Features

अमूर्त चित्र… कुसनूर सर आणि मी !

पुण्याचे चित्रकार शरद तरडे यांच्यामुळेच कुसनूर सरांशी ओळख झाली. ही कदाचित तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट असावी. तशी प्रत्यक्षात भेट कधी झालीच नाही. जाणून घेता आले ते त्यांचे विचार, तेही फेसबुकसारख्या माध्यमातून. त्यांचं लेखन वाचलं तेव्हा थक्क झालो, कारण ज्या पद्धतीनं शब्दातून त्यांनी चित्र आणि चित्रकलेविषयी भावना व्यक्त केल्या होत्या, त्या विलक्षण वेगळ्या होत्या. शक्य झाली तर त्यांची भेट घ्यायची असंही ठरवलं होतं, पण कोरोना आला आणि सारंच बारगळलं. चित्रकार शरद तरडे यांचा लेख त्यांच्याविषयी खूप काही सांगून जातो. म्हणूनच तो इथं देत आहोत.  

 

आमची आणि सरांची ओळख झाली ती उमाताई कुलकर्णी यांच्यामुळे.अंदाजे सात वर्षांपूर्वी ते “चित्र” विचारांविषयी फार अभ्यासपूर्ण बोलतात हे त्यांचेकडून ऐकल्यामुळे आपण  त्यांना भेटावे अशी इच्छा झाली आणि आम्ही बेळगावला जाऊन त्यांना भेटलो आणि त्यानंतर ही भेट चालूच राहिली.

पाथरे सर गेल्यावर जी एक पोकळी आमच्या आयुष्यात निर्माण झाली होती ती कुसनूर सरांच्या कला विचारांनी समृद्ध झाली.

त्यांचे अमूर्त कलेविषयीचे विचार ऐकून आणि त्यावर मनन केल्यावर ते आमच्या मनात रुजू लागले आणि नंतर प्रत्येक चित्रप्रदर्शनात रसिकांच्या बरोबर झालेल्या चर्चेत या विचारांमुळे आम्हाला आमची चित्रे रसिकांना समजावून देता आली आणि आम्हाला देखील समजून घेता आली.

गेली दोन वर्षे  सर बरेच आजारी होते, परंतु जमेल तेव्हा ते चित्र काढत असत. एकदा तर हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी रंगाचे सर्व साहित्य मागून घेतले होते यातूनच त्यांना चित्र काढण्याचा आनंद केवढा मोठा आहे हे लक्षात आले असावे.

त्यांचे कलाविषयक प्रगल्भ विचार लोकांसमोर यावेत म्हणून दोन महिन्यापूर्वीच आम्ही चित्रविषयक असंख्य प्रश्न त्यांना विचारले होते आणि केवळ आठ दिवसातच त्यांनी सर्वांची उत्तरे सविस्तरपणे लिहून ठेवली होती.

त्यांनी केवळ आपल्या आनंदासाठी दोन ते तीन हजार चित्रे काढली आणि ती रसिकांना प्रेमाची भेट म्हणून दिली.

कला जगताचा अभ्यास करून त्याविषयी बोलणे, चर्चा करणे त्यांना खूप आवडत असे. त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा उपयोग आम्हा सर्वांना अमूर्त कलेजवळ जाण्यास खूपच उपयोगी ठरला आहे.

०००००००

“अमूर्त चित्र काढताना तुमच्या हाताशी असलेले रंगच तुमचा हात धरून पेपरवर फिरू लागतात आणि त्या बरोबर तुमचे मनही तरंगू लागते ” कुसनूर सर आम्हाला अमूर्त चित्राबाबत सामावून देत होते

” आणि कुठेतरी आपण वेगळेच आकार, रंग घेतले तर चित्रच तुम्हाला सांगते की काहीतरी चुकते आहे, एवढे तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. अशा प्रकारच्या चित्रात लयीला खूप महत्व असते. जसे संगीतात रोह- अवरोह असतात तसेच चित्रात यायला पाहिजेत .एका रंगातून दुसऱ्या रंगाकडे जाताना हळुवारपणे रंगसंगती बदलली गेली पाहिजे, ते दोन रंग किनाऱ्यावर अलगद मिसळले गेले पाहिजेत. नाइफमध्ये काम करताना नेहमी रंगाला एक जाडसर किनार येते, तेथे खूप काळजी घेतली पाहिजे. ”

” पण मग त्यातूनच आकार, खोली, लय निर्माण व्हायला पाहिजे ना ?” मी म्हणालो.

” त्या रंगात संगीतात जशी वीण असते तसे ते एकमेकात गुंफले गेले की आपोआपच आकार, खोली, लय इत्यादी निर्माण होतेच ” ते उत्तरले.

“एका रंगातून दुसऱ्या रंगात जाताना आर्टिस्ट वेळेचा आणि अवकाशाचा विचार करत असतो, तो खरेतर मिनिट भरचा असू शकतो, पण ज्या वेळेस चित्र पूर्ण होते त्या वेळी रसिक मात्र त्या रंगात  तासनतास अडकू शकतो. ही मनःस्थिती ज्या वेळी दोघांना कळते त्या वेळी ते चित्र जमले असे समजावे. मनातील भावनांना अनेक प्रकारच्या रंगछटा हव्या असतात, पण आपल्याकडे तसे रंग नसतात तरीही आपण चित्र काढतोच, कधी ते फसते तर कधी ते संपल्या नंतर कळते की किती छान सगळे जमले आहे. पिकासो म्हणायचा -“चित्र काढताना काही कळत नाही काय करतोय ते, संपल्या वरच कळते की काय झाले आहे “” आपण पेंटिंग करून ठेवतो पण ते कुणीतरी बघितले की ते त्याच्या मनात बहरू लागते, वाढू लागते त्यामुळे ते पेंटिंग स्वतःची एक जागा निर्माण करू लागते, प्रत्येक क्षणी ते बहरते. सकाळ, दुपार, संध्याकाळी ते वेगळे भासू शकते. ज्या वेळी पेंटिंग बघणाऱ्याला आपलॆसे करते त्या वेळी ते पेंटिंग चांगले झाले असे समजावे. ” त्यांनी चांगल्या पेंटिंगची व्याख्या सांगितली .

” पेंटिंगमधले सर्व रंग, आकार वेगवेगळे असले तरी प्रत्येकाला स्वतःचे असे वेगळे आस्तित्व असतेच, हे सगळे असून सुद्धा पूर्ण पेंटिंगलाही वेगळे अस्तित्व असतेच ना !”  मी म्हणालो.

” अगदी बरोबर ! त्या दोघांचे आस्तित्व एकमेकात इतके मिसळलेले असते की ते वेगळे काढता येत नाही ” ते उत्तरले , ” प्रत्येक पेंटिंगचे वेगळे ग्रामर असतेच, त्यामुळेच एकसारखी पेंटिंग करता येत नाहीत, नाहीतर ती कारागिरी होते, त्यात कला संपलेली असते. ते पेंटिंग स्वतः वेगळे ग्रामर घॆउन येते. यालाच क्रिएटिव्हिटी म्हणता येईल. हुसेन, बेंद्रे यांची पेंटिंग तुम्हाला नक्की ओळखता येतात कारण त्यात आकार ,रंग यात तोचतोचपणा आलेला कळतो, पण अमूर्त पेंटिंगचे तसे होत नाही, तिथे नियमानुसार काम करता येत नाही. काम कसे करावे याला काही नियम नसतोच त्या मुळे प्रत्येक वेळी नाविन्यपूर्ण कलाकृती निर्माण होण्याची शक्यता असते, अमूर्त पेंटिंगमध्ये प्रयोग करायला भरपूर जागा असते, निसर्ग चित्रात, पोर्ट्रेट करताना तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊन काम करता येते पण अमूर्त पेंटिंगमध्ये काम करणारा आणि करून घेणारा एकच असतो.
इथे चित्रकारच चित्र होऊन बसतो हीच अमूर्त चित्रातली सुंदरता आहे .”

दोन वर्षांपूर्वी सरांना देवाज्ञा झाली.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

शरद तरडे, पुणे 
दूरसंचार : ९४२२० १०४१८

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.