No products in the cart.
बोलकी चित्रे : चित्रकवितांचा नाविन्यपूर्ण देखणा आविष्कार
‘Chinha Art News वरील ‘शब्दचित्र’ या चित्रकलाविषयक पुस्तक परिचयाच्या सदरातील हा दुसरा लेख. कवी उदय भिडे यांच्या ‘बोलकी चित्रे’ या चित्र, छायाचित्र आणि कविता यांचा अनोखा मेळ असलेल्या ‘सृजनसंवाद’ प्रकाशित देखण्या पुस्तकाचा चित्रकार रामदास खरे यांनी करून दिलेला हा परिचय. सोबत या पुस्तकातील काही चित्रांचाही समावेश केला आहे.
***
सोन कोवळी भरुनी लादली किरणे तिसरीवरती
दाट वनाची काजळमाया आणखी एकीवरती
पहा जाहली सज्ज होडकी सुशांत डोहावरती
अमूप धन हे वाटत जातिल प्रकाश- वाटेवरती!
एखाद्या निवांत वेळी पुस्तकात बंदिस्त झालेल्या त्या कवितेच्या ओळी तनमनात झिरपून द्याव्यात, डोळे मिटून ध्यानस्थ बसावे, मनःचक्षू समोर कवितेतला तो सारा परिसर, ते अनुपम दृश्य डोळ्यासमोर लक्ख उजळावे आणि कवितेला जवळ करावे यासारखा दुसरा परमानंद नाही. कविता वाचताना, भोगताना माझ्यासारखी अनेकांची अशी अवस्था नक्कीच होत असेल.
अनेकदा असं होतं की, कवितेत वाचकाला चित्र दिसू शकते किंवा एखादे चित्र न्याहाळताना आणि तो जर कविमनाचा असेल तर त्याला त्यात अनुरूप शब्दही दिसतात, कधी तर अख्खी कविताही दिसते. जणू हा उनपावसाचा रमणीय खेळ. ती कविता वाचकाशी जणू चित्रमय संवाद साधते. आणि जर ती कविता आणि हे चित्र वाचक रसिकाला एकाचवेळी मनःचक्षू समोर तरळले तर? ती अनुभूती वाचकाला विलक्षण ठरते. वाचक रसिक शब्दचित्राच्या अवकाशात स्वतःला हरवून जातो. कवी आणि चित्रकाराचे हे अद्भुत मिलन नक्कीच सुखदायक ठरते.
एखादा संवेदनशील कलाकार वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत असतो. कधी कधी जे शब्दांमध्ये व्यक्त करणे अवघड असते तिथे एखादा चित्रकार मोजक्या रंगरेषांच्या माध्यमातून कॅनव्हासवर व्यक्त होऊन जातो. आणि जेव्हा रंगरेषांना देखील मर्यादा पडतात तेव्हा एखादा कवी चार ओळींमध्ये ती अनुभूती नेमक्या शब्दात कागदावर मांडून जातो. कवी चित्रकाराचे हे एक अद्वैत नाते आहे. चित्रांवर कविता ही संकल्पना नवीन नाहीच. अनेकांनी असे प्रयोग केले आहेत आणि ते यशस्वी देखील झाले आहेत. ठाण्याचे कवी, अनुवादक उदय भिडे यांचा नुकताच सृजनसंवाद प्रकाशनाकडून ‘बोलकी चित्रे‘ या शीर्षकाचा देखणा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. यामध्ये भिडे यांना भावलेली आणि कवितेची शक्यता असलेली निवडक चित्रं निवडून त्यांनी त्यावर कविता केल्या आहेत.
संग्रहात पेंटिंग बरोबरच काही फोटोग्राफ्स देखील आहेत. संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चित्रांच्या पार्श्वभूमीवर भिडे यांची कविता आपल्याशी संवाद साधते. त्यामुळे चित्रामध्ये लपलेली कविता आणि कवितेत लपलेले चित्र यामध्ये वाचक रसिक तद्रूप होतो. एकाचवेळी चित्रं आणि कविता वाचकाशी संवाद साधू लागतात. एकूण बेचाळीस चित्रकविता वाचकाचे भावविश्व समृद्ध करते. संग्रहात निसर्गचित्रांचे प्रमाण जास्त दिसते. कविता आणि चित्रं दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. मात्र काही वेगळ्या कविता आहेत आणि ती चित्रं देखील! उदा.
खिन्न मनाच्या अथांग डोही
साचलेत रे अश्रू काही
अश्रुमागची व्यथा तरीही
कळली नाही तुला कधीही (पृ-३५)
छद्म-माणुसकीच्या, अधर्मी-धर्माच्या,
कच्च्या तत्वविचारांच्या, आणि
आणखीही कसल्या-कसल्या कप्प्यांमधून
प्रतिध्वनित होणारे शब्द
तुझ्या गळ्यातून उमटताना ऐकू येतात… (पृ-३१)
खांद्यावरला हात सांगतो
ही तर विश्वसण्याच्या वेळ
दुसऱ्या हात तोच भासतो
तिहेरी काट्यांवरचा खेळ! ( पृ-३८)
अशा कवितांच्या संदर्भात कवी भिडे यांनी निवडलेली चित्रेही वेगळी आहेत. मात्र एक शक्यता इथे जाणवते. त्या चित्रांमध्ये कवी भिडे यांना अभिप्रेत असलेला अर्थ वाचक रसिकांना मात्र नव्याने किंवा वेगळाच गवसण्याची शक्यता आहे. चित्रकवितांची हीच तर गंमत आहे. १९९८ पासून कवी भिडे यांना विविध चित्रकारांच्या चित्रांवर कविता करण्याचा जणू छंद जडला. फेसबुक आणि इतर ठिकाणी त्यांच्या या कविता प्रसिद्धही झाल्या. आता त्याचा संग्रह वाचकांसमोर देखण्या स्वरूपात आला आहे. उदय भिडे यांची शब्दकळा विलक्षण आहे. सहसा कानावर न पडणारे काही जुन्या काळातील शब्द आपल्याला चकित करतात आणि आपण नकळत त्या अर्थाचा शोध घेतो. उदा. रुधिर, मेदिनी, वासरमणी, दिक- सौधावरी, सायुजसिद्धी, कषाय-पात्री.
या संग्रहात चित्रकारांच्या नावांचा उल्लेख कुठेतरी असणं आवश्यक होतं. पण आपल्या मनोगतातून कवी भिडे यांनी आपल्या चित्रकवितेचा प्रवास त्यांचा मित्र दिलीप गोलम यांनी पाठवलेल्या चित्रापासून झाल्याचे कळते. या सुंदर कविता संग्रहाची पाठराखण प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी मोजक्या शब्दात केली आहे.
ते म्हणतात ‘उदय भिडे यांनी या चित्रांना रसिकांसाठी बोलके केले आहे. ‘बोलकी चित्रे’ हे पुस्तक केवळ कवितेसाठी नव्हे तर चित्रांमधली अंतस्थ अर्थासाठी परत परत न्याहाळावे इतके बोलके आणि देखणे झाले आहे.’ आणि ते अगदी खरे आहे. आर्ट पेपरवर ही चित्रे, कविता उत्तम मांडणीद्वारे छापल्या आहेत. त्यामुळे हा कवितासंग्रह एखाद्या कॉफीटेबल बुकसारखा देखणा, नाविन्यपूर्ण झाला आहे. सृजनसंवाद या धडाडीच्या प्रकाशन संस्थेची ही सव्वीसावी निर्मिती तितकीच दर्जेदार आहे. मंदार नेने यांनी केलेली मांडणी व साकारलेले मुखपृष्ठ उत्तम आहे. या सर्वांगसुंदर संग्रहाला वाचक रसिकांचा, चित्रकारांचाही उत्तम प्रतिसाद लाभेल असा विश्वास वाटतो.
– रामदास खरे, ठाणे.
- बोलकी चित्रे ( कवितासंग्रह )
- कवी : उदय भिडे
- प्रकाशक : सृजनसंवाद, ठाणे.
- पृष्ठे : ४८, मूल्य : २५०/-
- कवितासंग्रहासाठी संपर्क : ९८२०२७२६४६
Related
Please login to join discussion