No products in the cart.
रुजवा फुलवा : बाल अभिव्यक्ती विशेषांक बसोली ग्रुप नागपूर
नामवंत चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी लहान मुलांना मुक्तपणे कला अविष्कार साकारता यावा यासाठी खात्रीशीर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी १५ मे १९७५ केवळ ४५ सदस्यांसह नागपूर येथे बसोली ग्रुप ची स्थापना केली. आज दोन लाखांहून अधिक सदस्य बसोलीशी जोडले गेले आहेत. बसोली ही प्रामुख्याने चित्रकलेच्या वैशिष्ट्यपूर्ण राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिबिरांसाठी ओळखली जात असली तरी मुलांचा सर्वांगिण विकास करून त्यांना कलेची बहुमोल दृष्टी देण्याचं काम बसोलीने केलं आहे. या ग्रुपला ४५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने प्रसिद्ध झालेला बसोलीचे अंतरंग उलगडून दाखवणारा, लहानग्यांच्या सुंदर चित्रांनी नटलेला आणि कवितांच्या मैफीलींमध्ये सजलेला असा हा सदाबहार विशेषांक
******
या अबोध रेषा…
राहू द्या तशाच
ही अभिव्यक्ती आहे…
माझ्या छोट्या छोकऱ्याच्या
कोमल गुलाबी बोटांची…
वाकड्या तिकड्या असल्या म्हणून काय झालं?
मी स्वतःला शोधत असतो…
त्यात अविरतपणे.
बसोली ग्रुप नागपूर, बाल अभिव्यक्ती विशेषांक २०२२ च्या पहिल्या पानांवर दिलेल्या या ओळींमधूनच त्याचं अनोखेपण जाणवायला सुरुवात होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी लहान मुलांना मुक्तपणे कला अविष्कार साकारता यावा यासाठी खात्रीशीर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी १५ मे १९७५ केवळ ४५ सदस्यांसह नागपूर येथे बसोली ग्रुप ची स्थापना केली. यावर्षी या संस्थेला ४५ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने प्रसिद्ध केलेला हा बाल अभिव्यक्ती विशेषांक.
याच्या ‘बाल अभिव्यक्ती’ या नावावर जाऊ नका. कलेसाठी समरसून काम करणाऱ्या दिग्गजांपासून ते नवोन्मेषांचे रंग मुक्तपणे उधळणाऱ्या रंगरंगिल्या-छैलछबिल्या बालगोपालांपर्यंत सर्वांनीच या अंकाच्या निर्मितीमध्ये योगदान दिले आहे. ज्यांना आपल्या लहानग्यांचे बालपण सर्वांर्थाने समृद्ध करायचे त्यांच्यासाठी ‘बसोली’ या ग्रुपचे परिपूर्ण दर्शन घडवणारा हा विशेषांक संग्रही असायलाच हवा.
‘रुजवा फुलवा’, बसोली ग्रुपचे बोधवाक्य आहे याचा प्रत्यय या विशेषांकाच्या मुखपृष्ठापासूनच येतो. अंकाचे मुखपृष्ठ आदी ओंकार चन्ने या पाच वर्षाच्या चिमुकल्याने साकारले आहे. तर बरोबरच सजावटीची पूर्ण जबाबदारी मल्हार राहूल खासनिस (नागपूर, वय ५), अन्मय मंगेश दाणी (पुणे, वय,९), तादात्म्य रामपूरे, (सोलापूर वय ७), आर्यन बन्सल (अंबाला वय१२), कावेरी अडकीणे (नागपूर, वय ५) आणि अर्णव चन्ने (नागपूर, वय१० ) या लहानग्यांनी उत्तमरित्या पेलली आहे.
प्रसिद्ध लेखक, चित्रकार, कलासमीक्षक, कवी यांच्या आशयघन लेखनाने हा अंक सजला आहेत. तर बसोली ग्रुपचे सदस्य असलेली मुले आणि त्यांचे पालक यांनी बसोलीबाबत भरभरुन लिहिलेल्या अनुभवांनी बसोलीचे अनोखेपण अधोरेखित केले आहे. बसोलीच्या शिबिरांमध्ये सहभागी होऊन ज्यांचे बालपण समृद्ध झाले आहे अशा माजी सदस्यांनी बसोलीबाबतची कृतज्ञता आपल्या लेखाममधुन मांडली आहे.
प्रसिद्ध लेखक महेश एलकुंचवार या ग्रुपमध्ये सक्रीयपणे सहभागी आहेत. वेळोवेळी येथील उपक्रमांच्या पाठीवर आश्वासक हात ठेऊन ते प्रोत्साहन देतात., दीपक घारे, दिनकर बेडेकर, रघुवी कुल, विजयराज बोधनकर, गणेश कनाते, साधना बहुळकर डॉ. श्रीकात चोरघडे, शुभांगी भडभडे,महेंद्र पेंढारकर, साधना शिलेदार, रंजन जोशी, प्रतोद कर्णिक इ. लेखकांचे बालकांच्या अभिव्यक्तीच्या प्रकटीकरणाशी संबंधित तसेच बसोली ग्रुप आणि संस्थापक डॉ. चंद्रकांत चन्ने यांच्या सोबतच्या अनुभवांचे प्रकटीकरण करणारे लेख यामध्ये वाचता येतील.
दासू वैद्य, प्रफुल्ल शिलेदार, आशुतोष राम आपटे,श्रीपाद भालचंद्र जोशी,डॉ. सुमेधा हर्षे, मंगेश बावसे, श्रीकांत दुबे राधा जोशी, प्रा.दीपक जोशी कवी-कवयत्रिंनी या अंकामध्ये काव्यरंग भरले आहेत.
या अंकामध्ये गणेश नकाते यांनी बसोली ग्रुपच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमांमधील एका विशेष अनुभवाबद्दल लिहिले आहे. यावरुन चंद्रकांत चन्ने सरांनी निर्माण केलेल्या या अद्भुत रंगविश्वाचे वेगळेपण सिद्ध होते. कवी ग्रेस यांच्या कवितांमधील आशय गवसण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे अनेकजण त्यांच्या कवितांवर दुर्बोधतेचा शिक्का मारला जातो. मात्र चन्ने सरांनी बसोलीच्या लहानग्यांच्या अभिव्यक्तींमधून हे खोटे ठरवले आहे. ‘भय इथले संपत नाही’ ही कवी ग्रेस यांची कविता लता मंगेशकर याच्या स्वराने मराठीच्या विश्वात अमरत्व पावली आहे. याच गीतातील ‘झाडांशी निजलो आपण,झाडात पुन्हा उगवाया’ या ओळींना मूर्तरूप देण्यासाठी लहानग्यांनी साकारलेले क्ले आर्ट पाहिले तर आपण थक्क होऊन जातो.
बसोली ही प्रामुख्याने चित्रकारितेच्या वैशिष्ट्यपूर्ण राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिबिरांसाठी ओळखली जात असली तरी मुलांचा सर्वांगिण विकास करून त्यांना कलेची बहुमोल दृष्टी देण्याच काम बसोली ने केलं आहे. बसोली एक सामान्य संस्था न राहता ते एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्कारपीठ म्हणून सिद्ध झालं आहे. कला इतिहासाचे प्राध्यापक चंद्रकांत चन्ने पेंटींग, पॉटरी, शिल्पकला, बोलक्या बाहुल्या, नाटक, संगीत, नृत्य आणि अनेक कलाप्रकारांचे मार्गदर्शन बसोली च्या शिबिरांमध्ये तज्ज्ञांमार्फत केले जाते.
आज बसोली ग्रुपमध्ये जगभरातील २ लाखांहून अधिक लहानमुले आणि त्यांचे पालक जोडले गेले आहेत. हिवाळी आणि उन्हाळी सुट्टी लागली की या लहानग्यांना वेध लागतात ते बसोलीच्या निवासी शिबिराचे. बसोली ही भारतीय चित्रकला क्षेत्रातील प्रसिद्ध चित्रशैली आहे. याची सुरुवात हिमाचल प्रदेश मधील बसोली या पहाडी गावातील लघुचित्रमालिकेतून झाली आहे, आज नागपूरमधील बालचित्रकारांच्या बसोली ग्रुपने हीच संकल्पना पुढे नेली आहे. उन्हाळी सुट्टी बसोली निवासी शिबिर गडचिरोली अहेरी पासून लंडन अमेरिकेपर्यंतची मुले सहभागी होतात.
बसोली ग्रुपचे अंतरंग समजून घेण्यासाठी आणि या जगावेगळ्या उपक्रमाचा भाग होण्यासाठी हा बाल अभिव्यक्ती विशेषांक २०२२ अवश्य वाचा. बालकांच्या भावविश्वात सृजनरंग भरणाऱ्या बसोली ग्रुपबाबत या अंकात प्रसिद्ध लेखक महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केलेला आश्वासक शुभेच्छामधुन बसोलीचे उत्तुंग कार्य नेमकेपणाने शब्दांकीत केले आहे.
सृजनांचे हे नवांकुर समरसून वाढतील; त्यांचे वृक्ष, महावृक्ष होतील.
त्यांच्या उन्मेदांना फुलाफुलांची सिद्धी प्राप्त होईल.
अनेकांना ते जीवनदायी छाया निरंतर देतील.
चराचरात भरलेल्या निसर्गसत्तेचे हे विविध अविष्कार
मनात नवीन आशा व आश्वासन पल्लवित करणारे आहेत.
तुम्हाला हा अंक हवा असल्यास बसोलीचे संस्थापक चंद्रकांत चन्ने यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधा. 098231 59897
******
Related
Please login to join discussion