No products in the cart.
चित्रकार आणि समाजाला जवळ आणणारा ‘चित्र उत्सव’
सरत्या वर्षाखेर 27 डिसेंबरला मुंबईचे उत्तरेकडील टोकावर असलेल्या विरारहून सात किलोमीटर आत पश्चिमेला आगाशी या गावात नितांत सुंदर असा एक दिवसीय चित्र उत्सव साजरा झाला. बऱ्याच वर्षांपासून वसई विरार मधील 30 ते 35 चित्रकारांचा आमचा एक ग्रुप आहे, त्यात काही ज्येष्ठ कलाकार तर काही नवीन कलाकार आहेत. त्यातील आमचे ज्येष्ठ कलाकार मित्र फिलिप डीमेलो यांनी जवळजवळ महिनाभर आधी ग्रुपवर कळवले की 27 डिसेंबरची तारीख राखून ठेवा, त्या दिवशी आपण सर्व माझ्याकडे भेटतोय. आम्ही असे अधून मधून एकमेकांकडे भेटत असतो. सहकारी चित्रकारांच्या स्टुडिओंना भेट देणे, त्यांच्या कामावर चर्चा करणे, कलेच्या क्षेत्रातील घडामोडींवर चर्चा करणे, तसेच दिवंगत झालेल्या चित्रकारांना श्रद्धांजली वाहणे, त्यांच्या आठवणींना उजाळा देणे, असे निमित्त असतेच. पण यावेळी महिनाभर आधी कळवून फिलिप सर पुन्हा पुन्हा आठवण करीत होते आणि येताना प्रत्येकाने चितारलेले एखादे व्यक्तीचित्र आणायला सांगत होते यामुळे कार्यक्रम जरा “खास” असणार असे वाटले, पण स्पष्ट कल्पना येत नव्हती. असो.
27 डिसेंबरला ठरल्यानुसार सकाळी सकाळी नऊ सव्वा नऊ पर्यंत आम्ही आगाशीला फिलिप डिमेलो यांच्याकडे पोहोचलो. आगाशी म्हणजे शेती बागायतीने संपन्न सुंदर गाव, गुलाबी थंडीने धुक्याने वेढलेले गाव, फिलिप डिमेलोंच्या व्हिक्टर आळीतील वातावरण लग्नाच्या स्वागत समारंभा सारखे सजले होते, यजमान कुटुंबाची लगबग दिसत होती, टुमदार बंगल्यांच्या समोर अंगणात भला मोठा मंडप टाकलेला होता त्यात आदल्या दिवशी आणलेली अनेक व्यक्तिचित्रे प्रदर्शित केलेली होती, त्यात वसई. कला महाविद्यालयातील मान्यवर चित्रकारांनी दिलेली व्यक्तिचित्रं प्रात्यक्षिके होती, आलेल्या पाहुण्यांचे आगत स्वागत फिलिप आणि त्यांचे नातेवाईक सुगंधी चाफ्याची फुले देऊन करीत होते. निमंत्रित चित्रकारांनी सोबत आणलेली चित्रे प्रदर्शित करण्याचे काम कला महाविद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी अतिशय अचूकपणे बजावीत असल्याचे दिसले. शिवाय नाश्ता म्हणून गरम गरम पंजाबी समोसे पुदिन्याची चविष्ट चटणी नंतर कॉफी… सकाळीच उठून केलेल्या प्रवासाचा शीण एव्हाना कुठच्या कुठे पळून गेला होता.
तासाभरात सर्व निमंत्रित चित्रकार आल्यानंतर प्रथम फिलिप यांनी जेजेतील आमच्या सर्वांच्या शिक्षिका दिवंगत चित्रकार डॉ. नलिनी भागवत मॅडम आणि दिवंगत आई-वडील, नातेवाईक यांच्या विषयी हृद्य भावना व्यक्त केल्यानंतर सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली, नंतर समई प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली चित्र मंडपाच्या एका कोपऱ्यात लहानसे पण सुंदर व्यासपीठ होते, मंगल सुरांच्या सान्निध्यात कलाकार, कला रसिक विद्यार्थी आणि फिलिप यांचे नातेवाईक चित्रांचा आस्वाद घेत होते. नंतर निवेदीकेच्या सूचनेनुसार सर्व व्यासपीठांसमोर स्थानापन्न झाले. आणि व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले, त्यात होते जेष्ठ कलाकार, लेखक, संपादक, सतीश नाईक. ज्येष्ठ चित्रकार अनिल नाईक. जेजेचे निवृत्त प्राध्यापक शिल्पकार मधुकर वंजारी, कवी सायमन मार्टिन आणि फिलिप डिमेलो यांच्या अर्धांगिनी सौ. डिमेलो.
सर्वप्रथम फिलिप्स सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, ते म्हणाले खूप वर्षांपासून असा चित्र उत्सव साजरा करावयाची माझी इच्छा होती पण दरवर्षी उन्हाळा नंतर पावसाळा पुन्हा उन्हाळा असे चक्र सुरू होते व त्यात अडकलेल्या माकडाचे घर काही बांधून होत नाही तसेच काहीसे माझे झाले होते. मध्यंतरी कोरोना काळात आपले अनेक सहकारी आपल्याला सोडून गेले, त्यांच्या बद्दल दु:ख भावना व्यक्त करून म्हणाले मला देखील कोरोना झालेला. त्यातून मी वाचलो, नंतर सायकलिंग करताना बसचा धक्का लागून पडलो तेव्हा मृत्यू दोनच पावले लांब होता. पायाचे हाड मोडण्यावर निभावले तरी मी खचून गेलो नाही तर पायाच्या प्लास्टरवर संपूर्ण स्टोरी रेखाटली. ,जीवनाकडे सकारात्मकतेने बघणे गरजेचे आहे. त्यामुळेच आज चित्र उत्सवाचा योग जुळून आलाय.
त्यानंतर मान्यवर पाहुण्यांचे सुगंधी चाफ्याचे करंडे, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. नंतर प्रथम सतीश नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी सहसा कुठे जात नाही , या सर्व गोष्टींपेक्षा नेहमी लांब असतो. म्हणजे एकूणच चित्रकार असेच असतात . मी आणि माझे चित्रकला संशोधन लेखन असे सुरू असते, पण आज जर आलो नसतो तर सुंदर कार्यक्रमापासून वंचित राहिलो असतो. त्यांनी सुद्धा कोरोना काळात कशी सर्वत्र मृत्यूची भीती पसरली होती त्या पार्श्वभूमीवर अशा सकारात्मक कार्यक्रमांचे महत्त्व विशद केलं.
नंतर अनिल नाईक यांनी भाषणात मोठे चित्रकार कसे असतात ते सांगितले ते म्हणाले पिकासो व मातिस समकालीन असले तरी ते कधीच एकमेकांचा कुठे उल्लेख करीत नसत. पण मातीसचे जेव्हा निधन झाले तेव्हा पिकासोने मातीसचे मोठेपण जाहीररित्या मान्य केले, तसेच तय्यब मेहतांचे निधन झाल्यावर तय्यब मेहता विषयी कधीही न बोलणारा हुसेन म्हणाला “he was a great painter” मोठ्या चित्रकारांचे एकूण स्वभाव दर्शन त्यांनी श्रोत्यांना घडवले, नंतर कवी सायमन मार्टिन म्हणाले, असे मेळावे, चर्चासत्र वारंवार घडले पाहिजे यातून या समाज व्यवस्थेविरुद्ध शासनाविरुद्ध बोलण्याची संधी मिळाली पाहिजे, लोकांना बोलते करा. आज वसई विरार महानगरपालिकेत 25 वर्षे एक हाती सत्ता असून येथे एकही आर्ट गॅलरी नाही. नाट्यगृह नाही की उत्तम अद्ययावत रुग्णालयही नाही. नुसते इमारती बांधत सुटणे म्हणजे विकास, असा चुकीचा अर्थ लोकांच्या समोर मांडला जातोय ही प्रगती नसून अधोगती आहे. अशावेळी असे चित्र उत्सव भरवणे फार गरजेचे आहे. नंतर माजी प्राध्यापक वंजारी म्हणाले या सुपीक भूमीत पूर्वीचे कुशल कारागीर होते. कुंभार, सुतार, तांबटकर, लोहार यांची आज वाताहत झाली आहे, ती लोक-कला जिवंत राहणे फार गरजेचे होते, त्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करावयास पाहिजेत.
नंतर फिलिप्स सरांनी पत्नीचा सत्कार केला म्हणाले मी जो आज आपल्यासमोर उभा आहे तो माझ्या पत्नीमुळे ! एका चित्रकाराचा संसार, मुलांचे संगोपण, घरदार नातेवाईकांची उठबस सर्व तिने नोकरी करून समर्थपणे सांभाळली, अशी भावना व्यक्त करताना पती-पत्नी दोघांच्या डोळ्यातील कडा पाणवल्या होत्या. समाधानाचे भाव फिलिप यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. प्रेक्षकात मान्यवर चित्रकार शिल्पकार कवी चित्रपट दिग्दर्शक अशी अनेक मंडळी होती.
या सत्रानंतर अतिशय रुचकर भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला, नंतर फिलीपच्या बंगल्यामागील हिरव्यागार वाडीत विहार केला आणि लगेचच व्यासपीठावर कवी मंडळींची लगबग सुरू झाली, चित्रकार, कवी, नाटककार, नेपथ्यकार आशुतोष आपटे यांनी सुत्रे हातात घेतली आणि मोजक्यातच कवींच्या बोली भाषेतील कवितांचा सगळ्यांनी आनंद घेतला शेवटी आशुतोष आणि अर्चना सावंतने देहदानावर आधारित “सुटकेस” या कवितेचे वाचन करून संमेलनाचा शेवट केला. त्यानंतर जेजेतील निवृत्त शिक्षक मोग्गलान श्रावस्ती यांनी व्यक्तीचित्राचे प्रत्यक्ष दिले. त्यांनी मॉडेल म्हणून फिलिप सरांनाच बसवले व त्यांचे तैल रंगात सुरेख व्यक्तिचित्र रंगवले. दरम्यान अर्चना सावंत यांचे मधुर स्वर वातावरणात मिसळून कार्यक्रमाची गोडी वाढवीत होते. तोपर्यंत पाच वाजले होते नंतर मस्त कॉफीचा आनंद घेऊन सर्व मंडळी एकमेकांना निरोप देत तृप्त मनाने मार्गस्थ झाली.
****
– सुभाष गोंधळे
Related
Please login to join discussion