Features

कला संचालनालयाच्या गाडीचं आत्मकथन…

तिकडे वर्धेत साहित्य संमेलन जोरात सुरु झालं आहे . साहित्य संमेलनात आत्मकथनं खूप खपायला लागली आहेत. हल्ली कुणी पण आत्मकथनं वगैरे लिहायला लागलंय त्यामुळे मलाही वाटलं की आपण आत्मकथन वगैरे लिहायलाच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल एखाद्या गाडीच्या आयुष्यात असं काय घडत असणार की तिला आत्मकथनं वगैरे लिहावंसं वाटावं. नाही तसं नाही भाऊ, आमचं डिपार्टमेंटच संपूर्ण भारतातल्या राज्यात एकमेव आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी अशा प्रकारच्या संचालनालयाची कल्पना मांडली आणि मग पुढे मधुकरराव चौधरी यांच्या सारख्या सज्जन, सुशिक्षित आणि सुसंस्कृत व कलाप्रेमी शिक्षणमंत्र्यांनी तिला मूर्त स्वरूप दिलं. आणि ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ सारखं जागतिक कीर्तीचं कला महाविद्यालय कला संचालनालयाच्या अधिपत्याखाली आणून  महाराष्ट्रातील कला शिक्षणाला सुसूत्रता दिली. 
तेव्हापासूनच आमच्या अनेक पिढ्या या खात्याच्या सेवेत काम करु लागल्या. दादा आडारकर, धोंड मास्तर ,सातवळेकर यांच्या सारखे दिग्गज कलावंत तसेच कला संचालकांची सेवा आम्ही करीत होतो. काय आब होता तेव्हा त्यांचा ! खूप सुंदर दिवस होते ते. मुंबई देखील टुमदार होती. आणि सगळेच कला संचालक जवळपासच राहायचे. सातवळेकर सर वांद्रयाला कला नगरात राहायचे. आमच्या आधीच्या पिढीला खूप मोठे मोठे कलावंत इथं पाहायला मिळायचे.
त्याच्याही पूर्वीचा कालखंड तर रेडकारपेट चा होता. असं सांगतात अर्थात त्यावेळी आम्ही नव्हतो. घोडा गाड्या, बग्ग्या असायच्या. धोंड मास्तरांच्या ‘रापण’ नावाच्या पुस्तकात त्या साऱ्या आठवणी जिवंत झाल्यात असं कुणीकुणी सांगत असतं. धोंड मास्तर तर गोष्टी वेल्हाळ होते. रंगात येऊन अशा काही आठवणी सांगायचे की हीSS गर्दी गोळा व्हायची. अडूरकर आणि आडारकर युद्ध तर आमच्या आधीच्या पिढ्यानी / गाड्यांनी  अगदी जवळून पाहिलं. सातवळेकर सरांची शिस्त देखील आमच्या आधीच्या पिढ्यानी / गाड्यांनी अगदी जवळून अनुभवली.  बाबुराव सडवेलकर सरांची सारी कारकीर्द तर धर्मयुद्ध खेळण्यांतच निघून गेली. ती देखील आमच्या आधीच्या पिढ्यांनी / गाड्यांची मूकपणे पाहिली.
पण बाबुराव सडवेलकर सरांच्या नंतर मात्र आमच्या कला संचालनालयाचं टायर हळूच पंक्चर झालं आणि  पनवती लागली. त्यातच सरकारनं इथं अशी एकेक सॅम्पल्स आणून बसवली की, बघता बघता १९६५ सालापासून ताठ मानेनं कार्य करणारी ही इमारत ढासळू लागली. ज्यांना कलेतलं शष्प देखील कळत नाही अशांच्या नेमणुका सरकारं इथं केल्या आणि भ्रष्टाचाराच्या नाना कहाण्यांमध्ये हा विभाग गुरफटून गेला. आमच्या आधीच्या पिढ्यानी हा सारा भ्रष्टाचार डोळ्यासमोर घडताना पाहिला. इतकंच नाहीतर भ्रष्टाचारातून निर्माण झालेला पैसाच नव्हे, तर नाना प्रकारचा माल वाहून देखील नेला. आम्ही तर काय हुकुमाचे ताबेदार मालक सांगणार तेच करणार. पण या सगळ्या कहाण्या आता सविस्तर लिहायचा विचार आहे.
हा विचार का मनात आला त्यालाही एक कारण आहे. आणि ते भलतंच मजेदार आहे. त्या कारणामुळेच आम्ही या लिखाणाच्या नको त्या धंद्यात शिरलो. त्याचं असं झालं. सहा – सात महिन्यापूर्वी अचानक आमच्या साहेबांची म्हणजे राजीव मिश्रा यांची एका रात्रीत उचलबांगडी झाली. कारण काय माहिती नाही पण आमच्या खात्याचे मंत्री उदय सामंतसाहेब जाम खवळले होते. इतके की त्यांनी कुणालाही काही न विचारता सचिवांचा देखील सल्ला न घेता एका मिनिटात मिश्रासाहेबांना काढून टाकलं आणि तिथं साबळेसाहेबांना आणून बसवलं. साबळेसाहेब म्हणजे ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चे डीन आणि मिश्रासाहेब म्हणजे आर्किटेक्चर कॉलेजचे डीन. मिश्रासाहेब तसे चांगले होते. सर्वांशी हसून खेळून असायचे. आम्हाला घेऊन सतत मंत्रालयात जायचे. जेजेतली खवचट लोकं मात्र म्हणायची की ‘ते विरजण लावत फिरतात’ वगैरे. पण ते असो. कुठं कुठं त्यांची काम निघायची तिथं तिथं ते आम्हाला घेऊन जायचे. ते इतके दयाळू होते की मंत्रालयात आमच्या डिपार्टमेंटचे जे बॉस बसले होते ना ! त्यांच्या नवी मुंबईतल्या घरापर्यंत देखील अनेकवेळा आम्हाला लिफ्ट द्यायला लावायचे.
त्या दिवशी अचानक मिश्रासाहेबांची गच्छन्ती झाली आणि तिथं साबळेसाहेबांची नेमणूक झाली. त्यावेळी साबळेसाहेबांचा सत्कार महाराष्ट्रातल्या कला शिक्षकांनी असा घडवून आणला की विचारता सोय नाही. त्यालाही सामंतसाहेब  प्रोटोकॉल सोडून उपस्थित राहिले होते. कला शिक्षक एवढे खुश झाले होते की साबळेसाहेबांना त्यांनी एखाद्या पैलवान सारखं उचलून धरलं होतं. फेसबुक लाईव्हवरुन ते दृश्य पाहताना एक क्षण असं वाटलं की साबळेसाहेबांना ते आता उत्साहाने उचलून आपटणार की काय ? पण नशीब तसं त्यांनी काही केलं नाही.
साबळेसाहेबांनी आल्या आल्या शिक्षकांनी करायच्या व्यावसायिक कामांचा प्रश्न धसाला लावला. मग या गाडीला हात लावला. मी तर बाई घाबरूनच गेले होते ! सीटवरची कापडं त्यांनी फेडुनच टाकली. आणि सरकारी गाडयांना असतात तशी पांढरी शुभ्र कव्हर्स बसवली. खूप छान वाटलं. अस्सल सरकारी गाडीचा रुबाब आम्हाला आला. पुढं काय साहेबांना आणण्यानेण्याचं काम सुरु झालं. क्वचित कधीमधी साहेबांना जहांगीरला जावं लागायचं.
पण एरवी साहेब घरच गाठायचे. शनिवार रविवारला मात्र आम्ही साहेबांसोबत पनवेलला जायचो. तिकडं सगळी साहेबांची कमर्शियल काम चालायची ना ती पाहायला. एरवी मात्र साहेब थेट नवी मुंबईतल्या घरीच जायचे. संध्याकाळी मात्र त्यांच्या सोबत मंत्रालयातले एक साहेब असायचे. त्यांना मात्र ते अगदी घरपर्यंत लिफ्ट द्यायचे.  कधी कधी तर मला त्या साहेबांना मंत्रालयात जाऊन आणायला लागायचं. आणि मग पुढं नवी मुंबईचा प्रवास सुरु व्हायचा.
एके दिवशी मात्र गंमत झाली. अचानक साबळेसाहेबांची गच्छन्ती झाली. साहेब मोठ्या उत्साहाने नागपूरला गेले होते. काही तरी मोठं सरकारी काम मिळणार असं त्यांना वाटलं होतं. पण हातात मात्र गच्छन्तीचं पत्रच मिळालं. मला पण खूप वाईट वाटलं. पण करता काय आले दादांच्या मनात. खरी गंमत पुढेच आहे.
जेव्हा राजीव मिश्रासाहेब गेले तेव्हा त्यांनी पुष्पगुच्छ देऊन साबळेसाहेबांचं स्वागत केलं होतं. पण साबळेसाहेबांची गच्छन्ती झाल्यावर मात्र पुष्पगुच्छ सोडाच साधं हस्तांदोलन देखील करायला देखील साबळेसाहेब फिरकले नाहीत. ताबा देण्याची प्रक्रिया मिश्रासाहेब येण्याआधीच करून ते मोकळे झाले. हे सारं आम्हाला साबळेसाहेबांच्या ड्रायव्हर भाऊंमुळे कळालं.
त्या दिवशी आणखीन एक धमाल गोष्ट घडली. मिश्रासाहेबांनी साबळेसाहेबांच्या ड्रायव्हरला घरी जायला सांगितलं. कारण त्यांनी त्यांच्या ड्रायव्हर भाऊंना बोलावलं. मिश्रासाहेबाना नेहमीप्रमाणे मंत्रालयात जायचं होतं पण ते त्यांना जाता येईना, कारण साबळेसाहेबांचा गेलेला ड्रायव्हर भाऊ अचानक परत आला आणि मला धुऊ लागला. माझ्या तर मशीनचा ठोकाच चुकला. मला वाटलं परत एका रात्रीत मिश्रासाहेबांची गच्छन्ती झाली आणि पुन्हा साबळेसाहेब रुजू झाले की काय ? पण साबळेसाहेब परत आले नव्हते, तर त्यांच्या ड्रायव्हर परत आला होता. त्याला म्हणे ती गाडी घेऊन आणखीन कुठे जायचं होतं. हे काय गौडबंगाल चाललंय ते मला काही कळेच ना. पण आपण पडलो नोकरदार. धु म्हंटल की धुवायचं, लोंबतय काय म्हणून विचारायचे नाही.
माझ्या लक्षात आलं की नेहमीप्रमाणे मला कुणाला तरी वापरायला दिलं असणार. असं असलं की मग आमची पण मजा असते. पेट्रोलची टाकी फुल करून घ्यायची. आणि महाराष्ट्रभर हजार पाचशे किलोमीटर प्रवास करून यायचं. मजा असते अशा वेळी, खूप फिरायला मिळतं. आणि सरकारी गाडीचा शिक्का असल्यामुळं कुणी काही विचारत पण नाही. अनेक वेळा मी अशी जाऊन आले आहे. तसंच काहीतरी या वेळेही असणार असंच काहीतरी मला वाटून गेलं. माझ्या मनात असं यायला आणि मिश्रासाहेब तिकडं यायला एकच गाठ पडली.
साबळेसाहेबाच्या ड्रायव्हर भाऊंनी मिश्रासाहेबांना सांगितलं. की गाडी काही तुम्हाला दोन चार दिवस मिळणार नाही. मंत्रालयातल्या मोठ्या साहेबांनी मागवली आहे. ते ऐकलं आणि मिश्रासाहेबानी सुमडीत कणी कापली. मग साबळेसाहेबाच्या ड्रायव्हर भाऊंनी मला चांगली तयार करून पेट्रोल पंपात नेलं. टाकी एकदम फुल केली. टायरची हवा देखील चेक केली मग माझ्या लक्षात आलं आता आपल्याला बाहेर जायला मिळणार. पंपावर पेट्रोलचं  बिल कुणी भरलं ते मात्र मला काही कळलं नाही. बहुदा मिश्रा किंवा साबळेसाहेबांनी भरलं असणार.
मग तिथून आमचा प्रवास सुरु झाला. मध्येच ड्रायव्हरभाऊंना कुणाचा तरी फोन आला. ते बोलत होते त्यात धुळे धुळे असं नाव आलं. त्यावरुन मला लक्षात की आपल्या नशिबात आज धुळ्याचा योग आहे. आमचा प्रवास सुरु झाला. गाडीत एकट्या ड्रायव्हर भाऊंशिवाय कुणीच नव्हतं. मध्येमध्ये आम्हाला अडवून पॅसेंजर मंडळी विचारायची, दोन सीट घेणार का ? तीन सीट घेणार का ? तिकडे सोडणार का ? पण ड्रायव्हर भाऊंनी कोणालाच दाद दिली नाही. गाडी खराब झाली आणि मोठे साहेब ओरडले तर, म्हणून. आम्ही असेच धुळ्यापर्यंत रिकामे गेलो. तिकडे गेल्यावर लक्षात आलं की नागपूरहून कुणी सरकारी अंमलदार धुळ्याला येणार होते. आणि त्यांना आम्हाला मुंबईला घेऊन जायचं होतं.
ते साहेब आले आणि त्यांना पाहून आम्हाला धक्काच बसला. ज्यांना मिश्रासाहेब कधी कधी आणि साबळे नेहमीच नवी मुंबईतल्या घरापर्यंत लिफ्ट देत, तेच मंत्रालयातले साहेब गाडीत येऊन बसले होते. ते म्हणे नागपूरवरुन धुळ्याला आले होते. नागपूरवरुन त्यांना थेट मुंबईला जाता आलं नसतं का ? पण हा प्रश्न त्यांना विचारणार तरी  कसा ? मग साहेबाना आम्ही नव्या मुंबईतल्या त्यांच्या घरापर्यंत घेऊन आलो. त्यांचं माझ्यावरचं प्रेम बघून मला अगदी भरून आलं होतं. त्या साहेबांचं नावं मात्र मला काही माहित नाही  कारण सारेजण त्यांना साहेब साहेबच म्हणायचे. काही जण म्हणायचे हे इकडचे साहेब आहेत, काहीजण म्हणायचे ते तिकडचे साहेब आहेत, त्यामुळे माझ्या डोक्यात नुसता कल्ला झाला होता.

आता साहेबांना तिकडून इकडे आणायचा निर्णय कुणी घेतला. एका साहेबाची गाडी दुसऱ्या साहेबाला वापरता येते का ? स्टेशन सोडून बाहेरगावी जाताना वरिष्ठांची परवानगी घेतली होती का ? इतक्या मोठ्या प्रवासाला जे पेट्रोल लागलं ? त्याचे पैसे कोणी दिले ? गाडीच्या लॉगबुक मध्ये नेमकी कोणाच्या नावे नोंद झाली. समजा मध्ये काही अपघात झाला असता तर कोणाला जबाबदार धरलं असतं ! मिश्रा साहेबांना का साबळेसाहेबांना ? या सारखे आलतू फालतू प्रश्न विचारून मला भंडावून सोडू नका. असले प्रश्न विचारायचेच असतील तर ते रस्तोगीसाहेबांना विचारा. रस्तोगी साहेबांना देखील विचारायचे नसतील तर थेट दादासाहेबांना विचारा. आमच्या डोक्याला नसती झंझट लावू नका. काय ? समजलं का !

( इति लेखन सीमा )

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.