Features

पहिली भारतीय अमूर्त चित्रकर्त्री

‘The vastness again and again’ हे नसरीन मोहमदी या चित्रकर्तीचे चित्र प्रदर्शन राजा शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातल्या जहांगीर निकोलसन आर्ट गॅलरी येथे ३० एप्रिलपर्यंत आयोजित केले आहे. अवघे ५३ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या नसरीनच्या कलाजीवनातील महत्त्वाचे टप्पे, तिने केलेली वाटचाल, त्यामधून विकसित होत गेलेला तिचा चित्र – विचार, तिने हाताळलेली विविध चित्र-माध्यमे, तिने केलेले सखोल चित्र-चिंतन यांचे समग्र दर्शन या प्रदर्शनात घडते. या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर विनील भुर्के यांनी खास ‘चिन्ह आर्ट न्यूज’च्या वाचकांसाठी हा वृत्तांत लिहिला आहे.

अथांग निसर्गाला गवसणी

निसर्ग अथांग आहे,

सुंदर आणि अवर्णनीय आहे,

आपल्याला वेढून आहे,

तरीही अमाप उरलेला आहे.

आपणही निसर्ग आहोत.

स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर

आजूबाजूच्या निसर्गाचा शोध घ्यायचा,

त्यामध्ये हरवून जायचे.

म्हणजे आपणच आपोआप

आपल्याला सापडतो…!

निसर्गाचे हे अथांगपण शोधण्याचे आणि त्या शोधामार्फत स्वतःला शोधण्याचे उत्तम साधन म्हणजे चित्रकला!

‘The vastness again and again’ या चित्रप्रदर्शनामध्ये नसरीन मोहमदी नावाच्या चित्रकर्त्रीचा असाच शोध-प्रवास अनुभवायला मिळतो. सध्या हे प्रदर्शन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील जहांगीर निकोलसन आर्ट फाऊंडेशन (JNAF) च्या कलादालनात भरवले गेले आहे आणि ३० एप्रिलपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे.

अवघे ५३ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या नसरीनच्या कलाजीवनातील महत्त्वाचे टप्पे, तिने केलेली वाटचाल, त्यामधून विकसित होत गेलेला तिचा चित्र-विचार, तिने हाताळलेली विविध चित्र-माध्यमे, तिने केलेले सखोल चित्र-चिंतन यांचे समग्र दर्शन इथे घडते. हे प्रदर्शन जहांगीर निकोलसन आर्ट फाऊंडेशनच्या (JNAF) संचालिका श्रीमती पूजा वैश यांनी अतिशय कुशलतेने क्युरेट केले आहे. या प्रदर्शनाविषयीच्या त्यांच्या शिरोलेखात अगदी सर्वप्रथम येते ते नसरीनचे एक काव्यमय वाक्य – “In utter chaos, a thread of discipline – a cobweb.” “निसर्गाच्या अफाट पसाऱ्यातील एक नेटका धागा – एक कोळयाचे जाळे.”

वरकरणी असंबद्ध वाटणाऱ्या या निसर्गाच्या ग्रंथात दडलेली रहस्ये जाणून घ्यायची असतील तर प्रथमतः तो ज्या भाषेत आहे त्या भाषेची ओळख करून घ्यावी लागते. ही ओळख तिच्यातील मुळाक्षरांपासून होते. ही मुळाक्षरे कोणती? याचे उत्तर म्हणजे त्या भाषेतील म्हणजे निसर्गातील आकार. आणि हे आकार ज्यामध्ये असतात तो अवकाश. अवकाश आणि आकार यांच्या सतत बदलत असणाऱ्या परस्पर संबंधांमधून या भाषेची लिपी तयार होते. ती लिपी एकदा आपल्याला दिसू लागली की आपल्या नेहेमीच्या शब्दांच्या भाषेमध्ये जे व्यक्त करता येत नाही तेही दिसू लागते, समजू-उमजू लागते. दृश्याची भाषा ती हीच. तिला स्थळ-काळाचे बंधन नाही. कारण हीच चित्रकलेची भाषा आहे. यामध्ये अवकाशातील आकार दृश्यमान करणारा प्रकाश आणि त्या प्रकाशाचे अलंकार असणारे रंगसुद्धा असतात, परंतु ते नंतर येतात. मुळात असतात ते आकार. ज्यांना केवलाकार असेही संबोधले जाते.

अमूर्तनाचे मूलभूत संशोधन 

हे प्रदर्शन अनुभवताना अनेकांना असा प्रश्न पडू शकतो की इथे असलेल्या कित्येक चित्रांमध्ये, विविध रंगांची उधळण असलेली फक्त एक-दोनच चित्रे का? रंगीबेरंगी चित्रे बघण्याची आवड असलेल्यांची तर इथे निराशाच होते. इथे बहुतांश चित्रे गडद काळ्या रंगात आणि काही करड्या रंगात आहेत, याचे कारण ही चित्रे म्हणजे आकार आणि अवकाश यांच्यामधील संवादामधून तयार झालेल्या भाषेविषयी केलेले एक मूलभूत संशोधन आहे.

हे संशोधन नसरीनने कोणत्या पद्धतीने केले आहे? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला केवळ तिची चित्रे अनुभवून सहजपणे लक्षात येणार नाही. परंतु ते हळूहळू समजत जाते पूजा वैश यांनी अतिशय सुसंगत प्रकारे केलेल्या मांडणीमुळे. त्या मांडणीमध्ये नसरीनने वेगवेगळ्या ठिकाणी काढलेली छायाचित्रे, त्यामध्ये तिने नंतर केलेली निरीक्षणे, त्यामधून आलेल्या तिच्या दैनंदिनीमध्ये केलेल्या चित्र-विचारांच्या नोंदी, तिने प्रत्यक्ष घेतलेले दृश्यानुभव व त्यामधून तिने केलेले अमूर्तीकरण (किंवा अमूर्तन), ते करताना उपयोगात आणलेल्या पद्धती, त्यातून शोधलेली आकारांची मुळाक्षरे यांची संगती लागत जाते. उदाहरणार्थ तिने काढलेल्या छायाचित्रांमध्ये एक छायाचित्र एका कौलारू छताचे आहे. त्यात ती इमारत कोणती आहे, घर आहे की मंदीर आहे इत्यादी काहीही टिपलेले नाही. केवळ खुल्या अवकाशात निमुळता होत जाणारा कौलारू छप्पराचा त्रिकोणी आकार आणि त्याला वेढून असणारे अथांग आकाश इतकेच आपल्याला दिसते. ही तिच्या संशोधनाची पहिली पायरी आहे. इथेच खरंतर अमूर्तन सुरू होते.

पुढे कागदावर काळ्या शाईने काढलेली अत्यंत काटेकोर आकाराचे त्रिकोण असलेली भौमितिक संरचना दिसते. त्यामध्ये ते छप्परही राहिलेले नसते, कौलेही राहिलेली नसतात. इमारत तर नसतेच. समोर दिसतो तो अथांग अवकाशात तरंगणारा एक त्रिकोणयुक्त आकृतिबंध. हे सगळे जोडून पाहिल्यानंतर आपल्याला ते मूळ छायाचित्र आणि ते चित्र यांच्यामधील संबंध लक्षात येतो. अर्थात हा संबंध जोडणे आणि चित्रकाराने हे असे शोधले असेल, असे अंदाज करणे ही सगळी नंतर केली गेलेली प्रक्रिया आहे. ते तसेच घडले असेल असे खात्रीने सांगणे कठीणच आहे. कारण तिच्या बहुतेक सर्वच चित्रांवर दिनांक घातलेले नाहीत, शीर्षकेही दिलेली नाहीत. असे तिने मुद्दामच केले होते की नाही, हेही सांगता येणे कठीण आहे. परंतु ज्या नसरीनने अगदी बारीकसारिक गोष्टींची रेखाचित्रे काढली व त्यांच्यासंबंधी नोंदी तिच्या दैनंदिनीमध्ये लिहून ठेवल्या आहेत, जी नसरीन drafting ची आधुनिक उपकरणे वापरुन अतिशय अचूक व काटेकोर काम करायची, ती नसरीन तिच्या सर्वच चित्रांवर स्वतःचे नाव आणि दिनांक घालायला विसरली असेल, हे शक्य वाटत नाही. यामागे आणि चित्रांना शीर्षके न देण्यामागे तिचा काहीतरी वेगळा विचार असू शकेल. कदाचित या चित्रांना ती रूढ अर्थाने (चित्रकाराने निर्माण केलेली कलाकृती या अर्थाने) चित्रे मानतही नसेल का? केवळ स्वतःचे वैयक्तिक पातळीवरील संशोधन मानत असेल का? कदाचित तिला जे काही सापडत होते ते कालातीत आणि शब्दांमध्ये सांगू शकतो अशा अर्थाच्या पलिकडचे आहे, असे तिला वाटत असेल त्यामुळे तिने शीर्षक व दिनांक दिले नसतील का? आपण हे नवे काहीच निर्माण करत नाही आहोत, निसर्गात उपस्थित असलेलेच काहीतरी उलगडून पाहत आहोत त्यामुळे या चित्रांची निर्माती म्हणून स्वतःचे नाव लिहायलासुद्धा नको असे तिला वाटत होते असेल का? असे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतात. तिच्या कामांकडे बघून तिच्या चित्रकार म्हणून झालेल्या प्रवासाची मात्र कल्पना येते. चित्रकार म्हणून झालेल्या या तिच्या प्रवासात तिने प्रत्यक्षात केलेल्या प्रवासाचा आणि त्यामध्ये तिच्यावर पडलेल्या अनेक प्रभावांचाही मोठा वाटा आहे.

नसरीन मोहमदी: प्रवास आणि प्रभाव

नसरीन मोहमदी तिच्या रेखाचित्रांसाठी जगप्रसिद्ध आहे. आजच्या घडीला जगातील सर्वात महत्त्वाच्या भारतीय आधुनिक कलाकारांमध्ये तिची गणना होते. गेल्या दशकभरात तिच्या कामांची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. तिचे काम आतापर्यंत न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट (MoMA), मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट व तलवार गॅलरी या तीन ठिकाणी तसेच नवी दिल्लीतील किरण नाडर म्युझियम ऑफ आर्ट, व जर्मनीमधील डॉक्युमेंटा यासारख्या सुप्रसिद्ध कलादालनांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. नसरीनला ही जगमान्यता उशिरा म्हणजे तिच्या मृत्यूनंतर मिळाली, आणि आता तर ती ‘पहिली भारतीय अमूर्त चित्रकर्त्री’ म्हणून ओळखली जाते. तिच्या अल्प आयुष्यात तिने अनेक देशांमध्ये प्रवास केला, अनेक ज्येष्ठ कलाकारांशी तिचा थेट संपर्क आला आणि या सगळ्यातून तिच्यावर अनेक प्रभाव पडत गेले, त्यातूनच तिची शैली विकसित होत गेली.

नसरीनचा जन्म १९३७ साली कराची येथे उच्चभ्रू तयबजी या बोहरा मुस्लिम कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचा बाहरीन येथे छायाचित्रण उपकरणांचा व्यवसाय होता. ती अगदी लहान असताना तिच्या आईचा मृत्यू झाला आणि १९४४ मध्ये तिचे कुटुंब मुंबईत आले. नंतर तिने लंडनमधील सेंट मार्टिन स्कूल ऑफ आर्ट्समध्ये तीन वर्षे (१९५४ ते १९५७) शिक्षण घेतले. त्यानंतर ती शिष्यवृत्ती मिळवून पुढील शिक्षणासाठी तीन वर्षांसाठी (१९६१ ते १९६३) पॅरिसला गेली. तिला लहानपणापासूनच छायाचित्रणाची आवड होती. वडिलांचा व्यवसाय छायाचित्रणाशीच निगडीत असल्यामुळे साहजिकच तिला उत्तम अत्याधुनिक कॅमेरेसुद्धा हाताळायला मिळाले. त्यामुळे तिचे छायाचित्रणातील कौशल्य विकसित झाले. पुढे तिने याच कौशल्याचा उपयोग चित्रकलेसाठी आवश्यक असलेली निसर्गाची निरीक्षणे नोंदविण्यासाठी अतिशय खुबीने करून घेतला. ही काळाच्या पुढची गोष्ट होती. कारण त्यावेळी छायाचित्रणाला कलेचा दर्जासुद्धा दिला जात नव्हता. त्या काळातील तिने काढलेली अनेक छायाचित्रेसुद्धा या प्रदर्शनात बघायला मिळतात. ती बघून वाटते की, अतिशय साधीसोपी भासणारी ती छायाचित्रे आहेत, त्यांचे अमूर्तन तिने नंतर चित्रांमध्ये केले आहे. ते पाहून प्रश्न पडतो की, आज प्रत्येकाच्या हातात अत्याधुनिक मोबाईल कॅमेरा आहे, परंतु मूर्तात अमूर्त पाहण्याची तिची ती दृष्टी आपल्याकडे आहे का?

नसरीनची एकंदर चित्र-प्रक्रिया, तपशीलवार नोंदी ठेवण्याची सवय, अमूर्तन करण्याची प्रक्रिया हे सगळे बघून ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर बरवे यांची चिंतनशीलता आठवते. त्यांनी आपल्या दैनंदिनीमध्ये ज्या नोंदी लिहून ठेवल्या होत्या त्यामध्ये पाहिलेल्या दृश्यांचे शा‍ब्दिक वर्णन, रेखाचित्र, एखादी कविता असे मुद्दे असायचे आणि त्यावर केलेल्या चिंतनातून त्यांची चित्रे निर्माण व्हायची. त्यातूनच पुढे सुप्रसिद्ध ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक निर्माण झाले.

पॅरिसमधून नसरीन भारतात परतली आणि तिने मुंबईतील भुलाभाई इन्स्टिट्यूट फॉर आर्ट्समध्ये प्रवेश केला. त्यावेळी तिथे काम करत असलेल्या गायतोंडे, हुसेन आणि तयब मेहता यांच्याशी तिचा संपर्क आला. तसेच अमूर्त चित्रकार जेराम पटेल यांच्याशी तिची मैत्री झाली. या सर्वांचे मार्गदर्शन तिला मिळाले परंतु तिच्या कामावर त्यांच्या कामांची छाया फारशी पडली नाही, कारण तिचे काम तिने नेहेमीच स्वतंत्रपणे विकसित केले. १९४० व पन्नासच्या दशकात उदयाला आलेल्या ‘न्यूयॉर्क स्कूल’ या जगप्रसिद्ध अमूर्त चित्रकार समूहातील एक महत्त्वाची चित्रकर्ती Agnes Martin हिच्याशी नसरीनच्या कामाची तुलना केली जाते, परंतु Agnes च्या कामाचा प्रभाव मात्र नसरीनवर नव्हता कारण तिला त्याबद्दल माहितीच नव्हती. परंतु Kasimir Malevich आणि Wassily Kandinsky या दोन आघाडीच्या रशियन चित्रकारांचा माझ्यावर प्रभाव आहे, असे नसरीनने नमूद केले आहे. Paul Klee या महान चित्रकाराचाही तिच्यावर प्रभाव होता असे मानले जाते. बाहरीनमध्ये काही काळ राहिल्यामुळे सूफी गीतरचनांचाही प्रभाव तिच्यावर पडला. या प्रदर्शनात मांडलेल्या तिच्या दैनंदिनीमधील नोंदी अध्यात्मिकतेकडे जाणाऱ्या वाटतात त्याचे हेही एक कारण असू शकेल.

 तिच्या रेखाचित्रांमधील रेषांवर इस्लामी स्थापत्यशास्त्रामधील डिझाईन शैलीचा प्रभाव आहे, असे मानले जाते. तसेच तिच्या कामावर झेन बौद्ध धर्माचा प्रभाव आहे, असेही मानले जाते. गायतोंडे यांच्याशी संपर्कात आल्यानंतर झेन चिंतनाचा प्रभाव तिच्यावर पडला असावा. त्या काळातील तिची चित्रे आणि गायतोंडे यांची चित्रेसुद्धा साधारण एका प्रकारची वाटतात. हेही प्रदर्शनात केलेल्या मांडणीमधून लक्षात येते. तसेच तिला हिंदुस्तानी क्लासिकल संगीताची आवड असल्यामुळे पंडित भीमसेन जोशी, पंडित रविशंकर यांच्याशी आलेल्या संपर्काचाही प्रभाव तिच्यावर होता. तिला विणकामाची आवड होती. तिने डिझाईन करून स्वत: हाताने तयार केलेली कापडी पिशवीसुद्धा या प्रदर्शनात बघायला मिळते. पुढे १९७२ पासून नसरीनने बडोदा येथील सुप्रसिद्ध महाराज सयाजीराव विद्यापीठात फाइन आर्ट शिकवण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच ती एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका झाली होती. परंतु दुर्दैवाने साधारण चाळिशीच्या मध्यात असताना तिला चेतापेशींचा दुर्धर आजार जडला. त्यामुळे तिचे शरीर विकल झाले होते परंतु चित्रकलेसाठी आवश्यक असलेले हाताच्या हालचालींवर नियंत्रण तिला काही प्रमाणात ठेवता येत होते. त्यामुळे काम करणे शक्य होते, पण कठीण होते. त्याही परिस्थितीत तिने drafting tools वापरुन अतिशय काटेकोर व अचूक कामे केली. नंतर तिचा आजार गंभीर स्वरूपाचा होत गेला आणि १९९० मध्ये वयाच्या ५३ व्या वर्षी तिचे निधन झाले. जाताना नसरीनने मागे ठेवली ती तिची चित्रं. ती स्वत: मात्र तिची चित्रं ज्या अथांग निसर्गातून आलेली होती, त्याच निसर्गात चिरनिद्रेसाठी परतली, त्या चित्रांवर सही न करता. अमूर्तनाची व्याख्या करणारी ही पहिली भारतीय चित्रकर्ती जगाच्या स्मरणात कायम वास्तव्य करत राहील.

संदर्भ:

  • जहांगीर निकोलसन आर्ट फाऊंडेशन (JNAF) चे संकेतस्थळ. यावर आपण मुंबईतील या प्रदर्शनातील चित्रांची छायाचित्रे पाहू शकता.  

https://jnaf.org/exhibition/nasreen-mohamedi-the-vastness-again-again/ 

  • न्यूयॉर्कमधील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट (MoMA) चे संकेतस्थळ. यावर आपण त्यांच्या संग्रहातील नसरीन मोहमदीच्या चित्रांची छायाचित्रे पाहू शकता.  

https://www.moma.org/artists/31784 

  • न्यूयॉर्कमधील तलवार गॅलरीचे संकेतस्थळ. यावर आपण त्यांच्या संग्रहातील नसरीन मोहमदीच्या चित्रांची छायाचित्रे पाहू शकता.

https://www.talwargallery.com/exhibitions/nasreen-mohamedi3#tab:slideshow        

*****

– विनील भुर्के

लेखक स्वयंशिक्षित चित्रकार व कला-अभ्यासक आहेत.

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.