No products in the cart.
शिवपुतळ्याच्या शोकांतिकेची कारणं जेजेच्या ऱ्हासात !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात जी भयानक शोकांतिका घडली तिच्याविषयी ती घडल्यानंतर तासाभरातच युट्युबवर व्हिडीओज येऊ लागले. ऑनलाईन वृत्तपत्रांनी धडाधड बातम्या दिल्या. एकाहून एक स्फोटक बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होऊ लागल्या. प्रत्येकाचंच म्हणणं असं होतं की आपण देतोय तीच बातमी एक्सक्लुसिव्ह आहे. त्यात बरीच माहिती चुकीची देखील दडपून देण्यात आली होती. अगदी उदाहरण द्यायचं तर जयदीप आपटे हा २४ वर्षाचा तरुण आहे वगैरे… कुणीतरी हे पहिल्यांदा लिहिलं आणि त्यानंतर काही काळ हेच गृहीत धरून लोकं जयदीपला बडवू लागले. काहींनी तर तो शिल्पकला शिकलेलाच नाही वगैरे वगैरे बातम्या देखील दिल्या. त्या वाचत असताना खरोखरच मनोरंजन होत होतं. एक तर इतकी भयंकर घटना घडल्यानंतर ज्यानं तो पुतळा घडवला त्याचं काय झालं असेल ? त्याच्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली असेल ? याचं कुठलंही भान न बाळगता युट्युबवरच्या चॅनल्सनी अक्षरशः गोंधळ घातला.
या घटनेचं बातमीमूल्य आणि उपद्रवमूल्य जाणून नंतर मग राजकारणी देखील यात उतरले आणि मग एकच चिखलफेक सुरु झाली. त्यानंतर जे काही घडलं ते खरोखरच महाराष्ट्राच्या जनतेला शरमेनं मान खाली घालायला लावणारं होतं. त्यांचे एकूण हावभाव पाहून या मंडळींना खरोखर मनापासून दुःख झालं असेल असं मानणं केवळ अशक्य होतं.
त्या साऱ्याशी मला व्यक्तिशः काहीही घेणं देणं नाही. मी जे काही लिहितो आहे त्यातून मला हेच जाणवून द्यायचं आहे की हे जे कुणी टिनपाट राज्यकर्ते आपल्यावर राज्य करत आहेत, राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करत आहेत, तेच एका अर्थानं या महाभयंकर घटनेला कारणीभूत आहेत. या राज्यकर्त्यांनीच, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, महाराष्ट्राच्या कला शिक्षणाची पर्यायानं कला संचालनालयाची आणि कलेची अक्षरशः वाताहत करून टाकली आहे. गेली जवळजवळ चार दशकं मी या संदर्भात कडाडून टीका करतो आहे, पण तिच्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता. गेली अनेक दशकं महाराष्ट्राला कलासंचालक नाही हे मी विविध माध्यमातुन सातत्यानं सांगत आलो आहे. इतकंच नाही तर चार शासकीय कला महाविद्यालयात सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणता येतील असे अधिष्ठाता देखील महाराष्ट्र सरकारला नेमता आले नाहीयेत. केली गेली आहे ती फक्त वशिल्याच्या तट्टूची खोगीर भरती. आणि या वशिल्याच्या तट्टूनी कलाक्षेत्रात भ्रष्टाचाराचं थैमान माजवलं आहे. त्याचीच परिणती ही भयंकर घटना घडण्यात झाली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ही अवस्था झाली असल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष याकडं वेधलं गेलं आहे. त्याचाच फायदा घेण्यासाठी मी या विषयावर सातत्यानं लिहायचं ठरवलं आहे. या घटनेची पाळंमुळं जोपर्यंत शोधली जात नाही तोपर्यंत कुणाचाही मुलाहिजा न बाळगता परखडपणे टीका करायची असं मी ठरवलं आहे. त्याच मालिकेतला हा पुढचा लेख.
*****
या लेखासोबत जे कला संचालनालयाकडून प्रसारित केलेलं आर्टवर्क दिलं आहे त्यात किती चुका आहेत पहा ! कला संचालनालय या शब्दाचा उच्चार ‘कला संचलनालय’ असा अत्यंत चुकीचा केला आहे. याचा अर्थ असा की, प्रत्यक्ष कलासंचालक म्हणवणाऱ्या व्यक्तीला देखील कला संचालनालयाचा उच्चार कसा करावा हे ठाऊक नाही. तो इसम गेली सात-आठ वर्ष कला संचालकांच्या खुर्चीवर बसून नको नको ते उपद्व्याप करतोय. या गृहस्थांचा आणि चित्रकलेचा शष्प देखील संबंध नाही. त्यांना कला कशाशी खातात हे देखील ठाऊक असेल की नाही याबद्दल देखील माझ्या मनात शंका आहे. ज्या पोस्टरमध्ये त्यांनी स्वतःचा फोटो छापून घेतलाय त्या पोस्टरमधली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना पाहिलीत ? शिवाजी महाराज त्यांच्या डोक्यावर उभे आहेत असा भास होतो आहे. हे यांचं कलेचं ज्ञान ! यावरून काय लायकीची माणसं महाराष्ट्रात सर्वोच्चपदाचं काम करतात याची स्पष्ट कल्पना येते. खरं तर या साऱ्या अपराधाबद्दलच त्यांना टकमकटोकावरून ढकलून देऊन शिक्षा करायला हवी. दैनिक लोकसत्तानं २९ ऑगस्टच्या अंकात या गृहस्थांची मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी जे तारे तोडले आहेत ते केवळ भयंकर आहेत. फेसबुकवर ही पोस्ट प्रसारित होताच त्यावर शेकडो प्रतिक्रिया आल्या आहेत आणि प्रतिक्रिया देणाऱ्यांनी संबंधितांना अक्षरशः धोपटून काढलं आहे. पण याची त्यांना ना लाज, ना शरम, ना खंत !
महाराष्ट्रात कुठंही राष्ट्रपुरुषांचा पुतळा उभारायचा असेल तर त्यासाठी कला संचालनालयाची परवानगी लागते. पूर्वी या परवानगी देणाऱ्या समितीमध्ये ज्येष्ठ शिल्पकार, तज्ज्ञ अशांचा समावेश असायचा. ही समिती कलावंतानं दाखवलेल्या मॉडेल्सवर आधी आपला अभिप्राय द्यायची आणि नंतर प्रत्यक्ष पुतळ्यावर आपले मत नोंदवायची. पण कलासंचालक पदावर एकेक आचरट इसमाच्या नेमणूका झाल्यानंतर हळूहळू ही प्रथा मोडीत काढली गेली. कालांतरानं तर या समितीची सूत्र ही फक्त जेजेचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे आणि कलावंतांची चांडाळ चौकडी यांच्या हाती गेली. आणि मग तिथं कुठलाच धरबंध राहिला नाही. जर या चांडाळ चौकडीमधले कलावंत व्यावसायिक शिल्पकार असते तर त्याविषयी कुणीच आक्षेप घेतला नसता ( अगदी मी सुद्धा ) पण हे चौघंही शिल्पकला नव्हे, चित्रकला शिकलेले होते. साबळे यांना व्यावसायिक कामांमध्ये मदत करण्यासाठी ते एकत्र आले आणि मग साबळ्यांचेच झाले.
भारतात कुठेही मोठी कामं निघो, अगदी दिल्लीपासून कर्नाटकापर्यंत, जेजे स्कूल ऑफ आर्टला त्यासंदर्भात विचारणा झाली की हेच सारे साबळ्यांच्या मदतीला जाऊ लागले. हळूहळू या चौघांनी जम बसवला आणि प्रदर्शनाची, स्टॉल्सची, म्युरल वगैरेचीच नाही तर शिल्पकलेची कामं देखील ते घेऊ लागले. खरं तर हे चौघंही चित्रकलेचं शिक्षण घेतलेले, पण पुतळ्यांची कामं देखील सराईतपणे घेऊ लागले.
हे धाडस केवळ जेजे स्कूल ऑफ आर्टमुळेच ते करू शकले. अशी काही मोठी पुतळ्यांची वगैरे कामं आली की जेजेच्या नुकत्याच पास झालेल्या माजी हुशार विद्यार्थ्यांना बोलवायचं किंवा डिप्लोमाच्या वर्गात शिकणाऱ्या हुशार सिनियर विद्यार्थ्यांना बोलवायचं आणि त्यांना नानाविध आमिष दाखवून कामं करायला भाग पाडायचं हे धंदे त्यांनी सुरु केले. शेवटच्या वर्षी परीक्षेत नापास करतील या भीतीनं विद्यार्थी देखील यांच्यात येऊन कामं करू लागले. हे बहुसंख्य विद्यार्थी अगदी मध्यमवर्गीय घरातून आलेले असतात. त्यांना पैशाची गरज असते. त्यामुळे हे यांच्या भूलथापांना बळी पडतात, पण काही विद्यार्थी मात्र यांना खमके भेटतात. ते यांना सुनवायला देखील कमी करत नाहीत, ‘आम्हाला आमच्या आई-वडिलांनी जेजेमध्ये शिकायला पाठवलं आहे, माती मळायला नाही !’ असे विद्यार्थी मात्र यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये जातात. त्यांना परीक्षेत लटकवलं जातं. अगदी आता सुद्धा हेच सुरु आहे. यावर आतापर्यंत खूप टीका झाली पण जेजेमध्ये हे अद्यापही चालू आहे. कारण वर जाब विचारायलाच कुणी नाही.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना सत्याची थोडी जरी चाड असेल तर त्यांनी सेवानिवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करून यांची चौकशी करावी असे मी त्यांना जाहीर आवाहन करतो आहे. जर तशी नेमणूक ते करत असतील तर सर्व माहिती देण्याची जबाबदारी घेण्यास असंख्य कलावंत पुढे येतील याची मी खात्री देतो. बरं हे चांडाळ चौकडीमधले सभासद आहेत तरी कोण ? ठाऊक आहे ? ते आहेत चक्क जेजे स्कूल ऑफ आर्टमधले शिक्षक. त्यातला एक कायमस्वरुपी आहे तर अन्य हंगामी किंवा कंत्राटी. जेजे स्कूल ऑफ आर्टचा वापर हे सारे टेबल स्पेससारखा करतात असं जेजेमध्ये सर्रास बोललं जातं. शंभर-शंभर, दोनशे-दोनशे, चारशे-चारशे कोटींची कामं ही मंडळी करतात.
आता मला सांगा यांना सरकारनं नेमलं आहे ते जेजेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी तर ज्यातून जास्त पैसा मिळतो ती कामं हे करतील की विद्यार्थ्यांना शिकवतील ? यांना कामगारांची फारशी गरज लागत नाही, कारण जेजेत भरपूर गरजू मुलं पडलेली असतात. त्यांना ‘अनुभव मिळावा’ या उदात्त हेतूनं यात ओढलं जातं. कधीही जेजेमध्ये जा, ही चांडाळ चौकडी वर्गावरच नसते अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. कारण यांची सतत कामं चालू असतात. यातल्या तिघांनी तर नव्या मुंबईत स्टुडिओ देखील उघडले आहेत असं सांगितलं जातं आणि तिथं ही सर्व कामं केली जातात. मान्य आहे हे कायमस्वरूपी सरकारी नोकरीत नाहीत, पण सरकारी कला महाविद्यालयात तर शिकवतात ? लाखांनी पगार तर घेतात ? मला सांगा अशी जर मोठी मोठी कामं आली तर त्या कामांकडे आपण अधिक लक्ष देऊ की विद्यार्थ्यांकडे ? तेच आता जेजेत होतंय. विद्यार्थ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातंय. जर विद्यार्थी यावर आक्षेप घेऊ लागले तर त्यांना सरळ करायला यांना काही फार वेळ लागत नाही. पुढल्या परीक्षेत त्या विद्यार्थ्यांची पार वाजवून टाकतात ! विद्यार्थ्यांना धमक्या देण्यात तर हे फार माहीर आहेत, विद्यार्थीच सांगतात…
दर महिन्याला शासनाकडून पगार मात्र वाजवून घेतात. अहोरात्र ही मंडळी कामं करतात. शनिवार-रविवार मुंबईच्या बाहेर जातात, बँगलोरसारख्या शहरात तर यांची कोट्यवधींची कामं सुरु आहेत. हे वर्गात नसतात तर यांच्या उपस्थितीचा सह्या करतं तरी कोण ? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं यांचे बॉस विश्वनाथ साबळेच देऊ शकतील. सरकारला जर खरोखरच यासंदर्भात चौकशी करायची असेल तर आम्ही निश्चितपणे हजेरीच्या कागदपत्रांचे पुरावे देऊ ! उपस्थितीचा स्वाक्षऱ्या केल्या नसताना सुद्धा कसा पगार काढला जातो याची आता तरी होणार आहे चौकशी ?
हे तर काहीच नाही, सीईटी परीक्षेत सुद्धा यांचीच पॉवर चालते. हे म्हणतील त्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. कुठलीही सरकारी किंवा निमसरकारी कामं येवोत, त्या कामांमध्ये यांचीच नेमणूक केली जाते. निवृत्तीनंतर राहायच्या बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या दिल्लीतल्या घराचं इंटेरियर करायला सुद्धा यांचीच मदत घेतली जाते. हे बडे अधिकारी जर यात सहभागी असतील तर कोण यांच्यावर कारवाई करणार ? खालपासून वरपर्यंत सगळे या पापात सहभागी आहेत. जेजे स्कूल ऑफ आर्टचं आणि जेजे स्कूल ऑफ आर्टच्या शिक्षण परंपरेचं या सगळ्यांनी मिळून अक्षरशः मातेरं करून टाकलं आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी शोकांतिका झाली त्या साऱ्याच मूळ यात आहे. कसं ते वाचा पुढील असंख्य लेखात…
सतीश नाईक
sateesh.naik55@gmail.com
‘चिन्ह’च्या वेबसाईटवरील जयदीप आपटे यांचे लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Related
Please login to join discussion