Features

अमेरिकन लोक-चित्रकार ॲना मेरी रॉबर्टसन

ग्रँडमा मोझेस या नावाने अधिक परिचित असलेली स्वयंशिक्षित अमेरिकन लोक-चित्रकार ॲना मेरी रॉबर्टसन हिचा जन्म ७ सप्टेंबर, १८६० रोजी झाला. आयुष्याची कैक दशके तिने खेडेगावात शेतीभाती करण्यात व्यतीत केली. वयाच्या ७६ व्या वर्षी तिने याच ग्रामीण जीवनावर आधारित चित्रे रंगवायला सुरुवात केली आणि पुढील २० वर्षात तिने १५०० पेक्षा अधिक चित्रे निर्माण केली. तिची चित्रे जगभरात प्रदर्शित झाली आहेत आणि विकली गेली आहेत.

ग्रँडमा मोझेस हिचे अवतरण –

Life is what we make it, always has been, always will be.

ग्रँडमा मोझेस हिचा जन्म ग्रीनवीच, न्यू यॉर्क येथे झाला. तिचे वडील शेतकरी होते. मोझेसचे बालपण आनंदात गेले. वयाच्या १२ व्या वर्षापासून ती नजीकच्या श्रीमंत शेतकरी कुटुंबात घरगड्याचे काम करू लागली. १८८७ साली तिने शेतमजूर असलेल्या थॉमस मोझेस याच्याबरोबर विवाह केला आणि ते व्हर्जिनिया येथील एका शेतावर काम करू लागले. त्यांना दहा अपत्ये झाली पण त्यातली पाच जन्मतःच दगावली. १९०७ साली, त्यांनी ईगल ब्रिज, न्यू यॉर्क येथे स्वतःची शेतजमीन विकत घेऊन तेथेच ते स्थायिक झाले. ग्रँडमा मोझेसने आपले उर्वरित आयुष्य येथेच व्यतीत केले.

लवकरच फावल्या वेळात, मित्रमंडळी आणि नातेवाईकांसाठी भरतकाम केलेली निसर्गचित्रे मोझेस तयार करू लागली. १९२७ साली तिच्या पतीचे निधन झाले. तोवर तिचा मुलगा शेती बघू लागला होता. वाढत्या वयाबरोबर मोझेसला संधिवाताचा त्रास सुरू झाला आणि तिला भरतकाम करणे अवघड झाले. त्याऐवजी, वयाच्या ७६ व्या वर्षी तिने चित्रे रंगवायला सुरुवात केली. लहानपणापासून पहात आलेल्या ग्रामीण जीवनावर आधारित ही चित्रे होती. सुरूवातीला मोझेस ही चित्रे ३ ते ५ डॉलर्स किंमतीला विकत असे. मात्र पुढे तिची ख्याती पसरल्यावर तिची चित्रे ८००० ते १०००० डॉलर्स इतक्या किंमतीला विकली जाऊ लागली.

१९३८ साली, एके दिवशी, मोझेसच्या गावात फिरायला आलेल्या लुई कॅल्डर या कलासंग्राहकाने तिची काही चित्रे एका औषधाच्या दुकानात बघितली. त्याने ती विकत घेतलीच पण दुसर्या दिवशी मोझेसच्या घरात असलेली चित्रेही विकत घेतली. १९३९ साली न्यू यॉर्क येथे भरलेल्या ’कंटेम्पररी अननोन पेंटर्स ’ या प्रदर्शनात त्याने त्यातील तीन चित्रे मांडली. १९४० साली फक्त मोझेसच्या चित्रांचेच पहिले प्रदर्शन भरवले गेले. १९४३ सालापर्यंत तिच्या चित्रांना प्रचंड मागणी येऊ लागली.

१९४४ सालापासून ’अमेरिकन ब्रिटिश आर्ट सेंटर ’ ही संस्था मोझेसचे प्रतिनिधित्व करू लागली. पुढील २० वर्षे मोझेसची चित्रे युरोप-अमेरिकेत प्रदर्शित होत राहिली. तिची चित्रे बघायला येणार्या दर्शकांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला. हॉलमार्क च्या अभिष्टचिंतन-पत्रांवर तिची चित्रे छापली जाऊ लागली. तसेच फरशा, कापडे आणि चिनी मातीची भांडी यांनाही तिची चित्रे सुशोभित करू लागली. कित्येक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या जाहिरातींमध्येही तिची चित्रे झळकू लागली. एका अंदाजानुसार, अमेरिकेत तिची चित्रे छापलेली ४ कोटी, ८० लाख नाताळ-भेटपत्रे विकली गेली.

१९५० साली, ’नॅशनल प्रेस क्लब ’ या संस्थेने मोझेसची गणना बातमी देण्यासाठी योग्य असलेल्या ५ स्त्रियांमध्ये केली. तिला दोन मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान करण्यात आल्या. १९५२ साली तिचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. १९५३ सालच्या डिसेंबर महिन्यातील ’टाईम’ या प्रतिष्ठित साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर ९३ वर्षांच्या मोझेसचे छायाचित्र झळकले.

शुगरिंग ऑफ हे ग्रँडमा मोझेसचे चित्र

१३ डिसेंबर, १९६१ रोजी, वयाच्या १०१ व्या वर्षी ग्रँडमा मोझेस हिचे निधन झाले. मात्र तिच्या निधनानंतरही तिच्या चित्रांची मागणी कमी झालेली नाही. २००६ साली, नोव्हेंबर महिन्यात, तिने १९४३ साली रंगवलेले ’शुगरिंग ऑफ’ हे चित्र तिचे सर्वात किंमती चित्र ठरले. या चित्राला मिळालेली किंमत होती – १ कोटी, २० लाख डॉलर्स.

– रवी कुलकर्णी 

****

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.