EditorialFeatures

महाराष्ट्रात काय पण चालतं !

गेल्या आठवड्यापासून गोव्याच्या कला महाविद्यालयाच्या बातम्या गोव्याच्या वृत्तपत्रातून गाजतायत . गोव्यातले असंख्य चित्रकार महाराष्ट्रातल्या चित्रकारांचे मित्र असल्याने या बातम्यांची कात्रणं अर्थातच महाराष्ट्रातल्या चित्रकारांच्या व्हाट्सअप ग्रुप्सवर फिरली नसती तर ते नवलच ठरलं असतं . आलेली जास्तीत जास्त कात्रणं या मजकुरासोबत देण्याचा प्रयत्न केला आहे त्यावरून नेमका काय प्रकार घडला असावा याची चांगलीच कल्पना येते.

त्या बातम्या वाचून हसावे का रडावे हेच कळेना. आपल्याकडे गोव्यात चालते तसे काही एक नाही . अहो इथं कुठल्याही टिनपाट गावातून कुणीही फडतूस माणूस येऊन कुठल्याही कला महाविद्यालयाचा प्राचार्य होऊ शकतो ,इथं डिप्लोमा होल्डर देखील सरकारी कला महाविद्यालयाचा अधिष्ठाता देखील बनू शकतो , इतकंच काय पण महाराष्ट्राचा कला संचालक देखील बनू शकतो .

खरंच सांगतो शिवाजीराव आमच्या महाराष्ट्रात अत्यंत उमद्या मनाचे लोक राहतात . इथं बिहार , उत्तर प्रदेश , झारखंड सारख्या महाराष्ट्रापासून लांबलांबच्या राज्यातून आलेल्या लोकांना देखील आम्ही आमचंच मानतो . इथं त्या त्या पदावर बसणाऱ्या उमेदवारांना उमदे व्यक्तिमत्व असलेच पाहिजे असा कुठलाच आग्रह आमच्याकडे नसतो. सदर उमेदवार बुटका असला तरी आम्हाला चालतो , त्याचे दात पडलेले असतील तर ती त्याची जास्तीची गुणवत्ता असल्याचे मानण्याची आमचेकडे प्रथा आहे .एखादा उमेदवार अपंग असला नसला तरी मानानं वागवण्याची इथं संस्कृती आहे . एखाद्याला इंग्रजी येत नसले तरी आम्हाला चालते थोडेफार जुजबी बंबईय्या हिंदी आले तरी आम्हाला चालते . महाराष्ट्रात आहोत म्हणजे शुद्ध मराठी यायला पाहिजे असाही आमचा आग्रह नसतो .सर्वत्र मोठमोठाल्या पदांवर निर्णय घेणारे असेच बसवले जात असल्याने सारे जण एकमेकाला संभाळून घेतात .

मातृभाषेत शुद्ध मराठीत घराचा पत्ता लिहिता आला नाही तरी इथं मोठ्या मनानं सारे संभाळून घेतात . मागे एकदा आमच्या एका कॉलेजात दिल्लीवरुन एक मुलगी प्रवेश घ्यायला आली . सीईटीत पहिल्या पाचात आली असावी. आल्याबरोबर बापाने दिलेलं पत्र डीन सायबांना दिलं . मुलगी पहिल्यांदाच मुंबईसारख्या शहरात जातेय त्याची काळजी वाटून बापानं डीन सायबांना स्वतः पत्र दिलं होतं . बाप शे सव्वाशे वर्ष जुन्या कंपनीचा प्रमुख . त्याला वाटलं आपल्या पत्रामुळे डीन सायेब आपल्या मुलीकडे लक्ष ठेवेल . पण झालं भलतंच . ज्या लेटर हेडवर ते पत्र होतं त्याच्या कंपनीच्या नावातला ‘ कूक ‘ हा शब्द वाचुन त्या डीनने त्या मुलीला फाडफाड इंग्रजीत प्रश्न विचारला ” सो युवर फादर इज कुक ? ” डीन सायबाचा तो भयंकर प्रश्न ऐकला आणि त्या मुलीनं अशा कॉलेज मध्ये आपल्याला शिकायचंच नाही असं म्हणून ते पत्र परत घेऊन तिकडून अक्षरशः पळ काढला . हा किस्सा भयंकर व्हायरल झाला पण तरी सुद्धा तो डीन सायेब नियत वयोमानानुसारच निवृत्त झाला . सांगायचं तात्पर्य काय तर आमच्याकडे महाराष्ट्रात काय पण चालतं .

आणखी एक किस्सा पहा . असेच एक विभाग प्रमुख , काय त्यांचा अवतार वर्णवा ? ते साधा एका वर्षाचा डिप्लोमा करुन तिथं लागले होते पण नंतर तर ते हंगामी अधिष्ठाता देखील झाले होते , इतकंच नाही तर महाराष्ट्राचं कलासंचालकपद देखील भूषवत होते त्यांनी महाराष्ट्र सरकार तर्फे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकातच घपला केला होता . त्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना सभागृहात माफी देखील मागावी लागली पण यांच्यावर मात्र निलंबनानंतर काहीही कारवाई झाली नाही . आता मस्त पैकी निवृत्तीवेतन घेत छान जगताहेत .

आमच्याकडच्या विनाअनुदानित अनुदानित कला महाविद्यालयात तर आदल्या वर्षीचे गुणवान (?) विद्यार्थी शिक्षक म्हणून नेमण्याची प्रथा आहे . इतकंच नाही तर त्यांना त्याच्या पुढच्या वर्षी तर थेट प्राचार्यच करुन टाकण्याची देखील प्रथा आहे . त्यामुळेच की काय आमच्या महाराष्ट्रात इतकी कला महाविद्यालयं फोफावली आहेत की नक्की त्यातली किती चालू आहेत आणि किती बंद पडली आहेत ते कला संचालनालयातल्या तथाकथित अधिकाऱ्यांना देखील सांगता येत नाही , आता बोला !

गोव्यातल्या बातम्या वाचून हे सारे लिहावेसे वाटले . बाकी आता बोलण्यासारखे काही उरलेलेच नाही हे एव्हाना हे सारे वाचणाऱ्याच्या लक्षात आले असेलच !

– सतीश नाईक

****

Related Posts

1 of 69

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.