EditorialFeatures

खरंच, चार ओळी वाचायलाही वेळ नसतो ?

चिन्ह ‘च्या यु ट्यूब चॅनलवर गेल्या शनिवारपासून आम्ही ‘ कनक कनक पायल बाजे ! ‘ हा चित्रकलेच्या क्षेत्रातील नव्या उमेदीच्या कलावंताच्या कर्तृत्वाचा परामर्ष  घेणारा कार्यक्रम सुरु केला आहे . chinha art newsच्या कार्यकारी संपादक कनक वाईकर त्या सादर करणार आहेत . त्या कार्यक्रमाला नाव काय ठेवायचं यावर विचार सुरु झाला आणि अचानक व्ही शांताराम यांचा ‘ झनक झनक पायल बाजे ‘ हा अजरामर चित्रपट आठवला आणि क्षणार्धातच नाव पक्कं झालं ‘ कनक कनक पायल बाजे ! प्रतिक्रिया अजमावाव्यात  म्हणून एका दोघांना फोन केले तर ते हसतच सुटले . आणि लगेचच चित्रकार सिद्धेश नेरुरकर यांच्याकडे लोगो तयार करण्यासाठी  मेसेज रवाना झाला.

पहिल्याच कार्यक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळाला . कार्यक्रम सुरु झाला आणि पहिली काही मिनिटं दोन जण कार्यक्रम लाईव्ह पाहत असल्याचं लक्षात आलं . बहुदा ते दोघे म्हणजे मी आणि कनकच असावेत . काही मिनिटांनी मात्र प्रेक्षक येऊ लागले . वीस एक मिनिटांनी कार्यक्रम संपला तेव्हा सुमारे १०० एक लोकांनी कार्यक्रम पाहिल्याची नोंद झालं हॊती . आणि मग तो आकडा सतत वाढतच गेला २०० ३०० ४०० वगैरे . आज तीन दिवसांनी ८०० पेक्षा अधिक लोंकानी हा कार्यक्रम पाहिल्याची नोंद झाली आहे . प्रतिक्रिया देखील खूप आल्यात . येतच आहेत .

आता या आठवड्यात आणखी एक वेगळाच कलावंत कनक सादर करणार आहे . महेंद्रा ट्रॅक्टरची महिला दिनानिमित्ताने केलेली आणि खूप गाजलेली जाहिरात आठवतेय . एक तरुणी ट्रॅक्टर चालवण्याची परीक्षा देतेय वगैरे . हा तीच , तुम्ही नक्कीच पाहिली असणार , ती ज्यानं केली तो तरुण या कार्यक्रमात आपल्या भेटीला येणार आहे . कार्यक्रम आवर्जून पहा ! येत्या शनिवारी सायंकाळी ७ वाजता चिन्हच्या यु ट्यूब चॅनलवर त्याचा प्रीमियर होईल .

फक्त मुंबई – पुण्यातच नाही तर अन्य शहरात देखील खूप छान काम करणारे कलावंत तयार होत आहेत त्यांना आवर्जून प्रसिद्धी द्यायची , त्यांचं काम लोकांसमोर आणायचं हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे . आणि तो साकार करण्यासाठी आम्ही चिन्ह’च्या आमच्या वेबसाईटचा , समाज माध्यमांचा अगदी पुरेपूर वापर करतो आहोत .  पण हल्ली समाज माध्यमं चालवणाऱ्या कंपन्यांकडून खूपच हस्तक्षेप केला जाण्याचा , त्याच प्रमाणे अकौंट्सची हालचाल मर्यादित केली जात असल्याचा वारंवार अनुभव येऊ लागला आहे . त्यावर उपाय म्हणून आम्ही आता आमच्या chinha.in या संकेतस्थळाकडेच जास्त लक्ष केंद्रित  केलं आहे.

त्याचा एक भाग म्हणून आम्ही ५०० – ५०० कलावंत कलारसिकांचे व्हाट्सअप ग्रुप्स तयार केले आहेत . आता पर्यंत चार  ग्रुप्स पूर्ण भरले आहेत . तर आणखी दोन मध्ये रोजच नवे नवे लोक येऊन दाखल होत आहेत .आणखी चार  पाच दिवसातच हे ग्रुप्स देखील भरुन जातील  या ग्रुप्स द्वारे आम्ही आमचे कार्यक्रम आज २००० लोकांपर्यत पोहोचवत आहोत , तर १९ ब्रॉडकास्ट ग्रुप्स मार्फत सुमारे ५००० कलारसिकांपर्यत आम्ही आमचे कार्यक्रम आणि  आर्ट न्यूज मधले लेख पोचवत आहोत . पण ब्रॉडकास्ट ग्रुप संदर्भात सातत्यानं तक्रारी येत असल्यानं लवकरच ते बंद करीत आहोत .पण  हळू हळू व्हाट्सअप ग्रुप्सची ही संख्या वाढवत नेत किमान २५ हजार कलारसिकांना यात सहभागी करुन घेण्याचं प्राथमिक उद्दिष्ट्य आम्ही समोर  ठेवलं आहे . तेव्हा सर्वानाच या  निमित्तानं विनंती आहे की आपण तर यात सहभागी व्हाच पण आपल्या मित्र परिवाराला देखील या विषयी सांगा . ज्यांना भविष्यात चित्रकलेत करिअर करायचं आहे अशाना तर या कार्यक्रमाविषयी आवर्जून सांगा . जेणे करुन ते सारे ‘ चिन्ह ‘च्या या अभिनव चळवळीत सहभागी होतील .
चित्रकलेच्या प्रसारासाठी हे असे अव्याहत उपदव्याप चालू असताना खूप वेगवेगळे अनुभव येतात . काही मजेदार असतात तर काही कडवट देखील असतात . व्हाट्सअप ग्रुप्स आणि मेसेजेस संदर्भात हे लेखन करीत असताना आलेला अनुभव आपल्याशी शेअर केल्यावाचून  राहवत नाही . परवा नव्या कार्यक्रमाचे मेसेजेस पाठवल्यावर आलेला हा काहीसा  खट्टू  करणारा अनुभव . आतापर्यंत ‘चिन्ह’नं  फाईन आर्टच्या क्षेत्रात काम केलं आहे त्यामुळे आता तिथं अपवादानेच काही अनुभव मिळतात . पण या नव्या कार्यक्रमामुळे आता आम्ही उपयोजित कलेच्या क्षेत्रात आणि तेही मुंबई पुण्याबाहेर पोचतो आहोत . अशाच काही व्हाट्सअप ग्रुपवर आम्ही शनिवारच्या कार्यक्रमाच्या पोस्ट्स फॉरवर्ड केल्या ज्यात त्या लाईव्ह कार्यक्रमाची लिंक देण्यात आली होती . सायंकाळी ७ वाजता आम्ही प्रीमियर आयोजित केला होता . म्हणजे ७ वाजता किंवा त्यानंतर जे कुणी त्या लिंकवर क्लिक करणार होते त्यांना तो कार्यक्रम लाईव्ह प्रीमियरद्वारे दिसू लागणार होता .

चिन्ह’चे आजवर १०० -१२५ लाईव्ह कार्यक्रम किंवा २५-३० प्रीमियर्स आम्ही गेली दोन तीन वर्षे अशाच पद्धतीनं सादर करतो आहोत . तीच पद्धत आम्ही  इथं अंगिकारली होती . पण कार्यक्रमाआधीच अनेकांचे फोन -मेसेजेस येऊ लागले की ‘ कार्यक्रम दिसत नाहीत वगैरे काहीतरी तुमचं चुकलंय वगैरे. त्या साऱ्यांना सांगता सांगता आमचीच पुरेवाट झाली की ‘ कार्यक्रम सायंकाळी सात वाजता सुरु होणार आहे . सात वाजता दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि कार्यक्रम पहा , आम्ही तसं त्या लिंकसोबत जे थंबनेल जोडलं आहे त्यात दिलेल्या छोट्याशा माहितीत तसं म्हटलं आहे ‘ वगैरे .  त्यावर बहुतांशी फोन करणाऱ्याकडून उत्तरं आली की ‘ अरेच्चा, आम्ही  ते वाचलंच नाही . काहींनी तर म्हटलं की ‘ हॅ , इथं वाचायला कोणाला वेळ आहे ?’ वगैरे.

आता यावर काय बोलावं ? आमची तर बोलतीच बंद झाली . आपण कशासाठी करतो आहोत ? कुणासाठी करतो आहोत ? असे प्रश्न देखील मनात क्षणभर डोकावून गेले . त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमोल ठाकूरने औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयाच्या सांप्रतच्या अवस्थेचं  काही थोड्या शब्दात जे वर्णन केलं आहे ते ऐकल्यावर दोष कुणाला द्यायचा ? सरकारला ? मंत्र्याला ? सचिवादी नोकरशहांना ? शिक्षकांना ? का यात भरडल्या गेलेल्या / जाणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना ? असे अनेक प्रश्न मनाला सतावून गेले ! अजूनही त्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत ! तुम्हाला ती मिळाली असतील तर आम्हाला जरूर कळवा ?
****
‘कनक कनक पायल बाजे’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाची लिंक. शेवटच्या प्रश्नात अमोल ठाकूर ने शासकीय कला महाविद्यालयाच्या सध्याच्या परिस्थितीवर नेमके भाष्य केले आहे. आवर्जून ऐका.

– सतीश नाईक
मुख्य संपादक

chinha.in

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 69

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.