाजार’ अंक प्रसिद्ध केला होता. सह्याद्री वाहिनी आणि अन्य वाहिन्यांनी देखील ठळक स्वरूपात बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्या सर्व आजही यु ट्यूब चॅनलवर आहेत. त्यामुळे आम्हाला ठाऊक नाही/नव्हते असे विधान त्यांना करताच येणार नाही.

मेटल क्राफ्टसारख्या वर्गांवर तर एकही शिक्षक नसताना वर्षानुवर्षे ते वर्ग कसे चालू ठेवले गेले ? या प्रश्नांची उत्तरं ही मंडळी आता तरी देणार आहेत का ? सर्वात धक्कादायक प्रसंग होता तो म्हणजे शिवसेनेच्या महिला शाखेनं जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये घुसून मुंबई विद्यापीठाच्याच अखत्यारीत असलेल्या मेटल क्राफ्ट विषयाच्या हंगामी शिक्षकाला बडव बडव बडवलं होतं ! कपडे काढून त्याची अब्रू अक्षरशः चव्हाट्यावर मांडली होती. तेव्हा मुंबई विद्यापीठानं कोणती कारवाई त्यावर केली ? किमानपक्षी जाब तरी विचारला का ? मला वाटतं खोले साहेबच तेव्हा कुलगुरू होते. आपल्या अखत्यारीत असलेल्या संस्थेत असे प्रकार घडल्यानं कोणती कारवाई खोले साहेबांनी केली होती ? हेच नाही तर अशी असंख्य प्रकरणं याच काळात घडली. याच काळात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेला न बसलेला विद्यार्थी देखील एमएफएच्या परीक्षेत पहिला आला होता ( लोकसत्तेनं ही बातमी दिली. संपादक कुमार केतकर तेव्हा सांगत होते, माझ्या आयुष्यात मी एखाद्या बातमीला इतके फोन आलेले याआधी कधीच पाहिले नव्हते ) त्यावेळी मुंबई विद्यापीठानं काय कारवाई केली ?

जे जे स्कूल ऑफ आर्टमधली एकेक सीट काही शिक्षकांनी एकेक लाखाला विकल्या, तोही कालखंड हाच ! त्यावेळी कुलगुरूंनी काय केले ? जेजेच्या हंगामी अधिष्ठात्यानं शेतकऱ्यांना द्यायच्या सुवर्णपदकात भेसळ केली, ती बातमी प्रसिद्ध झाल्यावर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी काय कारवाई केली ? या संदर्भात प्रत्येक बातमी वृत्तपत्रात सविस्तर प्रसिद्ध झाली होती, पण मुंबई विद्यापीठानं त्यावर काहीही कारवाई केली नाही आणि आज इतक्या वर्षानं २०२२ साली मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्र कुलगुरू एकत्र येऊन शासनाला निर्णय देणार आहेत ! या तीन कला महाविद्यालयांचे राज्यस्तरीय विद्यापीठ कसे असावे ? वा रे न्याय ! इतके तुम्ही तत्वनिष्ठ होतात तर का नाही त्यावेळी पावलं उचलली ? का नाही तुम्ही जेजेची मान्यता काढून घेतलीत आणि शासनाला वठणीवर आणलंत ?

तुमच्या अख्ख्या कारकिर्दीत एकदा तरी जे जे स्कूल ऑफ आर्टला भेट दिली होती ? एवढ्या मोठ्या मोठ्या बातम्या वृत्तपत्रातून झळकताहेत, तर का नाही तुम्हाला मुलांना असं विचारावंसं वाटलं की, मुलांनो काय आहेत तुमचे प्रॉब्लेम्स ? आम्ही विद्यापीठ म्हणून तुमच्यासाठी काय करू शकतो ? शिक्षण तज्ज्ञ म्हणून ही तुमची जबाबदारी नव्हती ? तुम्ही दिलेले अहवाल विश्वासार्ह असतील असं आम्ही म्हणावं तरी कसं ? कुठल्या आधारावर ? आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापाशी ? गेल्या तीस वर्षात ३०० पेक्षा अधिक बातम्या वृत्तपत्रातून झळकल्या, पण काय कारवाई केली मुंबई विद्यापीठानं ? ज्या बातमीनं मुंबई विद्यापीठाची संपूर्ण नाचक्की केली, ती बातमी घडवणारा तो शिक्षक कम प्राध्यापक कम विभाग प्रमुख कम अधिष्ठाता कम कलासंचालक ( ही सगळी हंगामी पदं होती बरं का ) आज मस्त घरात बसून टीव्हीवर बघून, लाखो रुपयांचं सेवानिवृत्ती वेतन घेऊन जेजेची दुर्दशा एन्जॉय करतोय ! काय केली कारवाई तुम्ही त्याच्यावर सांगाल ? आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे ?

जेजेतल्या १०० सीट्ससाठी तीन ते ५००० अर्ज येतात, पण एका अरब देशातून आलेल्या राजदूताच्या मुलीसाठी मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या बीएफए आणि एमएफएच्या वर्षाला सगळेच्या सगळे नियम वाकवून बीएफए आणि एमएफएची अशी दोन्ही वर्षाची फी एकाच वेळी घेऊन प्रवेश दिलात. असे प्रवेश देता येतात ? दोन्ही वर्षाची फी एकदम घेता येते ? जी मुलगी कॉलेजमध्ये फारशी आली नाही तिला एमएफएचं सर्टिफिकेट घरी बसून दिलंत ? सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे त्या मुलीच्या वडिलांनी तिला जेजेमध्ये हॉबी कोर्ससाठी प्रवेश मागितला होता आणि दिवट्या प्रभारी कलासंचालकानं तिला थेट बीएफएच्या वर्गात प्रवेश दिला ! ते कमी पडलं म्हणून की काय एमएफएच्या वर्गात सुद्धा पहिल्याच वर्षी फी आकारून प्रवेश देऊन टाकला ! पावत्यांसकट बातमी छापली होती, पुराव्यादाखल हजेरीपट देखील छापला होता. काय कारवाई केली मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून तुम्ही त्यांच्यावर ? किमानपक्षी एखादं पत्र तरी दिलंत ? आमच्या विद्यापीठात असे प्रकार चालणार नाहीत, असं चार ओळींचं पत्र तरी दिलंत ?

काय केलं मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापनानं ? काय केलं मुंबई विद्यापीठाच्या विद्वत सभेनं ? गायतोंडे यांचं भलं थोरलं पेंटिंग, ज्याची किंमत आज कितीतरी कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे, ते पेंटिंग एका आचरट अधिष्ठात्यानं छोट्या फ्रेममध्ये बसण्यासाठी करवतीनं करा करा कापलं, कापताना ते मध्येच दुभंगलं… काय कारवाई केली तुम्ही त्या अधिष्ठात्यावर ? त्याच अधिष्ठात्यानं कोट्यवधी रुपये किंमतीची दीडशे चित्रं जाळून टाकली, पण तुम्ही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं. महाराष्ट्र शासनाला तर काही पडलीच नव्हती !
या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जो अहवाल द्याल त्या अहवालाला काय किंमत असणार आहे याचा तुम्ही कधी विचार केलाय ? दुर्दैवानं हे सगळं होत असताना तुम्ही फक्त पाहत राहिलात. तेच आता होणार आहे, आताही तुम्ही पाहतच राहणार आहात, असा आरोप जर तुमच्यावर कुणी केला तर त्यात त्यांचं काय चुकलं ? उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं जी समिती स्थापन केली आहे त्या समितीच्या पहिल्या तीन सदस्यांना जाहीरपणे विचारलेले हे प्रश्न आहेत. मिळतील याची उत्तरं आम्हाला ?
याच समितीतले एक सदस्य सुहास बहुळकर हे अधिष्ठात्यांच्या बंगल्याचं वस्तू संग्रहालयात रूपांतर व्हावं म्हणून प्रयत्न करीत होते, काय झालं त्या प्रयत्नांचं ? काय झालं त्या वास्तूचं ? त्यावेळी देखील आम्ही हा प्रश्न विचारला होता आणि आजही जाहीरपणे विचारतो की, इतकी मोठी वास्तू, इतका मोठा परिसर सांभाळणाऱ्या अधिष्ठात्यानं त्या बंगल्यात राहायचं नाही तर मग काय पालघर – डहाणूवरून किंवा कर्जतला राहून जेजेचा कारभार हाकायचा का ? आज कदाचित तुम्हाला एका व्यक्तीला तो बंगला मिळवून द्यायचा नसेल, पण ती व्यक्ती काय अमरत्वाचा पट्टा घेऊन आली आहे का ? तुम्ही आजचा विचार करताय म्हणून तुम्हाला हे सारं नकोसं वाटत असेल, पण ब्रिटिशांनी २०० वर्षांचा विचार केला होता. भविष्यात या वास्तूचं मोल, वास्तूतल्या कलाकृतींचं मोल पैशात मोजता येणार नाही, हे त्यांना ठाऊक होतं. म्हणूनच त्यांनी ऐसपैस जागा सोडून एकाहून एक ऐतिहासिक वास्तू उभारल्या. दीडशे वर्ष झाली.. आजही तो बंगला ठामपणे उभा आहे आणि तिथं आम्ही वस्तुसंग्रहालय उभारायला चाललो होतो ! काय तर म्हणजे व्यंगचित्रकार लक्ष्मण यांच्यासाठी एक दालन. त्यांच्याविषयी पूर्ण आदर व्यक्त करून एक प्रश्न विचारावासा वाटतो, काय संबंध होता त्यांचा आणि जेजेचा ? काय झालं त्या योजनेचं पुढं ? कोट्यवधी रुपये खर्च झाले, सरकार बदललं, काम थांबलं. आता तर काय म्हणे पुन्हा सुरु झालंय ! कुणाला बसवणार आहात त्या वास्तूत ? तुमचे शिक्षणमंत्री देखील अफाट बुद्धीचे. काय तर म्हणे लता मंगेशकर संगीत विद्यापीठाचं कामकाज तिथून सुरु करणार होते ! कुठून निघतात या सुपीक कल्पना ? दीडशे वर्षापेक्षा जास्त वयाच्या या परिसराला शासनाच्या दृष्टीनं काहीच ऐतिहासिक महत्व नाही ?
शिक्षणमंत्री एका दिवशी एक बोलतात तर दुसऱ्या दिवशी दुसरं ! अभिमत विद्यापीठासाठी केंद्रसरकार सोबत झालेल्या कागदपत्रांवर किंवा पत्र व्यवहारावर कुणाच्या सह्या आहेत ? या संदर्भात शिक्षणमंत्र्यांनी पुणे आणि रत्नागिरी येथे जाहीरपणे घोषणा केल्या आहेत त्यांचं काय ? त्या घोषणांचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर फिरताहेत हे तुम्हाला ठाऊक आहे ? हा सगळा पत्रव्यवहार पाहिल्यानंतर कधी कधी असं वाटतं, अभिमत विद्यापीठ आणि राज्यस्तरीय विद्यापीठ यांच्यातला मूलभूत फरक तरी यांना कळला असेल का ? जे शासन निर्णय झाले आहेत त्यातली भाषा वाचल्यानंतर त्यांना तो कळला असेल असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. तसं नसतं तर एका रात्रीत त्यांनी हा निर्णय फिरवला नसता.
जेजेशिवाय अन्य कलाशिक्षण संस्थांचा साऱ्यांनाच आता पुळका आलाय, पण या संस्थांची अवस्था किती भयानक आहे याचा तरी कुणी कधी विचार केलाय ? १६५ वर्ष वयाच्या जे जे स्कूल ऑफ आर्टला गेल्या ३०-४० वर्षांमध्ये त्याची पूर्णतः निर्नायकी अवस्था करून सरकारनं महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाचे जे काही धिंडवडे काढले आहेत त्याविषयी सभ्य शब्दात काही बोलावं अशी अवस्था नाही. १६५ वर्ष वयाच्या संस्थेला वर्षानुवर्ष ज्यांना साधे प्राध्यापक नेमता आले नाहीत, लेक्चरर्स नेमता आले नाहीत, कर्मचारी नेमता आले नाहीत, १५७पेक्षा अधिक पदं जिथं भरता आली नाहीत, ते आता म्हणे या तीन संस्थांचं मिळून राज्यस्तरीय विद्यापीठ करण्याची भाषा करताहेत ! याच्यावर कुणीतरी विश्वास ठेवील का ?
मला कल्पना आहे की मी अतिशय कठोर शब्दात टीका करतो आहे. याबद्दल मी साऱ्या ज्येष्ठांची माफी देखील मागतो, पण हे देखील स्पष्टपणे सांगतो की भविष्यात देखील असेच प्रकार घडत राहिले तर त्यावर टीकेचे आसूड ओढायला मी मागेपुढे पाहणार नाही ! तुम्हाला काय राज्यस्तरीय विद्यापीठ स्थापन करायचं असेल ते करा, मंत्र्यांना ज्या प्रकारचा अहवाल हवा असेल तो तुम्ही द्या, पण जेजेला जो अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळू पाहतोय त्यात तुम्ही आडकाठी करू नका. तुम्हाला हवं असेल तर ५०० एकराचं कलाविद्यापीठ बांधा, हव्या असतील तितक्या वास्तू तिथं उभारा, आणि त्या वास्तूंना हवी त्यांची नावं  तुम्ही द्या. आमचा कोणताही विरोध असणार नाही, पण जे जे स्कूल ऑफ आर्टला यात अडकवू नका, त्याचं अस्तित्व स्वतंत्र राखा. एवढे अत्याचार जे जे स्कूल ऑफ आर्टवर केले गेले आहेत की आता त्यावर हक्क सांगायचा महाराष्ट्र सरकारला कोणताही अधिकार उरलेला नाही !
सतीश नाईक

जे जे स्कूल ऑफ आर्टच्या १९७८-७९ सालच्या माहितीपत्रकातली शिक्षकांची यादी

जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट १९८३-८४ सालच्या माहितीपत्रकातील शिक्षकांची यादी

जे जे स्कूल आणि अप्लाइड आर्टच्या कायमस्वरूपी शिक्षकांची आजची दयनीय परिस्थिती

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जेजे अभिमत विद्यापीठा संदर्भात केंद्र शासनाशी केलेला पत्रव्यवहार : हा पत्रव्यवहार शिक्षणमंत्री नाकारणार आहेत ?

कला संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या कला महाविद्यालयांची संख्या, मंजूर विद्यार्थी संख्या आणि २०१९-२० मध्ये झालेले प्रवेश. यातले जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अप्लाइड आर्ट यांचे विद्यार्थी यातून वजा केले तर उरलेल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जे जे स्कूल ऑफ आर्ट, अप्लाइड आर्टला फासावर चढवणार आहात का ?

जे जे अभिमत विद्यापीठा संदर्भात झालेला अत्यंत महत्वाचा पत्रव्यवहार ( Letter of Intent ) डॉ. विलास खोले यांना आणखीन काही पुरावे हवेत ?

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.