Features

आरोग्य खात्याचं कला संचालनालय झालंय!

आधी ठाणे महानगर पालिकेच्या इस्पितळात नंतर नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर काल परवा छत्रपती संभाजीनगच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय सुविधाअभावी मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. जे शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४४ टक्के पदं रिक्त ठेवते त्या शासनाकडून जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयातील अध्यापक प्राध्यापकांची पदं प्रामाणिकपणे भरली जातील अशी अपेक्षा करावी का? झारीतला शुक्राचार्य उच्च व तंत्रशिक्षण खात्यात ठाण मांडून बसला आहे. तिकडे वैद्यकीय शिक्षण विभागातदेखील वेगळी परिस्थिती नसणार तिथं दुसरा शुक्राचार्य ठाण मांडून बसला असणार! मंत्रालयातल्या प्रत्येक खात्यात ठाण मांडून बसलेल्या या शुक्राचार्याना जोपर्यंत शासन वठणीवर आणत नाही तोपर्यंत आणखीन अर्धा डझन मुख्यमंत्री जरी नेमले तरी व्यवस्थेत कुठलाही बदल होणार नाही हे निश्चित. घेणार आहेत का राज्यकर्ते या प्रश्नाची दखल. 

गेले अनेक दिवस खरंतर असं म्हणायला हवं, गेले अनेक महिने, अनेक वर्ष ‘चिन्ह’ कला संचालनालय आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट हा विषय केंद्रस्थानी धरून उच्च व तंत्रशिक्षण खात्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करतो आहे. याची दखल घेतली जाते आहे किंवा नाही याविषयी मला काहीएक ठाऊक नाही. त्याच्याशी माझं काही देणंघेणंदेखील नाही. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राविषयी मला संपूर्ण माहिती असायला हवी असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून मी ती सातत्यानं मिळवत राहतो आणि तिची चिरफाड करून संबंधितांवर सातत्यानं टीका करत राहतो. या टीकेमुळे संबंधितांवर काही फरक पडतो का? किंवा त्यांच्यावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्यात काही सुधारणा होते का? हे जाणून घ्यावयास मला निश्चितपणाने आवडेल. पण ते करण्यासाठी लागणार पुरेसा वेळ मात्र मजपाशी नाही. एक केस संपली का दुसऱ्या केसच्या मागे मी सतत लागत असल्यामुळं माझ्यापाशी या बाबी पूर्ण करण्यास वेळच शिल्लक राहत नाही.

मी मूळचा चित्रकार आहे. पण चित्रकला सोडून हे सारे उपदव्याप करण्यातच माझं निम्यापेक्षा अधिक आयुष्य खर्ची झालं ही वस्तुस्थिती आहे. याविषयी मला फारशी खंतही वाटत नाही. जेजेत शिकत असतानाच मेनस्ट्रीम मीडियात काम करण्याची संधी मला मिळाली. या संधीचं मी काही सोनं करू शकलो नाही पण चित्रकला क्षेत्रासाठी मात्र प्रारंभापासूनच मी लेखन करत आलो. त्यालाही आता चाळीस बेचाळीस वर्ष लोटली आहेत. १९८२-८३ साली मी पहिली बातमी दिली होती की जेजेमध्ये प्राध्यापकांच्या दोन पोस्ट रिकाम्या, आज तब्बल चाळीस वर्षानंतर त्या पोस्ट भरल्या जाणार आहेत. आणि त्या भरल्या जात असताना प्रचंड मोठा भ्रष्टाचार होणार आहे.

प्राध्यापक पदाच्या या पोस्टना दर महिन्याला जवळजवळ लाखभर रुपये पगार दिला जाणार आहे. यावरून भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे एजंट भविष्यासाठी किती कोटींची बेगमी करून ठेवणार आहेत याची कल्पना येते. त्याचे आकडेसुद्धा आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. इतकंच नाही तर किती उमेदवारांनी संबंधितांशी सेटिंग लावून ठेवली आहे ही माहितीदेखील आम्ही प्रसारित करणार आहोत. पण ती नंतर. तूर्त हे सारं कटकारस्थान कसं रचलं गेलं त्याचीच माहिती विस्तारानं आम्ही देतो आहोत.

अन्य कुठल्याही वाहिन्या किंवा वृत्तपत्रे ही माहिती देणार नाहीत. कारण याला टीआरपी आहे कुठे असं वाहिन्यावाले सांगतील तर असा चित्रकलाविषयक मजकूर सर्वसाधारण वाचक वाचत नाहीत म्हणून पत्रकार त्या बातम्या उडवून लावतील. याचाच फायदा सातत्यानं कला संचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तसेच मंत्र्यांच्या खाजगी सचिवांनी घेतला नसता तर ते नवलच ठरलं असतं. म्हणूनच ‘चिन्ह’ला २००८ साली ‘कालाबाजार’ अंक काढावा लागला. आणि २०२० साली ‘चिन्ह’ची वेबसाईट सुरु करावी लागली.

आता तुम्ही विचाराल की याचा काही फायदा होतोय का? तर निश्चितपणानं होतो आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांची साखळी इतकी मजबूत आहे की त्यांच्यावर परिणाम होण्यासाठी फार वेळ घालवावा लागतो आहे. १९८५ सालापासून कोणे एके काळी सर्व भारतात मोठा मान असलेली महाराष्ट्राची प्रशासन व्यवस्था  खिळखिळी होण्यास सुरुवात झाली आणि आता तर ती संपूर्णपणे नष्ट झाली आहे की काय असंच वाटावं अशा घटना आजूबाजूला घडू लागल्या आहेत.

२००८ साली ‘कालाबाजार’ अंकात मी लिहिलं होतं की महाराष्ट्राच्या प्रशासनानं वेळीच सावध व्हावं अन्यथा महाराष्ट्राच्या प्रशासनातील सर्वच खात्याचं ‘कला संचालनालय होणार’ हे निश्चित. कला संचालनालयाचा वापर या साऱ्यात गिनिपिगसारखा केला गेला. तिथं तो प्रयोग यशस्वी होताच अन्य सर्व खात्यातच तो सुरु झाला. आता तर या साऱ्या प्रयोगांनी महाराष्ट्राचं प्रशासन पूर्ण डबघाईला आणलं गेलं आहे. गेल्या महिन्यात ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत १८ जण दगावले. त्या नंतर काल परवाच नांदेडमध्ये ३६ तासात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. हेडमास्तर म्हणून ज्यांचा सातत्यानं उल्लेख केला गेला त्या माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचं नाव दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा दुर्दैवीच नव्हे तर लांछनास्पद म्हणावा असा प्रकार घडावा हा केवळ दैवदुर्विलास आहे. त्यातनं बाहेर येतो न येतो तोच आता छत्रपती संभाजीनगराची बातमी आली आहे. तिथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या रात्री १८ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. महाराष्ट्रात प्रशासन नावाची गोष्ट तरी उरली आहे का? असा प्रश्न पडावा अशी सारी भयंकर परिस्थिती आहे. आणि या साऱ्या पार्श्वभूमीवर जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयातील भयंकर परिस्थितीविषयी वारंवार लिहिताना, बोलताना सत्य परिस्थिती मांडताना मला अतिशय संकोचल्यासारखं वाटू लागलं आहे.

आजच्याच दैनिक लोकसत्तामध्ये संदीप आचार्य यांनी ‘वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापक प्राध्यापकांची ४४ पदं रिक्त’ या शीर्षकाची जी बातमी दिली आहे ती वाचल्यावर जे शासन आपल्या करदात्याच्या, मतदात्याच्या आरोग्याचीदेखील काळजी घेत नाही तिथं जे जे स्कूल ऑफ आर्ट किंवा अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयातील प्राध्यापकांची पदं भरेल का? या चार महाविद्यालयात तर जवळजवळ नव्वद टक्के पदं रिक्त आहेत. आणि जी पदं कायम स्वरूपी आहेत त्यांना भूतसंवर्गात टाकायला उच्च व तंत्रशिक्षण खात्यातला अधिकारी कट कारस्थानं करतो आहे. काय बोलावं यावर? काय लिहावं यावर? खरोखरच मनापासून सांगतो मला अतिशय संकोचल्यासारखं झालं आहे आता. या सरकारकडून खरंच काही अपेक्षा करावी अशी परिस्थिती आता राहिली आहे का? असंच आता मला वाटू लागलं आहे. तुमचं काय मत आहे?

तूर्त इतकंच. अरण्यरुदन, आक्रन्दन, संताप यांचा आवेग कमी झाला की पुन्हा लिहेनच यावर. कारण जेजेसारखी १६६ वर्षाची संस्था आपल्याला जगवायची आहे.

सतीश नाईक 

संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.