No products in the cart.
अनुत्तरित काळा कॅनव्हास
चंद्रकांत चन्ने यांनी बाल चित्रकला क्षेत्रात विलक्षण असं काम करून ठेवलंय. सगळीकडे मोठ्यांच्या जगात आपलं अस्तित्व तयार करण्याची चढाओढ सुरु असताना चन्ने यांनी छोट्यांचे जग समृद्ध करण्याचं वेगळेपण जपलं. असंच वेगळेपण जाणवतं ते चन्ने यांचा कवितासंग्रह वाचताना. मुखपृष्ठापासून हा वेगळेपणाचा प्रवास आतील कविता, बोधचित्रे बघतानाही जाणवतो. हे नुसतं वेगळेपण नाही तर त्याला कल्पकतेची, सौन्दर्यदृष्टीची जोड आहे. रंगांच्या भाऊगर्दीत काळा रंग उठून दिसत असला तरी तो काहीसा दुर्लक्षित राहतो. अनेक जण त्याला नाक मुरडतात, पण या काळ्या रंगाचं गूढपण चन्ने यांनी जाणलं आणि त्याचं वैविध्यपूर्ण रूप आपल्या कवितांमधून मांडलं आहे. विजय प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या ‘अनुत्तरित काळा कॅनव्हास’ या कवितासंग्रहाचा परिचय वाचकांना करून देत आहेत प्रतोद कर्णिक.
काळा म्हणजे… …
माझ्या आईच्या गर्भात असलेला…..
सुरकुतलेला पण उबदार…..
जिवंत आभास…..
या ओळी वाचल्या की, आपल्याला त्या आपल्याला न आठवणाऱ्या आईच्या गर्भातल्या नऊ महीने अनुभवलेल्या अनुभूती पर्यंत नकळतच घेऊन जातात. आणि आईची, तिच्या उदरातली ती उब, ती अनुभूती परत एकदा जाणवून, आपल्या डोळ्यांच्या कडा पाणावतात… काळाच्याही पलीकडचा हा काळा, काळ्या कुट्ट काळोखाची ही एक लहानशी पण विलक्षण सफरच आज आपण करणार आहोत. या काळ्या रंगात दडलेल्या भावनांच्या अनेकविध छटा, त्यांच सौंदर्य, हे उलगडत, अमुर्ताकडे नेणाऱ्या या कवीता. ज्यांनी आपल्याच कैफात, कलेच्या नभांगणात दैदीप्यमान वाटचाल करत आपल्या कलेनी जग पादाक्रांत केलं त्या कलातपस्वी, गुरुवर्य प्रभाकर कोलते सरांची या काव्यसंग्रहाला लाभलेली प्रस्तावना अतिशय वाचनीय आणि या काळ – यात्रेच नेमकं मर्म उलगडणारी आहे.
गुरुवर्य कोलते सरांना, या कवितांतून आणि चित्रांतून कविचं हे व्यक्त होणं, जगप्रसिद्ध फ्रेंच चित्रकार पॉल गोगां यांच्या चित्रांच्या अभ्यासाची, ध्यासाची अभिव्यक्ती असल्याच जाणवतं. प्रस्तावनेतच, आपलं मनोगत सांगताना कवी चंद्रकांत चन्ने सरांनी, ” माझी माय जगली, ती निव्वळ काळ्याच्या आभासाने. काळ्या वरील प्रेमाच्या अतिरेकाने.” असं सांगत, “माझ्यातील तिची ही काळी अभिव्यक्ती तिच्या उबदार काळ्या गर्भातूनच मिळालेली देणगी आहे.” असं कथन केलं आहे. यातून चन्ने सरांना आपल्या विदर्भातील साध्याभोळ्या माय बद्दल किती जिव्हाळा आहे, हे या कवितांमधून जितकं ठायी, ठायी जाणवतं…. तितकचं… सरांच बालपण हे किती त्रासात, यातनांतून गेलं असावं हे लक्षात येतं.
आजवरच्या वाटचालीतही त्यांची आई हीच त्यांची प्रेरणा बनून कायमच त्यांच्या बरोबर राहिली आहे, हे सुद्धा यातल्या सुरवातीच्या काही कवितांमधून जाणवतं. आपल्या आयुष्याचा प्रवास पंच्याहत्तर वर्षांपूर्वी विदर्भातून चालू केलेल्या सरांनी, आयुष्यातल्या प्रत्येक टप्यावर, सुख, दु:खात, ‘आपल्या मायची देन’, असलेल्या या “काळ्याला” कायमचं उराशी कवटाळत आपली वाटचाल केली, हे या कविता संग्रहातून आपल्या मनाला भावतं.
“माझा काळा कॅनव्हास, मी कधीच रंगवला नाही, तो लिहिला….” असं म्हणतं सर आपल्याला अमूर्त काळ्या रंगाच्या सफरीवर हाताला धरुन अगत्यानी घेऊन जातात. “काळी पोत” या कवितेत, गावाकडली एक नात्यातली आजी नवजात नातवाला बघायला येते, आणि कडाकडा बोटं मोडत, एक काळी पोतं नातवाच्या गळ्यात घालते… त्या क्षणी , परत सरांच मन आपल्या लहानपणाकडे धाव घेते आणि आपली मायचं आपल्या पणतूचं कौतूक करायला आली असं त्यांना वाटत रहातं.
यातले शब्द…
“गावाकडली बुढी,
माझ्या नव्या नातवाला पहायला आली… “
यातला वैदर्भीय भाषेचा सहज गावरान मोकळेपणाही वाचताना आपल्याला आवडतो. या कवितां बरोबरच या अनुभवांना आपल्या कुंचल्यातूनही चन्ने सर पानापानात व्यक्त करतात. तेव्हा त्या काव्यातली भावछटा, अमूर्तता, विरोधाभास, विसंगती सगळचं फारच उत्तम प्रकारे ते आपल्या पर्यंत पोहचवतात. खरं तर या काव्या इतकीचं त्यांची ही चित्र अभिव्यक्ती सुद्धा या कविता संग्रहाला एक वेगळचं परिमाण देते.
“काला खट्या
तुला कवटाळण्याच धाडसही नाही तिच्यात ……
तुळशी वृंदावनही काळं रंगवण्याच तिचं वेड
तिला आप्तापासून दूर घेऊन गेलं”
असं आईच्या आठवणीने भावविवश होत सर लिहितात… तेव्हा त्यातल्या दुःखाला कुठलीच मोजपट्टी नसते. ते शब्दांतून भळभळत रहातं.
“तुझं लेकरु काळकुट्ट झालं तरच वाचेल
असं सांगणाऱ्या
मांत्रिकाचा शोध घेत
फिरते आहे ती भ्रमिष्टासारखी”……..
हे वाचून आपणही गलबलतो. मायची अपार माया आणि गावंखेड्यातलं विदारक वास्तव दोन्हीही चन्ने सर या कवितेतून दाहकपणे समोर ठेवतात.
“काळ्या चौकटीतलं बालपण…”
“बालपण?… कुठलं बालपण?…
बालक, शिक्षक, पालक या बर्म्युडा ट्रॅंगलमधे
अदृश्य झालेले?…”
यातला कवी म्हणजे एक लहान मुलांना घडवण्यात आपलं आयुष्य झोकून देणारे शिक्षक चन्नै गुरुजी या शिक्षण पद्धतीतल्या विसंगतीवर बोट ठेवताना आपल्याला दिसतात. पण… समाजातली दांभिकता आणि कुटुंबावर, बाल मनावर त्याची पडणारी गडद, काळी सावली या दोनही गोष्टी सरांच्या कवितेतून विलक्षण ताकदीने प्रकटतात.
” माझी प्रत्येक कृती…
आणि आईचं गहिवरणं
जुने हातमोजे आणि
बापाचा फाटका गंजीफ्रॉक कवटाळून…
निद्रानाश झाला तिला….”
या ओळी वाचताना त्यातले शब्दांच्या पलिकडले दु:खाचे कढ आणि दाह आपलंही मन विदिर्ण करतो.
” या अंधाऱ्या खोलीत
कुलूपबंद संदुकांत
एका बाळाचे बुट
सोन्याचं डोरलं
माझी सगळी आसवं
तुटलेले काळीज
आणि प्रखर कभिन्न काळा”
आयुष्यातल्या अलवार भूतकाळाच्या खूणाही सरांना त्या काळ्याच्या अथांगाकडे नेत रहातात. आपल्या बालपणातून युवा विद्यार्थी दशेत येतानाही या काळ्यानीच सावली बनून त्यांची सोबत केली होती. “छतीम वृक्षाच्या सावलीत” या कवितेत गुरुदेव रविंद्रनाथ यांच्या शांतिनिकेतन मधल्या दिवसातही, नंदलाल बोसांची आणि मनीदांची शामली… सरांना भुरळ घालत होती.
या कवितेतलं
” दृष्टिहीन विनोद बिहारींची भित्तिशिल्पे
स्पर्श संवेदनशीलतेची परिसीमा ……
कलाभवन बोलकं करुन गेला”
या ओळी काळ्या कुट्ट अंधाराच्या रुपेरी कडेसारख्या भासत रहातात. काळ्यातून डोकावणारी निराशा इथे आशेची शाल पांघरुन काळावरही मात करताना दिसते. या काळ्याचं अस्तित्व कवीच्या मनाला भारुन टाकत असलं तरीही या काळ्याची निर्मिती ही सप्त रंगांच्या एकरुपतेतूनच तर होत असते, हे वास्तवही या कविता नाकारत नाहीत. कधी काळ्या कावळ्याच्या रुपात ‘काळा’ कर्कश्य ओरडतो तेव्हाही चन्ने सरांमधला पुरोगामी त्या कावळ्याचा आणि पींडाचा संबंध हा तिरकसपणे अधोरेखित करत, समाजाची दुबळी मानसिकता दाखवून देतो. “काळी राखण” , “काळा कापूस” या कविताही काळ्या रंगाच्या गडदते बरोबरच समाजातील दांभिक मानसिकतेवरही बोट ठेवते. समाजातील विषमता आणि दांभिकता, खोटेपणा या काळ्याच्या मागे लपून बसतात, हा विषादही आपल्याला या कवितांमधून जाणवत रहातो. काळ्या कागदाचे फुल… या कवितेतून सरांच गुरुदत्त बद्दलच प्रेम आणि त्याच आपल्या आयुष्याला अवेळी कालप्रवाहात ढकलून देणं… याचा विषाद हे दोनही दिसतं.
गंभीर पण प्रसन्न…कागज के फुल
पहिला भारतीय सिनेमास्कोप
आणि तू निर्देशित केलेला… शेवटचा
यातला … “शेवटचा”, हा शब्द आपलही काळीज चिरत जातो.
मित्रांनो, चन्ने सरांचा हा काळ्या गडद रंगांबरोबरचा सगळा कला आणि काव्य प्रवास इथे उलगडणं शक्यही नाही आणि तो माझा प्रयत्नही नाही. आपण या प्रवासातला काही भाग आत्ता पहात आहोत. या कविता संग्रहातून, त्यातल्या प्रत्येक काव्यातून, चित्रातून, या काळ्याला किती भिन्न रुपकात सरांनी लिलया शब्दबद्ध केलाय, ते आपल्याला या पुस्तकाच्या वाचनातूनच, उलगडत जाईल. आणि मग या भयावह काळ्याची ही समाजातील वास्तव दाखवणारी विविध रुपं आपल्याही मनाचा वेध घेतील.
“एक अनुत्तरित कॅनव्हास”… या कवितेत
“कुठून आलोय मी?….
कोण आहोत आम्ही?…
कुठे जाणार शेवटी?…
या ओळी “कोहम्?!” या मानवी मनाला पडलेल्या सनातन प्रश्नावर येतात.
इथे सरांची प्रेरणा… पॉल गोगांही आपल्याला चन्ने सरांच्या शब्दातून भेटतो…
ताहितीच्या परिसरातील चित्र निर्मिती
पॉल गोगां…
तुला प्रचंड प्रसिद्धी देऊन गेली
असा हा जीवन प्रवासाचा कॅनव्हास, हा कितीही रंगांनी रंगला तरीही सगळ्याची बेरीज ही काळ्यातच सामावणारी ! आणि आपल्या आयुष्याचा “कोण मी?…” पासून सुरु झालेला हा प्रवास शेवटच्या क्षणी पडणाऱ्या, “कुठे जातोय मी?….” या प्रश्नापर्यंत अनुत्तरितच रहात असतो…थोर चित्रकार, कला अध्यापक, गुरुवर्य चन्ने सरांच हे नव्यानी भेटणार, ‘कवी चंद्रकांत चन्ने’, हे रुप या त्यांच्या काव्या इतकचं विलक्षण आणि थक्क करणारं आहे.
‘अनुत्तरित काळा कॅनव्हास’ हा कविता संग्रह खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
*****
– प्रतोद कर्णिक, ठाणे.
Related
Please login to join discussion