No products in the cart.
शांतिनिकेतन: एक अद्भुत चित्रकाव्य
‘चिन्ह’ आर्ट न्यूज वरील ‘शब्दचित्र’ या नव्याने सुरू झालेल्या सदरातील हा पहिला पुस्तक परिचय. ‘शांतिनिकेतन’ या अद्बभूतरम्य परिसरात २ महिने वास्तव्य करून कलासाधना करताना आलेले अनुभव लेखकाने यामध्ये शब्दबद्ध केले आहेत.
राज वसंत शिंगे म्हणजे एक मनस्वी अवलिया चित्रकार. वर्षातील दोन महिने राहते घर बंद करून चित्रकार पत्नी माणिक यांच्यासह भारतातील कुठल्यातरी प्रदेशात वास्तव्य करून तिथला निसर्ग, लोकजीवन यांचा मनमुराद आनंद लुटत कलेची साधना करायची हा या पतीपत्नींचा गेल्या कित्येक वर्षांचा शिरस्ता आहे. ‘शांतिनिकेतन’ हे त्यांनी लिहिलेले ‘सृजनसंवाद’ प्रकाशित पुस्तक एप्रिल महिन्यात प्रकाशित झाले. ‘शांतिनिकेतन’ हे ललितरम्य लेखन म्हणजे शांतिनिकेतनमधील त्यांच्या २५-२६ वर्षांपूर्वीच्या दोन महिन्यांच्या वास्तव्याचे अद्भुत चित्रकाव्य आहे. शांतिनिकेतनमध्ये राहून, तिथल्या निसर्गात रमून तेथील सानिध्यात माणिकने रंगरेखा चितारल्या व राज यांनी टेराकोटा मातीकाम, काही शिल्पे तयार केली व हे सर्व राहत्या घरी सांभाळून आणले, त्या मनोरम जगण्याचा हा ललितरम्य प्रवास आहे.
शांतिनिकेतनमधील काचमंदिर, वस्तुसंग्रहालय व इतरही सर्व वस्तू गुरुदेव रवींद्रनाथांच्या स्पर्शाने पावन झालेल्या. या भूमीत प्रत्येक ऋतू म्हणजे एक आनंदसोहळाच. लेखकाला महत्त्वाचे वाटले ते सुंदर जगण्याच्या व जगू देण्याच्या विचाराने प्रेरित होऊन, मानवतावाद इथे रुजावा, टिकावा म्हणून गुरुदेवांनी असंख्य झाडे लावली. प्रत्येक कणाकणाला निसर्गाच्या स्पर्शाने न्हाऊ घातले. शांतिनिकेतनचे हे वर्णन अतिशय लाघवी आहे. निसर्ग तेथे बोलतो, वावरतो, चराचरात भरून राहतो अशा मनभावन वातावरणात हे दोघे कलावंत रमले.
राज यांनी तिथल्या कष्टकरी लोकांचे वर्णनही छान केले असून गुरुदेवांच्या शिष्या राणी माँ, राणी माँ चा मुलगा अविजित, सोबतीला ‘डेबरा’ कुत्रा यांचे चित्रणही मनोज्ञ आहे. ह्या लेखनातील बंगाली भाषेचा अंगभूत गोडवा जवळीक वाढवणारा आहे. इथे शिकणारे विद्यार्थी वृद्धांना मदत करणारे, उपयोगी पडणारे, तेथे राहून काम करणारे आहेत. हा जो मानवतावाद गुरुदेवांनी रुजवला त्याचे लोभस दर्शन येथे घडते. मानवतेला सहज स्पर्श करणे म्हणजे काय हे जाणण्यासाठी ‘शांतिनिकेतन’ची ही पुस्तकरूपी सैर जरूर कराच! केवळ ८० पानांच्या या छोटेखानी पुस्तकातून तुम्हाला शांतिनिकेतन चा मन समृद्ध करणारा निसर्गानुभव घेता येईल. हे पुस्तक मागवण्यासाठी लेखक लेखक राज शिंगे यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. 9967679110
Related
Please login to join discussion