No products in the cart.
जनसामान्यांचा असामान्य फोटोग्राफर !
हा १९९३ सालच्या मुंबई दंगलीचा फोटो आहे. “हा फोटो मी ‘रे रोड’मध्ये घेतला आहे. आम्ही चाललो होतो आणि तितक्यात आमच्यासमोर दोन माणसं धावत आली आम्हाला वाचवा वाचवा असं म्हणत. पण आमच्याकडे फक्त कॅमेरेच होते, दुसरं काहीच नव्हतं. आणि मग ती त्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत गेली, त्यांच्या पाठीमागे एक मोठा घोळका धावत गेला, आमच्यात हिंमत पण नाही झाली की त्या घोळक्याच्या पाठीमागे जावं म्हणून. आम्हाला काही समजत देखील नव्हतं !
त्यावेळी मी दोन वेळा वाचलो होतो. माझ्या आडनावात ‘ओलवे’ हा इंग्रजी शब्द असल्यामुळेच केवळ मी वाचलो. ते म्हणाले, ‘इसका नाम तो सुधाकर है, इसको मारो !’ मी म्हणालो, ‘मै ओलवे हू, मैं ख्रिश्चन हू !’, मी सांगत होतो. माझ्या पाठी एक फोटोग्राफर होता, आमच्यावर दगडफेक झाली तेव्हा आम्हाला त्यानं वाचवलं. मी बाईकवर होतो, अर्धा किलोमीटर पोलिसांच्या छावणीपर्यंत गेलो. मी बाईकवर गेलो, पण पूर्णतः घामाघूम झालो. असा बाईकवर कधीच घामाघूम झालो नव्हतो…”
प्रख्यात फोटोग्राफर सुधारक ओलवेचा हा अनुभव ऐकताना समोरचा माणूस देखील घामाघूम होतो. स्वतःचा जीव धोक्यात घालून सुधारकने ९२-९३च्या मुंबई दंगलीतले जे फोटोग्राफ्स काढले ते सारेच खूप गाजले. या लेखाच्या प्रारंभी जो फोटो वापरला आहे तो फोटो तर जगभरात गाजला ! मुंबईच्या दंगलीचं हिंस्त्र स्वरूप याच फोटोनं जगासमोर आणलं, असं म्हटलं तर ते विधान अतिशयोक्तीचं ठरू नये. जेमतेम २६-२७ वर्षांचा होता तो तेव्हा, पण या साऱ्याच फोटोग्राफ्सनं सुधारकला प्रेस फोटोग्राफर म्हणून प्रस्थापित केलं यात शंकाच नाही.
सुधारक हा आमच्या जेजेचाच विद्यार्थी. जेजेत येण्याआधी तो सोमैयामध्ये गेला इंजिनियरिंगला. पण ते काही त्याला जमलं नाही म्हणून ते त्यानं सोडलं आणि जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये फाऊंडेशनला प्रवेश घेतला. आज नावाजलेले सुनील पडवळ, शीतल गट्टाणी, कुमार वैद्य, शिल्पा जोगळेकर वगैरे असंख्य चित्रकार त्याच्याच वर्गात होते. पण आर्थिक परिस्थितीमुळं त्याला ते शिक्षण करणं अवघड होऊ लागलं. साहजिकच त्यानं दोन वर्षाचा फाऊंडेशनचा कोर्स झाल्यानंतर फाईन आर्ट सोडलं. मग जेजेतले एक प्राध्यापक अनंत बोवलेकर यांनी त्याला फोटोग्राफी करण्याचा सल्ला दिला. म्हणाले, काही नाही तर लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रम वगैरे शूट करून तू पैसे कमावू शकशील. असं म्हणून त्यांनी त्याला जेजे अप्लाइडमध्ये फोटोग्राफीत प्रवेश करण्यास मदत केली.
जेजतला कोर्स पूर्ण होताच त्यानं ‘फ्री प्रेस’ला अर्ज केला. ती नोकरी त्यानं एक वर्ष केली. तिथून थेट तो ‘इंडियन एक्सप्रेस’ समूहात गेला. प्रख्यात फोटोग्राफर मुकेश पारपियानी तेव्हा एक्सप्रेस समूहाचे फोटो एडिटर होते. त्यांनी अत्यंत आधुनिक पद्धतीनं एक्सप्रेसचं फोटो युनिट उभारायला सुरुवात केली होती. त्यांनी सुधारकमधले गुण हेरले आणि त्याची फोटोग्राफर म्हणून निवड केली. त्याच सुमारास मुंबईत जातीय दंगली उसळल्या होत्या. त्या दंगलीची सुधारकने घेतलेली छायाचित्रं केवळ मुंबईत किंवा भारतातच नव्हे तर जगभरात गाजली. त्यानंतर मात्र सुधारकनं कधीच मागं वळून पाहिलं नाही.
सुधारकचे वडील सरकारी नोकरी करत असल्यामुळं ते वडाळ्याच्या सरकारी कर्मचारी वसाहतीतच राहत होते. ते आंबेडकरी चळवळीत होते. आंबेडकरांवरची गाणी ते गात असत. साहजिकच त्याचे परिणाम सुधारकवर झाले नसतील तर नवलच ठरलं असतं. सुधारकनं नंतर जी कामाठीपुऱ्यातल्या वेश्या, गटार साफसफाई करणारे मजूर इत्यादी जी तळागाळातल्या लोकांची छायाचित्रं घेतली त्याला देखील हेच संस्कार कारणीभूत ठरले असावेत. या छायाचित्रांनी त्याला अक्षरशः जगन्मान्यता मिळवून दिली.
‘इंडियन एक्सप्रेस’मधून सुधारक ‘आफ्टरनून’मध्ये गेला. नंतर तो ‘पायोनियर’मध्ये गेला. आणि ‘पायोनियर’नंतर तो मात्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये येऊन बराच काळ स्थिरावला. या सतत नोकऱ्या सोडण्यामागची त्याची भूमिका अशी की, त्यामुळे पगारात वाढ तर होतंच होती, पण त्याहीपेक्षा नवीन नोकरीत गेलो की नवीन स्टाफ, नवीन संपाद्क यांच्यासोबत काम करताना तुम्हाला सतत नवीनवी आव्हानं पेलावी लागतात. त्याचं मला अधिक आकर्षण होतं, असं तो अगदी मोकळेपणानं सांगतो.
‘टाईम्स’मधली नोकरी देखील त्यानं नंतर सोडून दिली. काही वर्ष फ्रिलान्सिंग केलं. पुन्हा एकदा ‘बॉम्बे टाइम्स’मधली नोकरी पत्करली. काही दिवसानं तीही सोडून दिली. त्यानंतर आजतागायत तो फ्रिलान्सिंगच करतो आहे. वेगवेगळे प्रोजेक्ट्स घेतो, पुस्तकं तयार करतो. मागच्याच वर्षी त्यानं टाटांसाठी एक मोठा प्रोजेक्ट केला. सेवाभावी संस्थांसाठी मात्र तो मोठ्या प्रमाणावर काम करतो. यातनं मिळालेल्या साऱ्या पैशातून त्यानं कर्जतमध्ये एक छोटीशी जागा घेतली आहे. त्या जागेत त्यानं अशी एक वास्तू विकसित केली आहे की तिथं कुणाही कलावंतांना विशेष करून चित्रकारांना आपलं काम करता येईल, वर्कशॉप्स करता येतील, कार्यशाळा घेता येतील. आतापर्यंत दोन-तीन कार्यशाळा त्यानं घेतल्या देखील आहेत. ‘फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट’ असं त्याच्या संस्थेचं नाव आहे. अलीकडंच त्यानं चित्रकार अनिल नाईक यांचं एक वर्कशॉप आयोजित केलं.
तुझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातले महत्वाचे पुरस्कार कुठले ? असं विचारलं तर तो अगदी मोकळेपणानं सांगतो, नॅशनल जियोग्राफीक अवॉर्ड हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणता येईल. त्यानिमित्तानं केलेल्या अमेरिकेतल्या वास्तव्यात मला खूप काही शिकता आलं. एक नवीच दृष्टी मिळाली त्या अनुभवानं मला. पद्मश्रीविषयी देखील तो मोकळेपणानं सांगतो. त्यावेळी तो पन्नाशीचा असावा. हे कसं काय झालं ? असं विचारल्यावर तो मोकळेपणानं सांगतो, मी काहीच केलं नाही. साधा अर्ज देखील नाही. मग लॉबिंग वगैरे तर दूरचंच ! जर्मनीत होतो त्यावेळी मी. अचानक दिल्लीहून घरी फोन आला. माझ्या बायकोला वाटलं की बोलणारा थट्टा करतोय. पण ती थट्टा नव्हती. नंतर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधला आणि २०१६ साली त्याला पद्मश्री मिळाली.
प्रेस फोटोग्राफीमधल्या त्याच्या या साऱ्या कर्तृत्वामुळेच केंद्र सरकारनं त्याची निवड केली असावी. अक्षरशः शून्यातून सुधारकनं आपल्याला उभं केलं आहे. या साऱ्या प्रवासातले त्याचे अनुभव विलक्षण आहेत आणि ते जाणून घेण्यासाठीच ‘चिन्ह’नं त्याला येत्या शनिवारी म्हणजे २६ मार्च रोजी ‘गच्चीवरील गप्पा’ कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. ऐकायला, पाहायला विसरू नका !
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह’
सुधारकचं काम पाहण्यासाठी त्याच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या
https://www.sudharakolwe.com/
Related
Please login to join discussion