Features

मुद्राचित्रणातले निकम गुरुजी !

योगाशी संबंध असलेल्यांना अंबिका योग कुटीर, ठाणे या संस्थेचे निकम गुरुजी आणि त्यांचं कार्य चांगलंच ठाऊक असतं. पण आमच्या चित्रकला वर्तुळात मात्र हटयोगी निकम गुरुजींखेरीज जेजे स्कूल ऑफ आर्टचे निकम गुरुजी आणि त्यांचं कार्य देखील ज्ञात असतं. जेजेमध्ये शिकवत असताना त्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना मुद्राचित्रणाचे धडे दिले. साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते. इतके की त्यांनी लग्न केलं ते देखील आपल्या एका विद्यार्थिनीशीच !

दोन वर्षांपूर्वीच जेजेच्या ३४ वर्षांच्या सेवेतून ते निवृत्त झाले. पुढल्या आठवड्यातल्या ‘गच्चीवरील गप्पा’ कार्यक्रमाविषयी बोलायला त्यांना फोन केला तर म्हणाले, आता औरंगाबादेत आहे. म्हटलं, तिथे काय चाललंय ? गावाला आले आहात का ? तर म्हणाले, नाही, इथून गाव खूप दूर आहे, अंबेजोगाई. अंबेजोगाई हे नाव उच्चारताच मला ८०च्या दशकातलं व्यंकटेश माडगूळकरांच्या अध्यक्षतेखाली झालेलं साहित्य संमेलन आठवलं आणि आठवला तो प्रचंड धुरळाच्या धुरळा आणि मातीत बसून पत्रावळीवर घेतलेलं जेवण ! लाखोंची उपस्थिती म्हणजे काय ? हे त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवलं होतं. असो, थोडेसे विषयांतर झाले.

तर सांगायची गोष्ट अशी की, ३४ वर्षाच्या जेजे स्कूल ऑफ आर्टमधल्या शासकीय नोकरीतून कुठलंही प्रमोशन न मिळता साहाय्यक अधिव्याख्याता किंवा अधिव्याख्याता या एकाच पदावरून सेवानिवृत्त झालेल्या या निकम गुरुजींनी आता मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना मुद्राचित्रण शिकवण्याचा विडा उचलला आहे. हे भलतंच थोर आहे ! ३४ वर्षाच्या शासकीय नोकरीत एकाच पदावर राहून इतके टक्के टोणपे खाल्ल्यानंतर सुद्धा एखादा माणूस सेवानिवृत्त झाल्यावर पुन्हा आपण जिथं शिकलो त्याच औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना मुद्राचित्रण कला शिकवण्याची जिद्द बाळगतो.. केवळ हाडाचा शिक्षक कलावंतच हे करू शकतो, असं म्हणायला हवं. चित्रकलेतल्या या आमच्या निकम गुरुजींनी ते सिद्धच करून दाखवलं आहे.

अनंतचं सारं शिक्षण शासकीय कला महाविद्यालय औरंगाबाद इथून पार पडलं. डिपेड करण्यासाठी म्हणून तो जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये ८५ साली आला आणि मग इथलाच झाला. जेजेमधलं बदल्यांचं राजकारण खूप गाजलं. त्या बदल्यांवरूनच सारी आंदोलनं झाली, वादविवाद झाले, अनेक चांगले शिक्षक, प्राध्यापक त्या बदल्यांच्या विरोधात नोकऱ्या सोडून गेले आणि स्वतःची व जेजे स्कूल ऑफ आर्टसारख्या संस्थेची पुरती वाट लावून बसले. तो सारा कालखंड मी स्वतः अनुभवला असल्यामुळं थोडंसं दोन्ही बाजूंनी समजुतीनं घेतलं असतं तर आज जी काही वेळ महाराष्ट्राच्या कलाशिक्षणावर आली आहे, ती निश्चितपणं आली नसती असं राहून राहून वाटतं.

जेजेमधल्या दोनच शिक्षकांच्या बदल्या कधी झाल्या नाहीत. त्यातले एक अनिल नाईक आणि दुसरे हे आमचे अनंत निकम गुरुजी. जेजेतल्या राजकारणाला कंटाळून २०००च्या दशकात त्यांनी नोकरी सोडायची तयारी केली होती, पण सरकारनं त्यांना ती सोडू दिली नाही. सरकारनं म्हणण्यापेक्षा एका डेप्युटी सेक्रेटरीनं. खरंतर याच डेप्युटी सेक्रेटरीनं जेजेची आणि नंतर कला संचालनालयाची कबर आपल्या कर्तृत्वानं खणली ! पण त्यांचे मंद बुद्धीचे पण उन्मत्त पोशिंदे वर ढिम्म बसलेले असल्यामुळं त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

अनंताला एके दिवशी मी विचारलंच होतं, प्रमोशन किंवा बढती न मिळता ३४ वर्ष एका पदावर राहावं लागलं याचं तुला कधी वाईट नाही वाटलं ? किंवा आपल्यापेक्षा चार आण्याची देखील ज्यांची लायकी नाही अशा व्यक्तींना आपल्या डोक्यावर अधिकारी म्हणून आणून बसवल्यावर काय वाटलं ? यावर तो बिचारा खिन्नपणे हसला, म्हणाला, बोलून काय उपयोग आहे ? आपलंच तोंड खराब होणार ! हा साऱ्या यंत्रणेचा दोष आहे, विशिष्ट व्यक्तींनी ही यंत्रणा आपल्या हातात घेतली आहे आणि ते आपल्याला हवी तशी मनमानी करून ती चालवतात. ज्यांच्यावर त्यांचा वरदहस्त असतो त्यांनाच ते पुढे आणतात, त्यांच्यावरच ते बढत्यांचा वर्षाव करतात, असिस्टंट लेक्चररचा लगेचच लेक्चरर करतात, लेक्चररच लगेचच प्राध्यापक करतात, प्राध्यापकाचा लगेचच हेड ऑफ द डिपार्टमेंट करतात, हेड ऑफ द डिपार्टमेंटचा लगेचच अधिष्ठाता देखील पाचच वर्षात करून मोकळे होतात. आपल्या सारख्यांना या यंत्रणेत स्थान नाही, किंमत शून्य ! म्हणूनच मी ठरवलं की आपण अध्यापनाकडे पूर्ण लक्ष द्यायचं, विद्यार्थी तयार करायचे आणि विद्यार्थी तयार करता करता कलावंत म्हणून आपण मोठं व्हायचं. अनंताचा हा सकारात्मक दृष्टिकोन त्याला खरोखरच मोठा करून गेला !

मुद्राचित्रं आणि पेंटिंग्जची ११ सोलो प्रदर्शनं त्याच्या नावावर जमा आहेत. तो सहभागी झालेल्या समूह प्रदर्शनांची तर संख्या अगणित आहे. भारतातल्या सर्वच प्रदर्शनांमध्ये त्याची चित्रं नुसती लागली गेली नाहीयेत तर वाखाणली गेली आहेत. मुद्राचित्रणाचे असंख्य नवनवीन प्रयोग त्यानं केले आहेत. पूर्वी मुद्राचित्र अगदी छोट्या आकाराची असत, पण अनंताने मात्र खूप मोठ्या आकारांमध्ये मुद्राचित्रं तयार केली आहेत. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही त्याच्या चित्राला मागणी असते. मुंबईमध्ये मुद्राचित्रण करणाऱ्याला फारशा जागा उपलब्ध नाहीत, पण अनंताने त्यावरही उपाय शोधला. तो भोपाळच्या भारत भवनमध्ये जाऊन काम करू लागला. त्याच्या पाठोपाठ त्याला फॉलो करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांनी भारत भवनची वाट पकडली. त्यातले अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात परतलेच नाहीत. खरंतर महाराष्ट्राला ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे, पण जे सरकार वर्षानुवर्षे महाराष्ट्राचं सर्वश्रेष्ठ कला संचालक पदच जिथं रिक्त ठेवतं, तिथं त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी ?

अंबेजोगाईवरून मुंबईत स्थायिक झाल्यावर अनेक ठिकाणी तो राहिला. अखेरीस नालासोपाऱ्याला स्थायिक झाला, पण नालासोपाऱ्यावरून कांदिवलीपर्यंतचा प्रवास मात्र त्यानं अतिशय वेगानं केला. कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्ससारख्या एरियात त्याचा सुसज्ज स्टुडियो आहे आणि तिथंच जवळपास घर सुद्धा ! त्याच्यावर लिहिण्यासारखं भरपूर आहे, पण ते निकम गुरुजींकडून ऐकणं अधिक महत्वाचं ठरेल. म्हणूनच येत्या शनिवारी म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी त्यांना ‘गच्चीवरील गप्पां’च्या कार्यक्रमात ‘चिन्ह’नं निमंत्रित केलं आहे. ऐकायला, पाहायला विसरू नका !

सतीश नाईक

संपादक ‘चिन्ह

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.