No products in the cart.
महाराष्ट्रातून चित्रकला शिक्षण संपलं ?
१९८१ साली मी जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलो. खरं तर त्या आधीच एक वर्ष मी मुंबईच्या मेनस्ट्रीम पत्रकारीतेत शिरलो होतो. चित्रकार व्हायचं होतं म्हणूनच जेजेत प्रवेश घेतला होता. पण त्या काळी तरी चित्रकलेवर चरितार्थ चालवणं अतिशय अवघड होतं. मला लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. साहजिकच लेखनालाही जेजेत प्रवेश करताच सुरुवात झाली. जेजेतल्या सहा सात वर्षाच्या शिक्षणाच्या काळात खूप लिहिलं खूप वाचलं. त्याच्या परिणाम असा झाला की पत्रकारितेतूनच मला बोलावणं आलं. आणि आवडीचं क्षेत्र असल्यामुळं मी ते स्वीकारलं देखील.
जेजेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय जवळकीच नातं असायचं. त्यामुळे कॅन्टीनमध्ये किंवा लाल कट्ट्यावर शिक्षकांशी सातत्यानं गप्पा टप्पा या व्हायच्याच. त्याच काळात जेजेमध्ये दोन तीन मोठे संप होऊन गेले होते. त्यातले दोन तर होते विद्यार्थ्यांचे आणि एक होता शिक्षकांचा. शिक्षकांच्या संपानं जेजेतले चांगले शिक्षक नोकऱ्या सोडून निघून गेले. त्याचे परिणाम लागलीच जाणवू लागले होते. उदाहरणार्थ अतिशय भंगड म्हणता येतील असे शिक्षक मानाच्या जागी रुजू झाले. आणि जेजेला उतरती कला लागू लागली. हे सारे बदल मी अगदी जवळून पाहात होतो. त्यातले काही चांगले शिक्षक मित्र बनले. साहजिकच त्यांच्या अडचणी सुखदुःख सारं काही समजू लागलं. वृत्तपत्रात नोकरी करू लागलो असल्यामुळं इथल्या साऱ्या बातम्या मी पत्रकार मित्रांना देऊ लागलो. बातम्या प्रसिद्ध झाल्यावर उडणारी खळबळ, होणारी कारवाई वगैरे गोष्टी मला अगदी जवळून अनुभवता आल्या. आणि कळत नकळत मी या भानगडीमध्ये ओढला गेलो. खूप खळबळजनक बातम्या दिल्या. त्यामुळे शासनाला त्या बातम्यांची दखल घ्यावीच लागली. आता ते सारं पुन्हा मांडून मोठेपण मिरवावं हा माझा स्वभाव नसल्यामुळं मी इथंच थांबतो.
पण एवढं तरी मी का लिहिलं ठाऊक आहे ? कारण मंत्रिमंडळातला डिनोव्हो संदर्भातला निर्णय जाहीर करताच काही चित्रकार आणि चित्रकला शिक्षण क्षेत्रातली मंडळी उचकली आणि माझ्या मित्रांसोबत श्रेय घेण्यावरून वाद घालू लागली. वास्तविक त्या संदर्भातलं कुठलंच श्रेय मी घेतलं नव्हतं. तरी देखील या मंडळींच्या पोटात का दुखू लागलं हे समजून घेणं अवघड आहे. बरं ही मंडळी वयानं मोठी होती का तर नाही ! मी जेजे विषयीच्या बातम्या जेव्हापासून देऊ लागलो तेव्हा तर यांचा जन्म देखील झालेला नसणार. किंबहुना जन्म झाला असेल तर तेव्हा ते शाळेत वगैरे असणार. अशा मंडळींच्या टीकेला मी भीक घालण्याचं कारणच नव्हतं. मित्रांनी नेमकी हीच बाब सांगून त्यांची तोंडं बंद करून टाकली.
हे सारं आत्ताच सांगायचं कारण असं की अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेजेत प्रवेश घेतल्यापासून जी भीती मनाला सतत अस्वस्थ करत असे ती भीती आता खरी ठरणार की काय असं वाटू लागलं आहे. ती भीती होती किंवा आहे ती जे जे स्कूल ऑफ आर्टच्या रम्य परिसरावर राज्यकर्त्यांची काकदृष्टी असण्याची. जेजे परिसरावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या त्या कालखंडात ती भीती सतत सतावत असे. अगदी कॅप्टन सॉलोमन देखील त्यातून सुटले नाहीत. सॉलोमन यांच्या कालखंडात देखील जेजे वाचवण्यासाठी आंदोलन झालंच. आणि दस्तुरखुद्द कॅप्टन सॉलोमन यांना आपल्याच सरकारच्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या विरोधात पाऊल उचलावं लागलं. त्यांनीही ते बेडरपणे उचललं. इतकं त्यांचं जेजेच्या वास्तूवर जेजेच्या परिसरावर प्रेम होतं.
हा सारा इतिहास जेजे संदर्भातल्या पुस्तकांमधून, धोंड मास्तरांच्या ‘रापण’मधून आमच्या सारख्या कट्टर जेजे प्रेमींच्या मनात झिरपला नसता तर ते नवलच ठरलं असतं. तो झिरपला. झिरपून इतका दाट झाला की चाळीस वर्ष लढा देताना देखील तो वितळला नाही. चाळीस वर्ष म्हणजे थोडा थोडका कालखंड नव्हे. चार तपं हा संघर्ष चालला. आणि अखेरीस चार पाच आठवड्यापूर्वी मंत्रिमंडळानं डिनोव्होचा निर्णय जाहीर करताच तो संपला. तो संपला म्हणून प्रदीर्घ श्वास टाकला आणि प्रदीर्घ काळ खोळंबलेल्या ‘जे जे जगी जगले’ या ग्रंथाच्या शेवटच्या टप्प्यातल्या कामाला हात घातला.
आणि चार दिवसापूर्वी बातमी आली की एआयसीटीईनं जे जे स्कूल ऑफ आर्टची मान्यताच काढून घेतली. म्हणजे आता जे जे स्कूल ऑफ आर्ट हे १६६ वर्षाचं मुंबई विद्यापीठाच्याच बरोबरीनं सुरु झालेलं कॉलेज अनधिकृत ठरलं आहे. भारतात जी अनधिकृत ठरलेली कॉलेजेस आहेत त्यांच्या रांगेत ते आता जाऊन बसलं आहे.
या साऱ्याला कारणीभूत आहे ते महाराष्ट्राचं कला संचालनालय आणि मंत्रालयातलं उच्च व तंत्रशिक्षण खातं. गेल्या पस्तीस वर्षात या उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं आधी कला संचालनालयाची आणि मग जे जे स्कूल ऑफ आर्टची पुरती धूळधाण करून टाकली. काही काही त्यांनी या संदर्भात करायचं शिल्लक ठेवलं नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीवर मी अक्षरशः कोरडे ओढले. जहाल टीका केली. मी केलेली टीका ही लंगोटी पत्रातून केली नव्हती तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांना मानाचं स्थान आहे अशा वृत्तपत्रातून केली होती. तेवढ्या पुरते ते सुधारायचे आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या. असाच लपंडाव तब्बल पस्तीस वर्ष चालू होता. काल परवा जुनी कात्रणं चाळत असताना १९८२ सालचं कात्रण मला सापडलं. त्यात मी असं लिहिलं होतं की जेजेमधल्या सोळा ( का चौदा ? ) प्राध्यापकांपैकी दोन जागा रिकाम्या. त्यामुळे मुलांचं नुकसान होतंय वगैरे. पण उच्च व तंत्रशिक्षण खात्यानं त्याकडे ढिम्मं लक्ष दिलं नाही. आणि आज २०२३ साली त्या सोळा ( का चौदा ? ) प्राध्यापकांपैकी फक्त दोन किंवा तीनच प्राध्यापकांच्या जागा भरलेल्या आहेत. बाकीची सारीच्या सारी पदं रिक्त आहेत. आता बोला !
जे जे स्कूल ऑफ आर्ट, जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, शासकीय कला महाविद्यालय औरंगाबाद आणि नागपूर या चार कला महाविद्यालयातील तब्बल १६६ अध्यापक प्राध्यपकांच्या जागा आज रिक्त आहेत. यावर वृत्तपत्रातून मी प्रचंड टीका केली. २००८ साली त्यावेळच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी बोलावलेल्या सभेत मी अक्षरशः आगपाखड केली. मंत्री महोदयांनी पदं भरतो असं जाहीर आश्वासन दिलं. जे मिनिट्स देखील झालं. पण आज २०२३ सालापर्यंत ती पदं भरली गेली नाहीत. डिनोव्हो झाल्यानंतर मात्र संबंधित मंडळी आता ती पदं भरण्याची घाई करू पाहतायेत. एका पदामागे पन्नास लाखाचा भाव ठरलाय असं म्हणतात. यावर उच्च अधिकाऱ्यांचं किंवा मंत्र्यांचं कुठलंही नियंत्रण नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे. पण आपण काहीही करू शकत नाही. इतकी या विभागाची भयंकर अवस्था झाली आहे.
त्यातच एआयसीटीईनं जे जे स्कूल ऑफ आर्टची मान्यताच काढून घेतली आहे. हा मोठा डाव तर नाही ना असा मला कधी कधी संशय येतो. २००८ साली जे जे स्कूल ऑफ आर्ट तिथून हलवून देवनारच्या खाटीकखान्या शेजारी न्यायचं, जेजेची ऐतिहासिक वास्तू दिल्लीच्या एका फॅशन डिझाईनरला देऊन टाकायची आणि जेजे कॅन्टीन आणि डीन बंगलो यांच्या समोरच्या मोकळ्या जागेत पंचवीस तीस मजली टॉवर उभारायचा असा प्लॅन झाला होता. इतकंच नाही तर तो प्लॅन कागदावर देखील रेखाटला गेला होता. पण तो प्लॅन बनवणाऱ्या आर्किटेक्ट कॉलेजच्या डचरू प्राचार्याची पीएचडीच बोगस निघाली. त्या संबंधीची बातमी प्रकाशित होताच सारा प्लॅन उधळला गेला आणि जेजे परिसरावरचा एक हल्ला अशा रीतीनं जमीनदोस्त झाला.
असं जरी असलं तरी ज्या राज्यकर्त्या पक्षानं किंवा राजकारणी व्यक्तींनी हा जो प्लॅन बनवला होता त्यानुसारच प्रत्येक गोष्टी, प्रत्येक घटना घडत गेल्या. आपल्या गावातली लायकी नसलेली माणसं केवळ चित्र काढतात म्हणून मंत्र्यांनी मोठ्या पदांवर आणून बसवली, एकाहून एक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कला संचालनालयात नेमणूका केल्या. त्यांनी आपापल्या कामगिरी चोख बजावली आणि जेजेची ब्रिटिशांच्या काळापासून बसवलेली घडी अक्षरशः नेस्तनाबूत करून टाकली. इतकी अवस्था आणली की कला संचालक पदावर पात्र व्यक्तींची नेमणूक देखील करता येऊ नये. परिणामी दादा आडारकर, माधव सातवळेकर, बाबुराव सडवेलकर यांनी भूषविलेल्या कला संचालक पदावर एकाहून एक आचरट ( आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या देखील ) नेमणुका झाल्या. हे सारे प्रकार वृत्तपत्रांनी वेळच्या वेळी वृत्तपत्रांमधून मांडले तरी जेजे इथून हलवण्याचं आणि ती जागा फुकून टाकून पैसे मिळवण्याचं राजकारण्यांचे प्रयत्न काही थांबले नाहीत. त्याला पहिल्यांदाच अडसर घातला तो माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी. त्यांनी उचललेली पावलं इतकी दमदार होती की जेजेला डिनोव्हो दर्जा मिळण्याची प्रक्रिया तिथूनच खऱ्या अर्थानं सुरू झाली. पण हा जो जे जे स्कूल ऑफ आर्ट नेस्तनाबूत करण्याचा कट ज्या कुणी आखला होता तो मात्र तसाच चालू राहिला. त्या कटाचा शेवटचा भाग म्हणजे एआयसीटीईनं जेजेची मान्यता काढून घेणं. असं मला सतत वाटतं आहे.
आता पुढं काय होणार ? कुणीच सांगू शकत नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एआयसीटीईनं ही कारवाई केली असेल तर तिथं महाराष्ट्र सरकारचं काय पण केंद्र सरकारचं पण काही चालणार नाही हे निश्चित. मग होणार तरी काय ? जेजेत जी आता चारशे पाचशे मुलं शिकतायेत त्यांचं शिक्षण वाऱ्यावर उडून गेलंय ? ज्यांनी मोठ्या उमेदीनं यंदाच्या वर्षी सीईटी दिली आहे ते आता कुठं शिकणार ? त्यांच्या आई वडिलांनी जो पैसा खर्च केला आहे त्याच काय ? पैशाचं जाऊद्या त्या मुलांनी जेजेत शिकण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं त्याच काय ?
भारताच्या कला शिक्षण क्षेत्रात जेजेचं मोठं मानाचं स्थान होतं ते आता संपल्यात जमा आहे असं समजायचं ? हे लिहीत असताना आणखीन एक भयंकर बातमी आली आहे. ती म्हणजे एआयसीटीईनं शासकीय कला महाविद्यालय औरंगाबाद आणि नागपूर यांची देखील मान्यता काढून घेतली आहे. याचा अर्थ असा की ज्यांनी कुणी महाराष्ट्रातून कला शिक्षण संपवायचा विडा उचलला होता तो बहुदा खरा ठरणार असं दिसतंय. या साऱ्याचा मी समाचार घेणार आहे. पण तो उद्या. तूर्त इतकंच.
*********
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
www.chinha.in
(लेखातील सर्व फोटो गीता कुलकर्णी यांच्या सौजन्याने.)
Related
Please login to join discussion