No products in the cart.
बॉम्बे आर्ट सोसायटी: गल्लाभरू की समाजसेवी?
बॉम्बे आर्ट सोसायटी वार्षिक कला प्रदर्शनाच्या चित्र निवड प्रक्रियेमध्ये पैसे खाते या आशयाचं एक पत्र एका चित्रकाराने सोसायटीच्या अध्यक्षांना लिहिलंय. हे निनावी पत्र सध्या समाजमाध्यमांवर फिरतंय. (हे पत्र संपादित स्वरूपात वाचकांसाठी इथे देत आहोत.) या पत्रातील काही बाबींमध्ये तथ्य आहेच, पण नाण्याची दुसरी बाजू बघणेही तितकेच गरजेचे आहे. मुळात बॉम्बे आर्ट सोसायटी ही नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे . १८८८ मध्ये कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या साठी तिची स्थापना झाली. आपल्याकडे सगळ्याच संस्था चांगल्या हेतूने सुरु होतात पण जसा काळ पुढे सरकतो तसे त्यात मग राजकारण, भ्रष्टाचार यासारख्या नको त्या गोष्टींची घुसखोरी होते. बॉम्बे आर्ट सोसायटी तरी त्याला कशी अपवाद असणार? असे असले तरी पत्रात चित्रकाराने जो आक्षेप घेतला आहे तो चित्राच्या एंट्री फी संबंधी आहे. खरं तर कुठलीही खाजगी संस्था चालवायची म्हणजे प्रचंड पैशाची गरज असते. हा निधी आणायचा कुठून? चित्रकलेच्या बाबतीत दानशूर लोक देखील नेहमी हात आखडता घेतात यात कुठलीही शंका नाही. मग अशा वेळी अशी एखादी संस्था चालवणे हे पांढरा हत्ती पोसण्याइतके जिकरीचे ठरते. मुंबईसारख्या ठिकाणी जागांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. शिवाय सोसायटीच्या इमारतीचा मेंटेनन्स, कर्मचाऱ्यांचे पगार या सगळ्या गोष्टीना जो पैसा लागतो तो सोसायटीने कुठून उभारावा हा प्रश्न आहे. मग हा पैसा वार्षिक प्रदर्शनाच्या प्रवेश शुल्कातून उभारण्याचा प्रयत्न केला जातो.
अशा पद्धतीने पैसा उभारणे संस्था आनंदाने करत नसणार. पण इतरही मार्गांचा संस्थेने विचार करावा. ६०० रुपये शुल्क भरणे हे नवीन कलाकाराला अडचणीचे असते. त्यात जर दोन ते चार कलाकृती द्यायच्या असतील तर प्रवेश शुल्क २००० रुपये पर्यंत वाढते. जर चित्र निवडले गेले तर ते फ्रेम करणे, संस्थेला कुरिअर करून पाठवणे या सर्व खर्चिक बाबी आहेत. त्यामुळे ही फी कमी करता येईल का हे बॉम्बे आर्ट सोसायटीने बघावे. त्याचबरोबर, अनेक प्रस्थापित कलाकार हे बॉम्बे आर्ट सोसायटीचे सभासद होणे टाळतात. खरं तर नाममात्र शुल्क भरून बॉम्बे आर्ट सोसायटीचे सभासद होता येते पण किती कलाकार उत्सुकता दाखवतात हा प्रश्नच आहे. त्यामुळे कलाकारांनी याही बाजूचा विचार करणे गरजेचे आहे. शेवटी संस्था ही सामूहिक मदतीवर चालत असते आणि प्रस्थापितांनी जर सढळ हाताने मदत केली तरच नवोदितांना भरावे लागणारे शुल्क कमी करता येईल.
शेवटी एका चित्रकारानी लिहिलेले पत्र इथे संपादित स्वरूपात वाचता येईल.
आर्ट सोसायटींच्या प्रदर्शनांच्या एन्ट्री फी संदर्भात 👉 कलावंतांची चाललेली लुटमार…
प्रती
कमिटी मेंबर, चेअर पर्सन आॕफ बाॕम्बे आर्ट सोसायटी / आर्ट सोसायटी आॕफ ईंडीया
यांस ..
आपली संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून कलावंतांसाठी जहांगीर आर्ट गॕलरीत वार्षिक प्रदर्शन आयोजित करते हे स्तुत्य आहेच, परंतु या प्रदर्शनासाठी तुम्ही कलावंतांची जी प्रवेश शुल्काच्या नावाने लुटमार करतायत ती थांबवावी..करोनामुळे भल्या भल्या उद्योगपतींचे धंदे बुडाले! कलाक्षेत्र तर अनेक वर्षांपासून मंदीच्या नावाखाली कोमेजले आहे, त्यात थोडी हालचाल होते ना होते तर करोनाने घात केला.
तर मुद्द्यावर येऊया, करोना काळात अनेक कलावंतांना कितीतरी दिव्यातून जावे लागले आहे..त्यामुळे अनेक कलावंतांची प्रवेश शुल्कासंबंधी कुजबुज चालू आहे..
कलाकार मित्रांनो बाॕम्बे आर्ट सोसायटीच्या वेबसाईट वर बघा जरा, मागच्या वर्षी ३५०० पेक्षा जास्त एंट्री आलेल्या. त्यातील प्रदर्शनासाठी 500 कलाकृती निवडल्या गेल्या. पण ज्या कलाकृती रिजेक्ट झाल्या त्या प्रवेशिकांचे पैसे मात्र बॉम्बे आर्ट सोसायटीच्या गल्ल्यात जमा झाले. निंदनीय आहे हे.
एका एंट्रीसाठी 600
चार एंट्रीसाठी 2000..
बरं आता हिशोब बघा! 3500 एन्ट्री आल्या, म्हणजे 3500 x 600 = 21 लाख ……गरगरलं ना डोकं ..म्हणजे रिजेक्टेड कलावंतांचे 18 लाख रुपये सोसायटीच्या गल्ल्यात जमा..ग्रेट ना..सोसायटीच्या कमिटीवर असलेले कलावंत पण संघर्षातून वर आलेत त्यांना नाही का लाज वाटत असे पैसे उकळायला? बरं अवॉर्ड विनिंग कलावंतांना मिळणारे पैसे हे अनेक दानशूर लोकांनी दान दिलेले किंवा प्रायोजित केलेले असतात..
फक्त डिजिटल इमेज बघून रिजेक्ट करण्याची प्रोसेसिंग फी एवढी ? पूर्वी पेंटींग सिलेक्शनसाठी थेट पेंटींग मागवायचे. त्यात नक्कीच कष्ट होते पेंटींग हॕण्डल करायचे वगैरे ..पण ईथे सर्व बैठ्या जागी ऑनलाईन असताना प्रवेश शुल्काच्या नावाखाली गल्ला भरायचं काम चालू आहे..अनेक कलावंतांना एवढी फी भरणं पण भारी पडतं. लांबच्या गावच्या कलाकारांच्या तर अजून वेगळ्या कहाण्या आहेत. पेंटिंगची फी भरणे, निवड झाली की फ्रेमींग, ट्रान्सपोर्ट, पेंटिंग परत घेऊन जायचा खर्च! ते पण बऱ्याचदा फुटलेल्या फ्रेमसकट! ..हे सर्व नाईलाजानं करावं लागतं, कारण जहांगीर सारख्या ठिकाणी पेंटिंगची विक्री झाली किंवा बक्षीस मिळालं तर तेवढाच खर्च सुटेल असा विचार करणारे भाबडे कलावंत बरेच आहेत…
या सोसायटींनी प्रफुल्ला डहाणुकर फाउंडेशनचा आदर्श ठेवावा. त्यांनी केलेला नियम अतिशय स्तुत्य आहे. प्रफुल्ला डहाणूकर फाउंडेशनच्या नियमाप्रमाणे कलाकृती जर रिजेक्ट झाली तर तिचे प्रवेश शुल्कही परत मिळते.
रिजेक्टेड कलावंतांची 18 लाख फी जमावताय राव ?? अवॉर्ड तरी इतक्या रकमेचे आहेत काय ? आमच्या सांगली कोल्हापुरच्या कलाकारांच्या पण लय डोक्यात गेलाय तुमचा कारभार….कमिटीवर बसलेल्या कलावंतांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्ही सुद्धा संघर्षातुन वर आला आहात त्यामुळे रिजेक्टेड कलावंतांची फी परत करावी किंवा जुजबी फी घ्यावी. किंवा जी फी घेतायत त्यात 50% कपात करावी.
ही सर्व कलावंतांकडून तुम्हाला कळकळीची विनंती!
आपल्यातलाच एक कलावंत
*****
सर्व फोटो बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वेबसाइटवरून साभार.
Related
Please login to join discussion