No products in the cart.
आणखी एक ना-लायक नेमणूक?
सत्तरच्या दशकात प्रख्यात पत्रकार गोविंदराव तळवलकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स‘मध्ये ‘कला संचालक की घाशीराम?’ असा एक सणसणीत अग्रलेख लिहिला होता. हा अग्रलेख तेव्हा प्रचंड गाजला होता. आता तब्बल पाच दशकानंतर पुलाखालून खूपच पाणी वाहून गेलं आहे. आता गोविंदराव असते तर त्यांनी ‘कला संचालक की चपरासी?’ असा अग्रलेख निश्चितपणे लिहिला असता इतकी संबंधितांनी कला संचालनालयाची अवहेलना केली आहे. कशी ते वाचा आणखीन एका विशेष लेखात.
काल सकाळी व्हाट्सअप चाळत असताना जे जे स्कूल ऑफ आर्टच्या एका विद्यार्थ्यांचा मेसेज दिसला. म्हटलं या विद्यार्थ्यानं आपल्याला का बरं मेसेज पाठवला म्हणून उत्सुकतेनं मेसेज ओपन केला तर त्यात ‘मॅक्स महाराष्ट्र’ची एक लिंक होती. ती ओपन केली आणि हादरलोच. प्रचंड कर्कश्श म्युझिक आणि अत्यंत चुकीच्या उच्चारांचं निवेदन यांनी तो व्हिडीओ ओतप्रोत भरलेला होता.
हल्ली वाहिन्यांवरच्या बातम्या पाहाणं बंद केल्यामुळं बातम्यांच्यामागचं कर्णकर्कश्श म्युझिक ऐकण्याची संवयच निघून गेली आहे. त्यामुळे आधी त्या व्हिडिओचा व्हॉल्युम कमी केला. १६६ वर्षाचं आमचं कॉलेज. तिथं तरुणपणातली सहा सात वर्ष व्यतीत केली आहेत. तिथल्या प्रत्येक झाडाशी, इमारतीतल्या दगडाशी अनोखं नातं जुळल्यामुळं त्या व्हिडिओमधला तरुण निवेदक जे जे स्कूल ऑफ आर्टचा उल्लेख सतत ‘ जे जे आर्ट ऑफ स्कूल’ असा अत्यंत गलिच्छ अशा चुकीच्या पद्धतीने करत होता. ते पाहून संताप अनावर झाला.
इतक्या जुन्या कॉलेजवर स्टोरी करताय, ते कॉलेज स्क्रीनवर मागेच स्पष्ट दिसतंय. त्यातले कॉलेजच्या नावाचे बोर्डदेखील इतक्या दुरून स्पष्टपणे आम्हा प्रेक्षकांना दिसतायेत आणि तो पत्रकार म्हणवणारा तरुण सातत्यानं जेजेचा उल्लेख चुकीच्या पद्धतीनं करतोय हे पाहून पत्रकारितेनं पराकोटीचा खालचा तळ गाठला आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
खरं तर राजीव मिश्रा हे जे जे आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य. त्यांचं ते पददेखील प्रभारी आहे. त्यातच त्यांच्या कर्तृत्वाचा ‘उतुंग आलेख’ पाहून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं त्यांना आणखीन एक प्रभारी पद बहाल केलं. ते म्हणजे महाराष्ट्राचे कला संचालक पद. वास्तविक त्यांचा आणि चित्रकलेचा काडीचाही संबंध नाही इतकंच काय पण त्यांचं शिक्षणदेखील जेजेत कधी झालं नाही. प्रभादेवीच्या रचना संसदचे ते आर्किटेक्चरच्या डिप्लोमाचे ते विद्यार्थी. कर्मधर्मसंयोगानं त्यांची निवड जे जे आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून झाली.
आणि नंतर थेट त्यांच्या गळयात प्रभारी कला संचालक पदाची माळ पडली. आधीच एकाहून एक नग प्रभारी कला संचालक म्हणून निवडले गेले होते त्यातलेच हे एक. त्यांना झाकावे यांना काढावे. इतकं साऱ्यांमध्ये कलाविषयक ज्ञानाचे साम्य. त्यांची निवड का केली? कुणी केली? कशी केली? याविषयी कुठलीही माहिती उपलब्ध नाही. भाजपच्या राज्यात असे प्रश्न विचारायचेदेखील नसतात, असं म्हणतात. खरं खोटं कुणास ठाऊक?
‘मिश्रा’ या त्यांच्या आडनावावरून त्यांनी अतिशय गोड बोलून कला संचालनालय आणि मंत्रालय कसं काबीज केलं असेल याची कल्पना यावयास काही हरकत नाही. मंत्रालयातल्या कुठल्याही खात्याच्या सचिव – उपसचिव यांच्यापासून मंत्र्यांपर्यंत कुठंही त्यांचा वावर असू शकतो. गेल्या सात आठ वर्षात त्यांनी शिक्षक म्हणून किती लेक्चर्स घेतली हा खरं तर संशोधनाचा विषय आहे, असं आर्किटेक्चर कॉलेजचे विद्यार्थीच सांगतात. या मिश्रा साहेबांनी आपली पीएचडी पूर्ण केलीच नाही तरीदेखील सचिवांसारखा अधिकारी त्यांचा उल्लेख सर्रास “डॉक्टर” असा करतात तेव्हा आपल्यापुढे कपाळावर हात मारून घेण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो.
दुपारी कधी तरी मंत्रालयात जायचे या केबिनमधून त्या केबिनमध्ये फाईली घेऊन हिंडायचे. मिळालेल्या अन्य वेळात मंत्र्यांच्या कार्यालयाची अथवा बंगल्याची पायधूळ झाडायची आणि संध्याकाळी दिवेलागणीला कला संचालनालयात परतायचे असा त्यांचा रोजचा दिनक्रम असतो असे जेजे परिसरात ठामपणे सांगितले जाते. मग ते वर्गात लेक्चर देण्यासाठी किंवा प्राचार्यांच्या कार्यालयात कॉलेजच्या कामकाजासाठी किती वेळ देतात? असा प्रश्न कुणीही विचारायचा नाही. कारण रोजच त्यांना कुण्यानाकुण्या साहेबानं मंत्रालयात बोलावलेलं असतं. साहेब म्हणजे अर्थातच उपसचिव, सचिव किंवा मंत्रीमहोदयसुद्धा असू शकतात. त्यांनी ‘सेवाधर्म’ आपल्यात इतका बाणवला आहे की कुठल्याही कामाला ते नकार देत नाहीत. मागच्या दिवाळीचंच उदाहरण घ्या ना. उपसचिव साहेबांकडे मिठाईचे प्रचंड पुडे आले. आता हे नव्या मुंबईच्या घरापर्यंत न्यायचे कसे असा प्रश्न उपसचिव साहेबाना भेडसावू लागला. मिश्रासाहेबांच्या कानावर तो जाताच मिश्रासाहेब कला संचालक म्हणून त्यांना मिळालेली गाडी घेऊन साहेबांसकट मिठाईचे पुडे गाडीत टाकून साहेबांना थेट नव्या मुंबईत घरापर्यंत सोडून आले. साहेबांना ही मिश्रा साहेबांची सर्व्हिस एवढी आवडली की नंतर साहेब रोजच कार्यालय सुटल्यावर नव्या मुंबईत कला संचालनालयाची गाडी घेऊन जाऊ लागले. कधी कधी मिश्रा साहेबाना मंत्र्यांची काम करायची असत त्यावेळी मात्र ते साहेबांना सोडायला जाऊ शकत नसत. अशा वेळी मिश्रा साहेब ड्राइव्हर सोबत साहेबांना गाडीत घालून पाठवत असत असं जेजेशी संबंधित ठामपणानं सांगतात.
मध्यंतरी सामंत साहेबांच्या काळात सहा सात महिन्यांसाठी मिश्रा साहेबांचं प्रभारी पद गेलं होतं. पण उपसचिव साहेबांना कला संचालनालयाच्या गाडीची इतकी संवय झाली होती की त्यांनी मग मिश्रा साहेबांच्या जागी आलेल्या साबळे साहेबांनाही हाताशी धरलं आणि मग साबळे देखील उपसचिव साहेबांना नव्या मुंबईत कला संचालकांच्या गाडीनं त्यांच्या घरी सोडू लागले. पण साबळे यांनी त्या जागेवर ‘दिवे’ लावल्यानं काही महिन्यानं पुन्हा मिश्रा साहेब प्रभारी कला संचालक झाले. पण तोपर्यंत उपसचिव साहेबांना गाडीची व्यवस्था झाली होती. त्यामुळे आता काही त्यांना नव्या मुंबईत साहेबांना सोडावयास जावं लागत नाही. पण उपसचिव साहेबांना कला संचालनालयाची गाडी इतकी आवडली आहे की त्यांना कुठं बाहेरगावी जायचं असलं म्हणजे ते ती हक्कानं नेतात.
साबळे जाऊन मिश्रा आले त्याच दिवशी कला संचालनालयाची गाडी उपसचिव साहेबांना आणायला चक्क धुळ्याला जाऊन आली होती. याचीही बातमी ‘चिन्ह’नं प्रकाशित केली. पण काहीही झालं नाही कारण ‘हमाम मे सभीच नंगे!’ आता तुम्ही म्हणाला याला पुरावा काय? याला पुरावे मंत्रालयापासून नवी मुंबईपर्यंतचे आणि टोल नाक्यावरचे सर्व सीसीटीव्ही. हे सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवण्याची प्रथा आहे. शिवाय गाडीचं रजिस्टर बुक किंवा डायरी हीदेखील उत्तम पुरावा ठरू शकते. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? बांधून घेणारे सर्वच त्यात सामील. कारवाई करायची तरी कुणी कुणावर? या संदर्भात आणखीन एक भयंकर किस्सा सांगितल्याशिवाय राहवत नाही. कला संचालनालयाचं मातेरं करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता असे एक कला संचालक काही वर्षांपूर्वी सरकारी कामामुळे मंत्रालयात गेले होते. का कुणास ठाऊक पण तेव्हाच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या मंत्र्यांच्या कपाळावर हे कला संचालक दिसले की आठी उमटायची. बहुदा दसऱ्याच्या आधीचा दिवस होता आणि मंत्रालयात पूजेची वगैरे गडबड चाललेली. उच्च व तंत्रशिक्षण खात्यात देखील पूजेची लगबग चालू होती. हे लांबलचक तोरण शिपायानं आणलं होतं. पण ते तोरण त्यांना काही चांगल्या पद्धतीनं लावता येईना. ते जे काही लावत होते ते अत्यंत बेंगरूळ दिसत होते. मंत्री महोदयांना ते काही आवडेना. शेवटी वैतागून ते आपल्या सचिवांना म्हणाले ‘तिकडे तो बाहेर कला संचालक बसलाय त्याला बोलवा आणि त्याला सांगा लावायला.’ पुढं काय झालं असेल हे सांगायला हवं का? असो. थोडेसे विषयांतर झाले.
तर अशा या आपल्या गुणसंपन्न मिश्रा साहेबांवर ‘मॅक्स महाराष्ट्रा’नं व्हिडीओ तयार करून कला संचालनालय परिसर आणि मंत्रालयाच्या परिसरात एकच धमाल उडवून दिली आहे. यातलं खरं काय आणि खोटं काय हे आता सांगणं अवघड आहे. ‘चिन्ह’चं आजवरचं कार्य चित्रकला आणि चित्रकला शिक्षण यांच्यापुरतंच मर्यादित होतं. त्यामुळे मिश्रा सारख्यांच्या कर्तृत्वाकडे आमचं लक्ष गेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि प्रभारी कला संचालकपदी गेल्या पंचवीस तीस वर्षात अशा काही भयंकर नेमणुका उच्च व तंत्रशिक्षण खात्यांनी केल्या की चित्रकलेशी काहीही संबंध नसलेल्या आणि तात्पुरत्या नेमणुकीवर आलेल्या असल्या नगांच्या वाट्याला आपण जायचंच नाही असं आम्ही ठरवूनच टाकलं होतं. पण आता मात्र ‘चिन्ह’ याकडे दुर्लक्ष करणार नाही हे निश्चित. किंबहुना गेल्या काही दिवसापासून जे लेख ‘चिन्ह आर्ट न्यूज’मध्ये प्रसिद्ध होत आहेत त्यांचा रोख प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांच्यावरच होता हे माहितगारांच्या लक्षात आलं असेलच.
हेच जेजेत कधीही न शिकलेले, रचना संसदमधून डिप्लोमा कोर्स केलेले, जे जे आर्किटेक्चरच्या प्राचार्य पदी प्रभारी म्हणूनच बसलेले इतकंच नाही तर महाराष्ट्राचं कला संचालक पदी प्रभारी म्हणून का होईना निवड झालेले मिश्रा साहेब आता जे जे डिनोव्हो विद्यापीठाच्या कुलगुरु पदी विराजमान होण्याची स्वप्न बघतायेत. धन्य धन्य त्या महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याची आणि ते चालवणाऱ्या सचिव आणि उपसचिव यांची.
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज‘
Related
Please login to join discussion