No products in the cart.
‘बी प्रभा’ यांच्याऐवजी ‘प्रभा अत्रे’?
दिल्लीच्या एका आलिशान क्लबमध्ये एक चित्रप्रदर्शन भरलं आहे. हुसैन यांच्यापासून कोलते यांच्यापर्यंत साऱ्याच मान्यवर कलावंतांची चित्रं या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहेत. पण या प्रदर्शनासंदर्भात जे माहितीपत्रक संयोजकांनी प्रदर्शित केलं आहे त्यात चित्रकार बी प्रभा यांच्याऐवजी चक्क किराणा घराण्याच्या प्रख्यात गायिका प्रभा अत्रे यांचं छायाचित्र प्रकाशित करण्यात आलं आहे. अक्षरशः हतबुद्ध करणारा हा सारा प्रकार आहे. त्याचाच समाचार घेणारा हा विशेष लेख.
एखादा चित्रकार गेल्यानंतर त्याच्या पश्चात त्याच्या चित्रांचं, त्याच्या स्टुडिओचं, त्याच्या घराचं, त्यानं जमवून ठेवलेल्या ग्रंथसंग्रहाचं नेमकं काय होतं हा मला सतत छळणारा विषय आहे. या बाबतीत घडलेली उदाहरणं एवढी विदारक आहेत की त्यांची आठवणसुद्धा कधीकधी नकोशी वाटते. मुद्दा स्पष्ट होण्यासाठीच फक्त दोन-तीनच उदाहरणं देऊ इच्छितो, त्यावरून मला नेमकं काय म्हणायचं आहे हे आपल्या लक्षात येईल.
व्यक्तीचित्रण कलेत अतिशय प्राविण्य मिळवलेले एक चित्रकार जेव्हा वारले तेव्हा त्यांच्या नात्यातल्याच किंवा घरातल्याच कुणीतरी दुसऱ्या दिवशीच सगळी चित्रं गोणपाटात भरली आणि कचरापेटीत नेऊन टाकली किंवा रद्दीवाल्याला नेऊन विकली होती. ते पोतं इतकं गच्च भरलं होतं की त्यातली एकदोन चित्रं जाताना वाटेत पोत्यातून सांडली. ती नेमकी त्या चित्रकाराच्या विद्यार्थ्यांच्या नजरेस पडली आणि मग बातमी फुटून मोठी बोंब झाली.
दुसरं उदाहरण ही असंच. राष्ट्रपतीपदक विजेत्या त्या चित्रकाराच्या निधनानंतर त्यांचा ग्रंथसंग्रह कपाटासकट लांबवला गेला. चित्रं किलोच्या भावात विकली गेली. आणि फोटोंचा अल्बम तर रद्दीच्या दुकानात विकायला आला. त्यात ते राष्ट्रपती पुरस्कार घेतानाचं छायाचित्रदेखील होतं. ही बातमीदेखील अशीच कानोकानी झाली.
तिसरं उदाहरण ही असंच तो चित्रकार गेल्यानंतर त्यानं जमवलेली त्या काळातली वृत्तपत्र आणि साप्ताहिकांची कात्रणं अशीच रद्दीला दिली गेली. जवळजवळ पुरुषभर उंचीच्या त्या गोणत्यात भारतीय चित्रकलेचा आणि नवचित्रकलेच्या प्रारंभाचा साराच्या सारा इतिहास संकलित करण्यात आला होता. पण त्याचा अखेरीस लगदा झाला.
आपल्याकडे दस्तावेजीकरणाकडे कुणीही गांभीर्यानं पाहिलं नाही. ना कलाशिक्षण संस्थानी, ना आर्ट सोसायट्यांनी. कला महाविद्यालयंदेखील तशीच. त्यानींही ही गोष्ट गांभीर्यानं कधी घेतलीच नाही. त्यामुळेच भारतीय चित्रकलेचा इतिहास लिहिताना अभ्यासकांच्या अक्षरशः नाकीनऊ येत आहेत. हे सारं आज आठवायचं कारण म्हणजे नुकतंच एका मित्रानं व्हाट्सअपवर पाठवलेलं एक फॉरवर्ड्.
दिल्लीच्या चाणक्यपुरी विभागातील DISCOVER Collection Club मध्ये एक चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. या प्रदर्शनात हुसैन, किशन खन्ना, रामकुमार, रामकिंकर बैज, रझा, सूर्यप्रकाश, एस जी वासुदेव, सतीश गुप्ता, मनू पारेख, जोगेन चौधरी, जे स्वामिनाथन आणि प्रभाकर कोलते तसेच बी प्रभा या दोन मराठी चित्रकारांची चित्रंदेखील प्रदर्शित करण्यात आली आहेत.
या प्रदर्शनाचं संयोजन कुणी केलं आहे. कुणी याचा कॅटलॉग लिहिला आहे वगैरे कुठलीच माहिती त्या फॉरवर्डमध्ये दिलेली नाही. त्यामुळे त्याविषयी काहीही सांगता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण या प्रदर्शनाचा कॅटलॉग म्हणून म्हणा किंवा माहितीपत्रक म्हणून म्हणा जे फॉरवर्ड माझ्या व्हाट्सअपवर आलंय त्यात एक अतिशय भयंकर चूक आहे. ती म्हणजे प्रख्यात महिला चित्रकार बी प्रभा यांच्या छायाचित्राच्या जागी कॅटलॉग लिहिणाऱ्यांनं म्हणा किंवा डिझाईन करणाऱ्यांनं म्हणा किंवा प्रदर्शनाचं संयोजन करणाऱ्यांनं म्हणा ‘बी प्रभा’ यांच्या जागी किराणा घराण्याच्या प्रख्यात शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं छायाचित्र प्रसिद्ध केलं आहे. किती भयंकर आहे ही चूक!
आयुष्यभर सर्वस्व ओतून कलासाधना करायची आणि निधनानंतर अथवा वृद्धावस्थेत असताना कुणीही अलाण्या फलाण्यानं कुठलाही अभ्यास न करता ही अशी भयंकर चूक करून कलेची थट्टा करायची. काय वाटत असेल त्या कलावंताना किंवा त्यांच्या नातलगांना. माझ्यासारखे त्यांचे चाहते हे सारं पाहिल्यावर हळहळतात मग प्रत्यक्ष त्या कलावंतांना किंवा त्यांच्या नातलगांना काय वाटत असेल? प्रभा अत्रे आज ९१ वर्षाच्या आहेत. सध्या पुण्यात राहतात. आजही तितक्याच तळमळीनं शास्त्रीय संगीताची सेवा करतात. भारतातल्या संगीताच्या सर्व पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. इतकंच नाही तर १९९० साली केंद्र सरकाराने पदमश्री देऊन त्यांचा गौरव केला होता. एवढंच नाही तर आता अगदी अलीकडेच पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात आला होता. अशा कलावंतांचा उल्लेख भलत्याच कलावंताच्या जागी करणं किंवा भलत्याच क्षेत्रातल्या कलावंतांच्या जागी त्यांचं छायाचित्र छापणं हा अत्यंत क्रूर किंवा जीवघेणा प्रकार आहे. त्या कलावंतांची केलेली भयंकर कुचेष्टा आहे. पण ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना त्याचा मागमूसदेखील नसावा याचं खरोखर आश्चर्य वाटतं.
बी प्रभा यांनी आपलं सारं आयुष्य चित्रकलेला वाहिलं होतं. वर्षानुवर्षे दररोज त्यांनी चित्रकला साधना केली. शेवटपर्यंत त्या कार्यरत होत्या. त्यांच्या निधनानंतर अशा प्रकारे दुसऱ्याच क्षेत्रातील कलावंतांचं छायाचित्र त्यांच्या जागी छापणं हे त्या दोन्ही कलावंतांवर अतिशय अन्याय करणारं आहे. आणि हे सारं भारताच्या राजधानीत घडावं, हे तर त्याहूनही दुर्दैवी आहे. त्या प्रदर्शनात सहभागी झालेले अनेक चित्रकार हयात आहेत. त्यांनादेखील संयोजकांना सांगता येऊ नये याचं खरोखरच आश्चर्य वाटतं.
बी प्रभा यांच्याशी माझ्या फार जुजबी भेटी झाल्या. त्या सतत कामातच असत. अशा वेळी त्यांना त्रास देणं योग्य वाटत नसे आणि संकोचदेखील वाटे, की एवढ्या मोठया कलावंतांचा वेळ आपण का घ्यावा ? पण त्यांचे पती बी विठ्ठल यांच्याशी मात्र बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कामांमुळे माझे या ना त्या निमित्तानं सतत बोलणं होत असे. खूप मोकळेपणानं ते आपल्या कामाविषयी बोलत असत. आपण कसे या स्थानापर्यंत पोहोचलो याविषयी ते अगदी रंगून जाऊन सांगत असत. खूप काही करायचं त्यांनी योजलं होतं. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर वज्रेश्वरीला त्यांनी तिथल्या प्रसिद्ध देवस्थानाजवळ खूप एकर जमीन घेतली होती. खूप म्हणजे काहीशे एकर वगैरे. आणि तिथे प्लॉट पाडून ते कलावंतांना द्यायचे अशी काहीतरी त्यांची भन्नाट कल्पना होती.
पण यातलं काहीच घडलं नाही. दोघांचेही दुर्दैवी मृत्यू झाले. मुलबाळ होऊन दिलं नव्हतं त्यामुळे त्यांच्या कुलाब्यातल्या आलिशान प्लॅटचं, नरिमन पॉईंटवरच्या स्टुडिओ आणि आर्ट गॅलरीचं पुढं काय झालं हे कुणाला कधी कळलंच नाही. परदेशात अशा कलावंतांच्या जागा, त्यांच्या स्मृती या जपल्या जातात. पण आपल्याकडे मात्र त्या कलावंतांच्या पश्चात त्याच्या कर्तृत्वावर बोळाच फिरवला जातो. त्याचे आप्तस्वकीयदेखील याला अपवाद नसतात, मग बाहेरच्यांचं काय विचारता?
बी प्रभा यांच्यासंदर्भात नेमकं हेच घडलं आहे. त्यातच गूगलनं अत्यंत बिनडोकपणानं या नोंदी केल्या आहेत. संबंधितांनी किंवा कलेच्या अभ्यासकांनी त्या तातडीनं दुरुस्त करावयास हव्या आहेत. पण लक्षात कोण घेतो? गूगलमुळेदेखील ही चूक संयोजकांनी केली असल्याची शक्यता आहे. पण ज्या कलावंतांचं पेंटिंग तुम्ही विकून लाखो रुपये गोळा करणार आहात त्या कलावंताविषयी योग्य ती किंवा अचूक माहिती देणं हे संयोजकांचं कर्तव्य नाही का? आता आम्ही एवढ डोकं आपटून सांगितल्यानंतर तरी तुम्ही त्यात सुधारणा करणार आहात का? का गूगलनं शेण खाल्लं म्हणून आम्ही पण शेण खातो आहोत असं आम्हाला सांगणार आहात?
सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
टीप: या लेखातील बी. प्रभा यांचे छायाचित्र टाइम्स ऑफ इंडियाच्या ‘आर्ट ऑफ इंडिया २०२३’ संग्रहातील आहे. प्रभा अत्रे यांचे छायाचित्र मथळ्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे विविध स्त्रोतांकडून घेतले आहे.
Related
Please login to join discussion