Features

बेळगावी (आर्ट) मॅगझीनची गोष्ट ! 

एखादं नियतकालिक प्रकाशित करणं आणि ते चालवणं हा किती अव्यापारेषु व्यापार असतो हे जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे. मी त्या वंशात आयुष्यभर फेरफटका मारून आलो असल्यामुळं मला त्याविषयी अगदी पुरेपूर ज्ञान आहे. आणि म्हणूनच बेळगाव सारख्या आधुनिक चित्रकलेच्या बाबतीत अतिशय अविकसित असलेल्या शहरातून जेव्हा ‘आर्ट अफेयर्स’ हे कलाविषयक इंग्रजी नियतकालिकं निघणार ही बातमी ऐकल्यावर मी अतिशय आश्चर्यचकित झालो होतो.

नंतर त्या नियतकालिकाचे काही अंक हाती आले. अर्थात ते मला काही तितकेसे समाधान देणारे नव्हते. पण तरी देखील त्या अंकाचं मी स्वागत केलं होतं आणि त्यांच्या संपादद्वयाला ‘चिन्ह’च्या व्हॉट्सऍपवरील ‘आर्टिस्ट ग्रुप’मध्ये सहभागी करून घेतलं होतं. जेणेकरून ते जे काही करताहेत ते जास्तीत जास्त चित्रकारांपर्यंत जावं किंवा चित्रकारांना देखील या माध्यमातून प्रसिद्धी मिळण्याच्या दृष्टीनं काहीतरी घडावं वगैरे.

सर्वसाधारणपणे अशी नियतकालिकं मी वर्गणी भरून मागवीत असे, पण मुलुंड सोडून ठाण्यावर राहावयास आल्यानंतर मात्र इथल्या टपाल व्यवस्थेची अवस्था पाहिल्यावर मी ते वर्गणी वगैरे भरणं बंद करून टाकलं. साहजिकच ते अंक माझ्यापर्यंत पोहोचणं अवघड झालं. आणि नंतर तर लॉकडाऊनच सुरु झाला, दोन वर्ष सारं काही बंदच होतं. लॉकडाऊननंतरचा पहिला अंक आता अलीकडेच प्रसिद्ध झाला, पण तो अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही.

‘गच्चीवरील गप्पां’मध्ये गप्पा मारायला अक्षय बापटला बोलवायचं हे सुमारे दोन – तीन महिन्यांपूर्वीच मी नक्की केलं. अक्षय बापट हा मूळचा बेळगावचा. तो कमर्शियल आर्टिस्ट आहे. काही काळ त्याने पुण्यामध्ये पॅकेजिंग इंडस्ट्रीत काम केलं. पुरेसा अनुभव घेतल्यानंतर त्यानं ठरवलं की, चलो बेळगाव ! २०१० साली तो बेळगावला आला, पुन्हा त्यानं तिथं पॅकेजिंग युनिटमध्ये जॉब केला आणि थोडेसे स्थिर स्थावर होताच २०१३ साली ‘डिझाईन हाऊस’ या नावानं स्वतःची जाहिरात कंपनी सुरु केली आणि बेळगावमधली डिझायनिंगची, प्रिंटिंगची कामं तो करू लागला. २०१४ साली त्यानं डिजिटल मशीन घेऊन प्रेस देखील सुरु केला.

एके दिवशी त्याच्याकडे एक गृहस्थ आले. ते म्हणाले, मला एक चित्रकलेवर अंक काढायचाय ! त्याचं डिझाईन तू करावंस अशी माझी इच्छा आहे. अक्षयने त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि काम स्वीकारलं. ते गृहस्थ देखील चित्रकार होते आणि बेळगावच्याच केएलइ हॉस्पिटलमध्ये अनॉटॉमी ड्रॉईंग आणि व्हिडीओ शुटिंगचं काम नोकरी म्हणून करत होते. विश्वनाथ गुगरी त्यांचं नाव. अक्षयने काम स्वीकारलं खरं, पण या फिल्डविषयी त्याला काही एक ठाऊक नव्हतं. त्यानं गुगरींना विचारलं तर गुगरी म्हणाले, मलाही काही ठाऊक नाही, पण मला अंक मात्र काढायचाय आणि तो चित्रकलेवरचाच असणार आहे. आणि त्यांनी अक्षयला त्यावेळी ठामपणे सांगितलं की, हा अंक मी पाचच वर्ष चालवणार आहे. अक्षय म्हणाला, बरं ! तोपर्यंत त्या अंकाचं रजिस्ट्रेशन देखील आलं नव्हतं.

म्हणून मग अक्षयने ठरवलं की ‘पेन अँड इंक’ या नावाने अंक सुरु करायचा. त्यानं लोगो देखील बनवला आणि २०१४ सालच्या नोव्हेंबर महिन्यात त्यांना ‘आर्ट अफेयर’ या नावानं रजिस्ट्रेशन देखील मिळालं. मग काय, केलेलं सर्व डिझाईन रद्द करावं लागलं आणि नवीन डिझाईन करावं लागलं. अशा तऱ्हेनं ‘आर्ट अफेयर’ या कलाविषयक टॅब्लॉइड इंग्रजी नियतकालिकाचा जन्म बेळगावात डिसेंबर २०१४ साली झाला. तेव्हापासून लॉकडाऊन सुरु होईपर्यंत दर महिन्याला एकेक अंक प्रसिद्ध झाला. २०१९-२० मध्ये अंक बंद होते २०१९ साली अंकाला पाच वर्ष पूर्ण झाल्यामुळे विश्वनाथ गुगरी यांचा त्या अंकातला इंटरेस्ट देखील संपला. पाच वर्ष मात्र ते खंबीरपणे ( खिशाला चाट मारून ) अंकाच्या प्रकाशनात सहभागी होत राहिले. २०१४ पासून २०१९ पर्यंतच्या मधल्या काळात अक्षय देखील प्रकाशनाच्या प्रक्रियेत पूर्णपणे शिरला होता.

२०१९ मध्ये गुगरींनी त्याला सांगितलं, आता हा अंक तूच पुढं चालव. अशा पद्धतीनं अक्षयकडं हा अंक चालून आला. आता वयोमानानुसार गुगरी त्यात फारसं लक्ष घालत नाहीत. अक्षयनेच तो पूर्णपणे टेकओव्हर केला आहे. लॉकडाऊन नंतरचा पहिला अंक नुकताच प्रसिद्ध झाला आहे. अक्षय तो आता पुढे चालवणार असंही म्हणतोय. गुगरींसोबतचा अक्षयचा हा सारा प्रवास अतिशय धमाल आहे. माझ्यासारख्या या क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या माणसाला देखील तो चक्रावून टाकणारा आहे. अक्षयकडून त्याचा हा सर्व प्रवास ऐकला तेव्हा देखील मी अक्षरशः थक्क झालो ! कलेची कुठलीही पार्श्वभूमी नसताना बेळगावसारख्या कलेच्या बाबतीत अविकसित ठिकाणाहून अंक प्रसिद्ध करण्याचं भलतंच चमत्कारिक धाडस करणाऱ्या अक्षयसोबत येत्या शनिवारी मी गप्पा मारणार आहे. ज्यांना ही कल्पना प्रथम सुचली त्या विश्वनाथ गुगरींना देखील त्याने या कार्यक्रमात आमंत्रित करावं असा माझा आग्रह होता, पण गुगरी फक्त कन्नड भाषा जाणतात, मराठीत व्यक्त होऊ शकत नाहीत. त्यामुळे ते कदाचित गप्पांमध्ये सहभागी होणार नाहीत, पण ते तिथं उपस्थित मात्र असतील. शनिवार दि. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी हा सारा चक्रम प्रवास ऐकण्यासाठी ‘गच्चीवरील गप्पां’च्या कार्यक्रमात अवश्य सहभागी व्हा !

सतीश नाईक

संपादक ‘चिन्ह’

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.