Uncategorized
नव्या वर्षाचे असंख्य संकल्प आपण ठरवलेले असतात. अगदी पहिल्या दिवसापासून कामाला लागायचे वगैरे.पण आळशीपणा अंगात भिनलेला असला म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासूनच ते मोडीत निघायला देखील सुरुवात होते.
यंदाही तसंच झालं. खूप काही ठरवलं होतं. पण थंडीनं साऱ्या संकल्पांवर संक्रांतच आणली. त्यातच पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार बाहेरगावी जाणं झालं.
पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि इंटरनेटचं निमित्त झालं. अखेरीस साऱ्यातून आज सुटका झाली.
दररोजच काहींना काहीतरी लिहावे असा विचार आहे, कारण यंदा योजिलेच खूप आहे. ऑनलाईन ‘चिन्ह’ मधून संपादकीय विशेष लेख बातम्यांद्वारे आपली भेट रोज होतेच आहे. पण त्याशिवाय तीन महत्वाच्या प्रकल्पांच्या निमित्ताने आपण यंदा वारंवार भेटणार आहोत, अगदी पक्क ! उदाहरणार्थ नव्या वर्षाच्या पूर्वार्धात खूप रखडलेला ‘जे जे जगी जगले…’ हा ग्रंथ प्रकाशित होतो आहे पाठोपाठ उत्तरार्धात ‘निवडक चिन्ह’चा तिसरा खंडही प्रकाशित होतो आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या वर्षाच्या शेवटाला म्हणजे ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी आपली एक विशेष भेट होणार आहे.
कारण २ नोव्हेंबर २०२३ पासून “गायतोंडे जन्मशताब्दी”ला सुरुवात होत आहे. २०२४ हे गायतोंडे जन्मशताब्दीच वर्ष आहे. महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार ते जाहीर करणार आहे किंवा नाही याविषयी काहीही कल्पना नाही,पण ‘चिन्ह’नं पत्रव्यवहार सुरु केला आहे, त्यास यश मिळेल की नाही या विषयी काहीही सांगता येणार नाही पण ‘चिन्ह’नं मात्र “गायतोंडे जन्मशताब्दी वर्ष” आपल्या पद्धतीनं साजरं करायचा निणर्य घेतला आहे.
२००१ साली गायतोंडे गेले त्याच वर्षी ‘चिन्ह’नं त्यांच्या वरची विशेष पुरवणी प्रसिद्ध केली. मग २००६ साली एक संपूर्ण अंक आणि २००७ साली आणखी एक विशेष पुरवणी प्रसिद्ध केली. गायतोंडे चरित्राची संदर्भ साधन उपलब्ध करून दिल्यावर देखील कुणी गायतोंडे यांच्यावरील ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी कुणी पुढं येईना हे पाहून २०१६ साली त्यांच्या वरचा पहिला वहिला मराठी ग्रंथ मोट्या दिमाखात प्रसिद्ध केला. हाच ग्रंथ आता २ नोव्हेंबर २०२३ रोजी इंग्रजीतून प्रसिद्ध होणार आहे. तूर्त इतकंच. बाकी सारे पुढल्या भेटीत. असेच वरचेवर भेटत राहू.
– सतीश नाईक
( चित्रकला विषयक बातम्या – लेख इत्यादी नियमित वाचण्यासाठी ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. )

Related Posts

1 of 7

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.