EditorialFeatures

अब आया ऊंट पहाड़के निचे !

मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून छिन्न विच्छिन्न होऊन जो महाभयंकर अपघात झाला तो अपघात आणखीन कितीतरी शे वर्ष मराठी माणसांच्या मनात डचत राहील, सलत राहील. ज्या पद्धतीनं त्या घटनेला राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली आहे ती पाहता शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे केवळ मराठी समाजापुरतंच मर्यादित नव्हतं हे देखील यातून पुन्हा नव्यानं सिद्ध झालं. जे कुणी या प्रकरणात येन केन प्रकारेण सहभागी होते ते सारे आता या घडीला त्या भयंकर घटनेला जी प्रचंड प्रसिद्धी मिळाली ते पाहून गर्भगळीत अवस्थेत निश्चितपणे असतील.
‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध करा !’ अशा पातळीवर येऊन अतिशय कणखरपणे या प्रकरणाची उकल जर संबंधितांनी केली तर निश्चितपणे या सगळ्या प्रकरणामागे जी काही भीषण मोडस ऑपरेंडी राबवली गेली ती सारीच्या सारी अगदी उघड्या-नागड्या पद्धतीनं समाजापुढे येईल. नव्हे ती यायलाच हवी आहे. या दृष्टीनंच आता मराठी जनमाणसानं आपला आवाज आता बुलंद करायला हवा आहे. यातले जे जे म्हणून कुणी आरोपी निघतील त्यांना वेचून वेचून शिक्षा दिली गेली पाहिजे, मग ते कुणीही असोत !
या साऱ्याला सुरुवात झाली ती सुमारे ३८-३९ वर्षांपूर्वी. तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी उघड उघडपणे कसा भ्रष्टाचार करायचा हे अगदी उघडपणे दाखवून दिलं आणि तिथूनच पुरोगामी आणि प्रागतिक म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र सरकारला नाट लागली. तिथूनच राज्यशासनाच्या, प्रशासनाच्या घसरगुंडीला सुरुवात झाली ती अद्यापपर्यंत सुरूच आहे. किंबहुना ती आता सुधारण्याच्या पलीकडे गेली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. त्या साऱ्याचा परिपाक म्हणजे ही मालवणची घटना !
महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात असंख्य वाईट घटना घडल्या असतील. पण त्या पद्धतशीरपणे दाबल्या गेल्या, बाहेर येऊ दिल्या नाहीत. म्हणूनच त्यावर फारशा लोकभावना व्यक्त झाल्या नाहीत. आणि ज्या झाल्या त्याचं दमन करण्यात राज्यकर्ते नेहमीच यशस्वी ठरले. यावेळी मात्र ते आपल्याच सापळ्यात अलगद अडकले आहेत. आता इथून मात्र त्यांची सुटका कितपत होईल याविषयी मनात शंका आहे, कारण ही सारी भयंकर घटना महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या जाणत्या राजाच्या संदर्भात घडली आहे. म्हणूनच तिला भारतभर अतिशय व्यापक प्रसिद्धी मिळाली आहे. आता यात सारेच अडकले आहेत. जे कुणी कुणाला सोडवायला जातील त्यांचं देखील उघडं – नागडं स्वरूप आता संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे.
या साऱ्याला कारणीभूत ठरली आहे ती महाराष्ट्र राज्याच्या कोणे एके काळी सर्वोच्च स्थानावर असलेल्या कलाशिक्षणाची अवहेलना ! स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या राज्यांमधलं महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य होतं किंवा आहे की ज्यात चित्रकला शिक्षणासाठी कला संचालनालयाची स्थापना केली गेली. बाकी अन्य कोणत्याही राज्यामध्ये कलाशिक्षणाची अशी दुसरी व्यवस्थाच नाही. या अशा एकमेव विभागाला प्रोत्साहन देण्याचं सोडून महाराष्ट्र शासनाच्या नोकरशाहीनं अन्य खात्यांप्रमाणेच या खात्याची देखील वाताहत करून टाकली. भ्रष्टाचारानं हे खातं अक्षरशः बरबटून टाकलं आणि तिथूनच महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाला नाट लागला तो लागलाच !
१९८५ साली चित्रकार बाबुराव सडवेलकर कलासंचालक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्या पदावर महाराष्ट्र शासनानं अक्षरशः एकाहून एक भयंकर असे गणंग आणून बसवले. या गणंगांनीच कला संचालनालयाची पूर्णपणे वाताहत करून टाकली. एक जुनी आठवण सांगावीशी वाटते… त्यावर्षी मी जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत होतो. बाबुराव सडवेलकर कलासंचालक होते. अधिष्ठाता संभाजी कदम होते. त्यावेळी बहुदा पहिल्यांदाच २६ जानेवारीच्या परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ पाठवण्यात आला होता. तो चित्ररथ कलासंचालक बाबुराव सडवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बनवला गेला होता. रेखाटन तयार करण्यापासून २६ जानेवारीच्या संचलनात तो फिरवण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर कलासंचालक बाबुराव सडवेलकर यांचं नियंत्रण होतं. तो कार्यक्रम बहुदा चार किंवा पाच तासच असतो, पण त्यासाठी बाबुराव सतत दिल्लीला जात-येत होते. कलावंतांची एक मोठीच्या मोठी टीम ( बहुदा प्रमोद आणि विनोद गुरुजी यांची असावी ) तिथं कार्यरत होती. जेजेतले अनेक ज्येष्ठ कलाशिक्षक या समारंभासाठी सतत दिल्लीशी संपर्क साधून होते, जाऊन येऊन होते. चार किंवा पाच तासांचा तो समारंभ. आदल्या दिवशी सर्वात मोठी रंगीत तालीम आणि त्याच्या आधी सुमारे चार-पाच दिवस सराव सत्र. पण घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर कलासंचालक म्हणून बाबुराव सडवेलकर आणि त्यांचे जेजेतले सहकारी बारकाईनं लक्ष ठेऊन होते.
त्यावर्षीचा चित्ररथ प्रचंड गाजला, सर्वांचंच कौतुक झालं, पारितोषिकं देखील मिळाली. वृत्तपत्रात छान छान लेख देखील आले. हे सारं घडलं ते कला संचालकांच्या दक्षतेमुळं आणि त्यांनी दाखवलेल्या दूरदृष्टीमुळं. त्यानंतर महाराष्ट्राच्या चित्ररथाला पारितोषिकं मिळण्याची जणू परंपराच सुरु झाली. फक्त चार किंवा पाच तासांच्या संचलनासाठी सडवेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मेहनत केली होती. अगदी बारीक बारीक गोष्टीत लक्ष घालून महाराष्ट्राला पुरस्कार मिळवून दिला होता.
आणि आता तब्बल ४०-४२ वर्षानंतर शिवाजी महाराजांचं सुमारे ३५ फुटाचं शिल्प साकारताना मात्र मालवणच्या राजकोट किल्ल्यावर होतं कोण ? तर तो एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आलेला शिल्पकार जयदीप आपटे आणि त्याचे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले शिल्पकार सहकारी किंवा तंत्रज्ञान जाणणारे कर्मचारी. कला संचालनालयातला किंवा उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा एकही अधिकारी त्यावर देखरेख करण्यासाठी तिथं नव्हता. इतकं मोठं कोट्यवधी रुपयांचं काम चालू असताना तिथं सरकारचे प्रतिनिधी असायला हवे होते. किंबहुना जबाबदार सरकारी कर्मचारी तिथं असायला हवे होते. पण तिथं कोण होतं तर आपटेच फक्त आपली आपटत होते. ज्यांनी त्याला हे काम दिलं त्यांची ही जबाबदारी नव्हती ? त्यांनी पाहायला नको होतं की हे काम बरोबर होत आहे किंवा नाही ? लोकांचे कोट्यवधी रुपये तुम्ही त्यात घालणार आहात, ‘साक्षात’ पंतप्रधानांच्या उपस्थितीत त्या पुतळ्याचं उदघाटन होणार असेल तर ते काम कसं चाललं आहे यावर संबंधितांनी देखरेख करायला हवी होती की नको ? ( जवाब दो… हां या नहीं ? ) कुणीच कसं तिकडं फिरकलं नाही ? जर नेव्हीने ही जबाबदारी घेतली होती असं बांधकाम मंत्री जाहीरपणे हे सांगत असतील तर नेव्हीचे जबाबदार लोकं तिथे असायला हवे होते की नको ? ही उभयतांची जबाबदारी नाही ? ती जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली असती तर नंतर घडलेली भयंकर घटना निश्चितपणे घडली नसती. अत्यंत बेजबाबदारपणे महाराष्ट्र शासनातले लोक वागले आहेत आणि नेव्हीचे देखील. आता शिवशाही असती तर या साऱ्यांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं यात माझ्या मनात तरी शंका नाही.
ही फक्त सुरुवात आहे. जेजे स्कूल ऑफ आर्टचं आणि महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाचं १९८५ सालानंतर राज्यकर्त्यांनी जे काही वाट्टोळं केलं ते वाटोळंच या साऱ्याला कारणीभूत आहे, असं मी या क्षेत्रातला जागरूक कार्यकर्ता आणि एक जबाबदार नागरिक म्हणून स्पष्टपणे सांगू इच्छितो. गेली ४२ वर्ष मी शासनाशी आणि त्यांच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेशी संघर्ष करीत आलेलो आहे.
आताशी कुठे शासनानं डिनोव्हो दर्जा जाहीर करून या बाबतीत लक्ष घातलं आहे असं म्हणता येईल. पण तिथंही आता नव्यानं भानगडी सुरु झाल्या आहेत. त्याविषयी मी सविस्तर लिहिणारच आहे, पण आता मात्र पुढले दोन-तीन किंवा कदाचित जास्तही लेख तरी या दुर्घटनेच्या संदर्भातच विस्ताराने लिहिणार आहे, सारी कारणमीमांसा करणार आहे. अशी संधी यानंतर मला पुन्हा कधीही मिळणार नाही याची मला खात्री आहे, म्हणूनच मी जे जे म्हणून काही लिहिता येईल ते पुढील आठवड्यात लिहिणार आहे. अवश्य वाचा आणि आपल्या मित्रमंडळींशी शेयर करा !
पहिली पोस्ट गेल्या ४८ तासात जवळजवळ एक लाख वाचकांनी वाचली आहे. तब्बल १२८ कमेंट्स, ८६६ रिऍक्शन्स आणि १५५ शेयर्स इतका मोठा प्रतिसाद फेसबुककर मित्रांनी या पोस्टला दिला आहे. या साऱ्यांचाच मी मनापासून आभारी आहे ! इथून पुढल्या आठवड्यात मी जे लेख लिहीन त्यालाही असाच प्रतिसाद द्यावा जेणेकरून ही मुर्दाड नोकरशाही आणि बेमुर्वतखोर राज्यकर्ते यांच्यावर थोडा तरी दबाव येईल. आणि त्यामुळे कदाचित आम्हाला आमचं प्रिय जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि महाराष्ट्राचं कलाशिक्षण वाचवता येईल.
सतीश नाईक
sateesh.naik55@gmail.com
याआधीचा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
‘चिन्ह’च्या वेबसाईटवरील जयदीप आपटे यांचे लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Related Posts

1 of 69

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.