No products in the cart.
कलावंत कलासंचालकांचे कारनामे !
एका रात्रीत उच्चशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी प्रभारी कलासंचालक प्रा राजीव मिश्रा यांची उचलबांगडी केली आणि त्यांच्या जागी प्रभारी कलासंचालक म्हणून जे जे स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांची नेमणूक करुन टाकली आणि मग सर्व नीतिनियमांना चाट देऊन ते जेजे मधल्या साबळे यांच्या सत्काराला उपस्थित देखील राहिले . मंत्र्याच्या हस्ते ‘प्रभारी’पदावर नेमणूक झाल्याबद्दल कुणा अधिकाऱ्याचा सत्कार झाल्याचं आपण कधी पाहिलं होतं ? पण तेही अभूतपूर्व दृश्य आपल्याला पाहावं लागलं . या नंतर काय काय घडणार ? आपल्याला काय काय पाहावं लागणार याची जणू पूर्व सूचनाच त्या सत्कार समारंभानं कलाक्षेत्राला दिली असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरू नये . तो कार्यक्रम झाला आणि नंतर मात्र लागलीच सामंत साहेब गोहाटीला जाऊन पोहोचले . जणू काही नियतीनं सामंत साहेबाना साबळे यांना कलासंचालक पदावर विराजमान करण्यासाठीच पाठवलं असावं असं वाटावं असाच तो सारा प्रकार होता . सामंत साहेब कलाविद्यापीठ काढण्याच्या स्वप्नांचं गाजर दाखवून महाराष्ट्राच्या उद्योगांचं कल्याण ( ? ) करण्यासाठी निघून गेले आणि इथं साबळ्यांनी आपल्या पॅलेटवरचे रंग दाखवावयास सुरुवात केली .
त्यांनी आजवर दाखवलेल्या किंवा उधळलेल्या रंगांचं मूल्यमापन , विश्लेषण किंवा पृथ:करण करण्याचं काम सुरुच आहे. योग्य वेळ येताच ते सारं आम्ही पुराव्यानिशी जाहीर करुच पण त्या आधी कला संचालनालयाच्या सीईटी परीक्षेचे जे धिंडवडे त्यांनी काढले आहेत त्यांचा समाचार घेणं अत्यावश्यक वाटतं आहे. माझी नवी तरुण सहकारी कनक वाईकर हिनं या सीईटी परीक्षेसंदर्भात जी स्टोरी दिली ती वाचून कलाक्षेत्रातल्या अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली असेल . खरोखरच संतापजनक प्रकार आहे हा सारा . महाराष्ट्रातल्या तीन हजार मुलांच्या आयुष्याशी म्हणजे पर्यायानं महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राशी खेळण्याचा अधिकार साबळे याना कोणी दिला असा प्रश्न आता तरी सरकारमधली कुणी जबाबदार व्यक्ती साबळे याना विचारणार आहे का ? का हे सारं घडवून आणल्याबद्दल कायमस्वरूपी कलासंचालकपदावर त्यांची नेमणूक करणार ? असा जाहीर प्रश्न आम्ही उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील याना विचारू इच्छितो .गेली तब्बल ४०- ४२ वर्षं आम्ही विविध माध्यमातून जे जे आणि कलाक्षेत्राचे ज्वलंत प्रश्न प्रत्येक तंत्रशिक्षण मंत्र्यांसमोर अत्यंत कळकळीनं मांडतो आहोत पण कुणीच कसं याची दखल घेत नाही याचं आश्चर्य वाटतं . नाही म्हणायला जेजेचा कॅंपस मात्र अजून जागच्या जागी शिल्लक राहिलाय ( तो देवनारला हलवायचे प्रयत्न देखील झाले , नाही असं नाही .) पण बाकी सारं मात्र गेल्या ४० वर्षात अक्षरश: नेस्तनाबूत केलं गेलं आहे. कलासंचालक नाही , सुशिक्षित सुसंस्कृत अधिष्ठाता नाहीत , प्राध्यापक नाहीत , अध्यापक नाहीत , शिपाई नाहीत , सुरक्षा रक्षक नाहीत , एव्हडा मोठा झाडांनी आच्छादित परिसर पण माळी देखील नाहीत . अशी गेल्या ३५ वर्षात सरकारनं आपल्या अनास्थेपायी या जागतिक दर्जा प्राप्त संस्थेची दुर्दशा करुन ठेवली आहे .
याचा फायदा मधल्या काळात मंत्र्यांच्या खाजगी सचिव , स्वीय साहाय्यक आणि गुंडपुंडांनी घेतला नसता तर नवलच . त्यांनी मग काहीही करायचं शिल्लक ठेवलं नाही . पदं , भरती , प्रवेश साऱ्याच विभागात अक्षरश: नंगानाच केला त्यांनी . ओवाळून टाकलेली माणसं एकत्र आल्यावर जे काही होतं ते आता इथं होऊन गेलेलं आहे . त्याचेच अवशेष सीईटी परीक्षेतील भ्रष्टाचाराच्या रुपानं डोकं वर काढू पाहत आहेत . सीईटी परीक्षेला बसलेल्या एका मुलीला निकाल का लांबतोय हे कळेना आणि त्यातून तिनं संगणकावर शोध घ्यायला सुरुवात केली आणि अचानक तिला आपला निकाल पाहता येतो आहे याचा शोध लागला. तो तिनं आपल्या क्लासच्या सरांना दाखवला . सरांनी मग त्यात प्रातिनिधिक स्वरुप लक्षात यावं यासाठी आणखी २५ नंबरांची भर घातली आणि साऱ्यांचे पेपर्स मिळवले . त्यांचा अभ्यास केल्यावर या साऱ्या प्रकारामागची मोडस ऑपरंडी त्यांच्या लक्षात आली आणि मग त्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधला .
कनकची स्टोरी प्रकाशित होताच मात्र एकच खळबळ उडाली . ‘चिन्ह’ला विरोध करणारे देखील काहीतरी गडबड झाली असल्याचं मान्य करू लागले . सीईटी बोर्डाला देखील निकाल जाहीर करणं पुढं ढकलावं लागलं . एक दिवस निकाल पुढं ढकलून त्यांनी केलं काय तर थातुर मातुर बदल . म्हणजे पहिली आलेल्या मुलीला त्यांनी मागं ढकलून दिलं वगैरे . डेटा ऑपरेटरची ‘ मिस्टेक ‘ म्हणे . किती शरमेची गोष्ट आहे ही ! सरकारी तिजोरीतून महिन्याला लाखो रुपये पगार घेणारी ही माणसं किती निर्लज्जपणे कोवळया मुलांची आयुष्य कशी लेखणीच्या एका फटकाऱ्यानिशी बरबाद करुन टाकतात पहा . म्हणूनच या साऱ्याचा आम्ही अत्यंत बारकाईनं पाठपुरावा केला . त्यातून उजेडात आलेल्या साऱ्याच गोष्टी अक्षरश: हबकून टाकणाऱ्या होत्या . त्या साऱ्याच एकाच लेखात मांडणं अशक्य होतं . म्हणूनच ही विशेष संपादकीय लेखांची मालिका आजपासून प्रसारित करीत आहोत .
– सतीश नाईक
संपादक
****
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला 90040 34903 या व्हाट्सअप नंबरवर जरूर कळवा. त्या आम्ही पुढच्या लेखात जरूर प्रकाशित करू. लक्षात ठेवा आपल्या प्रतिक्रिया येणे महत्वाचे आहे तेव्हाच एक चळवळ उभी राहील आणि भविष्यात होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.
‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion