No products in the cart.
दहा हजार वर्षांपूर्वीचा मानव कसा होता ?
कोकणात राजकारण आणि पर्यटन यांच्या बरोबरीनं सध्या कातळशिल्पांची चर्चा होत आहे. जागतिक वारसा ठरतील अशी ही कातळशिल्प कोणी तयार केली, ती तयार करणारी माणसं कोण होती, ही आकाराने भव्य असलेली शिल्प त्यांनी कशासाठी तयार केली याबाबद्दल लोकांच्या मनात जबरदस्त कुतूहल आहे. हेच कुतूहल कातळशिल्प अभ्यासक ओंकार क्षीरसागर यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळेच हल्लीच ट्रेंडमध्ये आलेल्या एआय ऍपच्या साहाय्यानं त्या काळातील मानव कसा दिसत असेल त्याची चित्रं त्यांनी तयार केली आहेत. त्याच बरोबर ही कातळशिल्प आणि त्याभोवती त्याकाळातील माणसांचा समुदाय याचीही काही चित्रं तयार केली. ही चित्रं किती टक्के बरोबर हा संशोधनाचा विषय असला तरी त्या काळाचा अंदाज आणि स्वरुप ती चित्रं आपल्या डोळ्यांसमोर अगदी अचूकपणे निर्माण करतात.
चार वर्षांपूर्वी BBC मराठीनं कोकणातील कातळशिल्पांवर एक डॉक्युमेंटरी केलेली माझ्या पाहण्यात आली होती. त्यात जे दाखवलं होतं त्याबद्दल मला जबदस्त कुतूहल वाटू लागलं आणि त्यानंतर जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा कोकणात जाऊन ही कातळशिल्पं पाहायचीच हे मी ठरवून टाकलं होतं.पण त्यानंतर नेमका कोविड आला आणि सगळं काही ठप्प झालं.पण तरीही इंटरनेट वरून जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी माहिती मी साठून ठेवत होतो. या दरम्यान मी बाय रिसर्च MFA करत होतो. त्याच्या थिसिससाठी मी कोकणातील कातळशिल्पं हाच विषय निवडला, कारण यामुळे मला त्या विषयावर सविस्तर अभ्यास करायला मिळणार होता.
कोविड थोडा कमी होताच मी मालवणातील कुडोपी इथल्या कातळशिल्पांच्या पहिल्या साईटला कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांच्यासोबत भेट दिली. ती कातळशिल्प पाहताना भान हरपून गेले होते. या कुडोपीच्या सड्यावर ६० कातळशिल्प आहेत आणि ही जगातील उत्कृष्ट अशी पेट्रोग्लिफ्स साईट म्हणून तिचा उल्लेख करता येईल अशी ती साईट आहे .त्यानंतर कातळशिल्प अभ्यासाचा मी सपाटाच लावला.
माझा थिसिस पूर्ण झाला पण त्यावर अजून बराच अभ्यास बाकी आहे हे सतत वाटत राहिलं…हा अभ्यास करण्यासाठी मी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या, कातळशिल्पांचे आकार अभ्यासण्यासाठी रेखाटनं केली, समुद्र किनाऱ्यावर मोठे कातळशिल्प त्याच आकारात काढून पाहिलं, फोटोशॉप सॉफ्टवेअर वापरून त्याचं डिजिटल ट्रेसिंग केलं. वेगवेगळ्या मार्गानं कातळशिल्प समजून घेण्याचा प्रयत्न केला…करतोय आणि तो सतत चालूच राहणार आहे, कारण हा विषय खूप गहिरा आहे. कातळशिल्पांच्या साईटवर कुठलेच आर्टीफेक्ट्स उदा. मातीची भांडी, इतर काही विधी यांचे काहीच पुरावे सापडत नाहीत. त्यामुळे काही गोष्टी कठीण होऊन गेल्या आहेत. कातळशिल्प आणि त्यांच्या जवळपास असणाऱ्या गावांच्या परंपरा किंवा चालीरीती या दृष्टीने यांचे काही संबंध मिळत नाही… असले तर ते फार तुरळक आहेत. गावातील लोकांकडे ती चित्र पांडवांनी काढली हे एकच उत्तर मिळतं. त्यामुळे कातळशिल्पांचा पसारा कोणी आणि कशासाठी करून ठेवला ? या प्रश्नांची उत्तरं सहजासहजी सापडणं कठीण होऊन बसलंय पण ते अशक्य मात्र नाहीये.
पण आता बरेच अभ्यासक आणि खासगी इन्स्टिट्यूट कातळशिल्पांच्या अभ्यासात उतरले आहेत. त्यामुळे आणखीन काही वर्षात या बद्दल आणखीन खुलासे होतील अशी आशा बाळगली पाहिजे. मी माझ्या पद्धतीनं कातळशिल्पांचा अभ्यास करतो आहे. प्रागैतिहासिक कला या बद्दल असणाऱ्या आकर्षणामुळेच माझे लक्ष कोकणातील कातळ खोद शिल्पांकडे गेले. गेली पाच वर्ष या विषयाचं वेड कमी झालेलं नाही. या कातळ शिल्पांविषयीच्या आकारांबद्दल, त्याच्या काम करण्याच्या पद्धतींबद्दल , त्यांनी हे आकार का कोरले असतील, त्यातून त्यांना काय साध्य करायचं होतं असे अनेक प्रश्न सतत डोकावत असतात. या विषयाचा अभ्यास चालू आहे. पण एक कुतूहल सतत मनात असतं की हा मानव कसा दिसत असावा ? ही माणसं कुठं राहत असावीत ? कातळशिल्पांभोवती त्यांच्या काय चालीरीती किंवा परंपरा असाव्यात ? या विषयीच्या माझ्या निरीक्षणातून मी काही चित्रं तयार केली होती, पण त्यांना काही गती मिळत नव्हती. पण गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर मी एआय आणि मिडजर्नी या सॉफ्टवेअर्सचा वापर करून लोकांनी तयार केलेल्या इमेजेस पाहत होतो. या सॉफ्टवेअरनं तयार झालेल्या काही इमेजेनं जबरदस्त परिणाम साधला होता, म्हणूनच मी याचा वापर माझ्या रिसर्चसाठी करण्याचं ठरवलं. मी नुकताच एआय या सॉफ्टवेअरचा वापर करून महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक मानव कसा दिसत असेल याची एक इमेज तयार केली आहे. याची काल मर्यादा १० हजार वर्षांपूर्वीची टाकली आहे कारण कातळशिल्पं ही जास्तीत जास्त २० हजार वर्षापूर्वीची असू शकतात असं अभ्यासक म्हणतात, म्हणून १० हजार हा त्याचा एक सुवर्णमध्य धरला. निश्चितपणे या सॉफ्टवेअरला काही मर्यादा आहेत पण माझ्या निरीक्षणातून तयार झालेली दृश्यांचे दस्तावेजीकरणं मी या सॉफ्टवेअरने करू पाहतोय, त्यामुळे प्रागैतिहासिक काळाच्या ओघात हरवलेली दृश्य पुन्हा जिवंत होतील अशी मी आशा व्यक्त करतो.
*****
– ओंकार क्षीरसागर.
Related
Please login to join discussion