Features

उपाशी पोराला पोट भरल्याचं सर्टिफिकेट !

आशुतोष आपटे हे जेजे अनन्य अभिमत विद्यापीठ आंदोलनाचे प्रमुख सूत्रधारांपैकी एक ! त्यांनी फेसबुकवर प्रथम रणशिंग फुंकलं. त्यांनी कळवळून लिहिलेल्या पोस्टनी जेजेचे आजी माजी विद्यार्थी जागरूक झाले. त्यांनीच पुढाकार घेऊन जेजेमध्ये पहिली सभा आयोजित केली जिला आजी माजी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. आता या आंदोलनात पुढं चाल मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील २४ तासात मिटिंग बोलावून आपला उद्देश स्पष्ट केला आहे, पण आशुतोष आपटे यांचं लिखाण काही थांबलेलं नाही आणि ते थांबणारही नाही ! कालच त्यांनी लिहिलेली एक पोस्ट आम्ही इथं देत आहोत. अवश्य प्रतिसाद द्या !

पोरगं उपाशी आहे, अर्धपोटी आहे… त्याला खायला द्यायला काही नाही. पोट खपाटीला गेलंय… अन् द्यायचा एक शिक्का मारून पोराच्या रिकाम्या पोटावर “याचं पोट भरलेलं आहे. यानी गुलाबजामही खाल्लेले आहेत. आम्ही तर आईस्क्रीमही न मागता दिलं आहे.”

जेजेचे राज्य विद्यापीठ झाले तर बस अशीच गत असणार आहे, जेजेला जोडल्या जाणाऱ्या दूरच्या कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची…

काही घरं अशी आहेत की भूक लागलेली असते, पण पोटभर मिळत नाही…अर्धपोटीच राहावं लागतं… पण तरीही उपाशीच राहावं लागतं. तशी आणखीही काही मोजकी घरे अशी आहेत तिथे नक्कीच पोटापुरतं मिळतं, जेवण देणारी त्या घरातील माणसंही चांगली प्रामाणिक आहेत.. आचारीही त्यांच्या पध्दतीने जेवण बनवण्यात निष्णात आहेत.. त्यांची स्वयंपाकाची पध्दत त्या त्या प्रांतानुसार आहे… त्यामुळे जेवणाची चव वेगळी वेगळी आहे, पण जेवण रुचकर आहे, पोटभर आहे…

अच्छा ! तिथं दुसरं एक खूप जुनं घर आहे.. तिथं पोटभर जेवण आहे, अगदी चांगल्या प्रतीचं जेवण मिळण्याची हमी आहे… कॉन्टिनेन्टल जेवणासाठी तर ते घर प्रसिद्ध आहे, पण तिथं आचारी संख्येने कमी आहेत.. आहेत त्यांना धड पगार नाही किंवा काही आचारी असे नेमले आहेत की पिठलं भात तरी त्यांना बनवता येतो की नाही याचीच शंका आहे, पण तरीही जेवण मुबलक आहे व सर्वसाधारणपणे त्याच घराकडे सगळ्यांचा ओढा आहे…

आता असं झालं की जे जुनं घर आहे, त्याची नीट डागडुजी करून त्याला नव्या स्वरूपात आंतरराष्ट्रीय मानांकन असलेलं बनवायचं ठरलं म्हणजे तिथल्या जेवणाचा दर्जा सुधारेल, चांगले व अधिक संख्येने आचारी भरती करता येतील…जेवणाचं साहित्यही आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार आणता येईल.. वगैरे वगैरे…मग करा की डागडुजी..कोणी आडवलंय..? हो हो करणारच आहेत डागडुजी.. छान करणार आहेत ते जुनं घर !

पण काहींना पोटशूळ उठला ना ! खरं तर जुनं घर चांगलं झालं तर त्यांना काही तोटा आहे का ? तर अजिबात नाही…पण… पण हे अर्धपोटीच ठेवणारे आहेत ना.. त्यांना आयडिया सुचली.. कसली ?
पोटभर जेऊ घालण्याची?? नाही… नाही!!! आयडीया सुचली धड जेवण न देता जेवण पूर्ण दिल्याचे क्रेडिट लाटायची..! लाळ सुटली नं खिशाला… !!

काय ही नेमकी आयडीया… ? आयडीया अशी की त्या जुन्या घराची डागडुजी करायला, त्यांचा विकास करायला विरोध करायचा… पण त्यांनी तुमच्या घरातल्यांचं पोट भरेल का ? तो विचार ते कुठं करतात ? त्यांना कुठं कुणाचं पोट भरायचं आहे ? त्यांना तर आपले खिशेच तेवढे भरायचे आहेत….
“फिर आप पुछोगे की आखिर आयडिया सुझी भी क्या ? ” आयडिया बहोत सिंपल सुझी… त्यांची आयडिया अशी की, त्या जुन्या घराला आमचंही घर जोडायचं का ? चांगले पोटभर जेवण देता येईल म्हणून ? नाही नाही…  !!! उपाशी पोटीही जुन्या घराकडून असे सर्टिफिकेट घ्यायचे की यांचं पोट भरलं म्हणून..!

फार कोड्यात नाही टाकत, जुनं घर म्हणजे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट.. जेजेला मिळणाऱ्या डीनोव्हा डीम्ड टु बी विद्यापीठाला विरोध करायचा आणि जेजेचे राज्य विद्यापीठ करा व आम्हालाही जेजेचे सर्टिफिकेट द्या… असा कांगावा सुरु आहे. हे म्हणजे उपाशी पोटाला पोट भरल्याचे प्रमाणपत्र दिल्यासारखंच आहे.. कारण त्यांना चांगलं शिक्षण देण्याची मुळात इच्छाच नाही… तर आपण जेजेचं शिक्षण दिलं असं सर्टिफिकेट वाटण्यात इंटरेस्ट आहे… !

मी म्हणतो, द्या की चांगलं शिक्षण, त्यासाठी तुमची संस्था चांगली करा, चांगले शिक्षक घ्या… असं शिकवा की जेजेचं शिक्षण फिकं वाटेल.. आज शांतिनिकेतन, बडोदा स्कूल ऑफ आर्ट यांना नाही जेजेच्या सर्टिफिकेटची गरज..! कारण ते चांगलं शिक्षण देतात.. जेजेच्या तोडीचे कदाचित काकणभर सरस शिक्षण देतात… तुम्हीही द्या ! कोणी आडवलंय?

खरं तर आपल्या महाराष्ट्रातील काही संस्था खरंच खूप चांगलं कलाशिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडचे शिक्षकही खूप प्रामाणिकपणे काम करतात आणि हे मी जवळून अनुभवलं आहे. ठाणे स्कूल ऑफ आर्ट, जे. के. कला, नाशिकचे चित्रकला महाविद्यालय, सांगलीचे कलाविश्व, खिरोदा, चोपडा येथील संस्था,सावर्डे येथील सह्याद्री स्कूल, कोल्हापूरच्या संस्था आणखीही काही थोड्या बहुत आहेत. आपल्याच महाराष्ट्रात पुण्याचे भारती विद्यापीठ आहे.. त्यांचं स्वतःचं अभिमत विद्यापीठ आहे.. त्यांना नाही गरज जेजेच्या सर्टिफिकेटची ! मग का जेजेला जोडून त्यांचे स्वत:चे स्वत्व नष्ट करता?

पण काही स्वार्थी किंवा डीनोव्हो म्हणजे नेमकं काय ? याबाबत नीट माहिती नसलेले लोक या चांगल्या संस्थांचा व त्यांच्या शिक्षकांचाही गैरसमज करून देत आहेत… ते असं म्हणतात, “आम्ही जे.जे. व्यतिरिक्त इतर कलामहाविद्यालयांकडे दुर्लक्ष करतो.” मी नम्रपणे सांगू इच्छितो महाराष्ट्रातीलच काय भारतातीलही अनेक संस्था जेजेच्याच माजी विद्यार्थ्यांनी उभारल्या आहेत किंवा त्यांच्या सुरुवातीच्या काळात कमी पगारातही शिक्षक म्हणून काम करुन अनेक कलासंस्थाच्या उभारणीसाठी मोलाचा हातभार लावला आहे.

मित्रांनो, मी स्वत:च वसई, सावर्डे व देवरुख अशा तीन कला महाविद्यालयांच्यासुरुवातीच्या कालखंडात प्राचार्य किंवा शिक्षक म्हणून काम केले आहे. शिवाय डोंबिवली, ठाणे, कोल्हापूर, मुंबई, जयपूर, अकोला, अमरावती,नागपूर, कोलकाता अशा अनेक ठिकाणी वर्कशॉप, व्याख्याने किंवा कार्यक्रमासाठी तेथील शैक्षणिक संस्थांनी मला वारंवार निमंत्रित केले आहे. मग मी का या संस्थांचा दुस्वास करेन ? आणि मी तर एक जेजेचा सामान्य विद्यार्थी आणखी खूप जेजेचे विद्यार्थी आहेतच जे जेजे व्यतिरिक्त अन्य संस्थामध्ये कार्यरत आहेत.

पण याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करायचे व निव्वळ आरोप करायचे… का ? तर जेजेचे राज्य विद्यापीठ केले व यांच्या संस्थेला जेजे नावाचे सर्टिफिकेट देता आले तर यांची चलती वाढेल… !  हा स्वार्थी हेतू आहे, पण त्या विद्यार्थ्यांचे ? त्यांचे मात्र नुकसानच होईल… कारण सर्टिफिकेट मिळेल पण शिक्षण?
जेजेचे केवळ नाव लावले म्हणजे जेजेचे शिक्षण मिळाले असे होईल का ? तर अर्थातच नाही.. तुम्ही तुमच्याकडे चांगले शिक्षक भरा, शिक्षणास आवश्यक अद्ययावत सोयी करा व जेजे पेक्षा चांगले शिक्षण द्या, पण असे करुन त्यांना फायदा काय ? त्यापेक्षा शिक्षणाचा दर्जा सुमारच ठेवायचा व जेजेचं नाव लावून खपवायचं… बनवायचा हातरुमाल पण पैठणी म्हणून सांगायचं…

त्यापेक्षा जेजेतच प्रवेश घ्या आणि शिका नं ! किंवा तूमचे आर्ट कॉलेज जेजे पेक्षा भारी करा… पोराला उपाशी ठेवायचं आणि भरलं रे बाबा तुझं पोट असं सर्टिफिकेट द्यायचं हा कोणता खेळ..?

आम्ही खूप लोकं आहोत की आम्ही जेजेतून शिकलो, पण डिप्लोमा डीग्रीचे अधिकृत सर्टिफिकेट
घेतलेच नाही… कारण आमचं शिक्षण आम्हाला तारुन नेतं फ्रेम केलेलं, ती चौकोनी टोपी घालून कुलगुरूंच्या हस्ते घेतलेलं सर्टिफिकेट तारून नेत नाही… कलेमध्ये, “बाप दाखव नाही तर श्राध्द कर” अशी म्हण अस्तित्वात असते. तुमचे काम, तुमच्या अंगी असलेली व घडवलेली कला हेच आपलं जगणे सिध्द करते.

जेजेचं शिक्षण हवं तर प्रत्यक्ष जे. जे. तच प्रवेश घ्यायचा… तिथे इनामेइतबारे शिकायचे… जेजेचे राज्य विद्यापीठ करणं म्हणजे एकूण कलाशिक्षणाचा बट्याबोळ करणं, त्याऐवजी ऑलरेडी सॅंक्शन झालेलं जेजेचं अनन्य अभिमत विद्यापीठ स्थापन करणं व आवश्यकता असेल तर दुसरीकडे
दुसऱ्या नावाचं राज्य कला विद्यापीठ स्थापन करणं हेच इष्ट !

आशुतोष राम आपटे
[ आपट्याची पानं ]

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.