No products in the cart.
चित्रकला… तल्लख बुद्धिमत्तेसाठी सहज, सोपा खुराक
कॅली रायमानोवीझ (Kylie Rymanowicz) या अमेरिकेतील संशोधक. त्यांनी मिशिगन विद्यापीठात संशोधन करून बाल चित्रकलेवर अनेक गोष्टी मांडल्या. त्यांच्या संशोधनामुळे चित्रकलेकडे, बाल चित्रकलेकडे बघायचा जगाचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला.बाल मानस शास्त्राचे आणि बाल चित्रकलेचे अभ्यासक स्प्रमनी एलम (Spramani Elaun) यांनीही या विषयावर मूलभूत आणि महत्वाचं संशोधन केलं आहे.
या दोन्ही संशोधकांच्या संशोधनातून खालील गोष्टी सिद्ध होतात.
१) चित्रकला हे लहान मुलांच्या मनातील भावनांना मुक्त वाव देणारं प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून कुठल्याही बंधनाशिवाय मुलं थेट व्यक्त होतात.
२) पेन्सिल, क्रेयॉन, खडू आणि पेंटब्रश हातात पकडल्याने मुलांचे सूक्ष्म मोटर स्नायू विकसित होण्यास मदत होते. या विकासामुळे मुले लिहिणे , कोटाला बटण लावणे यासारख्या नियंत्रित हालचाली चांगल्या पद्धतीने करू शकतात. याचबरोबरच मुलांमध्ये संज्ञानात्मक विकासही होतो. म्हणजे याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात, हे ती मुलं नकळत शिकतात. चित्रकला मुलांना पॅटर्निंग म्हणजेच वेगवेगळे आकार, वस्तू आणि त्यावरचे पोत आणि त्यामागचे कारण आणि परिणाम शिकवत असते. (म्हणजे, “जर मी क्रेयॉनने खूप जोर दिला तर रंग गडद होईल.” या प्रमाणे).
३) लहान मुलं चित्रकलेच्या सरावातून मनात एखादी योजना बनवून किंवा त्यांच्या योजनेनुसार काय तयार करू इच्छितात याचे चित्र आधी मनात तयार करतात, या प्रक्रियेतून लहान मुलं गंभीरपणे विचार करण्याच्या कौशल्यांचा सराव देखील करत असतात. गणिती कौशल्य म्हणजे आकार, तुलना करणे, मोजणी आणि तर्क (logic) यासारख्या संकल्पना मुलं आपल्या चित्रकलेच्या सरावातून शिकू शकतात, तयार करू शकतात आणि समजू शकतात.
४) वाढत्या वयातली मुले स्वाभाविकपणे नेहमीच उत्सुक असतात. चित्रकलेत मग्न झाल्यावर, त्या क्षणापासून मुले स्वतःच्या मनावर नकळत नियंत्रण मिळवत असतात. ते स्वतःला आपल्या विचारांना, चित्रकलेतून जगासमोर आणण्याचे काम करत असतात. एक प्रकारे ते स्वतःला, स्वतच्या विचारांना, भाव भावनांना अधिक प्रगल्भपणे शोधतात. चित्र काढण्याच्या प्रक्रियेत लहान मुले नकळत निरीक्षण करतात आणि अनुकरण करत असतात. जगात, निसर्गात अनेक गोष्टी कशा कार्य करतात याचा सूक्ष्म विचार करायला सुरवात करतात. सभोवताली घडणाऱ्या अशा अनेक घटना आणि त्यामागील कार्यास पोषक वातावरण चित्रांतून कसे व्यक्त करावे हे शोधण्याचाही प्रयत्न करतात. हा मुद्दा अधिक स्पष्ट व्हावा म्हणून एक उदाहरण पाहूया. जर एखाद्या मुलाने माशांचे चित्र काढले. तर तो त्याच्या बाजूने पाणी हे रेषा किंवा लाटांच्या आकारात चितारतो. हे त्यांनी जेव्हा प्रत्यक्ष टॅंकमधे, व्हिडिओत किंवा चित्रातून पोहणारा मासा बघितलेला असतो, तेव्हा स्वतःच्या निरिक्षणांतून हे ज्ञान आत्मसात केलेलं असतं. तेच तो आपल्या चित्रातून व्यक्त करत असतो. इतकेच नाही तर माशाच्या तोंडावर वरच्या दिशेनी जाणारे हवेचे बुडबुडे म्हणून तो दोन तीन लहान लहान गोलाकार पण काढतो.
हे नैसर्गिक आणि सहज घडत असताना, मुलांना त्यांच्या मेंदूमध्ये पाहिलेल्या गोष्टी आठवून व्यक्त व्हायचे कनेक्शन बनविण्यात मदत करते, ते त्यांना या सभोवतालच्या गोष्टी शिकण्यास मदत करते आणि ही सगळी आपोआप घडणारी, अनियंत्रीत प्रक्रिया मुलांसाठीही खूप मजेदार देखील आहे. मुलांमध्ये या मेंदू मध्ये घडणाऱ्या सहज आणि अखंड खेळाला सतत प्रोत्साहन देण्यासाठी, कार्यरत ठेवण्यासाठी चित्रकला ही एक अत्यंत प्रभावी अशी नैसर्गिक क्रिया ठरली आहे.
लहान मुले नेहमी त्यांच्या चित्रांचे वर्णन करतात. त्या चित्रातल्या आपल्या संकल्पनांवर बोलतात. या प्रक्रियेतून कळत नकळत मुले भाषा कौशल्ये विकसित करत असतात. तुम्ही सक्रियपणे, लक्ष देऊन त्या़ंचे बोलणे ऐकून घेतले आणि त्यावर त्यांना तुमच्या मनातले प्रश्न, शंका विचारुन बोलते केलेत, तर त्यांचा भाषा विकास वेगाने घडतो. जो त्यांच्या पुढील सर्वांगीण विकासासाठी फार महत्वाचा ठरतो.
या आणि अशा अनेक देणग्या नकळत चित्रकलेने लहान मुलांना बहाल केल्या आहेत. पण यासाठी त्यांना चित्रकलेची गोडी निर्माण होईल असे पोषक वातावरण तयार करणे ही पालकांची जबाबदारी आहे. आणि आपल्या लहान मुलामुलींना चित्रे काढताना खऱ्या अर्थाने पूर्ण स्वातंत्र्य देणे आणि त्यांना त्यांच्या चित्रांबद्दल, त्या मागच्या संकल्पनांबद्दल प्रेमाने आणि आपुलकीने बोलते करणेही आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, पालकांनी आपल्या मनातली चित्र लहान मुलांना काढायला लावणे हे सगळ्यात पहिले थांबवणे आवश्यक आहे. उलटपक्षी मूल चित्रकलेत रमायला लागलं की त्याच्या बाजूला बसून, त्याच्यासारखं मूलं होऊन, चांदोबा असा काढू का? मला जमतेय का? असे विचाराल.. तर त्या मुलाची नुसती कळीच खुलणार नाही, तर तो खऱ्या अर्थाने सततच्या पालकांच्या दडपणातून बाहेर येईल आणि स्वतंत्रपणे, मुक्तपणे चित्र काढेल.
मी माझ्या ओळखीच्या अनेक पालकांशी बोललो यावर. वरकरणी, हो आम्ही अगदी आमच्या चिन्याला जे हवे ते तसे तसे करु देतो म्हणत असले, तरीही खरं लपून राहत नाही. असो. यात मला एक पालक खूप वेगळे वाटले. आणि त्यांच्या मुलीच्या चित्रांतूनही ते वेगळेपण मला प्रकर्षाने दिसले. ते पालक म्हणजे आता बंगलोरला असलेला दीप आणि त्याची पत्नी. दीप हा पेशाने संगणक क्षेत्रातला इंजिनिअर असला तरीही स्वत: उत्तम वादक आणि संगीतकार आहे. तो अनेक वाद्य वाजवण्यात तरबेज आहे. तर त्याची पत्नी उत्तम गायिका आहे. आपल्या मुलीबरोबर, अत्रेयी बरोबर ते दोघे, ती लहान असल्यापासून संगीत आणि चित्रांबद्दल बोलत. तिची चित्रकलेतली आवड लक्षात येताच या दोघांनी तिला चित्रकलेला लागणारं साहित्य तर वेळोवेळी दिलच पण तिच्या चित्रांबद्दल ते तिच्याकडून जाणून घेत. तिच्याकडून चित्रकलेचे धडे घेत. आज पंधरा वर्षांची अत्रेयी अभ्यासात तर हुशार आहेच, पण ती आज जी चित्र स्वतःच्या मनानं काढते. ते पाहून मी देखील थक्क झालो. त्यातली दोन चित्रे मी इथं देत आहे. त्यावरुन तुमच्या लक्षात येईल.
अशाच चित्र काढणाऱ्या मुलांना कौतुकाचे दोन शब्द ऐकायला मिळावेत, त्यांची चित्र जगभर पोहोचावीत यासाठी ‘चिन्ह’नं चाईल्ड आर्ट गॅलरी सुरु केली आहे. यात पाहिलं प्रदर्शन हे ‘आदी चन्ने’ याचं असणार आहे. दि १५ ते २२ जून २०२३ दरम्यान तुम्ही ‘आदी चन्ने’ची चित्रे या गॅलरीत बघू शकाल. तेव्हा ‘चिन्ह’च्या या नवीन उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या.
तुमच्या मुलाला जर चित्रकलेची आवड असेल तर ‘चिन्ह’च्या पालक ग्रुपमध्ये खालील लिंकवर क्लिक करून जरूर सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/JLIPozlnGAU2UYCZaOEO5B
***
– प्रतोद कर्णिक
लेखक हे चित्रकार आणि जाहिरातकर्मी आहेत.
Related
Please login to join discussion