Features

जेजे स्कूल ऑफ आर्टचे कलेवर – ३

जेजे स्कूल ऑफ आर्टचे कलेवर या लेखाच्या तिसऱ्या भागात वाचा, जेजेचे सध्याचे डीन साबळे यांची निवड कशी झाली. त्यासाठी तत्कालीन तंत्र  शिक्षणमंत्र्यांनी कसे नाट्यमय निर्णय घेतले. लायक शिक्षकांना डावलून आपल्या मर्जीतील शिक्षकांना मोठ्या पदावर बसवण्यासाठी नियमांना हवे तसे वाकवण्यात आले.

 २००६ साली लिहिलेला हा लेख तत्कालीन प्रशासनामधल्या व्यक्तींनी जेजेची कशी पद्धतशीर वासलात लावली याची मुद्देसूद माहिती देतो. आज जेजेची वास्तू तिथेच असली तरी परिस्थिती मात्र अजूनच खालावली आहे. 

जेजे स्कूल ऑफ आर्टचे डिनोव्हो होण्यासाठी जे विद्यार्थी विरोध करत आहेत त्यांच्या डोळ्यात या लेखामुळे झणझणीत अंजन पडेल.

सूर्यवंशींना एक न्याय तर बोरोलेंना दुसरा 

श्री साबळे यांची नेमणूक ज्या जागेवर झाली त्या जागेसाठी लोकसेवा आयोगाकडे त्याच जातीतल्या हेमंत सूर्यवंशी या ज्येष्ठ चित्रकारानेही अर्ज केला होता . पण केवळ छायाचित्रावर सही केली नाही म्हणून केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या सूर्यवंशीचा अर्ज लोकसेवा आयोगवाल्यानी फेटाळला. त्याआधी झालेल्या कलासंचालक पदाच्या निवडीच्या वेळी मात्र अशा प्रकारच्या त्रुटी राहिल्या असता उमेदवारांना लोकसेवा आयोगाने आपल्या कार्यालयात बोलावून त्या त्रुटी पूर्ण करून घेतल्या होत्या. विचारा हवं तर चित्रकला निरीक्षक दिलीप बोरोले यांना. लोकसेवा आयोगाकडून बोरोलेना एक न्याय तर सूर्यवंशींना दुसरा न्याय असं का ? कारण उघड आहे श्री साबळे यांच्याप्रमाणेच श्री बोरोले हेही वळसे – पाटलाचेच कॅन्डीडेट होते . साबळेचं काम फत्ते झालं पण नागपूरचे शिक्षक कोर्टात गेल्यानं बोरोले यांच काम मात्र अडकून राहिलं . अन्यथा आता श्री बोरोले कलासंचालक पदावर विराजमान झालेले साऱ्या महाराष्ट्राला पाहावे लागले असते. आयोगानं अर्ज फेटाळलेल्या हेमंत सूर्यवंशी यांच्या चित्रालाच यंदाचा ललित कला अकादमीचा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे . त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व गुणी कलावंताला डावलून , साबळे यांच्यासारख्या मराठी बोलतानासुद्धा दहा वेळा फापलणाऱ्या डिप्लोमा होल्डर उमेदवाराला जेजेच्या मानाच्या आधी प्राध्यापक पदावर व नंतर विभागप्रमुख पदावर बसवून तंत्रशिक्षण खातं आणि आयोगानं जेजेच्या विद्यार्थ्यांना अक्षरशः खड्ड्यात घातलं आहे . 

या साबळेंची मुलाखत घ्यायला आयोगानं निवडले कोणाला तर प्रा. आयवले नावाच्या दिवट्या व्यक्तीला . आरक्षणाचा फायदा घेऊन प्रथम जेजेचं प्राध्यापक पद आणि नंतर विभागप्रमुख पद मिळवलेल्या या गृहस्थामध्ये तंत्रशिक्षण खात्यानं असं काय पाहिलं कुणास ठाऊक , एका रात्रीत हे गृहस्थ पात्रता नसतानाही जेजेचे प्रभारी अधिष्ठाता झाले . चार सहा महिने ते पद ते उपभोगतात न उपभोगतात तोच , आणखी एका रात्रीत ते महाराष्ट्राचे प्रभारी कला संचालकही झाले . या सर्व पदावर त्यांनी आपले गुण मुक्तपणे उधळताच तंत्रशिक्षण खात्यानं त्यांना पुन्हा जेजेच्या विभागप्रमुख पदावर आणून बसवलं . त्यांनी उधळलेल्या गुणांचे रंग एवढे ‘ फ्लोरोसेंट होते की खरं तर त्यांना खात्यानं निलंबित करावयास हवं होतं . पण तेथे त्याची जात आडवी आली . या अशा सर्वगुणसंपन्न व्यक्तीला आयोगानं श्री साबळे यांची मुलाखत घेण्यासाठी बोलावलं . या आयवले यांचा पेन्टिंगशी खरं तर काहीही संबंध नाही . ती मुलाखत घेण्यासाठी ते संपूर्णपणे अपात्र होते . पण आले लोकसेवा आयोगाच्या मना तेथे कोणाचे चालेना ! ‘ खरं तर या सर्व गोष्टींचा विचार करून , आयवलेच्या नंतर झालेल्या पदावनती विचार करून लोकसेवा आयोगाच्या या निवड प्रक्रियेलाच कुणीतरी न्यायालयात आव्हान द्यायला हवं आणि भावी चित्रकारांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या मंत्री किंवा अधिकाऱ्यांना तुरुंगातच डांबायला हवं  इतके त्यांचे हे गुन्हे भयंकर आहेत . 

विधानसभेतही वळसे पाटील गप्पच 

 श्री साबळे यांच्या नेमणुकीबद्दल जरा विस्तारानं  लिहिलं  कारण त्या मागची सरकारी मोडस ऑपरेंडी कळावी . गेल्या १५-२० वर्षातल्या जेजे आणि कलासंचालनालयातल्या साऱ्याच्या साऱ्या नेमणुका याच पद्धतीन केल्या गेल्या . याच पद्धतीनं लायकी नसलेली माणसं तंत्रशिक्षण विभागानं कलासंचालनालयाच्या माथी मारली आणि सातवळेकर , धोंड , सडवेलकर यांच्या काळातल्या भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ प्रशासनाची वाताहत करून टाकली . शाळकरी एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या ग्रेड परीक्षाच्या निकालातसुद्धा फिरवा फिरवी करून संचालनालयातल्या या नालायक माणसानी पैसे खाल्ले , त्यावरून कलासंचालनालयाचं  हे प्रशासन किती सडलं  असेल याची कल्पना यावी या साऱ्यांचे सूत्रधार उपकलासंचालक श्री वसंत रसाळ , हे सर्व करून सवरून येत्या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत . या गृहस्थानी जातीचा खोटा दाखला दाखवून तीन वेळा पदोन्नती घेतली. नियमानुसार ती एकदाच घेता येते मुंबईच्या वृत्तपत्रांनी वेळोवेळी त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढली . विधानसभेत आमदारांनी त्यावर प्रश्नही विचारले , पण तंत्रशिक्षण मंत्री ढिम्म हलले नाहीत नेमणुकासंबंधीचे सर्व नियम धाब्यावर बसवून तंत्रशिक्षण खात्यातल्या चांडाळ चौकडीनं  जवळजवळ १५ ते २० वर्ष सलग अशा एकाहून एक आरक्षणाचा खरा खोटा फायदा घेतलेल्या कला संचालकांच्या नेमणुका केल्या . या मूर्ख कारभाराचा संपूर्ण फायदा घेऊन या धूर्त गृहस्थानं सारे कलासंचालनालय आणि त्या अंतर्गत असलेली चार शासकीय व २०० पेक्षा खाजगी कला महाविद्यालय आपल्या दावणीला बांधून , महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाचा पार खेळखंडोबा करून टाकला . त्याची सर्व कृष्णकृत्ये उजेडात आली तरी महाराष्ट्र शासन बधलं  नाही ( रसाळ यांच्यावर करावयाच्या कारवाईची शिफारस केलेली फाईल तर म्हणे तंत्रशिक्षण सचिव जॉयस शंकरन यांच्या टेबलावर गेले चार महिने नुसती पडून आहे । गेली १५-२० वर्षे चित्रकार मंडळी कलासंचालनालय आणि जेजेची अधोगती असहाय्यपणे नुसते पाहत होते पण आता जेजे स्कूल ऑफ आर्ट पूर्णपण हातचं जाणार हे लक्षात येताच जेजेचे सर्व माजी विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी स्वतःची संघटना उभारली आहे आणि संघटनेतर्फे त्यांनी आता जेजे आणि कला संचालनालयातील भ्रष्टाचाराचा निकाल लावायच ठरवलं आहे . या संघटनेन आता प्रथम तंत्रशिक्षण मंत्री वळसे – पाटील आणि तंत्रशिक्षण खात्यातले चार अधिकारी आणि लोकसेवा आयोग यांनाच कोर्टात खेचून गेल्या २० वर्षातल्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करायला लावून जेजे शुद्धीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ करावा . कला संचालनालय तर आता गेलेच आहे पण निदान जेजे तरी वाचवता येऊ शकेल. 

ही वळसे – पाटलांची कारवाई ? 

याही बाबतीत अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही . तीन एप्रिलच्या मंत्रालयातल्या सभेमध्ये तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लवकरात लवकर ही पद काढली जातील असं आश्वासन दिलं . त्या सभेला आता सात महिने झाले . अद्यापही कोणती कारवाई झाली नाही १९९८ साली दैनिक लोकसत्तामध्ये यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले होते . तेव्हापासून आजतागायत ही सर्व पद रिकामी आहेत . तीन एप्रिल दोन हजार आठच्या सभेमध्ये तंत्रशिक्षणमंत्री वळसे पाटील यांनी आणि त्यांच्या सचिवानी पदांच्या भरतीसंदर्भात लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव गेलाय असही सांगितले . त्यालाही आता जवळजवळ सात महिने झाले . पण अद्याप ती पदं रिक्त आहेत . वळसे – पाटलांनी जेव्हा हे आश्वासन दिल तेव्हा ही पदं तुम्ही भरू शकणारच नाहीत , त्याविरोधात कुणीनाकुणी कोर्टात जाईल .. कलासंचालक आणि अधिष्ठाता पदाची जाहिरात दिल्यावर २००६ साली जे घडलं होतं , तेच आताही घडेल . गेल्या १५-२० वर्षांमध्ये खुल्या वर्गातील कुठल्याच पदांना पदोन्नती दिली गेली नसल्याने खुल्या वर्गातील कोणीच अधिव्याख्याते प्राध्यापक होऊ शकलेले नाहीत. अधिष्ठाता पदासाठी अर्ज करावयाचा असेल तर त्याला प्राध्यापकपदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव लागतो तो अनुभव सध्या सरकारच्या चारही कलामहाविद्यालयातील वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष नोकरी केलेल्या कुणाही खुल्या प्रवर्गातल्या अधिव्याख्यात्याकडे नाही . याउलट प्राध्यापकांच्या राखीव वर्गातील जागा या गेल्या १५-२० वर्षात नियमितपणे भरल्या गेल्याने सद्यपरिस्थितीत फक्त मागासवर्गीय उमेदवारच अधिष्ठाता आणि कलासंचालक पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरू शकतो २००६ साली लोकसेवा आयोगानं जाहिरात दिल्यावर नागपूरमधील काही खुल्या वर्गातील काही अधिव्याख्याते न्यायालयात गेले आणि लोकसेवा आयोगाला ही जाहिरात मागे घेण भाग पडलं . तर आता तुम्ही ही पदं कशी भरणार ? असं श्री वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी आम्ही रिकूटमेंट रुल्स बदलले आहेत असं उत्तर दिलं . 

या घटनेला आता जवळजवळ सात महिने झाले . आजही जेजेत शिकवण्यासाठी प्राध्यापकच नाहीत . ज्याला प्राध्यापक या शब्दात ध ला य लावायचा की य ला ध लावायचा हेही ठाऊक नाही असा इसम तिथं प्राध्यापक म्हणून मिरवतो आहे . त्यानं घातलेल्या गोंधळांची प्रकरण वृत्तपत्रात रोज गाजताहेत पण कुठलीही कारवाई नाही. प्राथमिक रंगही कुठले ते सांगू शकणार नाही असा माणूस अधिष्ठाता म्हणून काम पाहतोय. जेजेच्या दीडशे वर्षाच्या इतिहासात एवढी भयंकर परिस्थिती इंग्रजानीसुद्धा आणली नव्हती . आज जेजेत अधिष्ठाता नाही . विभागप्रमुखाची पदं काढून टाकली आहेत . प्रभारी अधिष्ठाता निलंबित झालाय . एक शिक्षक निलंबित झालाय . दोन शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत . २००० साली लोकसेवा आयोगाच्या कृपेने जो डिप्लोमाधारक इसम इथं चिकटला, जो अवघ्या तीन वर्षात प्राध्यापकही झाला ज्याला साथं मराठीही धड बोलता येत नाही जो जेजेमध्ये आता ज्येष्ठ शिक्षक म्हणून मिरवतोय.  

*****

अपूर्ण

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.