No products in the cart.
दगडांमधलं अद्भुत सौन्दर्य !
दगडाला पाझर फोडणाऱ्या गोष्टी आपण अनेक वेळा ऐकत असतो, पण श्रीनिवास गद्रे यांचं प्रस्तुत ‘स्टोन स्टोरीज’ हे प्रदर्शन म्हणजे दगडाला सौन्दर्याचा पाझर फोडण्याची कथा आहे. श्रीनिवास गद्रे या कलाकार माणसानं साध्या दगडांमध्ये दडलेली अनेक अमूर्त चित्रं बाहेर काढून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते सुद्धा सहा वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर! त्यांच्या या सुंदर प्रदर्शनाची सुरस कथा म्हणूनच या लेखातून मांडत आहे.
गद्रे खरं तर व्यवसायानं इंजिनियर. त्यांनी व्यवसाय म्हणून इंजिनिअरिंग कंपनी स्थापन केली. त्यात प्रचंड यश मिळवलं. पण नवं काहीतरी करायचं म्हणून एका टप्प्यानंतर ती कंपनी कुटुंबियांच्या ताब्यात दिली आणि आपण आता वेगळ्याच कामात रमणार आहोत, असं जाहीरही केलं. ते वेगळं काम होतं फोटोग्राफी. अंगातील धमक आणि फोटोग्राफीवरील प्रेम या दोन गोष्टींच्या जोरावर त्यांनी आपलं करियर सोडून फोटोग्राफीमध्ये काम सुरु केलं आणि आणि त्यांच्या लेन्समधून टिपलेले फोटो आज सगळ्यांचं लक्ष आकर्षित करत आहेत.
गद्रे आणि माझी ओळख होण्यासाठी कारणीभूत ठरले ते आमचे गुरु पाथरे सर ! पाथरे सरांचं एक अमूर्त चित्र प्रदर्शन आणि पुस्तकाच्या निमित्तानं आमची ओळख झाली. आपल्याला कलाविषयक जे प्रश्न पडतात त्यांची उत्तरं शोधण्याची आणि सतत चिंतन करण्याची सवय गद्रे यांनी स्वतःला लावून घेतली आहे. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी गद्रे अनेक कलाकारांना भेटतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात.
गद्रे पूर्वी लँडस्केप फोटोग्राफी करायचे. हे करत असताना इतरांनी काय काम केलं आहे याचा अभ्यास त्यांनी सुरु ठेवला. सोबतीला अफाट वाचन होतंच ! सततच्या शोधातून ज्या नवीन वाटा दिसत होत्या त्यामुळे गद्रेंच मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. जे करतोय त्यात काहीतरी कमी वाटत होतं. ही अस्वस्थता गद्रेंना अधिक विचार करायला भाग पाडत होती. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा त्याला आपली वाट गवसते, ज्याला आपण युरेका असं म्हणतो तशीच काही भावना असते ती. तो क्षण गद्रेंच्या आयुष्यात आला जेव्हा त्यांनी एका पाश्चात्य छायाचित्रकारानी काढलेला दगडाचा फोटो पाहिला. या कलाकारानं दगडाचे अंतरंग शोधण्याचा अफाट प्रयत्न केला होता.
या क्षणातून गद्रेंनी प्रेरणा घेतली. दगडातून सौन्दर्य शोधणं सुरु झालं. हे सौन्दर्य शोधताना त्यांनी कष्ट घेतले. अक्षरशः ध्यास घेतला. त्यासाठी ते खंबाटा या गावी गेले तिथे त्यांनी हवे तसे दगड शोधले. त्या दगडाच्या पातळ चकत्या करून घेतल्या. ही सगळी सामग्री मग त्यांच्या प्रयोगशाळेत अर्थात स्टुडिओमध्ये येऊन पडली. या प्रयोगशाळारूपी स्टुडिओत अक्षरशः त्यांचं सौन्दर्य संशोधन सुरु झालं असं म्हणता येईल. कारण या चकत्यांना ते डिजिटल कॅमेरा जोडलेल्या मायक्रोस्कोपखाली धरून त्याचं निरीक्षण करत. डिजिटल कॅमेराला लावलेला मायक्रोस्कोप आणि समोर दगडांच्या अगदी एक एम एम जाडीच्या अनेक रंगातील चकत्या असत. या चकत्या मायक्रोस्कोप समोर धरून त्यावर वेगवेगळी प्रकाशयोजना करून त्याच्या अंतरंगात काय घडलं आहे हे बघणं म्हणजे खरोखरच एखाद्या तळ्यामध्ये टाचणी शोधण्यासारखं होतं. गद्रे यांनी हे प्रयोग तासंतास केले आणि त्यातून कलात्मक छायाचित्रं त्यांना मिळाली. या प्रयोगातून आलेल्या या छायाचित्रणाचे परिणाम इतके सुंदर आहेत की पाहणाऱ्याला ही अमूर्त चित्रंच वाटतात.
चार-पाच वर्ष त्यांनी या दगडातील कलात्मक गोष्टी कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये पकडण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न हळूहळू यशस्वी ठरत होता. या प्रयोगांमधून गद्रे यांची स्वतःची शैली विकसित झाली. गद्रे यांनी या दगडांना घडवलं असंच म्हणता येईल. कारण या दगडांमधील अंतरंग ही एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यानं साकारलेली चित्रंच आहेत असं वाटतं. दगडातून अनेक कलाकृती त्यांना भेटत राहिल्या आणि त्यांचा उत्साह वाढत राहिला. त्यांना आपल्याला काय करायचं हे माहित होतं आणि त्यासाठी लागणारी चिकाटीची गद्रेंकडे होती.
या पाच वर्षात गद्रे अनेक कलाकारांना भेटले. त्यांना आपल्या कलाकृती दाखवत राहिले. येणाऱ्या सूचना आणि प्रतिक्रिया यातून पुढील वाटचाल घडत राहिली. गद्रे ज्या उत्तरांच्या शोधात होते ती त्यांना मिळत गेली. फोटोग्राफीतून मिळवलेले कलात्मक परिणाम हे चित्रकाराच्या काढलेल्या चित्रासारखेच असावेत यासाठी त्यांनी ध्यास घेतला. या त्यांच्या प्रयत्नात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. हेच त्यांचं प्रस्तुत प्रदर्शन पाहिल्यावर दिसून येतं. त्यांनी शोधून काढलेली ही दगडातील अमूर्त चित्रं खरोखरच त्यांची वेगळी दृष्टी आणि सातत्य याचा मिलाप आहे असंच म्हणता येईल.
गद्रे यांच्यातील हा संवेदनशील, विनयशील माणूस आणि कलासक्त स्वभाव आणि त्याला मिळालेली लोकांची साथ यामुळे त्यांचं पहिलं प्रदर्शन मुंबई येथील ताओ आर्ट गॅलरी येथे 23 जून ते 15 जुलै दरम्यान सुरु आहे. त्या प्रदर्शनांमधून मिळणारी रक्कम ते अशा संस्थांना देणार आहेत ज्यांना त्याची अत्यंत गरज आहे. त्यांच्या या योजनेला ताओ आर्ट गॅलरीनेही उत्तम प्रतिसाद दिला म्हणूनच हे प्रदर्शन आपल्यासमोर येत आहे.
या प्रदर्शनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रांना दिलेली नावं ! ती इतकी समर्पक आहेत की आपल्या अंतर्मनाला ती भिडतात. ती या लेखात वाचण्यापेक्षा कला रसिकांनी ती प्रत्यक्ष प्रदर्शन बघूनच जाणून घ्यावी, यासाठी शीर्षकं इथं देण्याचा मोह मी टाळत आहे.
चुकवू नये असं हे कलात्मक प्रदर्शन आहे.
– शरद तरडे.
Related
Please login to join discussion