No products in the cart.
हे घडणारच होतं !
हे घडणारच होतं !
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची भयंकर घटना जिथं घडली त्या मालवणच्या मेढ्यामधल्या राजकोट किल्ल्यापासून अवघ्या चार पाच फर्लांग अंतरावर माझं नवं घर आहे. म्हणजे घर जुनं आहे, मी तिथं नव्यानं राहावयास आलो आहे.
गेल्या एप्रिलपासून मी तिथं राहू लागलो आहे. मी मूळचा अस्सल मुंबईकर. २०१२ सालापर्यंत ५५ वर्षात जेमतेम सहा किंवा फार तर सात वेळा मालवणला मी आलो असेन. २०१२ साली वडिलांचं निधन झालं आणि मग मात्र वडिलोपार्जित जमिनीमध्ये लक्ष घालायला मी सुरुवात केली, साहजिकच माझ्या मालवणच्या फेऱ्या वाढू लागल्या. गेल्या एका तपामध्ये वर्षातून तीन चार किंवा पाच फेऱ्या माझ्या मालवणात व्हायच्याच. पण गेल्या एप्रिलपासून मात्र दर महिन्याला नेमानं मी इथं येतो आणि दहा बारा दिवस तरी इथंच मुक्काम ठोकून राहतो. कुणी सांगावं हे वाढत जाऊन कदाचित इथं मी कायमचाच राहीन !
मला मालवण अतिशय आवडतं. विशेषतः मालवण बंदर किंवा चिवला बीच हे माझे फेव्हरेट आहेत. तिथून सायंकाळी जो सूर्यास्त दिसतो तो तर मला अतिशय प्रिय आहे. चिवला बीचवर संध्याकाळी आकाशात रंगांचा जो अनोखा नजारा पाहावयास मिळतो तो कॅमेऱ्यातनं टिपताना मी दिवसातला किती वेळ त्यात घालवला आहे याची गणतीच मी कधी केली नाही. आज देखील संध्याकाळ झाली की माझी पावलं आपोआप चिवला बीचकडे वळतात.
जी गोष्ट चिवला बीचची तीच मालवण बंदराची ! १९६४ साली मी या बंदरात पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. तेव्हापासून आजतागायत हे बंदर कायमच माझ्या आकर्षणाचा विषय ठरलं आहे. मालवणमध्ये पाऊल टाकलं की माझी पावलं आपसूकच बंदराकडे वळतात. तो अथांग पसरलेला समुद्र आणि सिंधुदुर्ग किल्ला नजरेत साठवल्या खेरीज मला राहवत नाही. हे कदाचित प्रत्यक्ष महाराजांचं, अथांग सागराचं आणि त्या दोघांशी असलेल्या माझ्या पूर्वजांमधील संबंधामुळे देखील असू शकेल. ( यावर मी सविस्तर लिहिणार आहे, पण ते नंतर कधीतरी ) आणि त्यानंतरच मग माझी योजिलेली सगळी कामं सुरु होतात.
बंदर जेटीवर उभं राहिलं की सूर्यास्ताचे अनोखे रंग न्याहाळता येतात. आठ-नऊ महिन्यांपूर्वी उद्ध्वस्त राजकोट किल्ल्याच्या परिसरात काहीतरी काम चालू असल्याचं जाणवू लागलं. हल्लीच्या पद्धतीप्रमाणं अशी कामं सुरु असली म्हणजे चारही बाजूंनी पत्रे लावले जातात त्यामुळे बाहेरून काही कळत नाही. असेल काहीतरी म्हणून मी त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही, पण नंतरच्या भेटीत तिथं मला एक शिल्प उभारलेलं दिसू लागलं. बंदरावरचं कुणीतरी बोललं देखील, ‘महाराजांचो पुतळो असा ! तो मोदी येतालो असा उदघाटनाक.’ तेव्हा कुठे मला उलगडा झाला जयदीप आपटेने सांगितलेल्या शिवाजी महाराजांच्या शिल्पाविषयीचा.
जयदीपचे दोन-तीन लेख आम्ही ‘चिन्ह आर्ट न्यूज’मध्ये प्रसिद्ध केले होते. त्यावेळी कदाचित ते फारसे वाचले गेले नसतील, पण आता मात्र जयदीपचं नाव प्रचंड चर्चेत आलं आहे, कर्णोपकर्णी झालं आहे. त्यामुळे त्यानं लिहिलेले हे लेख नक्की वाचले जातील याची मला खात्री आहे. म्हणूनच त्या लेखांच्या लिंक्स या मजकुराच्या शेवटी दिल्या आहेत.
त्याच्या कुणा मित्रानं ( मित्र म्हणजे चित्रकार मित्र ) ते लेख मला वाचायला दिले. त्याची शैली मला आवडली, मांडण्याची पद्धत आवडली म्हणूनच मी ते लगेचच प्रसिद्ध केले. खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं आपले विचार मांडले आहेत. आणखीनही त्याच्याकडून लेख अपेक्षित होते, पण नंतर बहुदा तो या पुतळ्याच्या कामात गुंतला असावा. नोव्हेंबरमध्ये मी त्याला फोन केला होता, यासंदर्भात एखादी स्टोरी प्रसिद्ध करूया म्हणून, पण कामाच्या ताणानं तो काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे ते राहून गेलं असावं.
नोव्हेंबरमध्येच मी मालवणला गेलो होतो, पण मोदी येण्याची तयारी १५ -२० दिवस आधीच चालली असावी. कारण हा रस्ता बंद, तो रस्ता बंद, इकडून जायचं नाही, तिकडून जायचं नाही हा प्रकार पाहून मी अक्षरशः कंटाळलो आणि त्याच्याशी संपर्क साधण्याच्या भानगडीत पडलोच नाही.
यानंतर तो प्रसिद्ध पुतळा उदघाटनाचा समारंभ झाला. त्यावेळी मी काही मालवणात नव्हतो. तो समारंभ देखील मी जेमतेम टीव्हीवरून पाहिला. हे असले कार्यक्रम आणि कंठाळी भाषणं मी सहसा टाळतो, पण इथं मात्र शिवाजी महाराज, सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला, मालवण हे माझे आवडीचे विषय असल्यामुळं कसाबसा तो कार्यक्रम पाहिला. तो कार्यक्रम झाल्यानंतरच्या आठवड्यात मी मालवणला गेलो होतो. यावेळचा कुडाळपासून मालवणपर्यंतचा प्रवास अतिशय सुविहित झाला. रस्त्यावर एकही खड्डा नव्हता, पण मालवण शहरात मात्र बॅनर्स आणि होर्डिंग्सचं साम्राज्य पसरलं होतं. मालवणच्या रिक्षावाल्यांकडून त्या कार्यक्रमाचे खूप किस्से कळले. उदाहरणार्थ दोन दोन हेलिपॅड बांधली गेली, कोट्यवधी रुपये त्यात खर्च केले गेले, आणि दुसऱ्या दिवशीच त्यातलं एक हेलिपॅड निकालात काढलं गेलं, वगैरे वगैरे…
यावेळी मालवण बंदरातूनच तो पुतळा मी पाहिला. जयदीपने काढलेली काही स्केचेस आम्ही लेखाबरोबर प्रसिद्ध केली होती, त्यामुळे त्या स्केचेसचा आणि दुरून दिसणाऱ्या पुतळ्याचा संबंध मला लगेच लक्षात आला. का कुणास ठाऊक मला तो पुतळा बघण्यासाठी राजकोट किल्ल्यावर जावंसंच वाटेना ! माझ्यासोबत आलेले चित्रकार मित्र मात्र वेळ काढून तो बघायला गेले. पण परत आले ते तणतणतच. नावंच ठेवत होते. मुंबईहून दोन चाकरमानी त्यावेळी मालवणला माझ्यासोबत आले होते. त्यांचा खरं तर कलेशी काही संबंध नाही, पण ती महाप्रसिद्धी पाहिल्यामुळे ते आवर्जून पुतळा पाहायला गेले होते, पण ते देखील आले ते नाक मुरडतच ! त्यांनाही तो पुतळा आवडला नसावा. त्यावेळीही मी काही तो पाहायला गेलो नाहीच.
बहुदा मार्च महिन्यात मी तो पाहिला. आणि खरं सांगायचं तर मला काही तो फारसा पटलाच नाही. ज्या पद्धतीनं ते सारं काम करण्यात आलं होतं त्याला टिपिकल कमर्शियल फिनिशिंग होतं, पण त्यात भावना मात्र अजिबात दिसत नव्हत्या. ज्या टेकडीवर तो किल्ला बांधला आहे त्या टेकडीवरून जे खडक खाली गेले आहेत त्यावर उदघाटन समारंभाच्या वेळी गवताच्या कृत्रिम लाद्या आणून बसवल्या असणार. कार्यक्रमानंतर त्याला पाणीच घातलं गेलं नसणार, साहजिकच ते सारं गवत सुकलं होतं. एक घाणेरडा कृत्रिम कमर्शियल फील त्या साऱ्या कामातून येत होता. त्यात कुठलाही आपलेपणा नव्हता. किल्ल्यातली फुलझाडं देखील सुकली होती यावरून त्या कार्यक्रमाच्या दिवशी जे काही लक्ष दिलं गेलं तेच अंतिम असावं, नंतर हा भाग पूर्णपणे दुर्लक्षित केला गेला असावा याविषयी माझी पक्की खात्री पटली.
आम्ही गेलो होतो ते बहुदा मार्चमध्ये, पण त्यावेळी देखील तोडकाम-जोडकाम चालू होतं. काही भाग कोसळला होता, त्याची दुरुस्ती चालू होती. ते पाहून माझी पक्की खात्री पटली की कुणा धंदेवाईक कंत्राटदाराचंच हे काम आहे. ज्याची सरकारदरबारी वट आहे अशा कोणत्यातरी कंत्राटदाराने ते काम घेतलं असणार आणि ते सरळ सबकॉन्ट्रॅक्टरला देऊन टाकलं असणार. त्या दोघांनी मिळून जे काही दिवे लावले होते ते तिथे दिसत होते.
पुतळ्याविषयी काय सांगावं ? ( खरं तर इथं शिल्प हा शब्द अपेक्षित होता, पण शिल्प हा शब्द वापरण्यासारखं तिथलं वातावरण नव्हतं. त्याला पुतळाच म्हणायला पाहिजे. पुतळा आणि शिल्प यातली सीमारेषा आता पुसट झाली आहे हा काळाचा महिमा आहे. ) सांगण्यासारखं त्यात काही नव्हतंच ! आमचे सार्वजनिक गणपतीवाले देखील खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रक्चर तयार करतात आणि त्या मुर्त्यांची ने-आण देखील करतात. इथं तर एकाच जागी तो पुतळा बसवायचा होता. तो देखील धड बसवला गेला नसणार असं उघड उघड दिसत होतं. खालून लोखंडाच्या मोठमोठ्या तुळया किंवा खांब वेल्डिंग केलेले किंवा जोडलेले दिसत होते. जे गलिच्छ म्हणता येईल असंच होतं. पत्रा एकमेकांवर चढवून काम केलं तर कसं दिसेल ? तसं ते सारं दिसत होतं. मी काही शिल्पकलेतला तज्ज्ञ नाही, पण हे शिल्प फार काळ टिकणार नाही हे मात्र मला लागलीच मनोमन वाटून गेलं. अर्थात तिथं त्याचा उच्चार करणं देखील योग्य नव्हतं, पण माझ्या चित्रकार मित्रांच्या कानावर मात्र मी हॉटेलवर आल्यावर घातलं होतं. तिथल्या एकूण वातावरणाविषयी फेसबुकवर मी बहुदा दोन पोस्ट लिहिल्या होत्या, त्या अतिशय वाचल्या गेल्या होत्या.
इथून पुढं मी जे लिहिणार आहे ते गेल्या ३५ वर्षात महाराष्ट्र सरकारनं दृश्यकलेचं, दृश्यकला शिक्षणाचं कसं पद्धतशीररित्या वाटोळं केलं त्याविषयी. त्याचीच परिणती या अतिशय भयंकर अशा शोकांतिक घटनेत झाली आहे. आणि आज या साऱ्याचं खापर ही बेशरम लोकं नेव्हीच्या माथ्यावर फोडू पाहत आहेत. पुराव्यानिशी मी हे सारं दाखवून देणार आहे. अवश्य वाचा !
सतीश नाईक
जयदीप आपटे यांचे लेख वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.
https://chinha.in/features/creating-shivaji-maharaj/?fbclid=IwY2xjawFI03ZleHRuA2FlbQIxMAABHeF-sKTV9rqaGdrbdhiGcFn7u8kJlm-2ezzKocvcOZeSAmQ1zCi9ldi5Jg_aem_FLDgYFhH_Id5Tc_NP4Jzkg
https://chinha.in/features/my-sculptures/?fbclid=IwY2xjawFI04tleHRuA2FlbQIxMAABHStJfkPG4h6Hni5QC0Ia9Co5VvrNJS4fdJKa-ym7qnGR3DlrMp8Oe2wmtA_aem_bQNmfB7q2g4Big00JH85LQ
Related
Please login to join discussion