Features

एका प्रश्नाची बारा उत्तरं !

रहेजा कला महाविद्यालय बंद पडल्यावर वडाळ्याच्या जेकेनं ते कला महाविद्यालय चालवायला घेतलं. त्या कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुरेंद्र जगताप यांनी आशुतोष आपटे यांना एक प्रश्न विचारला, त्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्तानं आपटे यांनी केलेलं हे विचार मंथन.
प्रिय मित्र,
सुरेंद्र जगताप

तुझ्या चांगल्या व मनापासून विचारलेल्या प्रश्नाला माझे उत्तर

तुझा प्रश्न : सर्व समावेशक एका छत्रा खाली जे काही नवीन आधुनिक कला शिक्षण होवू शकते. तेच करू, सोबत करू. वेगळ्या चुली का मांडायच्या ?

( थोडक्यात जे. जे. डीनोव्हो अभिमत विद्यापीठाऐवजी जे. जे. राज्य विद्यापीठ का नको?)

उत्तर : १. जेजेचे राज्य विद्यापीठ व्हावे ही कल्पना राज्याच्या कला शिक्षणाला घातक आहे. जेजेचे शिक्षण महत्त्वाचे, सर्टिफिकेट नाही. जेजेचे शिक्षण हवे तर जेजेत येऊन शिकता येते.

उत्तर : १. जेजेचे राज्य विद्यापीठ व्हावे ही कल्पना राज्याच्या कला शिक्षणाला घातक आहे. जेजेचे शिक्षण महत्त्वाचे, सर्टिफिकेट नाही. जेजेचे शिक्षण हवे तर जेजेत येऊन शिकता येते.

२. इतर संस्थांमध्ये चांगले शिक्षण दिले जात नाही व त्यांच्या शिक्षणाला काही अर्थ नाही म्हणून त्यांना जेजेचे नाव लावा असाही याचा अर्थ होतो व त्या काही चांगल्या संस्थांचा व प्रामाणिक शिक्षकांचा हा अपमान आहे. कृपया असा अपमान करु नका. मी स्वतः वसई कॉलेज, डिकॅड, देवरुख येथे प्राचार्य होतो, तसेच सह्याद्री स्कूल ऑफ आर्टला शिक्षक होतो. आम्ही तिथे चांगले शिक्षण दिले आहे. मी तेथे असताना जेजेच्या ऐवजी विद्यार्थी त्या कॉलेजला प्राधान्य देत होते. आजही वसई व सावर्डे आणि इतर काही संस्था जेजेच्या तोडीस तोड आहेत. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व जेजेचा टिळा लावून मोडू नका.
३. आजपर्यंत कधीही सर्टिफिकेट वर जेजेचे सर्टिफिकेट असे नसते. जेजेत शिकले तरीही सर्टिफिकेट मुंबई विद्यापीठाचे व कला संचालनालयाच्या जी. डी. आर्टचे ( Government Diploma in Art- G. D. Art) असे असते. मग आजच का एकदम जेजेचे नाव हवे ?

४. डिप्लोमाला कोणत्याही विद्यापीठाला संलग्न करता येत नाही. कायदेशीर रित्या ते मान्य नाही. डिप्लोमा हा दहावी नंतर आहे. डिग्री बारावी नंतर. जेजेला आम्ही डिग्री मिळवली तेव्हा सुरुवातीला दहावी नंतर प्रवेश होता, परंतु तेव्हा फाउंडेशन दोन वर्षांचे करुन १०+२+३ असा डिग्रीचा पॅटर्न राबविला गेला. पुढे लगेचच बारावी नंतर सुरू झाले. तात्पर्य डिप्लोमाला जेजेचे किंवा कोणतेही राज्य विद्यापीठ झाले तरी त्यात सामील करुन घेता येत नाही. त्यासाठी आधी डिप्लोमा संस्थांना डिप्लोमा सोडून डिग्रीच्या नियमानुसार इन्फ्रास्ट्रक्चर, त्या योग्यतेचे शिक्षक (पदवीधर नाही पदव्युत्तर अभ्यासक्रम उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेले, चांगल्या विद्यापीठातून डॉक्टरेट केलेले वगैरे असे, किमान असिस्टंट प्रोफेसर, साहाय्यक अधिव्याख्याता नाही) वगैरे अर्हता यु. जी. सी. व तत्सम राष्ट्रीय नियमानुसार प्राप्त करावी लागेल. यासाठी संस्थांवर प्रोफेसर स्केलच्या पगारासहित खूपच अतिरिक्त भार पडेल व बराच कालावधीही लागेल.

५. सर्वांनाच डिग्री करणे शक्य नसते म्हणून उच्च शिक्षणाबरोबरच डिप्लोमा चालू ठेवणे ही सरकारची जबाबदारी असते. मात्र आत्ताचा आपला डिप्लोमा हा दुर्दैवाने तेवढ्या विहीत मान्यतेचा नाही. जसे दहावीसाठी, बारावीसाठी बोर्डाची परीक्षा असते. म्हणून आपले सरकार त्यासाठी वेगळे बोर्ड स्थापन करुन मान्यता प्राप्त डिप्लोमा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारचे हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे व त्यासाठीचे क्रेडिट माननीय शिक्षणमंत्री श्री. उदय सामंत यांना द्यायलाच हवे.
६. आत्ताही जेजे मुंबई विद्यापीठाची डिग्री असली तरी ताब्यात महाराष्ट्र शासनाच्याच आहे. शासनाचा हस्तक्षेप वारंवार असतो. हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. शासन कुणाच्याही आकसाने बदल्या करून टाकते, शिक्षक भरती, साधी माळी, वॉचमन ही भरतीही करता नाही किंवा ढिसाळ कारभार केला जातो. यात शिक्षणमंत्री वैयक्तिक चांगले असून उपयोग नाही, ही व्यवस्थाच पोखरलेली आहे. त्यामुळे जेजेचे राज्य विद्यापीठ झाले तर पुन्हा याच व्यवस्थेच्या तोंडघशी पडावे लागणार. बरे आज मा. शिक्षणमंत्री स्वतः उच्च विद्याविभूषित व शिक्षणाचा कळवळा असलेले आहेत. आज मा. मुख्यमंत्री आपल्या जेजेचेच आहेत. उद्या हेच तिथे नसणार आहे. मग जे कोणी शिक्षणमंत्री येतील त्यांच्याबरोबर पाट का लावून घ्यायचा? आजही भाभा, किंवा इतर राज्य विद्यापीठात काय अनागोंदी चालू आहे त्याच्या बातम्या सतत येतच असतात. म्हणून जेजेचे महाराष्ट्र शासन पुरस्कृत पण स्वायत्तता असलेले डी-नोव्हो अभिमत विद्यापीठच व्हायला हवे. व डिप्लोमासाठी बोर्ड असायला हवा व स्वतंत्र वेगळे राज्य कला विद्यापीठ रत्नागिरी किंवा औरंगाबाद, जालना येथे भव्य प्रमाणावर व्हावे.
७. सुरेंद्र तुझ्या विषयी व काही आणखी शिक्षकांविषयी तुम्ही माझे मित्र म्हणून स्नेह असला तरी त्याहुन अधिक तुमच्या प्रामाणिक शिकवण्याच्या तळमळीमुळे मला तुमच्या विषयी आदर आहे. मला वाटते उलट तुमच्या संस्था या जेजेच्या नाही तर त्यांच्या स्वतःच्या नावावर मोठ्या व्हाव्यात. जसे पूर्वी रहेजाचे जेजेपेक्षा स्वतंत्र नाव होते. सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयाचे आहे, तुपे होते तेव्हापासून नाशिकच्या कॉलेजचे नाव आहे, पुण्याचे अभिनव व भारती विद्यापीठाचे नाव आहे, नीलिमा कढे यांच्या ठाणे स्कूल ऑफ आर्टचे नाव आहे, अनिल अभंग प्राचार्य होता तेव्हा डोंबिवलीच्या करंदीकर कला महाविद्यालयाचे नाव होते,पप्पादा राजेशिर्के यांच्यामुळे सावर्ड्याचे नाव आहे…. शिल्पा जोगळेकर असल्यापासून रचनाचे नाव आहे, आजही रचना अप्लाइड, सोफिया यांचे नाव आहेच. कोल्हापूरचे अजय दळवींचे दळवी स्कूल ऑफ आर्ट, शिल्पकार संजय तडसरकरांचे कलामंदिर आणि आणखी काही असतीलच.. मग यांना जेजेच्या दावणीला बांधून का फरफटवायला पाहिजे ?
त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असु दे !
गाण्यात जशी घराणी असतात म्हणजे, किराणा घराणे, कर्नाटकी घराणे, उत्तर हिंदुस्तानी अथवा जयपूर घराणे तशी ही दृश्यकलेतील स्वतंत्र शैलीची सुंदर घराणी आहेत. हे कलाक्षेत्र आहे. एकाच छापाचे गणपती छापायचा कारखाना नाही.
८. डी-नोव्हो हे स्टेटस सगळ्यांना नाही मिळत. इंजिनियरिंग वगैरेतील नावाजलेल्या कॉलेजांनाही नाही. त्यांना अभिमत विद्यापीठ होता येते.
डी-नोव्हो स्टेट्स मिळणे हा जेजेचा सन्मान आहे. आणि जेजे महाराष्ट्राचंच आहे, कायम महाराष्ट्राचंच राहणार आहे ( केन्द्राचं किंवा खाजगी कधीही होणार नाही, होऊ शकत नाही. ) त्यामुळे हा महाराष्ट्राचाही सन्मान आहे. भारतातील इतर कोणत्याही कॉलेजला अद्याप तरी हा डी-नोव्हो सन्मान प्राप्त नाही. मग आपल्याच जेजेला डी-नोव्हो नको, जेजेचे राज्य विद्यापीठ करा असा करंटेपणा का करायचा ? जेजेचे डीनोव्हो होऊ द्या. राज्य कला विद्यापीठ वेगळे स्थापन करा आणि डिप्लोमासाठी बोर्ड स्थापन करा अशी मागणी उचित होईल.
९. जेजे डी-नोव्हो झाले की फी वाढेल, गरीब विद्यार्थी येथे येऊ शकणार नाहीत हाही धडधडीत खोटा आरोप आहे. असे आरोप तेही लेटरहेडवर छापून कलापुष्पसारखी जबाबदार संस्था करते याचे वाईट वाटते. जेजेला ग्रांट महाराष्ट्र शासनाचीच असणार आहे, जेजेला शैक्षणिक व्यवस्थापकीय स्वायत्तता असली तरी जेजे कायम महाराष्ट्र शासनाचे राहणार आहे. त्यामुळे भरमसाठ फी वाढ करताच येणार नाही. शिवाय फी परतावा, फी माफी या सर्व योजनाही तशाच राहतील.
१०. आणखी एक महत्त्वाचा धोका. जेजेचे राज्य विद्यापीठ झाल्यास काही धंदेवाईक संस्थांचे फावणार. कारण जेजेचे सर्टिफिकेट आपण आपल्या गावात देतो म्हटल्यावर विद्यार्थ्यांची जेजेच्या सर्टिफिकेटच्या नावाने फसवणूक होणार. सर्टिफिकेट मिळेल पण शिक्षण जेजेच्या तोडीचे थोडंच मिळेल ? जर जेजेच्या तोडीचे शिक्षण देऊ शकता तर जेजेचे सर्टिफिकेट कशाला हवे ? सर्टिफिकेट की शिक्षण ?
जेजेचे शिक्षण हवे तर जेजेतच येऊन शिकावे. सगळ्याच संस्थांत तुझ्यासारखे प्रामाणिक व त्या योग्यतेचे शिक्षक नाहीत हे तुलाही माहिती आहे. कित्येक संस्था कायम स्वरूपी बंद कराव्यात म्हणून चित्रकला निरीक्षकांचा अहवाल आहे. खूपशा संस्थेत पुरेशी पटसंख्याही नाही. शासकीय महाविद्यालये सोडून एकूण प्रवेश संख्या विनाअनुदानित कायम विनाअनुदानित साठी १२७४५ आहे पैकी फक्त ४६८२ विद्यार्थी प्रवेशीत आहेत. म्हणजे ८०६३ विद्यार्थी पटसंख्या रिक्त आहे. अनुदानीत ३१ संस्थांमध्येही ३९०० पैकी ३२६४ विद्यार्थी प्रवेशीत आहेत. म्हणजे ६३६ जागा रिक्त आहेत. ३२ कला संस्था तीन वर्षांपासून बंद असल्याने कायम बंद करण्याकरिता शासनाकडे प्रस्तावित आहेत. मग कोणासाठी हवंय जेजेचे राज्य विद्यापीठ?
११. माननीय शिक्षण मंत्रीमहोदयांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असावी. कारण आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत व कालही एका टीव्ही चॅनेलवर ते म्हणाले होते, की ” सावंतवाडीच्या एखाद्या गरीब विद्यार्थ्याला जेजेचे सर्टिफिकेट मिळाले तर त्याला नोकरी लागेल. “
आता मुळात जेजेच्या किंवा कोणत्याही कलेच्या सर्टिफिकेटवर नोकऱ्या किती उपलब्ध आहेत ? आज जेजेचे नाही तर कला संचालनालयाच्या ए. टी. डी. च्या सर्टिफिकेटवर थोड्याफार कलाशिक्षकांची भरती होते. आता ए. टी. डी. हा दोनच वर्षांचा डी. एड. समकक्ष डिप्लोमा कोर्स आहे. त्या वर्गाला डीग्री देताच येणार नाही. बाकी उपयोजित कला व चित्र शिल्पकलेच्या अभ्यासक्रमाला काही हजारो नोकऱ्यांचे ऑप्शन आहेत का? तर नाहीच नाही! कलेत बाप दाखव नाहीतर श्राध्द कर असे साधे गणित असते. तुमच्या प्राप्त केलेल्या कलाकौशल्य व कलागुणांवरच तुम्हाला काम मिळते. म्हणजेच जेजेचे सर्टिफिकेट नव्हे तर चांगले सक्षम शिक्षण महत्त्वाचे. आणि जेजेचे डी-नोव्हो अभिमत विद्यापीठ झाले तर शासनाचा हस्तक्षेप टाळून जेजेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणे पूर्ण शक्य आहे. इतरही चांगल्या कला संस्थांनी खरे तर डीनोव्हो शक्य नसले तरी स्वतःचे अभिमत विद्यापीठ स्थापायला हवे. सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयाला ते शक्य आहे.
१२. जर जेजेचे सर्टिफिकेट चांगले भारीतले शिक्षण देण्याचा प्रश्न सोडवता येतो असे म्हणणे म्हणजे आयआयटीचे सर्टिफिकेट आयटीआयला देऊन टाकायचे असे आहे.
आशुतोष राम आपटे
[ आपट्याची पानं ]
माझ्यात जे जे आहे
ते ते जेजे आहे.

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.