No products in the cart.
दादा , जेजेत मॉर्निग वॉकला याच …
स्वातंत्र्योत्तर भारतात आजतागायत अन्य कुठल्याही राज्यात अस्तित्वात नसलेल्या पण केवळ महाराष्ट्रात दृश्यकलेच्याच प्रसारार्थ स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाची कबर ९०च्या दशकात पुण्यातल्या एका इसमाने खणायला घेतली. त्या नंतर या पदावर बसण्याचं ‘भाग्य’ लाभलेल्या कायम आणि सुमारे ११-१२ प्रभारी कला संचालकांनी नंतरच्या २० -२५ वर्षात आपापल्या मगदुराप्रमाणे त्यात भर घालून प्रथम गाढवाचा ‘नांगर’ फिरवणाऱ्या त्या कला संचालकाचं स्वप्न साकार करावयाचा चंगच बांधला. तो बांधणाऱ्यातले बारावे आणि शेवटचे शिलेदार होते प्रा (?) विश्वनाथ साबळे. कर्मधर्म संयोगाने ते देखील पुण्याचेच.म्हणजे पुण्यामधूनच शिक्षण वगैरे झालेले. त्यांनी अवघ्या सहा महिन्यातच कला संचालनालयाचे पूर्णतः बारा वाजवण्यास सुरुवात केली. पण त्यांना ‘बारावे’ घालण्यापासून रोखण्यास जी व्यक्ती पुढं आली ती मात्र चक्क पुण्यातून निवडून आलेली असावी याला काव्यगत न्याय म्हणावयाचे नाही तर दुसरे काय ? होय. आम्ही महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संदर्भातच बोलत आहोत. ९०च्या दशकात सुधीर बापट आणि किरीट सोमय्या याना विधानसभेत प्रचंड रान उठवून देखील एका भाजपच्याच खासदारामुळे जे जमू शकलं नव्हतं ते चंद्रकांत दादांनी अगदी विनासायास जमवून दाखवलं त्याबद्दल दादांचं अभिनंदन करायलाच हवं.
शुक्रवारी म्हणजे ३० डिसेंबर रोजी नागपुरातूनच एक थेट शासकीय आदेश काढून आधी उच्च शिक्षण मंत्र्यांनी महाराष्ट्राचा कला संचालक बनण्याचं विश्वनाथ साबळे यांचं स्वप्न कायमस्वरुपी निकालात काढलं आणि साबळे यांची जेजेत वर्णी लावणाऱ्या एका पूर्ण राष्ट्रवादी तर साबळे यांचीच कलासंचालक पदावर प्रतिष्ठापना करणाऱ्या दुसऱ्या अर्ध्या राष्ट्रवादी आणि आता पाव पाव शिवसेनावादी असलेल्या मंत्र्यांना देखील सणसणीत चपराक लगावून दिली . हे सारं कमी पडलं म्हणून की काय आणखी एक आदेश काढून त्यांनी राज्यस्तरीय कला विद्यापीठाचा अभ्यास (?) अहवाल करण्यासाठी आधीचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आचरटपणे निर्णय घेऊन ‘ गठीत ‘ केलेली फोकनाड समिती देखील निकालात काढली . अशा पद्धतीनं दादांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत यात शंकाच नाही .
डिसेंबर महिन्याच्या पूर्वार्धात जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि कला संचालनालय यांच्या आज झालेल्या दुरावस्थेचं कथन करण्यासाठी आम्ही दादांची त्यांच्या निवासस्थानी विशेष भेट घेतली होती . त्या छोट्याशा भेटीत देखील दादांनी अत्यंत लक्षपूर्वक सारं ऐकून घेतलं होतं आणि विधानसभा अधिवेशन संपताच योग्य ती कारवाई करण्याचं आणि जानेवारीच्या पूर्वार्धात आपण जेजेला विशेष भेटी देणार आहोत इतकंच नाही तर मोठ्या बैठका देखील घेणार आहोत असं आश्वासन देखील दादांनी दिलं होतं . प्रत्यक्षात विधानसभा अधिवेशनाचं सूप वाजतं न वाजतं तोच तातडीनं कारवाई करुन दादांनी संबंधितांना चकित करुन सोडलं आहे यात शंकाच नाही .
जेजे परिसरातला हा संघर्ष १९९४ सालापासून सुरु आहे . पण गेल्या २८ वर्षात ज्यात समाधान मानावे अशी एकही बातमी सरकारनं कधी दिलेली स्मरत नाही . म्हणूनच दादांनी दिलेल्या या बातमीचा आनंद खूप मोठा आहे .इतका मोठा की ३० रोजी सायंकाळी आम्ही पहिल्यांदा ब्रेकिंग न्यूज देताच ती बातमी अगदी वणव्यासारखी पसरली . हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘व्हायरल’च झाली . रात्रभर प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया येतच राहिल्या.अजूनही येतच आहेत . या संघर्षात आपण एकटेच नसून जेजेचे असंख्य चाहते आपल्या पाठीशी असल्याचं भान देखील या बातमीनं आम्हाला दिलं यात शंकाच नाही . म्हणूनच दादांचे जाहीरपणे आभार मानण्यास आम्हाला कोणताही संकोच वाटत नाही .
हा लढा व्यक्तिगत स्वार्थासाठी तर कधीच नव्हता , किंवा कुणाही व्यक्तीच्या विरोधात देखील नव्हता . श्री साबळे यांच्याशी कधी साधे हस्तांदोलन केल्याचे देखील आम्हाला स्मरत नाही . हा लढा होता तो प्रवृत्ती विरोधात . स्वतःच्या स्वार्थासाठी शे दीडशे वर्षाची उत्तम बांधलेली व्यवस्था मोडून काढून जेजे स्कूल ऑफ आर्टला भिकेला लावण्याच्या विरोधात हा सारा संघर्ष होता . आणि गेली अनेक वर्षे आम्ही जे कळकळीने मांडत होतो त्यातली सत्यता पटल्यामुळेच चंद्रकांतदादांनी हे पाऊल उचलले असणार याची आम्हाला खात्री आहे .संबंधितांनी असे सांगितले की ही तर केवळ सुरुवात आहे . ट्रेलर आहे ‘ पिक्चर अभि बाकी है ! नागपूरमध्ये झालेल्या मिटींग्जमध्ये दादांनी उद्वेगाने म्हणा किंवा इशारा म्हणून म्हणा ‘मी आता रोज सकाळी जेजेमध्ये मॉर्निंग वॉकलाच यायचा विचार करतो आहे , असे उदगार काढले असल्याचे कळले , तसे जर असेल तर जेजेचे नष्टचर्य आता संपलेच म्हणायचे !
बाकी आता वरचेवर भेटतच जाऊ. ‘चिन्ह’च्या सर्वच वाचकांना , चाहत्यांना , हितचिंतकांना नव्या वर्षाच्या अगदी मनापासून शुभेच्छा ! नव्या वर्षानिमित्तानं खूप नवे संकल्प सोडले आहेत. खूप नवे आणि मोठे बदल करीत आहोत . कसे वाटतात ते अवश्य कळवा ! पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा !!
– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह’
Related
Please login to join discussion