No products in the cart.
चित्रकलाच वाचवेल मुलांना !
शास्त्रज्ञ असं अनुमान काढतात की येत्या ३० ते ४० वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता मानवावर उलटणार आहे ! आज ज्या प्रमाणे आपण मोबाईलसारख्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी गेलो आहोत ते पाहता हे अशक्य वाटत नाही. अशा वेळी चित्रकलेसारखी कला लहान मुलांना या धोक्यापासून वाचवू शकते. मानवी मेंदूच्या विचार करण्याच्या सामर्थ्यालाच कृत्रिम बुद्धिमत्ता संपवू पाहत आहे. अगदी लहान मुलंही मोबाईलच्या आहारी जाऊन अनेक मानसिक, शारीरिक आजारांना बळी पडत आहेत. अशा वेळी त्यांच्या हातात पेन्सिल ब्रश आणि कागद देणे हेच योग्य होईल. काही वर्षांपूर्वीच मुलांच्या चित्रकलेच्या तासात मुलांकडून होमवर्क पूर्ण करून घेणारे शिक्षक आता स्वतः त्यांच्या हातात ब्रश देत आहेत. याला कारण म्हणजे तंत्रज्ञानामुळे सुन्न झालेलं मुलांचं मन आणि बुद्धी ! चित्रकला मुलांच्या विकासासाठी कशी मदत करू शकते ते या लेखातून मांडलं आहे प्रतोद कर्णिक यांनी
मानव म्हणून इतर प्राणी सृष्टीच्या तुलनेत, सगळ्यात महत्वाचं आपलं वेगळेपण म्हणजे,आपण जे सभोवताली पहात असतो, त्या आपल्या निरीक्षणातून, आपण मनातले भाव आपल्या हातातून चित्ररुपानी साकार करु शकतो.
उत्क्रांतीच्या टप्यातील ज्याना Homo Neanderthalis म्हणून ओळखलं जातं, जे पृथ्वीवर साधारण इसवीसन पूर्व २.६ दशलक्ष (millions) वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे वैज्ञानिक पुरावे आढळले आहेत. त्यांनी शीला चित्रे, गुंफा चित्रे साधारण इसवीसन पूर्व ४२००० वर्षांपूर्वी चितारली आहेत. त्या टप्यावर मानवी मेंदू प्रगत होत गेला होता हेही विज्ञानाने सिद्ध केलं आहे. त्या आधी मानवाचा आणि चित्रकलेचा संबंध असल्याचा एकही पुरावा आजवर आढळला नाही.
म्हणजेच चित्रकलेचा थेट संबंध माणसाच्या प्रगत मेंदू बरोबर आहे.
एकदा कधी आपल्या आदिम पूर्वजांकडून पहिल्यांदा प्रकट झालेली ही मानवाची चित्र अभिव्यक्ती, तेव्हापासून आजवर, गेली ४०,००० ते ४५,००० वर्ष अखंडपणे, अव्याहतपणे सुरु आहे. पण भविष्यात ती अशीच सुरु रहाणं नुसतं आवश्यकच नाही तर ही मानवाची अस्तित्वासाठीची गरज आहे.
तंत्रज्ञानाचा पुढला टप्पा यंत्रमानव, आणि त्याच्याही पुढला टप्पा जो आज आपण गाठलाय, तो म्हणजे कृत्रिम मेंदूची किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्मिती. आज तंत्रज्ञानाच्या अशा टप्यावर आपण आहोत, ज्याचे विलक्षण फायदे आहेतच, तसे कल्पनातीत तोटेही आहेत. तंत्रज्ञानाच्या अती आहारी जाण्याचे तोटे कमी करण्यासाठी, आपली चित्रकलाच आपल्या मेंदूला लहान वयापासून कार्यरत ठेऊन तंत्रज्ञानाच्या अती आहारी जाण्याचे जे धोके समोर उभे ठाकले आहेत, त्यावर आपण बऱ्याच अंशी मात करु शकतो.
अगदी आपल्या घरातही आपण हे पहात आलो आहोत. छोटं बाळ दीड ते दोन वर्षाचं झालं की मग भिंतीवर, जमिनीवर जो पृष्ठभाग दिसेल त्याच्यावर, जे मिळेल त्यानी अगदी खिदळत मनसोक्त रेघोट्या मारायला लागतं. त्याचं ते रेघोट्या मारणं, घोटाळत रहाणं ही त्याच्या मनातल्या चिमुकल्या विचारांची सहज आणि नैसर्गिकरीत्या त्याची पहिली चित्रं असतात. हेच त्याचं तल्लीन होऊन रेघोट्या ओढणं म्हणजे मेंदूकडून येणाऱ्या भावनांचं त्याचं पाहिलं दृश्य प्रकटीकरण असतं.
आपण जेव्हा चित्र काढतो, तेव्हा आपल्या मेंदूतून त्या संकल्पनांच्या सूचना आपल्या हाताला मिळत जातात. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जसा नियमित व्यायाम आवश्यक, तसं मेंदूच्या कार्यरत रहाण्यासाठी चित्रकला ही मेंदूला व्यायाम, बौद्धिक खुराक म्हणून काम करते. तंत्रज्ञानावर अवलंबून रहाण्याच्या, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जाण्याच्या धोक्यांना थोपवायला, हा व्यायाम, ही प्रक्रिया फारच महत्वाची ठरणार आहे.
पण आज मूल साडेतीन चार वर्षाचं झालं की त्याच्या हातात पालकांचा मोबाईल दिसायला लागतो. जरा उच्चशिक्षित कुटुंबात, पाचव्या वर्षी खास किड्स टॅबही आणला जातो.
अगदी साधं उदाहरण पाहूया. आधीच्या काळात बाळ रडायला लागलं तर आपण खुळखुळा वाजवून, एखादं खेळणं दाखवून, ‘अले बाला…. काय होतंय’, करत त्याचं मन रमवत असू. जेवताना त्याला काऊ, चिऊची गोष्ट सांगितली जाई. मग गेल्या दहा वर्षात यात बदल होत होत , घरातल्या टी. व्ही. वर एखादं गाण्याचं चॅनल किंवा त्याला आवडतं, म्हणजे ते बाळ हसतं, खिदळतं म्हणून एखादी कार्टून्स सिरीयल लावली जाई.
आज… आई बाबाचा मोबाईल त्याच्यासमोर धरुन, त्याला खेळवलं जातं, भरवलं जातं. त्याला अमुक गाणं फार आवडतं, म्हणतं तेच परत परत कर्कश्य आवाजात ऐकवलं जातं. मुळात त्याच्या दृष्टीवर, नाजूक श्रवण यंत्रणेवर या सगळ्याचा सातत्यानं दुष्परिणाम होत असतो, हे आपल्यापैकी कित्येकांच्या मनातही येत नाही.
इथूनच या प्रगत तंत्रज्ञानाच्या आहारी जायची सवय आणि चटक आपणच त्या लहानग्या जीवाला लावत असतो. पुढे, शाळेत अगदी त्याला काही चित्र काढायला शिकवली आणि ड्रॉइंग बुकमधे काही सराव करुन यायला सांगितला, की पालकही सर्रास गुगलचा आधार घेऊन आपल्या छोन्याला गृहपाठात मदत करतात.
आज अगदी सहा वर्षांची मुलंपण, कुठलंही चित्र काढताना, गुगल ईमेजेस्, डिजिटल ऍप्स वापरताना दिसतात. या लहानग्यांचे तंत्रज्ञानाच्या अनावश्यक आणि घातक आहारी जाण्यातले धोके हे पालक पूर्णपणे दुर्लक्षित करत असतात.
जगातल्या मोठमोठ्या संशोधकांनी असं अनुमान काढलं आहे, की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जाणं हे मानवाच्या मेंदूला चालना देण्याच्या कार्यावर खूप मोठा आघात करत आहे. जसजसा या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जगभरात वाढतं जाईल, माणूस आपल्या मेंदूचा वापर कमी कमी करत, या कृत्रिम बुद्धिमत्तेवरच अवलंबून रहायला सुरवात होईल आणि एक दिवस ही कृत्रिम बुद्धिमत्ताच माणसावर उलटल्या शिवाय रहाणार नाही. साधारणं २०३८ ते २०४० पासून कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) मानवावर उलटायला सुरवात होईल, असंही शास्त्रज्ञ आत्ताच सांगत आहेत.
हे प्रमाण जसं वाढत जाईल, ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच मानव निर्मित यंत्रमानवाचे घातक उद्योगच माणसाचं अस्तित्व संपवण्याच्या टप्यावर आणल्या शिवाय रहाणार नाहीत. हे सगळं लगेच नक्कीच घडणार नसलं, तरीही पुढल्या तीस ते पन्नास वर्षात इतकं भयंकर संकट या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जाऊन आपणच आपल्यासाठी निर्माण करु शकतो.
कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त आहेच. पण त्याच्या आहारी जाणं फार घातक आहे. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे दुधारी शस्त्र आहे. ते जितकं मानव जातीच्या फायद्याचं, तितकंच, जसजसे आपण या कृत्रिम बुद्धिमत्तेवर विसंबण्याचं, आहारी जाण्याचं प्रमाण वाढत जाईल ते मानवासाठी घातक आणि मानवजातीच्या मुळावरच घाव घालणारं ठरु शकतं.
हे धोके आज वेळीच ओळखून अगदी पहिलं पालकांमध्ये आणि त्यानंतर लहान मुलांमध्ये जागृकता वाढवणं आवश्यक आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे आणि सतत उत्क्रांतीकडे वाटचाल करणारा आपला मेंदू, यामधे समतोल रहाण्यासाठी पालक, शिक्षक आणि लहान मुले यांच्यासाठी ‘चिन्ह’तर्फे लवकरच वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत.
ज्या योगे बाल चित्रकलेच्या माध्यमातून आणि चित्रकलेच्या सरावातून वर सांगितलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या भयंकर धोक्यांपासून आपल्या पुढल्या पिढ्यांचं रक्षण होईल आणि सशक्त मानवी मेंदूची आजवरची उत्क्रांती निर्विघ्नपणे अव्याहत सुरु राहील.
*****
– प्रतोद कर्णिक, ठाणे
Related
Please login to join discussion