No products in the cart.
स्वातंत्र्याचे ऋण फेडण्यासाठी ‘बंधनव्रत’ घेणारे अमूर्त चित्रकार
अस्सल कलाकार कधीही आपल्या कलाकृतीला नियमांच्या चौकटीत बांधून घेत नाही. अमूर्त शैलीतील चित्रे साकारणाऱ्या चित्रकारासाठी तर अशी चौकट घालून घेणे हे अशक्य कोटीतील काम असते. पण नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम करणारे चित्रकार भगवान चव्हाण यांनी हे आव्हान स्वीकारले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी वर्षभर राष्ट्रध्वजाच्या मूळ आकाराची म्हणजे दोन बाय तिन फूट आकाराची अमूर्त शैलीतील ७५ चित्र साकारण्याचा दृढ निश्चय केला. एरव्ही चित्र काढताना ते कॅन्व्हॉसवर Oil Paints चा वापर करून अमूर्त चित्रे साकारतात. पण या उपक्रमात त्यांनी ही आपली ही नेहमीची कलरपॅलेट दूर ठेवून फक्त acrylic paints वापरूनच सर्व चित्र काढायचे ठरवले.
तुमच्या सारख्या अमूर्त चित्रशैली साकारणाऱ्या चित्रकाराने चित्राचा आकार आणि रंगांचा प्रकार आणि चित्रांची संख्या यांची चौकट स्वीकारायचं कारण काय? असं विचारल असता भगवान चव्हाण म्हणाले,
” देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी करावास पत्करला. विविध श्रेत्रांतील व्यक्तींनी सर्वस्व पणाला लावले. आज या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना कलाकार म्हणून मी काय करू शकतो. असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला. आजवर मी अमूर्त शैलीमध्ये मनाजोगती चित्र साकारली. नेहमीच्या चौकटीत न राहता प्रवाहाच्या विरुद्ध आयुष्य जगलो. कलाकार म्हणून मुक्त अविष्कार करण्याचे स्वातंत्र्य आणि निकोप समाजजीवन मला या देशाने दिले. त्यांचे प्रतिकात्मक ऋण फेडण्याचा एक प्रयत्न म्हणून आजवर कधीही चौकटीत न अडकलेल्या माझ्या कुंचल्याला एक वर्षभरासाठी चौकटबद्ध करण्याच ठरवल. आणि वर्षभराच्या कालावधीत फक्त दोन बाय तीन फूट आकाराची ७५ अमूर्त चित्र साकारण्याचं ठरवल. सुरुवातीला मला खूप तांत्रिक अडचणी आल्या. आकाराचं बंधन नकोस वाटायला लागलं. पण सुरुवातीची ८–१० चित्र साकारल्यावर मात्र मला त्या बंधनातही मुक्ततेचा आनंद गवसला.”
नियोजित ७५ चित्रांपैकी साधारण ४५ चित्रांचं काम आता पूर्ण झाल आहे. या चित्रांपैकी ३५ चित्रांचं प्रदर्शन बंगळुरूच्या कर्नाटक चित्रकला परिषदेच्या कलादालनात दि. ८ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणार असून ते १४ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. ‘चिन्ह’च्या ऑनलाईन आर्ट गॅलरीत देखील हे प्रदर्शन ८ ऑगस्ट पासून पाहता येईल. उर्वरित चित्रं पुढील तीन चार महिन्यात तयार होताच एकूण ७५ चित्रांचं प्रदर्शन चेन्नईमध्येच भरवलं जाणार आहे.
भगवान चव्हाण मूळचे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीचे. १९८० मध्ये ते जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये दाखल झाले. जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकत असताना यांनी ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. या पुरस्कार जिंकणारे ते जेजे मधील पहिले विद्यार्थी ठरले. या स्पर्धेमध्ये एम.एफ. हुसेन यांच्यासह देशातील नामवंत चित्रकारांची सहभाग घेतला होता यामधुन भगवान चव्हाण या विद्यार्थ्याचे चित्र निवडले जाणे हा बहुमान होता. जेजे मधील शिक्षण पूर्ण केल्यावर ते ललित कला अकादमीची शिष्यवृत्ती स्विकारून ते वर्षभरासाठी चेन्नईतील ‘चोला मंडल आर्टिस्ट्स व्हिलेज‘ मध्ये गेले. त्यानंतर फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते पॅरिसला उच्च शिक्षणासाठी गेले होते. तिथून परतल्यावर आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे चौकटीतील आयुष्य निवडून मुंबईत स्थायिक होण्याऐवजी त्यांनी चेन्नई शहर निवडलं. त्यानंतर काही कालावधीतच त्यांना ‘चोलामंडल या आर्टिस्ट व्हिलेज‘ मध्ये स्टुडिओ बांधण्याची संधी मिळाली . मधला काही काळ संघर्षाचा गेला . पण आता मात्र ते पूर्णपणे चित्रांमध्येच रमून गेले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त त्यांनी काढलेल्या या विशेष चित्रांचं हे प्रदर्शन त्यांच्या कारकीर्दीतलं महत्वाचं प्रदर्शन ठरलं तर आश्चर्य वाटू नये. ‘चिन्ह’च्या ऑनलाईन आर्ट गॅलरीमध्ये https://chinha.in/category/online-art-gallery/
८ ऑगस्टपासून तुम्ही या अनोख्या चित्रांचा आनंद लुटू शकता.
Related
Please login to join discussion