No products in the cart.
भूतकोला : एक दिवसाचे देव
प्रतीक सायकलवरून प्रवास करत करत दक्षिण भारतात शिरलाय. भाषेची अडचण असल्यामुळं संवाद साधणं अवघड झालं आहे. त्यामुळे मुक्काम करताना नानाविध अडचणी येतात. त्यातून वेळ काढून तो लिहितो आहे. त्यातलाच हा एक विशेष लेख.
लोककला म्हटलं का तिचं स्वतंत्र कला म्हणून अस्तित्व राहत नाही. ती कला जोडली जाते जीवनातील वेगवेगळ्या आयामांशी.
काही जाती-जमातीमध्ये विशिष्ठ जीवन प्रसंगाला वेगवेगळ्या कला करण्याची पद्धत आहे. लग्न प्रसंगी वारली आदिवासी वारली चित्रकलेचा चौक भरतात, मध्यप्रदेशात भिलाला, राठवा आदिवासी पिठोरा बाबाचा नवस फेडण्यासाठी पिठोरा चित्र काढतात. लग्नाच्या वेळी मिथीलांचलची लोकं मधुबनी चित्र काढतात. असं हे सगळं करमणुकी सोबतच कर्मकांडही जोडलेलं आहे.
भारतीय समाज अनेक जातींमध्ये विभागलेला समाज आहे. त्यामुळे ह्या लोककला सुध्दा जातीनिहाय विभागलेल्या दिसतात.लोककलांचा समग्र आढावा घ्यायचा असेल तर हे जातीपातीचं अस्तित्व दुर्लक्षित करणं शक्य नाहीच. गुजरातच्या कच्छ भागात सोळापेक्षा जास्त जमाती राहतात. त्यांच्यामध्ये भरतकाम खूपच खास केलं जातं. त्यांचे रीतीरिवाज त्या भरतकामाशी जोडलेले आहेत. पण हे भरतकाम सुध्दा येवढे जातीनिहाय निगरगट्ट आहे की, त्या सोळा जातींपैकी एकही जात दुसऱ्या जातीची शैली वापरत नाही. अर्थात त्यांच्या कपड्यावरच्या भरतकामावरून त्यांची जात ओळखणे सहज शक्य होते. मग अनेकदा जाती टिकविण्यासाठी आणि तिला सुधृढ करण्यासाठी सुध्दा लोककला वापरात येते की काय असे वाटते.
दृश्यकलेत हा प्रकार कमी दिसतो. आता वारली चित्रे, मधुबनी चित्रे लोकं हौशीने काढतात. पण सादरीकरण कला प्रकारात भारतभर हे खूप प्रकर्षाने जाणवते. ठराविक जातीनेच ठराविक कला जोपासायच्या असा प्रकार दिसून येतो. वासुदेव दुसरा कोणत्याही जातीची व्यक्ती होत नाही. यावर लेखक राजन खान महत्त्वाचं बोलतात.
-(लोककला या मुळात लोककला नाहीत, जातीय कला आहेत. त्या कला त्या जातींनीच सांभाळायच्या, म्हणजे जाती घट्ट राहण्याची व्यवस्था, ज्यांना या कला सुंदर वाटतात, त्यांनी आपल्या अंगावर या कला घ्याव्यात आणि त्या जाती ज्या दिनक्रमात जगतात, तसं संपूर्ण आयुष्य जगावं, मग या कला अधिक सुंदर होतील. आपलं तथाकथित उच्च जातीय आवरण सांभाळत या जातिगत लोककला सुंदर आहेत आणि त्या टिकल्या पाहिजेत आणि आमच्या दारात आल्यावर त्यांना आवर्जून मदत करतो असं म्हणणं हा थिल्लर भोंदूपणा आहे. तुम्ही या लोककलांचे अवतार अंगावर घालून आयुष्यभर लोकांच्या दारात भिका मागून दाखवा, मग म्हणता येतील या लोककला सुंदर आहेत असं. आणि लोककलांचा एवढा कळवळा आहे, तर, देशातल्या सर्वच लोकांनी या कला आपल्या घरात अंगिकारल्या पाहिजेत.
वासुदेवाला जात असते, सगळ्याच लोककलांना जाती असतात, सांताक्लॉजला नसते. त्यांच्यातलं कुणीही सांताक्लॉज होतं. आणि मुळात सांताक्लॉज हा जगण्याचा त्यांचा धंदा नाही. भारतीय लोककला हा जातीय पोट भरण्याचा धंदा आहे. तसं भारतात कुणीही, कोणत्याही जातीची माणसं कोणतीही लोककला आयुष्यभर सांभाळू लागली, तर मग खऱ्या अर्थानं त्या लोक-कला होतील. ते होईपर्यंत तुम्ही आपले उच्च जातीय सौंदर्याचे दंभ सांभाळत बसा. -राजन खान)
असा हा सगळा आपल्याकडे जांगडगुत्ताच आहे एकंदरीत.
दक्षिण भारतात दृश्यकलेबरोबर अनेक विभिन्न ,अक्राळविक्राळ, सुंदर, मनमोहक नृत्य आणि नाट्य प्रकार ही आहेत. त्यातलाच एक केरळ मधे प्रकार आहे तेयम. हा तेयम प्रकार वर कर्नाटकात येतो तेव्हा थोड्या अधिक फरकाने बदलतो आणि लोक त्याला भूतकोला म्हणतात. भूतकोला म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अंगात येण्याचा प्रकार पण त्यासोबत अक्राळविक्राळ वेशभूषा , मुखवटे आणि अगम्य अभिनय आणि नृत्य ह्याचं मिश्रण आहे.
इथे मी दक्षिण कर्नाटक मध्ये आहे. ज्याला तुळूनाड पण म्हणतात. इथे अनेक ग्रामदेवता आहेत. या कोला प्रकारात यापैकी काही ग्रामदेवता अंगात येतात आणि मग लोकं त्यांचं गाऱ्हाणं मांडतात . त्या देवता ही निवारणाचं आश्वासन देतात. हे सगळं अभिनयातून चालू असतं. कुठेही शब्द बोलला जात नाही. पाठीमागे जोरजोरात वाद्य वाजत असतात. अनेकदा या देवता पेटत्या मशाली घेऊन नाचतात. संध्याकाळचे वातावरण असते. सगळं कसं रोमांचकारी गूढ वातावरण केलं जातं. देवतांचे वेष हे खूप भव्य असतात, चेहरे रंगवलेले, अतिमानवीय दिसण्यासाठी नारळाच्या कोवळ्या फांद्या वापरून अंगाभोवती मोठा गोलाकार देखावा केला जातो. पूर्ण दिवस जातो हे सगळं बनवायला. सकाळपासून हे कलाकार एक एक गोष्ट हाताने बनवतात.
यात शिल्पकलेचा अंतर्भाव येतो तो देवतांचे मुखवटे करताना. हे मुखवटे पितळी असतात. एक मुखवटा जो वराह मुखी असतो ती पांजुरली देवता, जुंमादी म्हणजे वर स्त्री आणि खाली पुरुष अशी एक देवता, कोट्यादा बब्बु स्वामी अश्या अनेक देवता असतात. रंगभूषा वेशभूषा सुरू असते तेव्हापासून हे सगळं बघणं एक वेगळाच भन्नाट अनुभव असतो. मी जरांदाया या देवाच्या मंदिरात हा भूतकोला पाहिला. शेवटी इथे त्या देवाचा मोठा लाकडी रथ सगळे गावकरी ओढतात. हा रथोत्सव इथे जवळपास सगळ्या मंदिरामध्ये होत असतो.
हे सगळं होत असताना कलाकारांच्या आणि ग्रामस्थांच्या मी मुलाखती घेत होतो. तेव्हा एक वरिष्ठ ग्रामस्थ मला म्हणाले आमची ही खूप मोठी परंपरा आहे. हे भूतकोला करणारे लोक खालच्या जातीचे असतात पण पहा आज एक दिवसासाठी ते देव होतात. येवढं महात्म्य आहे या परंपरेचे.
एक दिवसाचे देव….. हे ऐकल्या बरोबर माझ्या मनात चटकन उरलेल्या ३६४ दिवसाचं काय हा प्रश्न तरळला…
प्रतिक,
कला प्रवास
Related
Please login to join discussion