No products in the cart.
दुसरा पर्याय नाही!
जेजे अनन्य अभिमत विद्यापीठासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच अर्थात जेजेच्या माजी विद्यार्थी असलेल्या उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः २४ तासात मंत्रालयात सभा बोलावली. ही खरोखरच कलाक्षेत्रातली मोठी घटना म्हणता येईल. कारण जे जे स्कूल ऑफ आर्ट संदर्भात आता वाईट व्हायचे काहीही शिल्लक राहिले नव्हते. महाराष्ट्राचे तंत्रशिक्षण मंत्रालय किंवा उच्च शिक्षण मंत्रालय म्हणा, यांनी गेल्या ४० वर्षात जे जे स्कूल ऑफ आर्टला अक्षरशः भिकाऱ्यासारखं वागवलं. जेजेच्या उत्कर्षासाठी संबंधितांनी ज्या ज्या म्हणून मागण्या केल्या त्या त्या साऱ्यांना अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या.
जोपर्यंत बाबुराव सडवेलकर कलासंचालक होते तोपर्यंत बरे चालले होते असे म्हणायचे. त्यानंतर प्रभारी कला संचालक म्हणून प्रा. शांतीनाथ आरवाडे यांची निवड झाली. त्यांनीही कला संचालनालयाचा गाडा नियमानुसार आखला. त्यानंतर मात्र कला संचालनालयाच्या बाबतीत जे काही घडले त्याची आठवण सुद्धा आज तो काळ पाहिलेल्यांना नकोशी वाटते.
‘चिन्ह’नं जो २००८ साली या साऱ्यावर प्रकाशझोत टाकणारा ‘क(।)लाबाजार’ अंक प्रसिद्ध केला त्यात हे सारे विस्ताराने आले आहे. त्यामुळे आता इतक्या वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती मी करू इच्छित नाही.
अर्थात त्यातले बरेचसे खलपुरुष आता काळाच्या ओघात अंतर्धान पावले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काही लिहिणं हे देखील आता मला योग्य वाटत नाही, पण एवढं मात्र मी सांगेन की तंत्रशिक्षण खात्यापासून ते जे जे स्कूल ऑफ आर्ट किंवा अप्लाइड आर्टमधल्या बहुसंख्य लोकांचा यात वाटा आहे. रेल्वेत एखादा पाकीटमार रेड हॅन्ड पकडला गेला की कसे उरलेले सारे त्याला धुतात, कृश शरीराच्या व्यक्ती देखील बडवून हात मोकळे करून घेतात, तसंच काहीसं याबाबतीतही झालं. ज्यांच्याकडून कधी अपेक्षा केली नव्हते अशांनी देखील या गंगेत हात धुवून घेतले आणि जे जे स्कूल ऑफ आर्टचे एकेक बुरुज अक्षरशः ढासळून टाकले. काही करायचं म्हणून त्यांनी शिल्लक ठेवलं नाही.
शिक्षणाचं एकही पवित्र क्षेत्र त्यांच्या तडाख्यातून सुटलं नाही. कुणी विद्यार्थ्यांकडून प्रवेशाचे सिटमागे लाखो रुपये उकळले, तर कुणी नापासांना पास करून त्यात पैसे कमावले. नव्या भरतीला परवानगी नाही असे सांगून कुणी गुणवंत उमेदवारांना बाद करून टाकले, तर कुणी नालायक उमेदवारांना या काळात पदावर आणून बसवण्यात धन्यता मानली. जेजेची संस्कृती ठाऊक नसलेली आणि किमान पात्रता देखील नसलेली एकाहून एक दिवटी माणसं पद्धतशीरपणं एकेका विभागात पेरली गेली. ज्यांनी हे करवून आणलं त्यातला एक दिवटा आता तुरुंगात खितपत पडला आहे, पण काही लाख रुपयांसाठी त्यानं जे काही घडवून आणलं त्यामुळं मात्र जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि कला संचालनालयाचं प्रशासन मात्र कायमचंच खिळखिळं केलं.
ही लॉबी इतकी प्रभावशाली होती की नावानिशीवर यांची कर्तृत्व वृत्तपत्रांनी तपशीलवार प्रसिद्ध केली, पण यांच्या केसालाही कधी धक्का लागला नाही. मला खात्री आहे की ज्यांनी हे सारं घडवलं ते सारेच आता सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रचंड सेवानिवृत्ती वेतन घेऊन जेजेचं जे काही आंदोलन चाललं आहे ते यु ट्यूबवर पाहत पाहत एन्जॉय करत असतील.
काहींना तोंडदेखलं त्यांच्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी निलंबित केलं गेलं. अविर्भाव असा आणला गेला जणू काही आपण मोठी शिक्षा करतोय. ज्यांनी आयुष्यभर सरकारी केबिनी अनुभवल्या त्यांना निलंबित झाल्यानंतर काही काळ जेजेच्याच बाकड्यावर बसवलं, पण ते सारे हरामखोर त्या साऱ्यांना पुरून उरले ! मंत्रालयातल्या आपल्या पित्त्यांना हाताशी धरून त्यांनी आपल्या सेवानिवृत्ती वेतनाची व्यवस्थित सोय करून ठेवली.
१) परीक्षेला न बसलेला विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या एमएफएच्या परीक्षेत पहिला आला २) जेजेच्या अधिष्ठात्यानं एकेकाची कोट्यवधी रुपये किंमत असलेली सुमारे १००-१५० दुर्मिळ पेंटिंग्ज जाळून टाकली ३) प्रख्यात चित्रकार गायतोंडे यांनी विद्यार्थी दशेत रेखाटलेलं भलं थोरलं सिमेंटच्या पत्र्यावरचं पेंटिंग छोट्या फ्रेममध्ये बसेना म्हणून चारही बाजूंनी कापून टाकलं, कापताना ते मधोमध दुभंगलं. ४) एका प्रभारी एचओडी कम प्रभारी अधिष्ठाता कम प्रभारी संचालकानं सर्वोत्कृष्ट शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकांच्या घडणावळीत हेराफेरी केली. त्याबद्दल प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना विधानसभेत माफी मागावी लागली. ५) कुठल्यातरी परदेशी राजदूताच्या मुलीला जेजेत हॉबी क्लासमध्ये प्रवेश हवा होता, तर यांनी तिला बीएफए आणि एमएफएची फी एकाच वेळी घेऊन तिला न शिकताही मुंबई विद्यापीठाची पदवी बहाल केली. ६) एकदा तर अधिष्ठाता पदाच्या मुलाखतीसाठी प्रभारी अधिष्ठाता उमेदवाराला टॅक्सीत घालून घेऊन चक्क महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात घेऊन गेला. ७) एक अधिष्ठाता तर जेजेसारख्या हेरिटेज परिसरात टॉवर बांधायला निघाले होते. अशी किती उदाहरणं सांगावी ! सांगताना देखील आपल्याला शरम वाटते, पण करणाऱ्यांना त्याचं काहीही वाटलं नाही. नशीब आमचं आणि जेजेचं देखील ताठ की ते जेजेच्या वास्तू देवनारच्या खाटीकखान्या शेजारच्या डम्पिंग ग्राउंडवर नेण्यास यशस्वी ठरले नाहीत !
ही सगळी प्रकरणं दहाच्या दशकातली. त्यानंतर काही घडलंच नाही असं वाटतंय ? त्यानंतर आजतागायत खूप काही घडलंय. मस्टरवर सही न करणाऱ्या अधिष्ठात्याची स्टोरी प्रसिद्ध करून आम्ही ते दाखवून देखील दिलंय. पूर्वी काहीच कारवाई होत नसत, पण सदर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या आठवड्यात जेजेत चक्क बायोमेट्रिक मशिन्स बसवली गेली. पण संबंधितांवर कारवाई मात्र अद्याप झालेली नाही. असं का ? समजा दहा वर्ष सदर अधिष्ठात्यानं मस्टरवर सही केलीच नसेल तर त्याला वेतन कसं दिलं गेलं ? सही न करता देखील वेतन देण्याची सूट या अधिष्ठात्याला ‘विशेष बाब’ म्हणून सरकारनं दिली होती किंवा काय ? याची तरी चौकशी आता केली जाणार आहे का ?
उच्च शिक्षणमंत्री श्री उदय सामंत या बाबतीत लक्ष घालतील का ? उच्च शिक्षणमंत्र्यांची महाराष्ट्रा चं कला विद्यापीठ निर्माण करण्याची कल्पना मोठी रोमांचकारी होती. १९८३ सालीचा बाबुराव सडवेलकरांनी शासनाला याबाबतचा अहवाल दिला होता, पण त्यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही. नंतरही अनेकवेळा कला विद्यापीठाची मागणी झाली, पण तिलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. उदय सामंत यांच्यासारखे शिक्षणमंत्री तेव्हा जर महाराष्ट्राला लाभले असते, तर आज महाराष्ट्र कुठे असता ? ( हे वाक्य मी मुळीच उपरोधिकपणे म्हणत नाही याची कृपया नोंद घ्यावी. ) उदय सामंत यांच्या प्रस्तावाबद्दल मी एवढंच म्हणेन की, त्यांच्या प्रस्तावाला खूप उशीर झाला आहे. मुख्य म्हणजे केंद्रसरकारनं जे नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलं आहे आणि ज्याची अंमलबजावणी या वर्षाच्या अखेरीपासून होणार आहे त्यात दहावीनंतरच्या अभ्यासक्रमांना कोणतंही स्थान ठेवण्यात आलेलं नाही. पदविका देणाऱ्या कलाशिक्षण संस्थांचं काय होणार आहे याबद्दल आता केंद्रसरकारच अधिक अधिकारवाणीनं सांगू शकेल. ६० वर्ष झाली कला संचालनालयाच्या स्थापनेला, संपूर्ण भारतात असं हे एकमेव खातं, पण त्यावर चुकीच्या नेमणूक करून त्या खात्याचे अक्षरशः धिंडवडे काढले गेले, मंत्रालयातल्या दरवाजावरची तोरणं लावण्यासाठी देखील कला संचालकांना मंत्रालयात बोलावलं गेलं. या पदाचं किती अधःपतन करता येईल तितकं ते केलं गेलं. जे कला संचालनालयाच्या बाबतीत तेच जेजेच्या अन्य दोन शिक्षण संस्थांबद्दल.
जेजेचं जे काही बरं वाईट व्हायचं होतं ते आता होऊन गेलं आहे, काहीच शिल्लक नाही. औषधापुरतेच आता कायमस्वरूपी शिक्षक उरले आहेत. १५० पदं भरायची राहिली आहेत. ती कधी भरली जातील याविषयी कुठलीच शाश्वती नाही. २००७ साली मंत्रालयात एक विशेष सभा भरवली गेली, त्या सभेत माझ्यासारख्या असंख्य जेजेच्या माजी विद्यार्थ्यांना बोलावलं गेलं, त्यावेळचे शिक्षणमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘पदभरतीचे प्रस्ताव गेले आहेत, लवकरच पदभरती केली जाईल’ असे जाहीर केले होते. आज जवळजवळ १५ वर्ष झाली… पदभरतीची संख्या १६० पर्यंत पोहोचली आहे. ही लवकर होईल या बाबतीत आम्ही महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यावर का बरं विश्वास ठेवायचा ? हे खातं तर महाराष्ट्राच्याच हातात होतं, का नाही तुम्हाला सुसंस्कृत उमेदवार भरता आले ? आणि उमेदवार भरतीला इतकी वर्ष लागावीत ? चांगल्या शिक्षकांच्या पिढ्याच्या पिढ्या तुम्ही कापून काढल्या आणि ओझ्याची गाढवं आमच्या उरावर आणून बसवलीत, का आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा ? आहे तुमच्याकडे उत्तर ? गेल्या ४० वर्षात महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाची तुम्ही तुमच्या हाताने कबर खोदलीत आणि आज आम्हाला कला विद्यापीठाचं गाजर दाखवता ? का आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा ? आहे तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर ?
जेजेचं जे जे म्हणून वाईट व्हायचं ते आता होऊन गेलंय. आता दोनच पर्याय उरले आहेत. एक तर जे जे स्कूल ऑफ आर्ट बंद करून टाकावं, पण आमची पिढी जिवंत असेपर्यंत ते तुम्हाला करता येणार नाही हे लक्षात ठेवा. उरला पर्याय दुसरा, अनन्य अभिमत विद्यापीठाचा. तो तुम्ही स्वीकारा, त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहा तरच आता जमशेदजी भाईंच्या आत्म्याला न्याय मिळेल ! कधी नव्हे ती परिस्थिती आता आमच्या बाजूने आहे. आमचाच एक विद्यार्थी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळेच श्रीयुत उदय सामंत तुम्हाला हे करावंच लागेल. कारण जेजेचं वाटोळं झालेलं आता कुणालाच पाहवणार नाही. जेजेच्या माजी विद्यार्थ्यांना तर नाहीच नाही. त्यात आमच्यासोबत माननीय मुख्यमंत्री देखील आले हे कृपया लक्षात घ्या ! आफ्टर ऑल जेजेची संस्कृती ही वेगळीच आहे, हे परवा मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सभेत तुम्हाला दिसलं असेलच. तेव्हा उदयराव हा प्रश्न आता प्रतिष्ठेचा करू नका ! जेजेचा इतिहास हा १६५ वर्षाचा आहे हे लक्षात घ्या.
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह’
Related
Please login to join discussion