No products in the cart.
ઘાટકોપરનો ચિત્રકાર !
जेजे स्कूल ऑफ आर्टच्या फाईन आर्टमधल्या पहिल्या वर्षाला शिकत असतानाच अतुलनं साऱ्या जेजेचंच लक्ष आपल्याकडं वेधून घेतलं होतं. कारण त्याच्या पेंटिंगला ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’चं त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट चित्राचं बक्षीस मिळालं होतं. एखाद्या विद्यार्थ्याला सोसायटीचा असा सर्वोच्च मानाचा पुरस्कार मिळावा हे तेव्हा तसं नवीन होतं. त्यामुळं त्याचं खूप कौतुक झालं. सारं जेजेच त्या कार्यक्रमासाठी जहांगीरला लोटलं होतं. आठवतंय मला आता… छोटाच कॅनव्हास होता, पण अतिशय प्रभावी असं पेंटिंग होतं ते. त्यावेळचे जेजेचे प्रभारी डीन आणि कला संचालक बाबुराव सडवेलकर यांनी त्या चित्राबद्दल अतिशय गौरवोद्गार काढले होते.
जेजेत जाता येता त्याच्याशी गाठभेट व्हायची, कॅंटीनमध्ये देखील आम्ही हमखास भेटायचो. नंतर खूप गाजलेला आणि अकालीच गेलेला चित्रकार विजय शिंदे देखील त्याच्याच वर्गात शिकत होता आणि मुख्य म्हणजे त्याच्याच ग्रुपमध्ये होता. त्याच्याशी अतुलचं छान जमायचं. त्या काळात मी ‘वेध’ नावाचं एक टंकलिखित अनियतकालिक प्रकाशित करीत असे. दोन किंवा तीनच अंक काढले होते त्याचे. त्या अंकात जेजेतले सारेच लिहिणारे, वाचणारे आणि चांगले चित्र काढणारे एकत्र आले होते. अलीकडेच दिवंगत झालेल्या योगेश रावळ या माझ्या मित्रानं त्या अंकाची मुखपृष्ठे केली होती. अतुलशी परिचय असल्यामुळं अतुलनं देखील त्या अंकासाठी एक दोन रेखाटनं काढली होती.
पण कसं कुणास ठाऊक त्यानंतर मात्र अतुल जेजेतल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमधून दूर दूर होत गेला ! कदाचित त्यानं जे काही ठरवलं होतं, म्हणजे पूर्णवेळ चित्रकारच व्हायचं वगैरे त्याकडे त्यानं आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं असावं. पूर्णवेळ तो वर्गातच काम करत असताना दिसे. लाल कट्टा, कँटीन, पोर्च इथं त्याचा वावर जवळजवळ नव्हताच. जेजेतल्याच एका शिक्षकांसोबत त्याचे स्नेहबंध जुळले आणि नंतर नंतर तर तो काहीसा फटकून वागतोय की काय असं काहीतरी इतर विद्यार्थ्यांना वाटू लागलं असावं. मला मात्र तो अधिकाधिक फोकस झालाय असं वाटत होतं.
जसजसा जेजेतला एकेक वर्ग तो पार करत गेला, तसतसा त्याच्यात किंवा त्याचा वर्गमित्र विजय शिंदे याच्यात मोठा बदल होत गेला. विजयचं फारसं वाचन नव्हतं, पण अतुल मात्र खूप वाचायचा. इथं सचिन आणि कांबळी यांचं उदाहरण कदाचित अप्रस्तुत वाटेल, पण ते द्यायचा मला मोह आवरत नाही हे मात्र खरंय. अगदी तसंच झालं काहीसं. अतुल अतिशय शांतपणे, विचारपूर्वक एकेक टप्पा पार करत यश मिळवत गेला तर विजयचा मात्र नंतर कांबळीच झाला. अतुल अस्सल घाटकोपरवाला होता, मराठी अस्खलित बोलायचा आणि वाचायचा देखील, पण नंतर मात्र ठरवून त्यानं स्वतःत बदल केला. इंग्रजीकडं अधिक लक्ष दिलं. किंबहुना ते सुधारावं म्हणून तो वर्गातल्या कॉन्व्हेंटच्या मुलींमध्ये अधिक राहू लागला. त्यातल्याच एकीबरोबर त्यानं नंतर लग्न देखील केलं. आता नीट आठवत नाही, पण कधीतरी मद्रास कॅफेमध्ये तो मला त्याच्यातल्या बदलाविषयी अगदी भरभरून बोलला होता.
स्वतःत केलेल्या बदलांचा फायदा त्याला जेजेमधून बाहेर पडल्यानंतर खूप झाला असावा. मुंबईच्या कलावर्तुळात प्रवेश करेपर्यंत तो सर्वच मान्यवर चित्रकारांच्या सहवासात आला होता. हुसेन, अकबर पदमसी, तय्यब मेहता, जहांगीर सबावाला यांच्यासारख्या श्रेष्ठ चित्रकारांपासून केकू गांधी, काली पंडोल यासारखे गॅलरी ओनर्स किंवा सुधीर पटवर्धन, नलिनी मलानी, गीव्ह पटेल, भूपेन खक्कर, प्रभाकर बरवे यासारख्या सर्वांचाच सहवास त्याला अतिशय समृद्ध करून गेला असावा. चित्रकार प्रभाकर कोलते यांचा सहवास तर त्याला जेजेमध्ये असल्यापासूनच लाभला होता आणि अर्थातच नंतर त्यात खंड देखील पडला. पण तोपर्यंत अतुलचं नाव कलाक्षेत्रात वाखाणलं जाऊ लागलं होतं.
त्याच्या पेंटिंग्जनी विशेषतः पेंटिंग्जमध्ये हाताळलेल्या विषयांनी त्या काळात अतुलचं नाव सर्वतोमुखी देखील होऊ लागलं. उदाहरणादाखल सांगायचं तर स्वतःला केंद्रस्थानी ठेऊन त्यानं रेखाटलेली पेंटिंग्ज, गांधीजींच्या चित्रांची प्रदीर्घ मालिका, शटर पेंटिंग्ज, मुंबईच्या पार्श्वभूमीवरची पेंटिंग्ज, विशेषतः रेल्वे स्टेशन्सवरील नामफलकांची त्याची पेंटिंग्ज, भूपेन खक्कर, त्याचे वडील, सत्यजित रे यांच्या चित्रपटातील नायिका, राजा रविवर्मा यांच्या चित्रातील प्रतिमा, लोकप्रिय हिंदी चित्रपटातील दृश्य प्रतिमा यासारख्या एकापेक्षा एक वेगळ्या अशा त्याच्या विषयांनी अतुलला चित्रकार म्हणून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं यात शंकाच नाही ! मला आठवतंय एकदा चित्रकार प्रभाकर बरवे यांच्यासोबत गप्पा मारत होतो आणि गप्पांत अतुलचा विषय निघाला. कुणाविषयी देखील अत्यंत संयमितपणे प्रतिक्रिया व्यक्त करणारे बरवे त्यादिवशी अतुलच्या चित्रांच्या संदर्भात मात्र अतिशय दिलखुलासपणे आणि मोकळेपणानं बोलले होते. त्यावेळचं बरव्याचं एकच वाक्य आज अगदी स्पष्ट आठवतं. ते म्हणाले होते, या माणसानं दृश्य प्रतिमा इतक्या हाताळल्या आहेत की पुढं हा कोणता विषय हाताळणार आहे याविषयी मला खरोखरच औत्सुक्य असतं. पण प्रत्येकवेळी तो यशस्वी ठरला आहे.
भारतातलं असं एकही महत्वाचं प्रदर्शन नाही ज्यात अतुलची चित्रं लागली नसतील. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही योकोहोमा त्रिएनाले, व्हेनिस बिएनाले, डॉक्युमेंटा, मास्को बिएनाले, एशिया पॅसिफिक त्रिएनाले इत्यादी जागतिक प्रदर्शनांत त्याच्या चित्रांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. कलाक्षेत्रातले हे खूप मोठे मानसन्मान आहेत. अतुलकडे ते त्याच्या कर्तृत्वानं चालत आले आहेत. केवळ भारतातल्याच नाही तर जगभरातल्या सर्वच महत्वाच्या कला संग्राहकांच्या संग्रहात त्याच्या चित्रांचा समावेश झालेला आहे. हे सारं असलं तरी अतुल आपली मुळं विसरलेला नाही आणि जिथून तो आला ते घाटकोपर देखील विसरलेला नाही. अशा या भारतातल्या अत्यंत महत्वाच्या चित्रकाराकडून त्याच्या आजवरच्या चित्रप्रवासाविषयी जाणून घेता यावं याच हेतूनं १९ तारखेच्या ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये त्याला आमंत्रित करण्यात आलं आहे. ऐकायला, पाहायला विसरू नका !
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह’
Related
Please login to join discussion