Features

‘तुका’ झालासे कळस ! 

आपल्याकडे चित्रकारांना समाजाकडून मान्यता मिळते ती थोडीशी उशिराच. म्हणजे पन्नाशीच्या नंतर साठीच्या अलीकडे पलीकडे… गायतोंडे, हुसेन, रझा यांच्यापासून थेट बरवे यांच्यापर्यंत साऱ्यांचीच उदाहरणं सर्वश्रुत आहेत. पण अशा पन्नाशीनंतरच्या प्रवासात ऐन भरात आलेल्या चित्रकारावर आंधळं होण्याचा भयंकर प्रसंग गुदरला तर ? हे काल्पनिक नाहीये, वस्तुस्थिती आहे ! चित्रकार तुका जाधव यांच्या बाबतीत अगदी असंच घडलं आहे. ५२व्या वर्षी त्यांच्या दिसण्याच्या तक्रारी सुरु झाल्या. आधी बहिणीला अंधत्व आलं आणि मग त्यांच्यावरही तीच आपत्ती कोसळली. हे काहीसं अनुवंशिकच म्हणावं लागेल. आयुष्यभर चित्र काढायचं ठरवलं होतं आणि हे काय मध्येच विचित्र झालं. उपचारासाठी त्यांनी खूप धावपळ केली, पण काही उपयोग झाला नाही. १४ वर्षात हळूहळू आजूबाजूचं सारं दिसेनासं होत गेलं. आणि आता तर काहीच दिसत नाही.

पण गडी खंबीर आहे ! बायकोला किंवा मित्रांना घेऊन जहांगीर किंवा चित्रकला प्रदर्शन पाहण्यासाठीचा प्रवास मनात येईल तेव्हा करत असतो. गेल्या वर्षी तर त्याला नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबईनं सल्लागार मंडळावर देखील नियुक्त केलं. मुंबईतच नाही तर दिल्लीला देखील तो मिटिंगसाठी जाऊन येऊन असतो. मोबाईल, व्हॉट्सॲप याचा तो सजगपणे जागरूक राहून वापर करत असतो. अलीकडेच घडलेली घटना सांगतो, लताबाई गेल्या त्याचदिवशी सकाळी जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद यामध्ये कलाध्यापक म्हणून काम केलेले दिलीप बढे यांचं औरंगाबादेत निधन झालं. तर औरंगाबादमधल्या त्यांच्या शोकसभेसाठी तो खास आंबेजोगाईवरून औरंगाबादला गेला होता आणि तिथं त्यानं भाषण देखील केलं.

हे तर काहीच नाही… काल फोनवरून बोलताना त्यानं जे मला सांगितलं ते ऐकून मी खरोखरच चक्रावून गेलो की काय माणसाची जिजिविषा असेल ! ६५ व्या वर्षी आंबेजोगाईमधल्या त्याच्या वडिलोपार्जित जमिनीत तो ४० बाय २० फुटाचा स्टुडिओ बांधतोय ! मी विचारलं, स्टुडिओ कशासाठी रे ? तर म्हणाला, अजून खूप काम करायचंय मला. मी खरंच चक्रावून गेलो आणि त्याला विचारलं की, कसं करतोस तू काम ? तर तो म्हणाला, माझी बायको मदत करते मला. आणि कुणी कुणी येतात, लहान मुलं, मित्रमंडळी.. त्यांना सांगतो मी लावायला रंग. म्हणजे तुला पेंटिंग अजून दिसत असतं ? हो ना, म्हणाला. माईंडमध्ये सगळंच दिसत असतं. माईंड हा त्यानंच वापरलेला शब्द. पेंटिंग घडण्याची प्रक्रिया अंतर्मनात सतत चालूच असते.

न राहवून मी विचारलं, अरे पण एवढा मोठा स्टुडिओ का बांधतोयस ? तर म्हणाला, आमची थोडी बहुत जमीन आहे तिथं, माझे वडील तर शेतकरी. ते म्हणाले, या जमिनीचा उपयोग लोकांसाठी कर ! दुमजली इमारत बांधतोय तिथं. त्यात मी माझ्या चित्रांचं म्युझियम देखील करणार आहे आणि दोन तीन रूम्स देखील काढतो आहे जेणेकरून बाहेरून येणाऱ्या चित्रकारांना किंवा विद्यार्थ्यांना तिथं राहता येईल. त्यावर मी विचारलं, कुठवर आलंय काम ? तर म्हणाला, डिझाईन मॉडेल वगैरे झालंय, प्रत्यक्ष जोत्याचं काम देखील सुरू झालंय. मे मध्ये बहुदा, महाराष्ट्र दिनी उद्घाटन देखील करायचा विचार आहे. मी त्याला म्हटलं, फोटो पाठवशिल ? तर म्हणाला, हा.. पाठवतो की ! फोन ठेवला आणि मिनिटाभरात त्यानं मॉडेलचे फोटो पाठवले. मी लगेच फोन करून त्याला सांगितलं, बांधकामाच्या जागेचे फोटो पाठव की… तेही त्यानं पुढल्या १० मिनिटात पाठवले. जे या पोस्टसोबत दिले आहेत. आहे की नाही कमाल ?

जेजेत शिकत असताना तुका एक वर्ष माझ्या वर्गात शिकायला होता. ज्यानरसारख्या एका विषयात काही मार्क कमी पडल्यानं तो नापास झाला होता. मग प्रा. संभाजी कदम सरांच्या सल्ल्यानं त्यानं पुन्हा प्रवेश घेतला आणि तो आमच्या वर्गात आला. तसा तुका एकटा एकटाच असायचा, स्वतःतच हरवलेला. बोलायचा देखील कमी, पण चुकून माकून बोललाच तर काहीसं छापील बोलायचा. त्यामुळे टारगट मित्रमंडळी त्याची थट्टा देखील करायचे. त्याकाळात पँथरची चळवळ खूप जोरात होती. जेजेमधले काही विद्यार्थी देखील त्या चळवळीत होते. तुका देखील त्यांच्यात शिरला होता. पँथर अरुण कांबळेंचा भाऊ चंदू हा त्याचा जेजेतला मित्र ! त्यामुळे नामांतर मोर्च्यांमध्ये देखील तो सहभागी झाला होता. पण तिथं तो फारसा रमला नाही. किंबहुना नंतर नंतर तर तो त्यांच्याशी फटकूनच वागू लागला.

कॉलेजमध्ये असताना तो सतत स्केचिंग करताना दिसायचा. आधी जलरंगात आणि नंतर तैलरंगात त्यानं असंख्य पोर्ट्रेट्स केली होती. राज्य कला प्रदर्शन, बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या प्रदर्शनात त्याच्या चित्रांना बक्षीसं देखील मिळायची. बॉम्बे आर्ट सोसायटीची बेंद्रे हुसेन स्कॉलरशिप ही त्याच्या आयुष्यातली टर्निंग पॉईंट ठरली. त्यानंतर तो थेट एसएनडीटी विद्यापीठात अध्यापक म्हणून रुजू झाला. अत्यंत प्रामाणिकपणे त्यानं अध्यापनाचं काम केलं. प्रभा अत्रे वगैरेंच्या विषयी तो खूप छान आठवणी सांगायचा. संध्याकाळी जहांगीरच्या पायरीवर बसला म्हणजे त्याच्या गप्पांना अगदी बहर यायचा. मराठवाड्यातून आलेली असंख्य मुलं हॉस्टेलमध्ये राहत असत, त्याच्यासोबत ती गॅलरीतही असत. त्यातल्या अनेकांनी व्यसनांपायी स्वतःतील कलावंत संपवून टाकला. काहींनी तर स्वतःला देखील संपवलं. पण तुका मात्र त्या साऱ्यापासून लांबच राहिला.

या काळात त्यानं मुंबईत १० प्रदर्शनं भरवली. जवळजवळ तितक्याच ग्रुप शो मधून त्यानं आपली चित्रं प्रदर्शित देखील केली. २००८ किंवा ०९ साली त्याच्या डोळ्याच्या तक्रारी सुरु झाल्या. खूप उपाय केले पण तक्रारी थांबेचनात ! तितक्यात त्याच्या बहिणीला अंधत्व आलं. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की हे प्रकरण अनुवंशिक असावं. जिथं जिथं यावर उपचार होतात, तिथं तिथं तो भारतभर जाऊन आला, पण हळूहळू निराश देखील होत गेला. त्यावर आता काहीच उपाय नाही हेही कळून चुकलं. १० सालानंतर हळूहळू त्याला दिसणं कमी होत गेलं. आणि आता तर त्याला जवळजवळ पूर्ण अंधत्व आलंय. बायकोच्या साथीनं तो सारी कामं करतो, अगदी पेंटिंग सुद्धा ! सांगत होता, खूप मित्रमंडळी मदत करतात. त्यामुळं मी सतत काहीना काही करत राहतो. बहुदा अंधत्व आल्यानंतर त्यानं बासरी जवळ केली आहे. अप्रतिम वाजवतो ! फेसबुकवर एक दोन रेकॉर्डिंग देखील कुणीतरी ठेवली आहेत. उद्या ती याच पेजवर पाहायला मिळतील, अवश्य पहा, ऐका ! कला अभिव्यक्तीमध्ये अडथळा आल्यावर एखादा कलावंत आपल्यात साठलेली ऊर्जा कशा पद्धतीनं दुसऱ्या कलेत संक्रमित करतो हे त्यातून अतिशय सुरेख पद्धतीनं स्पष्ट होतं.

५ तारखेला होणाऱ्या या ‘गच्चीवरील गप्पा’ माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय ठरणार आहेत, कारण यात बीडसारख्या गावातून आलेला एक तरुण मुंबईत स्वतःला कसं उभं करतो, कलाविश्वात नाव कमावतो आणि दृष्टी जाण्यासारखा भयानक प्रसंग ओढावल्यावर सुद्धा कशी पुढं पुढं वाटचाल करीत जातो. या वयात, या अवस्थेत गावात स्वतःचा स्टुडियो, म्युझियम उभारण्याचं स्वप्न पाहतो, हे सारंच भन्नाट आहे. म्हणूनच ५ तारखेला होणारा हा तुका जाधव यांच्यासोबतचा हा ‘गप्पां’चा कार्यक्रम चुकवू नका !

सतीश नाईक

संपादक ‘चिन्ह’

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.