Features

मला ‘मदन’ भासे हा !

एके दिवशी संध्याकाळी एक फोन आला… आधी कधी फोन आलेला नसल्यामुळं तो नंबर माझ्या फोनमध्ये अर्थातच सेव्ह केलेला नव्हता. पलीकडे कुणीतरी तरुण बोलत होता. ‘गच्चीवरील गप्पां’चे कार्यक्रम पाहून तो अतिशय प्रभावित झाला असावा. त्याच भरात त्यानं फोन केला होता आणि त्यानं पाहिलेल्या ‘गप्पां’च्या कार्यक्रमांपैकी अनेकांवर तो भरभरून बोलत होता. स्तुती कोणाला आवडत नाही ? पण असं कोणी भारून जाऊन बोलू लागलं की मलाही थोडं अवघडल्यासारखं होतं. गेले काही दिवस आपण रोजच ‘गप्पां’चे एकेक कार्यक्रम बघतोय, असं तो सांगत होता.

भाषा मुंबई-पुण्याची नव्हती, सांगली- सातार – कोल्हापूरची असावी. विशेषतः त्यातले कोल्हापुरी हेल आणि खटके मला अधिक जाणवत होते. कुतूहलानं त्याला विचारलं, कुठून बोलतोयस ? तर म्हणाला, इकडे, भांडुपवरून. म्हटलं, ही भांडुपची भाषा नाही वाटत ! नाही सर, म्हणाला, मी मूळचा कोल्हापूरचा. काय करतोस ? विचारलं तर म्हणाला, आर्ट डिरेक्टर म्हणून काम करतो. कसलं आर्ट डिरेक्शन करतोस ? तर म्हणाला, सिनेमांचं ! फिल्म इंडस्ट्रीत काम करतो म्हणाला. कोल्हापूरहून कधी आलास ? विचारलं तर म्हणाला, झाली १२ – १३ वर्ष. कोल्हापूरकर आपली भाषा आणि आपल्या बोलण्याचा ढंग काही विसरत नाहीत, असं म्हणालो तर तो हसला ! ‘गप्पां’विषयी तो जे बोलत होता ते ऐकून तो चित्रकलेतला चांगलाच जाणकार असावा हे स्पष्टपणे जाणवत होतं, लक्षात येत होतं. फोनवरच्या बोलण्याचा शेवट करता करता मी त्याला आपलं सहज म्हटलं, तुझं काम व्हॉट्सअपवर पाठव, मला आवडेल पाहायला !

त्यानं रात्री उशिरा बहुदा त्याचं काम पाठवलं असावं. दुसऱ्या दिवशी ते पाहिलं आणि मी अक्षरशः उडालोच ! त्याची लँडस्केप अगदी टिपिकल कोल्हापुरी होती. पण त्यात देखील एक व्यावसायिक फिनिशिंगची हातोटी मला अधिक जाणवून गेली, जी सर्वसाधारणपणे कोल्हापूरकरांच्या लँड्स्केपमध्ये नसते. लँड्स्केपमध्ये फोटो फिनिशिंगचं स्किल त्यानं ऍड केलं होतं त्यामुळे ती अधिक लक्षवेधक भासत होती. त्याची ड्रॉइंग्ज पाहून मात्र मी अवाक झालो ! शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची त्यानं जी ड्रॉइंग्ज किंवा रेखाटनं केली होती ती केवळ अद्भुत होती ! विशेषतः त्यातलं पर्स्पेक्टिव्ह माझ्यावर अधिक प्रभाव टाकून गेलं. रायगडसारख्या किल्ल्यांतल्या उद्ध्वस्त अशा अवशेषांचा, वास्तूंचा अभ्यास करून त्यानं त्या ३५० वर्षांपूर्वी कशा असतील ? याचं अत्यंत प्रभावी असं चित्रण केलं होतं.

न राहवून मी त्याला फोन केला. म्हणाला, होय सर, मी हेच काम करतो. मी सेट डिझायनर आहे. चित्रपटांसाठी मी सेट्स करतो. काही ऐतिहासिक चित्रपटांचे सेट्स करता करता मी शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांच्या प्रेमातच पडलो. आणि मग किल्ल्यांचाच अभ्यास करू लागलो. माझ्या रेखाटनांमधून मी ते किल्ले ३५० वर्षांपूर्वी कसे असू शकतील ? हे चित्रित करीत असतो. किती वर्ष झाली तुला या क्षेत्रात येऊन ? तर तो म्हणाला, झाली असतील १० – १५ वर्ष… कोल्हापूरच्या तिन्ही महत्वाच्या कला महाविद्यालयात मी शिक्षण घेतलं आहे. बाबुराव पेंटरांचे चिरंजीव हे माझे या क्षेत्रातले गुरु. वडणगेकर सरांचं देखील मला मार्गदर्शन लाभलं. कोल्हापुरात असताना कुठं कुठं जाऊन लँडस्केप करायचो, कोल्हापूरची आमची ती परंपराच आहे. एके दिवशी पंचगंगेच्या घाटावर लँडस्केप करत होतो. काम पूर्ण झालं आणि मागे येऊन चित्र बघू लागलो तर एक गृहस्थ मला काम करताना पाहत होते. पूर्ण झालेलं काम पाहून मला म्हणाले, लय भारी ! चांगलं काम करतोस तू. पर्स्पेक्टिव्हची अतिशय छान समज तुला आहे. तू असं कर, कला दिग्दर्शक हो ! खूप नाव कमावशील.

भीत भीत मी त्यांना नाव विचारलं, तर ते म्हणाले,बळीराम बिडकर. मग माझ्या लक्षात आलं बळीराम बिडकर म्हणजे एके काळचे मराठी चित्रपटांचे कला दिग्दर्शक. ते स्वतःहून माझ्या चित्रांचं कौतुक करत होते. मला लै भारी वाटलं ! मग मला ते म्हणाले, चल घरी. त्यांच्या घरी जाऊन त्यांनी मला आपलं काम दाखवलं. माझंही खूप कौतुक केलं. पुन्हा एकदा मला म्हणाले, तू मुंबईला फिल्म इंडस्ट्रीत जा, खूप नाव कमावशील ! त्यांचा सल्ला मानला आणि मुंबईला आलो. कोल्हापूरहून मुंबईला आलो तो थेट कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडेच गेलो. त्यांनी माझं काम पाहिलं आणि मला त्यांच्या स्टुडियोत ठेऊन घेतलं.

मुन्नाभाई एमबीबीएस, स्वदेश, ब्लॅक, मंगल पांडे, गॉड तुस्सी ग्रेट हो, लगे रहो मुन्ना भाई, जोधा अकबर, राजा रवी वर्मा, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, सरीवर सरी, बालगंधर्व इत्यादी चित्रपटांसाठी मी साहाय्यक कला दिग्दर्शक आणि सेट डिझाईन ( स्केच आर्टिस्ट ) म्हणून काम केलं. नंतर मुख्य कला दिग्दर्शक आणि प्रोडक्शन डिझायनर म्हणून मणिकर्णिका, तानाजी, बाजीराव मस्तानी, मोहन जो दरो या चित्रपटांसाठी काम केलं. या काळात असंख्य स्टेज शो, इव्हेंट्स यांची देखील मी कामं केली आणि अगदी अलीकडंच मी निर्माते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या बिग बजेट ऐतिहासिक मराठी चित्रपटासाठी कला दिग्दर्शन केले. तो चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे.

यातल्या असंख्य ऐतिहासिक चित्रपटांची कामं करता करता मी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या प्रेमात कधी पडलो ते माझं मलाच कळलं नाही ! आणि मग त्या किल्ल्यांचा अभ्यास करणं, प्रत्यक्ष शिवकाळात ते कसे असतील याच कल्पनाचित्रं उभं करणं याचा मला अक्षरशः ध्यासच लागला. माझ्या पर्स्पेक्टिव्हच्या अभ्यासाचा वापर करून मी या किल्ल्यांना कागदावर किंवा संगणकात दृश्यरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. यातून पुढं काय साध्य होणार आहे हे मला ठाऊक नाही, पण काहीतरी वेगळं केल्याचं समाधान मात्र या कामानं मला भरपूर मिळवून दिलं आहे. मदन सांगत होता आणि मी अक्षरशः भारावून जाऊन ते ऐकत होतो.

मग मी मदनला सहज म्हटलं, ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये मला तुला बोलवायला आवडेल, येशील ? तर तो त्याच्या कोल्हापुरी ठसक्यात बोलला, येन की ! असा हा एक वेगळा कार्यक्रम अचानकपणे ठरला आणि त्याची तारीख देखील मला छान मिळाली, १९ फेब्रुवारी शिवजयंतीची ! संध्याकाळी अर्थातच नेहमीच्या गप्पा होणार आहेत त्या प्रख्यात चित्रकार अतुल डोडिया यांच्याशी तर सकाळी ११ वाजता आपण भेटणार आहोत तरुण कला दिग्दर्शक मदन माने यांना. ऐकायला, पाहायला विसरू नका !

सतीश नाईक

संपादक ‘चिन्ह’

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.