No products in the cart.
रायगडाच्या पायथ्याशी, कोलाजाच्या पलीकडे.
प्रतिक जाधव हा चित्रकार, शिल्पकार गेल्यावर्षीच सायकलवरून भारत दर्शनाला निघाला होता. पुढे पश्चिम बंगालमध्ये तो आला आणि कोरोना लॉकडाऊन सुरू झाला. नाईलाजानं त्याला आपला कलाप्रवास रद्द करावा लागला. नंतर तो मुंबईला आला आणि आता लॉकडाऊन उठल्यानंतर सायकलवरून तो भारत दर्शनाला निघाला आहे. आता मात्र त्यानं कोकणातून प्रवास सुरू केला आहे. महाडला त्याचा पहिला मुक्काम होता, त्याविषयी त्यानं लिहिलेला लेख आम्ही सोबत देत आहोत. इथून तो गोव्याला जाणार आहे. त्याची सगळी प्रवास वर्णनं देखील ‘Chinha Art News’ वर वाचायला मिळतील. तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा !
ऊन डोक्यावर आलं होतं आणि अंग घामानं न्हाऊन निघालं होतं. सायकल चालवत मी मुंबईहून महाड जवळ आलो होतो. महाड जवळ येताच नदी पाहूनच बरं वाटलं. ती सावित्री नदी होती. कधी नदीत उडी घेईन असं वाटत होतं. पटकन सायकल नदीकाठावर वळवली. कपडे काढून उडी घेणारच होतो तितक्यात नेहमीच्या सवयीनं मोबाईल काढून गूगल मॅप उघडला. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला अजून किती अंतर मला जायचंय ते मी पाहत होतो. मॅप उघडून पाहिला आणि मी उडालोच. मला घाम फुटला. काळजाचा ठोका चुकणं यालाच म्हणत असावं बहुदा. कारण मी जिथं उभा होतो त्या जागेला क्रोकोडायल विव्ह पॉइंट नाव होतं. अर्थात तिथून नदितल्या मगरी चांगल्या पाहता येतात. चटकन मी मागे झालो आणि गुपचूप कपडे चढवून मी महाडच्या नितीन गुरव यांना फोन लावला. माझा महाडचा मुक्काम त्यांच्याकडेच होता. मी त्यांच्या घरी जायला निघालो. डोक्यात विचार चालूच होता की मी नदीत उतरलो असतो तर काय झालं असतं…वगैरे.
नितीन गुरव हे ग्रामीण महाडच्या एका शाळेत कला शिक्षक आहेत. त्यांनी महाड मधे माझे स्वागत केले. ते माझे फेसबुक मित्र. आमची ही पहिलीच भेट.
मी ‘ कलाप्रवास ‘ सुरू केला होता तेव्हापासून ते महाडला बोलावत होते. आज तो योग जुळून आला होता.
आम्ही तयार होऊन लगेच त्यांच्या शाळेवर जायला निघालोत. ऊन चटका देत होतं पण डोळ्यासमोर सुंदर मोकळा रस्ता होता. आता मी त्यांच्या मागे त्याच्या मोटारसायकलवर होतो. सह्याद्रीचे उंचच उंच कडे होते समोर. शाळा महाड पासून 24 कि.मी. अंतरावर आहे. वाळण विद्यालय. वाटेत येणाऱ्या डोंगराकडे बोट दाखवत सर सांगत होते की कोंकण म्हणजे फक्त समुद्र किनारा नव्हे, तर हा सह्याद्री सुध्दा आहे. नेमका उन्हाळ्याच्या सुरुवातीला मला कोकणात आलेलं पाहून ते म्हणाले की, कोकण जसा जसा तापतो तसा तसा तो पिकतो सुध्दा. म्हणजे कोकणातील प्रमुख फळं याच काळात खायला मिळतात. काजू, आंबा, फणस याच मोसमात पिकतात. पुन्हा एक डोंगर आणि त्यावरची वस्ती दाखवत सर म्हणाले त्या तिथून आमची मुले रोज खाली उतरून शाळेत येतात आणि रोज हा डोंगर चढून घरी जातात. आम्ही शिक्षक गाडी घेऊन येतो. पण या मुलांची मेहनत आमच्यापेक्षा जास्त आहे. प्रत्येक शिक्षकाला मुलांच्या या खडतर वाटेची जाणिव असायला पाहिजे.
बोलता बोलता आम्ही रायगडाच्या पायथ्याला असणाऱ्या या शाळेच्या आवारात आलोत. प्रशस्त मोकळं मैदान आणि मैदानाच्या दोन बाजूला इंग्रजीच्या एल अक्षरासारख्या वर्गाच्या रांगा. माझे मन पटकन माझ्या शाळेत गेलं. शाळा सुटल्यानंर बऱ्याच वर्षांनी मी अशा शाळेत आलो होतो. शाळेत ज्या शिक्षकांच्या अवतीभोवती सुध्दा मी जास्त थांबलो नाही, अशा शिक्षकांसह आज या शाळेत आम्ही स्टाफ रूममधे डबा एकत्र खाल्ला. आम्ही मुलं डबा वाटायचो तसाच हे शिक्षक सुध्दा वाटतात हे पाहून मलाही गंमत वाटली. ते ही आमच्यासारखे थुकरट विनोद करतात हे पाहून आणखीनच हसू आलं. काय आहे ना की शिक्षकांना नेहमी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मी पाहत आलो होतो आज पहिल्यांदाच मी शाळेत एक पाहुणा म्हणून होतो आणि त्यांच्यासोबत बसलो होतो. मुलांकडे पाहताना मला वाटत होत की मीही त्या मुलांमधे कुठेतरी बसलोय आणि या सायकलने आलेल्या पाहुण्याकडे कुतूहलाने बघतोय.शाळेचा पाहुणचार झाला, मुलांसोबत संवाद झाला आणि मग मी गुरव सरांच्या चित्रकलेच्या वर्गामध्ये आलो.
भिंतींवर आणि फलकावर लावलेली चित्रेच सांगत होती की हा मुलांचा आवडीचा वर्ग आहे. हा चित्रकलेचा वर्ग होता. पण ही चित्रे वेगळी होती.
नेहमीपेक्षा खूपच वेगळी. मी अजून जवळ जाऊन पाहिलं तर ते रंगवलेली चित्र नव्हतीच. ते एक कोलाज चित्र होतं. नाही नाही, ते कोलाज सुध्दा नव्हतंच. अक्षरशः एक एमएम किंवा दोन एमेएम आकाराचे कागदी बारीक तुकडे जोडून ते चित्र पूर्ण केलं होतं. बघून अंगावर काटा उभा राहिला. या वयाची मुलं एवढं बारीक काम एवढ्या सफाईदारपणे कसं करू शकतात. आणि बर ही सुईच्या टोकावर बसतील असे बारीक बारीक तुकडे जोडून चित्र पूर्ण करायला वेळ किती लागत असेल. त्या मुलांचे पेशंस काय असतील. या सगळ्या प्रश्नांनी डोकं चक्रावून गेलं होतं. मी सरांकडे पाहिलं तेव्हा ते म्हणाले की, मी तुला अशीच नव्हतो दाखवणार ही चित्रं. माझ्याकडे मागील अगदी 17 वर्षांचा संग्रह आहे. तो मी तुला दाखवणार आहे. ती चित्रे घरी आहेत. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सोबत प्रश्नही होतेच मनामध्ये. मी घरी जाण्याची वाट पाहत होतो.
घरी गेल्यावर उशीर झाला होता आणि उद्या दिवसाच्या उजेडात ती चित्रे पाहू असं ठरलं. दुसऱ्या दिवशी गुरव सरांनी कपाटातून काही गठ्ठे काढले. आणि घराच्या हॉल मध्ये बसून ते एक एक चित्र माझ्या हातावर देत चित्राबद्दल, काढणाऱ्या मुलाबद्दल सांगू लागले. मी एक एक चित्र पाहत होतो आणि विचार करत होतो की किती अफाट काम केलय या विद्यार्थ्यांनी.
कोणत्याच अंगाने ती शालेय मुलांची चित्रे वाटत नव्हती. मातब्बर कलाकारांची कामे पाहतोय असं वाटत होतं. हॉल भर आम्ही पसारा करून बसलो होतो. किती वेळ गेला माहीत नाही. आ वासून मी ती अफाट कामं पाहत गेलो. हे असं काहीतरी अफाट पाहिलं की आपण किती लहान आहोत याची जाणिव होते. या मुलांची कामं पाहून तसंच वाटतंय. ही कामे कोलाज नाहीत, हे कोलाजाच्या पुढचं काहीतरी आहे. इतरांना या चित्रांविषयी सांगताना कोलाज या शब्दाचा आधार घ्यावा लागतोय खरा ,पण या कलाप्रकाराला स्वतंत्र नाव असावं अशी आमची चर्चा चालली होती. उदा. लघुचित्रे अनेक प्रकारची पण त्यातही बसोली लघुचित्रे, कांग्रा लघुचित्रे ही वेगवेगळी. तशीच या चित्राला स्वतंत्र प्रांतीय नाव असायला हरकत नाही.
महाडच्या ग्रामीण भागात फिरताना आम्ही वाघोली गावात गेलो. त्याच शाळेची माजी विद्यार्थिनी निकिता कालगुडे हिच्या घरी गेलो. शालेय शिक्षण पूर्ण झालं पण तिने आजही तिची या खास शैलीतील चित्रे रंगवणं चालू ठेवलं आहे. तिने या शैलीला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. बारिक तुकडे जोडून भारीच तरल छटा तिनं चित्रात आणल्या आहेत. सरांनी जरी 17 वर्षापूर्वी मुलांना हे अशी चित्रे काढणे सुचवलं असलं तरी मुलांनी एवढ्या वर्षात काम करत करत अनेक नव्या युक्त्या शोधल्या आहेत. कागदाचे बारीक तुकडे करण्यासाठी कोणी कर्कटक वापरतो तर कोणी वेगळच काहीतरी. एवढंच नाही तर कधी कधी अनेक मुलं एकत्र येऊन एक काम पूर्ण करतात. सतरा वर्षांच्या या काळात लहान भावंडांनी मोठ्या शाळेत जाणाऱ्या भावंडांना हे करताना पाहिलं आहे. ते शाळेत येण्याआधीच ही चित्रं पाहत मोठी होत आहेत. एका पिढीनं हे आत्मसात केलं आहेच. आता या गावातील अनेक पिढ्या हे करतील तेव्हा आपसूकच ह्या प्रकाराला एक लोककलेचं स्वरूप येईल. हे सगळ बघणे माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. आणि अशा वेगळ्या प्रयोगाला प्राधान्य देणाऱ्या ह्या कलाशिक्षकाला सलाम.
कोकण प्रवासात आता सावंतवाडीच्या दिशेने पुढे जात आहे. कोकणच्या या लालसर वाटांवरून सायकल चालवताना ,इथला निसर्ग आणि गोड माणसं मला चांगलीच भुरळ घालत आहेत.
– प्रतिक जाधव
कला प्रवास
Related
Please login to join discussion